शिक्षण व्यवस्थाच नापास...

सध्या आपल्या अवतीभोवती पाहिले तर आपण प्रत्येकानेच स्वतःभोवती एक कुंपन घातले आहे. त्या कुंपनाचा परिणाम म्हणून माझा भवताल सुरक्षित झाला आहे, पण माझ्या भोवताल मध्ये नसलेल्यांचे काय? हा प्रश्न पडत नाही. तो जर पडणार नसेल आणि मी माझी मुक्ततता एवढाच विचार करत असू तर याचा अर्थ शिक्षणाचा मानवी हदयावरती परिणाम झालेला नाही असेच म्हणावे लागेल. शिक्षणाने प्रत्येकाला उंच भरारी मारण्याची शक्ती देण्याची गरज असते... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
शिक्षण व्यवस्थाच नापास...

शिक्षण घेतलेली माणंस अधिक बंधमुक्त असायला हवीत. मात्र आपल्या अवतीभोवती आपण जे पाहातो त्यामध्ये शिकलेली माणंस अधिक बंधयुक्त असल्याचा अनुभवास येतो. गांधीजीनी म्हणत असे की “ मुक्त करते ते शिक्षण”. मुक्त होण्यासाठी चिंतनाची जशी गरज आहे त्याप्रमाणे विचाराचे आचरणही महत्वाचे ठरते.

माणसांच्या हदयातून जो विचार असतो त्या विचाराच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला तर माणंस अधिक विकास पावत असतात. मात्र बाहेरून लादलेल्या विचाराने माणंस अधिक बंधयुक्त होतात. त्यांच्यात सामावलेली नैसर्गिक उर्जा संपुष्टात येण्याचा धोका वाढतो.नव्याने शिक्षणातून जे काही लादले जाते त्यातून शक्ती मिळते पण ती शक्ती अत्यंत मर्यादित असतेही हेही सिध्द झाले आहे. त्यामुळे व्यक्ती जीवन समृध्दतेच्या वाटेने चालण्याऐवजी चाचपडतच चालत राहाते. त्याबंधयुक्त प्रवासामुळे माणंस स्वतःचा विकास कुंठीत करत जातात .शिक्षण हे केवळ स्वतःच्या विकासापुरता विचार करण्यास शिकवत नाही. अवघा समाज शोषण मुक्त असावा म्हणून भूमिका घेण्यास भाग पाडत असते. त्या मुक्ततेच्या विचाराला राष्ट्राच्या सिमा,जात,धर्म,पंथ यांच्या सिमारेषा देखील उरत नाही. शिकलेली माणंस जेव्हा मी आणि माझे एवढाच विचार करतात तेव्हा ते शिक्षण अपयशी असते.

सध्या आपल्या अवतीभोवती पाहिले तर आपण प्रत्येकानेच स्वतःभोवती एक कुंपन घातले आहे. त्या कुंपनाचा परिणाम म्हणून माझा भवताल सुरक्षित झाला आहे, पण माझ्या भोवताल मध्ये नसलेल्यांचे काय? हा प्रश्न पडत नाही. तो जर पडणार नसेल आणि मी माझी मुक्ततता एवढाच विचार करत असू तर याचा अर्थ शिक्षणाचा मानवी हदयावरती परिणाम झालेला नाही असेच म्हणावे लागेल. शिक्षणाने प्रत्येकाला उंच भरारी मारण्याची शक्ती देण्याची गरज असते. आज आपले शिक्षण “मी” च्या पुढे जातांना दिसत नाही. प्रत्येक जन जीवन प्रवासाचा समृधद् आनंद शोधण्या ऐवजी स्वतःचा तात्पुरता आनंद शोधत आहे.

स्वतःला आनंदाच्या वाटा तात्पुरत्या किंवा दिवसासाठी पुरतात, पण त्या पलिकडे जीवनाच्या वाटांचा शोध सातत्याने घ्यावा लागतो. जीवन आनंदाच्या वाटा निसर्गातच असतात. पण तो निसर्ग पाहाण्याचे, जगण्याचे ,अनुभवण्याचे शिक्षण वर्तमान शिक्षणात नाही. वर्तमानातील शिक्षण पाठयपुस्तकाच्या सिमा ओलांडत नाही. पाठयपुस्तकात असलेला आशय़ जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न होत नाही.त्या आशयाला स्वतंत्र्यपणे पाहाण्याची वृत्ती विकसित न झाल्यांने जगणे आणि शिक्षण यांचा संबंध फारसा उरलेला दिसत नाही.त्यामुळे शिकलेली माणंस मार्काच्या उंचीवर पोहचतात पण जगण्याची उंची हरवतांना पाहावयास मिळते.याचे कारण शिक्षण जीवन प्रवास सुखरूप करण्यासाठी मदतीचा विचार पेरत नाही. मुळात जीवनाचा शोध लागत नसेल तर ते शिक्षण काय कायमाचे ? शिकता शिकता आपण आपल्या भोवताल देखील जाणत नाही. पुस्तकातील शब्दांच्या पलिकडेचे शिकणे होताना दिसत नाही.

जीवनातील प्रश्न आहेत पण ते पुस्तकातील पाठात नाहीत आणि असले तरी ते परीक्षेला नाहीत.जे अखंड जीवनाला उपयोगाचे असते हे लक्षात कोण घेते ? निसर्गांशी नाते बांधण्याकरीता, संवादाकरीता, जाणून घेण्याकरीता लागणारी संवेदना पेरण्यात अपयश आले का ? असा प्रश्न पडतो. आपले शिक्षण जीवनाच्या उध्दाराची भाषा करीत नाही, तर केवळ उद्यापुरता विचार करायला शिकविते. त्यातून आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला नोकरी मिळते, व्यवसाय करता येतो.त्यासाठी शिक्षण उपयोगी पडत असेल पण इतके सारे झाल्यानंतरही जीवन आनंदाचे काय ? असा प्रश्न उरतोच. आपल्या व्यवसायात, नोकरीत आपण समाधानी असतो का.. ? समाधान मिळत नसेल तर आपल्याला आपला आतला आवाज आणखी काही सांगू पाहात आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपण व्यवयाय करतो पण त्या व्यवसायात प्राप्त केलेल्या कौशल्यावंरती आपण यंत्रासारखे काम करतो. त्यात आंनद किती मिळतो ? ते जीवनाचे अंतिम ध्येय आहे काय? याचा विचार करण्याची गरज आहे. आपले जीवन यांत्रिक बनून जाते. नोकरी, व्यवसायाचे निमित्ताने आपण चालत राहातो पण ते चालणे आनंददायी असते का ? हा प्रश्न आहे. याचे कारण चालतांना आपल्या अवतीभोवती निसर्गातील अनेक गोष्टी आहेत.

झाडे,वेली,फुले,पक्षी,प्राणी,ओढे नाले,डोंगर,पर्वत आहेत.या सर्वांमध्ये प्राण भरलेला आहे.त्यांच्याशी बोलण्याची,निरिक्षण करण्याची ,अनुभवण्याची संधी आपण कधीच मिळवत नाही. माणंस जेव्हा शिक्षित होताता तेव्हा ते अधिक संवेदनशील बनण्याची गरज असते.संवेदना असेल तर ते निसर्गाशी बोलत राहातात.त्यांना निसर्गातील प्रत्येक गोष्ट खुणावत राहाते.पहाटे अंगणात येणारी कोकीळा जे काही गाते तो तिचा सुस्वर देखील मनाला मोहिनी घालत असतो.त्या स्वरातही आंनदाचे भरते आहे. झाडाला लागलेली फुले आणि त्यांचे रंग,आकार,गंध,फळ या गोष्टी देखील त्यांना खुणावतात असतात. आकाशाकडे , क्षितीजाकडे पाहात त्यातील बदलांचे निरिक्षण करीत आनंद मिळवित राहाणे घडत जाते. पण त्या करीता संवेदना जोपासाव्या लागतात. आकाशाचे बदलणारे रंग संवेदनशील माणंसाला अधिक खुणावत असतात..आणि तोही माणूस निसर्गाशी बोलत राहातो.

प्राचीन काळात आपल्याला अनेक विद्वान माणंस समृध्दतेचे वाटचाल करतांना दिसतात याचे कारण ती माणंस निसर्गासोबत जगत होती.त्यांचा हा प्रवास त्यांना सत्याच्या आणि बंध मुक्ततेच्या विचारापर्यंत घेऊन जात होता.त्यांना निसर्गाशी बोलावे वाटत होते. मनापासून ते निसर्गातील विविध घटकांशी बोलत होते. अनेक शहाणी असलेला माणंस झाडांशी,नद्याशी बोलत असलेले आपण वाचतो.कारण निसर्ग त्यांना प्रेरित करीत असतो. आज असे काही घडतांना दिसत नाही.आपला संवाद हरवला आहे. जिथे माणंसा सोबतचा संवाद हरवला आहे तेथे यंत्राशी खेळणे मात्र वाढले आहे.यंत्राच्या मदतीने माणंस संवादित करण्याऐवजी केवळ मुके शब्दांनी मुक्त होत संवेदना व्यक्त होतांना दिसत आहे.त्या यंत्राच्या मदतीने हदय संवेदना कमी होता आहेत का ? असा प्रश्न आहे.

कारण जे यंत्र माणंसाने माणंसाशी संवाद होण्यासाठी निर्माण केले त्यातून संवेदना वृध्दींगत होतील अशी अपेक्षा होती..पण त्यातून कदाचित मुक शब्दांचा संवाद वाढला असेल..पण संवेदनानी युक्त संवाद हरवत चालला आहे.एकाच ठिकाणी भावपूर्ण श्रध्दांजली आणि त्याचखाली अभिनंदन,वाढदिवसाच्या शुभेच्छा..हे कशाचे धोतक आहे. आज यंत्रात असलेला संवादात निर्मळता नाही,हदयाची भाषा नाही..त्यात अधिक सामावलेला आहे..तो समाजाचा दबाव..त्या संवादात आर्तता नाही..त्यामुळे यंत्र बनवलेल्या माणंसाला त्या यंत्राने यंत्रात रूपांतरित केले आहे.त्यामुळे आज शिक्षणावरती अधिक जबाबदारी आहे.

संवेदना निर्माण करण्यात शिक्षणाला यश मिळाले तर भवताल अधिक सुंदर बनेल. प्रितीने हदय भरून येईल.एकमेकाबददलचे नाते अधिक सहदयी बनेल.सहकार्याचा भाव उंचावेल. माणूसपणाच्या उंचीवर जाण्यासाठी प्रत्येकजन प्रयत्न करेल. स्पर्धेचा भाव संपुष्टात येऊन सहकार्याचा भाव वाढेल.द्वेष,मत्सर,फसवणूकीचा भावच मनात उरणार नाही.माणंसाबदददल जितकी प्रिती राहील तितकीच प्रिती निर्सगाविषयी देखील निर्माण होईल.मग झाडे लावा,झाडे तोटू नका असे सांगावे लागणार नाही.

मनात केवळ निर्मळता,प्रेम आणि सहकार्य,संवेदनाच साठून भरलेल्या राहतील.असा माणूस ही जीवनभर आनंदाने प्रवास करीत राहील.इतकी निर्मळता अंतकरणात असेल तर दुस-याचे भलेच चिंतणार ..त्या माणंसाच्या हातून वाईट कसे घडेल..ही भावना म्हणजे ज्ञानेश्वराच्या पसायदानातील भाव आहे.त्यांच्या हदयात जो जो वाछिंल ते तो लाभो..किंवा दुरितांचे तिमिर जावो..विश्वस्वधर्म सूर्य पाहो..या भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्याचे काम शिक्षणाचे असते.ते जोवर होत नाही तोवर मानवी जीवनही सुखी होणार नाही आणि समाजही .अशा भावना निर्माण होणे याचा अर्थ जीवन मुक्ततेच्या दिशेचा प्रवास आहे.शोषनमुक्त समाजाच्या दिशेने जाणे आहे.

आपण शिक्षणाचा संबंध जोपर्यंत मर्यादित अर्थान घेत राहू तोपर्यंत जीवनात आनंद मिळणे कठिण आहे. शिक्षण आणि जीवन यांचे नाते आहे.ते नाते अधिक घटट करण्यासाठी जोवर पावले उचलत राहू तोपर्यंतच शिक्षण बहरत राहिल अन्यथा शिक्षण निराशेच्या आणि कृतीशुन्यतेच्या दिशेने चालत राहील आणि जीवनही निराशेच्या छायेत सापडेल.त्यामुळे शिक्षणाने समृध्द विचार पेरण्याची गरज आहे.येथील मनुष्यबळाने देखील पाठयपुस्तकाचे बाहेर जात जीवनाशी शिक्षण जोडायला हवे.कृष्णमूर्ती म्हणाले त्या प्रमाणे शिक्षणात संवेदना नसेल तर समाज व राष्ट्र कसे निर्माण होईल..? आपण शिक्षणाचे यश अपयश केवळ विद्यार्थ्यांच्या पास आणि नापासा एवढयात मर्यादित अर्थाने मोजत असतो पण त्यापलिकडे जात व्यापक पातळीवर ते य़श अपयश मोजायला हवे.

तसे मोजले गेले तर शिक्षणाची व्यवस्थाच मोठया फरकाने नापास झाली असे म्हणावे लागेल.समाजातील गुन्हेगारी,फसवणूक,हिंसा, भ्रष्टाचार, पैशाची हाव, व्देष, मत्सर, विचारशुन्यता, विवेकचा अभाव ,भले न चिंतन्याची वृत्ती,ज्ञानापासून दूरावणे आणि खोटया मोहात स्वतःला गुंतवत खोटया खोटया प्रतिष्ठेत स्वतःला मशगुल करून ठेवणे हे शिक्षणाचेच अपय़श आहे. मी कोण आहे हे विसरत जात..आणि माणूसपणाच्या उंचीसाठी प्रवास करण्यापेक्षा खोटया आणि तत्वहिनतेचा प्रवास करण्याची मानसिकता निर्माण करण्यात मिळणारे यश हे शिक्षण नापास झाल्याचे धोतक आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com