आधी स्वतःकडे पहा..

jalgaon-digital
9 Min Read

खरेतर मुलांना घरात, शाळेत, समाजात तसे सन्मानजनक स्थान फारसे कोणी देताना दिसत नाही. बालकांना आपण नेहमीच गृहीत धरीत असतो. त्यांना नेहमीच मोठयांच्या मनासारखे वागावे लागते. मोठयांनी सांगावे आणि बालकांनी ऐकावे असेच सारे सुरू असते. बालकांच्या संदर्भाने मोठयांना सर्व अधिकार अप्रत्यक्ष प्राप्त झालेले असतात.

मोठी माणसं हीच बालकांचे उध्दारकर्ते अशीच मोठयांची धारणा असते. मोठी माणसं स्वतःला सर्वव्यापी, सर्वव्यापक समजत असतात. मुलांना जगण्याचे, विचाराचे, वर्तनाचे, शिकण्याचे, खेळण्याचे, कोणत्या शाळेत जायचे, कोणता विषय शिकवायचे, कसे शिकायचे हे सारे अधिकार कायद्यांने त्यांना असले तरी प्रत्यक्षातही तसे अधिकार असायला हवे असतात; पण ते अधिकार अपवाद वगळता फार कोणाला कोणा बालकाला मिळत नाही. सारे काही मोठयांच्या कलाने आणि त्यांच्याच मनाने सुरू असते. मोठया माणसांमध्ये आपण सारे काही जाणतो अशी त्यांची जणू मोठयांची धारणा असते.

घर हीच शाळा…

त्यांच्या हितासाठीच आपण सारे काही करीत असतो असे सांगून आपणच हित कर्ते आहोत हे त्यांचे समर्थन असते. अध्यात्म्यात सारी चिंता देवाला असते अशी भक्तांची धारणा असते त्याप्रमाणे येथे बालकांची चिंता मोठयांना असते असेच मोठी माणसं मानतात. जणू बालकांसाठी मोठी माणंस म्हणजे देवाचे अवतार असाच जणू त्यांचा समज असतो. खरेतर पालक, शिक्षकांनी मुलांना जाणून घेण्याची गरज असते. पण त्यांना जाणून घेणे होताना दिसत नाही. आपण मुलांच्या भावभावनांचा, मनाचा आणि त्यांच्यात सुरू असणा-या अंतरिक संघर्षाचा जोवर विचार करीत नाही तोवर बालकांना जगण्याची समृध्द वाटच निर्माण होणार नाही.

आपण जीवनभर जगण्याचा प्रवास करीत असतो तेव्हा आपले कोणी तरी ऐकायला हवे, आपला आदर करायला हवा. सारेकाही आपल्या मनासारखे व्हायला हवे. आपण सांगू तेच अंतिम असायला हवे असे वाटत असते. घरात काय आणि समाजात काय हिच धारणा नेहमीच मोठयांची असते. तसे वाटणे काही चूकीचे नाही. मात्र आपणाला जे काही वाटते आहे तसा विचार बालकही करीत असणार ना! त्यांनी मोठयांप्रमाणे विचार केला तर त्यांचे काय चुकले? बालकांना स्वातंत्र्य देण्याची पंरपरा आपल्या व्यवस्थेत तशी नाहीच. त्यांना आपण कधीच स्वातंत्र्य देत नाही.त्यांना कोठे काय कळते ही आपली धारणा पक्की असते. अगदी मुलांना काय हवे आहे ? त्यांना हवे असलेले साहित्य अगदी सातत्याने त्यांच्यासोबत असणारे असले तरी तेही मोठयांच्या पसंतीचे हवे असते. आपण मोठी माणसं आपल्याला कोणती वस्तू आनंद देते त्यानुसार आपण त्या निवडत असतो. मात्र येथे तर बालकांना त्यांना लागणारी वही कोणती,पुस्तके कोणती हवी येथून मोठयांचीच निवड असते.

मैदानांची वाट हवी..

परवा आईने मुलीसाठी एक चित्रकलेची वही आणली तर तीच्या मलपृष्ठावर वॉटर कलरने रंगविलेले चित्र होते. ते चित्र पाहून मुलींने नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली “मला कार्टून हवे होते. फुले हवे होते ही काय चेटकिणीचे चित्र, मला नको वही” .खरेतर मुलांना आपण इतक्या साध्या गोष्टीत गृहीत का धरतो हा खरा प्रश्न होता. त्या वस्तू मुलांना जर उपयोगात आणायच्या असतील तर त्यांना त्या निवडू देण्याची स्वातंत्र्य देण्याजी गरज असते. त्यावरील चित्रात त्यांची अभिरूची दडलेली असते. प्रत्येक मुलाला काहीतरी हवे असते. कोणाला प्राणी हवे असतात, कोणाला पक्षी,तर कोणाला कार्टून हवे असते. मात्र मोठयांना संस्कारांची इतकी घाई झालेली असते की त्यांना सुविचाराच्या वह्या हव्या असतात. त्यावर त्यांना काहीतरी संदेश दिलेला हवा असतो. आपण मुलांचे वय, त्याच्या वयाला अनुरुप अभिरूची याचा कधीच विचार करीत नाही.त्यांच्या मनाचा विचार न करता आपला प्रवास सुरू असतो.

आपल्याला त्यांच्या हिताची काळजी असतेच. मात्र त्या हिताची काळजी वाहताना बालकांना विकासाच्या संधी नाकारणे घडते. आपण एका अर्थाने सातत्याने बालकांवरती काही लादत असतो. ते लादने आपल्यासाठी कितीही आनंददायी असले तरी त्यांच्यासाठी निराशाजनक असते हे लक्षात घ्यायला हवे. त्याला गृहीत धरून चालणे यात आपण स्वतःलाच देवासारखे सर्वस्वी समजतो. खरेतर आपण देव नसतोच.आपल्याला कोठे सर्व अधिकार असतात. मात्र ते अधिकार घेऊन आपण मुलांशी वागताना स्वतःत काही बदल घडवायला हवेत. मात्र आपण जे नाकारायला हवे तेच नाकारत नाही. आपण मुलांशी संवाद करीत त्यांना जाणून घेण्याची गरज आहे. त्यांना माणूस म्हणून स्वातंत्र्य द्यायला हवे.मात्र असे करणे आपल्याला धोक्याचे वाटत असते.

तुम्ही फक्त इतकेच करा..!

अनेकदा मोठी माणसं चूका करीत असतात. तसे लहान मुलेही चुका करीत असतात. त्यांनाही चूका करण्याचा अधिकार असतो. मोठयांनी चुका केल्या तर त्या चूका का झाल्या याबाबत ते खुलासा करतात. अनेकदा मोठी चूक झाली तर मी माणूसं आहे. चूका होणारच असे सांगत आपल्या चूकांचे समर्थन करताना दिसतात. चूका केल्या तरी त्यांचे तात्वीक पातळीवर समर्थनही करतात. मोठयांना चूकांचे समर्थन करण्याचा अधिकार असतो अशी त्यांची समजूत असते. त्यांच्या समर्थनामधून त्यांच्या चूकांना माफी मिळते. मात्र एखाद्यावेळी मुलाने चूक केली तर ती का घडली? त्याबाबत मुलांना ऐकून घेणे फारसे घडताना दिसत नाही. त्यांना खुलासा करण्याची संधी मिळत नाही. बालकांनी जी चूक केली आहे त्या चूकांना माफी नाही. त्यांचेवरती कधी रागावणे घडते. कधीकधी हात उगारणे आणि कधीकधी मारझोड करणेही घडते. त्याच बरोबर कधी कधी त्यांच्याकडून अज्ञान व्यक्त झाले तर मोठी माणसं हसतात. ते हसणे मुलांच्या अंतकरणाला धक्का लावणारे असते.

मुलांचे अज्ञानाचा प्रवास त्यांना ज्ञानाच्या दिशेने घेऊन जाण्यास मदत करणारा ठरतो. मुलं हे अज्ञानी असतात, त्यांना ज्ञान प्राप्त करून देण्याच्या प्रवासासाठी मोठयांनी प्रवास घडवायचा असतो. ती मोठयांची जबाबदारी असते. मात्र आपण जेव्हा त्यांच्या अज्ञानाला हसतो असतो तेव्हा ते त्याला अपमानजनक वाटत असते मात्र खरा तर तो मोठयांचा पराभव असतो. आपण त्यांना जाणून घेण्यासाठी जे हदय लागते ते आपण मिळविलेले नाही, आपण स्वतःला विकसित करू शकलो नाही. त्यामुळे खरा पराभव तर आपलाच झाला असे आपण मानायला हवे. तसे झाले तर आपण बालकांच्या अज्ञानावरती हसण्याचा प्रश्नच निर्माण होण्याची शक्यता नाही.

आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

आपण सर्व शक्तीमान असत नाही.आपल्याला जगातील सर्व काही येते असे होत नाही. खरेतर आपण जीवन व्यवहारात ज्या ज्या गोष्टी करतो, हव्या असतात त्यातील येणा-या गोष्टी आणि न येणा-या गोष्टी यांची यादी केली तर आपल्याला न येणा-या गोष्टींचीच सूची खूप मोठी आहे. त्यातही करता येत असूनही न करणा-या गोष्टी कोणत्या याचीही सूची बनविली तर आपण बरेच काही करत नाही हे लक्षात येईल. आपणाला जे येत नाही ते मात्र मुलांना आले पाहिजे हे म्हणणे काहीसे अन्यायकारक आहे. आपल्याला नाही आले तरी चालेल पण बालकांचे वय, अनुभव यांचा विचार न करता ते लादने म्हणजे बालकांवरती अन्यायकारक नाही का? आपण त्यांच्या आंतरिक कलाचा, अभिरूचीचा विचार न करता आपण त्याचेवरती बरेच काही लादतो. त्याच्या क्षमता न जाणता त्याच्यावर अन्याय करतो. त्याला अपयश आले, त्याला पालकांच्या अपेक्षे इतके गुण नाही मिळाले तर आपण त्यांच्यावरती चिडतो हे अन्यायकारक नाही का? आपल्याला जितके मार्क मिळाले नाही त्यापेक्षा अधिक अपेक्षा ठेवायच्या आणि पुन्हा मुलांवरती चिडायचे याला काय म्हणावे,आपल्या शैक्षणिक आणि जीवन प्रवासात आपण जर अपेक्षे इतके मिळविण्यात यशस्वी झालेलो नाही याचा अर्थ आपल्यातही काही कमतरता आहे.

याचा अर्थ आपल्याला ते येत नाही, आपल्याला त्यात रस नाही असे स्पष्ट सांगून मोकळे होतो. अनेकदा मराठीच्या शिकविणा-या शिक्षकाला गणिताचा प्रश्न विचारला तर उत्तर असते माझा मराठी विषय आहे. मला नाही जमणार गणित.. आपल्याला ते जमत नाही याचे कारण देऊन मोकळे होतो.. पण मुलाला तसे म्हणण्याचा अधिकार नाही. मी शिकतो..प्रयत्न करतो असेही त्याला म्हणता येण्याचा जणू अधिकार नाही. त्याला समजावून घेण्यासाठी आपण खरच किती प्रयत्न करतो हे महत्वाचे आहे. आपणही त्याला जाणून घेतले,त्याच्यातील उणीवा समजून घेतल्या तर मुलांच्या कमतरतेवर वैतागण्याचे काहीच कारण नाही. खरेतर आपण मुलांना जाणून घेणे फार महत्वाचे आहे. त्याकरीता फक्त स्वतःकडे सुक्ष्म नजरेने पाहण्याची गरज आहे इतकेच.. मुलांवरती रागवण्यापूर्वी मला हे येते का ? मला त्याच्या वयाचे असताना कळत होते का..? आपण रागावतो तेव्हा मला रागावलेले चालते का ? मी ज्या अपेक्षा करतो आहे त्या मी त्या विद्यार्थी दशेत पूर्ण करू शकलो का ? असे स्वतःलाच प्रश्न विचारावेत आणि मगच आपण वैतागायला हवे..इतकेच..

आपण मुलांना गृहित का धरतो?

त्या संदर्भाने गिजूभाई म्हणतात..

तुम्ही देव नाही, मग मुलाशी वागताना देव असल्या सारखे का वागता ?

तुम्ही सर्वज्ञ नाही, मग मुलांच्या अज्ञानाला का हसता?

तुम्ही सर्व शक्ती मान नाहीत, तर मुलांच्या असहायतेवर का चिडता?

तुम्ही काही परीपूर्ण नाहीत, मग मुलांच्या कमतरतेला का वैतागता?

आधी स्वतःकडे पहा आणि मग मुला कडे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *