Friday, April 26, 2024
Homeब्लॉगपुस्तकातून घडूदे मस्तके..

पुस्तकातून घडूदे मस्तके..

मे महिना सुरू झाला आणि नेहमी प्रमाणे शाळा बंद झाल्या. खरेतर गेले वर्षभर शाळा बंदच आहेत पण तरीसुध्दा मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शाळा बंद असल्यातरी शिक्षण सुरू होतेच. पण शाळा बंद करण्याची घोषणा केल्यामुळे तेही थांबणार होते. त्यामुळे मुलांच्या हाती दिड महिना सुटटी होती. तसेही सध्या लॉकडाऊन असल्यांने मुलांना घरा बाहेर पडणे शक्य नव्हते.

ग्रामीण भागात तर वर्तमानपत्रेही उपलब्धतेची अडचन होती. ग्रंथालय देखील बंद होतीच. त्यामुळे मुलांच्या हाती आनंदासाठी, मनोरंजनासाठी कोणताही पर्याय नव्हता. या कालावधीत मुलांसाठी फक्त दूरदर्शन आणि भ्रमणध्वनी उपलब्ध असणार होते. त्यात मुलांच्या या वयाला अनुरूप व त्यांना भावनारे, प्रत्यक्ष शिक्षणांला उपयोगी पडेल असे काही उपलब्ध करून देण्याचा विचार करण्याची गरज होती. त्यासाठी बालवाचनालयाची कल्पना पुढे आली होती.

- Advertisement -

संगमनेरच्या जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून बालवाचनालयाच्या विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्याचा विचार सुरू होता. त्याच वेळी ऑनलाईन पुस्तके उपलब्ध करून देण्याचा विचार आमदार सुधीर तांबे यांच्या सोबतच्या चर्चेत पुढे आला होताच. त्यामुळे तो विचार या काळात मुलांच्या विकासाला मदत करणारा ठरणार होता म्हणून तो राबविण्याचा निर्णय घेतला. या काळात मुलांसाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध व्हावीत याकरीता पुस्तकांचा शोध सुरू झाला. हळूहळू पुस्तके हाती मिळत गेली. मात्र या प्रकल्पाची व्याप्ती किती असावी याबाबत फारसे काही ठरले नव्हते मात्र आरंभी फक्त संगमनेर मधील सह्याद्री माध्यमिक व प्राथमिक शाळेपुरते राबविण्याचा विचार पुढे आला होता. मात्रा चांगला उपक्रम असेल तर तो विस्तारीत करायला हवा ही बाब लक्षात घेऊन व्हाटसअपच्या माध्यमातून लिंक शेअर करण्यात आली.

बालशिक्षणांच्या दिशेने…

अगदी पहिल्या दहा मिनिटात पहिला गट पूर्ण झाला आणि पाहाता पाहता दहा व्हॉटसअप समूह पूर्ण झाली. या समूहाने राज्यातील बहुतांश जिल्हे व्यापले होते पण त्या पाठोपाठ जर्मणी, अमेरिकेतून काही पालक सहभागी झाले. राज्याबाहेरूनही मराठी कुंटुबानी प्रतिसाद दिला. त्यामुळे हा वाढता प्रतिसाद लक्षात घेता जबाबदारी अधिक वाढली होती. त्यामुळे रोज मुलांना पुस्तके देण्याच्या बरोबर ती निवडण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागत होती. रोज मुलांसाठी अनेक पुस्तके वाचायची, पुस्तकातील विषय, भाषा, विद्यार्थ्यांचा कल, चित्र आणि चित्रांचे आकार यासारख्या अनेक गोष्टींचा विचार करून ती पुस्तके रोज समूहावरती सकाळी टाकली येत होती.

आरंभी एक आठवडा केवळ मराठी भाषेपुरता असलेल्या विषयांची पुस्तके, शिक्षक, पालकांच्या विनंतीनंतर इतर भाषेतील देखील पुस्तके देखील उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू झाला. त्या पाठोपाठ इंग्रजी आणि हिंदी भाषेतील पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. त्याचवेळी विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी जशी पुस्तके दिली जात होती त्याप्रमाणे ऐकण्यासाठी कोल्हापूरच्या शिक्षिका सुरेखा कुंभार, सविता घुले यांनी निवडलेल्या कथा, गोष्टी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवाजात उपलब्ध करून देण्यात आल्या. गोष्टरंग म्हणून प्रा.अर्चना भांडारकर यांनी ध्वनीचित्रीत केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून निवडक गोष्टी देखील उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी सुटटीत मिळाली. सर्व माध्यमांतून मनोरंजन करण्यासाठी ही प्रकल्प सुरू केला. त्यास भरभरून प्रतिसाद मिळत होता.

ही पुस्तके अनेक शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक यांनी आपल्या वर्गांच्या शाळांच्या गटावरती फॉरवर्ड करीत अनुषंगिक वेगवेगळे उपक्रम हाती घेतले होते. सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचल्यानंतर त्यांनी कोणती पुस्तके वाचली? त्या पुस्तकातील काय आवडले? त्या पुस्तकाबददल थोडक्यात मत व्यक्त करण्यास, नोंदी करून विद्यार्थी रोज शाळेच्या गटावर पाठवत होते. काही विद्यार्थी आशयाला अनुरूप असे चित्रांचे रेखाटन करीत होते. सांगली जिल्हयातील संगीता शहा या मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचा भाग बनत त्यांच्या विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांच्या आधारे पुस्तका बददलचा अभिप्राय दर्शित करण्यासाठी चित्रफिती बनविण्यास सांगितल्या होत्या आणि दर शनिवारी त्या समूहावरती टाकण्यास सांगितल्या. खरेतर गटातील अनेक शिक्षकांनी वेगवेगळ्या पध्दतीने हा उपक्रम राबविला आहे.

शिक्षकीपेशाची चालता वाट..

या प्रकल्पाअंतर्गत वाचनाचे कौशल्यांचा विचार अधिक गंभीरपणे केला जावा, यासाठी व्याख्यांनाचे नियोजन करण्यात आले होते. आरंभी राज्यातील प्रयोगशील ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ.शकुंतला काळे यांनी वाचनामुळे जीवनात झालेल्या परिवर्तनाचा प्रवास अधोरेखित केला. त्याच बरोबर बालसाहित्यिक व प्रयोगशील शिक्षक फारूक काझी यांचे पुस्तके कशी वाचायची असतात यावर मान्यवरांची व्याख्यान आयोजित करण्यात आली. खरेतर पुस्तके मुलांच्या आय़ुष्यात आली तर चित्र बदलेल. शिक्षणामुळे माणंस शहाणी होता की नाही हे वर्तमानातात आपण अनुभवत आहोत. शिक्षणाची उददीष्टे फारशी साध्य होतांना आपल्या भवताल मध्ये दिसत नाहीत. त्यामुळे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी म्हटले होते की “ज्यांची मस्तके पुस्तके घडवितात ते कोणाच्या चरणावर नतमस्तक होत नाही” या त्यांच्या विचाराचा पाठलाग आपण करत जातो तेव्हा त्यामागील शक्ती अधोरेखित होते.

पुस्तके वाचने म्हणजे केवळ शब्द वाचने नाही, तर त्यामागील भाव वाचने आहे. त्यातून विचाराची वृध्दी होणे असते. पुस्तके वाचने म्हणजे विवेकाची पेरणी असते. पुस्तके वाचत असतो तेव्हा केवळ शब्द वाचणे नसते तर त्या शब्दांचा अर्थ जाणून घेणे असते. त्यामुळे पुस्तके विवेकाची पेरणी करतील तर माणंस अधिक विवेकशील बनतील. त्या विवेकातून शहाणपणाची पेरणी होईल. शहाणपण अंगी आले तर स्वतंत्र्य नागरिक म्हणून जगण्याची हिम्मत मनगटात येईल. योग्य आणि अयोग्य यांच्यातील नेमका दृष्टीकोन विकसित होईल. चिकित्सक, सर्जनशील, विश्लेषनात्मक वृत्ती विकसित होण्यास मदत होईल. अनेकदा आपणच आपल्यावरती अन्याय करीत असतो. समाजातील पंरपराचे पालन करतांना त्याचा होणार विपरित परिणामाने आपणच कितीतरी भोगत जातो. त्यामुळे जीवनाचा आनंद गमावून बसतो. अनेकदा आपण विवेकांने विचार करणे टाळतो. त्यामुळे जीवनातील दुःखाचे कारण आपण आणि आपली विचारधारा असते. पुस्तके अन्यायाच्या विरोधात उभे राहाण्याची शक्ती मस्तकात भरत असतात. पुस्तकांनी पेरलेल्या विचारमुळे अन्यायाच्या विरोधात चिड निर्माण होईल. त्यामुळे समाजात आज दिसणा-या लाचा-यांच्या फौजा आपोआप कमी होतांना पाहावयास मिळतील.

समाजात आज आपण माणंस जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माणंस म्हणून जगणारी माणंस खरच माणंस आहेत का? असा प्रश्न पडतो. कधीतरी एखादे गाणे आपण ऐकत जातो, त्यात म्हटले की माणंसा माणंसा कधी होशील माणूस.. हा प्रश्न अस्वस्थ करीत जातो. आपण माणंस बनण्याचा प्रवास थांबविला आहे का? असा प्रश्न असतोच. आपण गेले अनेक वर्ष शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. पण त्या शिकण्यात फक्त साक्षरता आहे, याचे कारण शिक्षणांचा संबंध केवळ पाठयपुस्तकाशी आहे. त्या पलिकडे एक मोठे जग आहे ते समजावून घेण्यासाठी, उघडे आकाश समजावून घेण्यासाठी, भवताल समजावून योग्य पाऊलवाट निर्माण करण्यासाठी पुस्तके मदत करतातच. मुले वाचत नाही असे म्हणून मोठी माणंस त्यांच्याप्रति नाराजी व्यक्त करतात पण त्यांची वाचनाची भूक भागविण्यासाठी मोठी माणंस किती प्रामाणिक प्रयत्न करतात हा खरा प्रश्न आहे. मोठी झालेल्या प्रत्येकाला मुलांवर काही लादायला आवडते, त्यातच प्रत्येकाला संस्कार करण्याची प्रचंड घाई आहे.

चित्र वाचूया… शिक्षण करूया…

आपणाला प्रत्येक मुलांच्या उद्याच्या भविष्यात त्याला काही म्हणून पाहाण्याची दृष्टी आहे. मग आपण त्याला त्या दिशेने घडविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. त्या प्रयत्नात मुलांना जाणणे नसते, त्यात त्यांचे भावविश्व समजावून न घेता केवळ पुस्तके लादणे असते. या प्रयत्नाने वाचनाची अभिरूची विकसित होण्याऐवजी पुस्तकांपासून मुले दुरावतात. खरेतर पुस्तके मुलांना वाचायची असतात तेव्हा त्यांनी ती कशी हवीत याचा विचार त्यांनाच करून द्यायला हवा. त्यांना किंमान आरंभी तरी वाचण्यासाठी मोकळे आकाश द्यायल हवे. मगच पुस्तकाशी नाते जुळण्याची शक्यता आहे. या निमित्ताने मुलांना वाचनाची भूक आहे.. पण ती भूक भागविण्यासाठी त्यांना आवडणारी, हवी असलेली पुस्तके त्यांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मोठयांनी लादलेली तर अजिबातच नकोत. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन शाळा व समाजाने वाचन संस्कृती विकसित करायची म्हणून काही लादण्याऐवजी त्यांना त्यांचा वाचनाचा मार्ग अनुसरून देण्याची गरज आहे. त्यांच्या स्वातंत्र्यातच स्वतंत्र्य विचारधारेचा नागरिक दडला आहे. असा नागरिकच देशाची लोकशाही आणि देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेऊ शकणार आहे. अनुकरण प्रियता आणि विचारशुन्यता माणंसाना भक्त बनवेल पण त्यात व्यक्तिमत्वाचा अंश असणार नाही. स्वतंत्र्य विचाराने नागरिक मतभेदावरती जातील पण त्याचे मनभेदात रूपांतरण होणार नाही. ती मतभेद म्हणजे ज्ञानाचा प्रवास आहे. असा प्रवास घडेल तर देशाला अधिक संपन्न नागरिक मिळतील आणि देश ज्ञानाच्या दिशेचा प्रवास सुरू करेल.. गरज फक्त छोटया छोटया प्रयत्नांची… आणि गरजे प्रमाणे प्रकाशबेट निर्माण करण्याची.

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या