पुस्तकांशी करूया मैत्री

पुस्तके का वाचायची हे जोवर मुलांच्या गळी उतरवले जात नाही तोवर ती वाचणार नाहीत. त्याच बरोबर त्यांच्यापुढे जी माणस सतत असतात त्यांच्या हाती सतत पुस्तके दिसली तर मुले वाचती होण्यास मदत होत असते. पुस्तके वाचल्यावर काय होते ही पुस्तके वाचनारी माणस पाहून मुलांना अधोरेखित करण्यास मदत होत असते. पुस्तके माणसात शहाणपणाची पेरणी करीत असतात. त्या शहाणपणातूनच जीवनाची वाट सुलभ होत असते.... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
पुस्तकांशी करूया मैत्री

शिक्षण हक्क कायद्याचे आस्तित्व आल्यानंतर कायद्याने शाळांसाठी पायाभूत सुविधांची गरज व्यक्त करण्यात आली. शाळा म्हणून त्या सुविधांची अनिवार्यता अधोरेखित करण्यात आली. त्यात अनेक सुविधांपैकी ग्रंथालय सुविधांची अनिवार्यता स्पष्ट झाली. शाळेत विद्यार्थी संख्या लक्षात घेता किमान काही प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता असणे आवश्यक असते. कायद्याने सक्ती करण्यात आली म्हणून काही शाळांनी पुस्तके आणून ग्रंथालय असल्याचे नमूद केले.

शाळांना ग्रंथालय आहेत मात्र त्यातील अनेक पुस्तके केवळ कपाटात ऱाखली जाणार असेल तर त्याचा उपयोग नाही. विद्यार्थ्यांपर्यंत ती पुस्तके सातत्याने पोहचली नाहीत तर ती पुस्तके केवळ शोभेच्या वस्तू ठरतील. पुस्तके म्हणजे विद्यार्थ्यांना फुलविणारी, बहरवणारी प्रेरक शक्ती असते. पुस्तके मुलांच्या भावविश्वाला समृध्द करीत असतात. मात्र शिक्षणात मुलांचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांची हाती अवांतर पुस्तके देण्याची गरज असते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी जे अनेक प्रयत्न केले जातात त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणून अवांतर पुस्तकांचे वाचन हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र आपल्याकडे शिक्षण प्रक्रियेत अवांतर पुस्तकांचे वाचन हे महत्वाचे मानले जात नाही. किंबहूना अवांतर पुस्तके वाचने म्हणजे टाईमपास, वेळेचा अपव्यय मानला जातो. त्यातून शिक्षणात अडथळा येईल अशीही अनेकाच्या मनात धारणा असते. मात्र शिक्षणातील आणि समाजातील असलेल्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यावर मात करण्याचा मार्ग म्हणून ग्रंथालयांचा विचार करता येईल.

पुस्तकांशी करूया मैत्री
मैदानांची वाट हवी..

समाजात शहाणपणाची पेरणी करण्यासाठी शाळा, महाविद्यालये,ग्रंथालये महत्वाची भूमिका बजावत असतात. यावरती होणारा खर्च म्हणजे खर्च नाही तर राष्ट्र व समाजाच्या विकासासाठी केलेली गुंतवणूक असते. आपल्याकडे मात्र अद्यापही ग्रंथालय, पुस्तके यांच्या बाबतील फारशी सकारात्मक भूमिका समाज आणि शिक्षणात दिसत नाही. शाळेत ग्रंथालय आहेत का? असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर एका अर्थाने नाही असेच असते.. पण शासनाचे निकष म्हणून त्याची पूर्ती करतांना शाळा दिसतात. ग्रंथालयाचे आस्तित्व शाळेसाठी आणि उद्याचा समाज म्हणून आपण घडू पहाणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे. शाळेचा दर्जा हा शाळेत असलेले ग्रंथालये किती समृध्द आहेत त्यावरच एका अर्थाने ठरत असतो. शाळेच्या इमारती किती सुंदर आणि देखण्या आहेत यापेक्षा तेथील ग्रंथालयाच किती पुस्तके आणि उत्तम दर्जाची पुस्तके आहेत हे महत्वाचे आहे.

शाळा आणि शिक्षकांना नेहमीच भेडसावणारा प्रश्न म्हणजे बेशिस्त आणि अभ्यास न करण्याची वृत्ती. मात्र शाळेने यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा वयोगट, अभिरूची, कल लक्षात घेऊन पुस्तके उपलब्ध करून दिली तर मुले वाचती होण्यास मदत होते. अशी वाचती मुले ज्या शाळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात त्या शाळेतील शिस्तीचा प्रश्न निर्माण कमी होण्यास निश्चित मदत होणार आहे. पुस्तके का वाचायची हे जोवर मुलांच्या गळी उतरवले जात नाही तोवर ती वाचणार नाहीत. त्याच बरोबर त्यांच्यापुढे जी माणस सतत असतात त्यांच्या हाती सतत पुस्तके दिसली तर मुले वाचती होण्यास मदत होत असते. पुस्तके वाचल्यावर काय होते ही पुस्तके वाचनारी माणस पाहून मुलांना अधोरेखित करण्यास मदत होत असते. पुस्तके माणसात शहाणपणाची पेरणी करीत असतात. त्या शहाणपणातूनच जीवनाची वाट सुलभ होत असते.

पुस्तकांशी करूया मैत्री
घर हीच शाळा...

पुस्तके म्हणजे ज्ञानासाठी उघडे आकाश अशीच ती धारणा असते.खरेतर पुस्तकात काय नसते...? तर जगात जे जे म्हणून काही आस्तित्वात आहे ते आपल्याला पुस्तकात सामावलेले पहावयास मिळते. पुस्तके वाचत जातो त्याप्रमाणे त्या त्या विषयांची जाणीव अधिक खोल बनत जाते. पुस्तके वाचता वाचता आनंदाचे भरते येते. त्याचप्रमाणे ज्ञानाची प्रक्रिया होण्यास मदत होत असते. पुस्तकांमुळे भोवताल अधिक समृध्दतेने कळत जातो. वाचना-याचा विवेक उंचावत जातो. माणसांच्या आय़ुष्याची सार्थकता कशात आहे हे जाणता येते. पैशापेक्षा ज्ञानाच्या श्रीमंतीची भूक वाढत जाते. पुस्तके वाचता वाचता माणस वाचनासाठी लागणारे समजपूर्वक वाचनाचे कौशल्य प्राप्त करतात. अनेकदा वाचना-यांच्या प्रवृत्तीत देखील बदल घडवून य़ेतो. पुस्तकांमध्ये शक्ती आहे माणसांना बदलविण्याची. सुधा मूर्ती यांचे पुस्तक वाचल्यानंतर केवळ मुलीच्या पायावरती पांढरा डाग आहे म्हणून विवाह नाकारणारा तरूण सहदयतेने तीच्याशी विवाह करण्यास तयार होतो. असे परीवर्तन मुलांच्या मनात घडत जाते.

आपल्या भोवताल मध्ये घडणा-या घटनांचे वास्तव समोर येण्यास मदत होते.एकाच विषयावरती अनेक पुस्तके उपलब्ध होतांना त्यात विविध दृष्टीकोण मांडला जातो पण त्यातून गोंधळाची स्थिती निर्माण झाली तरी वाचनाने प्राप्त झालेल्या विवेकाने योग्य अर्थ लावण्यास निश्चित मदत होते. लोकशाही विकासासाठी आपण ज्या व्यक्ती आणि समाजाची अपेक्षा करतो तो शिक्षणातून अपेक्षित केलेला आहे.तसे नागरीक फारसे निर्माण करण्यात येथील शिक्षण संस्थाना य़श आलेले नाही हे वास्तव आहे.त्याचे कारण मस्तके पुस्तकांनी घडलेली नाहीत. लोकशाहीसाठी उदार अंतकरणाची, विचाराचा संघर्ष विचाराने करणारी,विचाराचे मतभेद असली तर मनभेदात रूपांतर न करणारी माणस हवी असतात. दुस-याच्या विचाराचे स्वागत करण्याइतकी उंची त्या मनात असायला हवी असते. ती व्यवस्था पुस्तकाच्या वाचनातून समजण्यास मदत होते. समाजात शांतता प्रस्थापित करण्याबरोबर संघर्ष कमी करण्यासाठी लागणारे शहाणपण पुस्तकातून मिळत असते. आपला दृष्टीकोन समृध्द करणे, कधी कधी आपल्याला जसा विचार आहे त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीचेही विचार आहेत.

पुस्तकांशी करूया मैत्री
तुम्ही फक्त इतकेच करा..!

आपला दृष्टीकोन कोणावरती न लादता सदसदविवेकाने निर्णय घेण्यासाठी लागणारे शहाणपण तेथूनच येते. माणंसाच्या उंची समजून घेता येतात. आपल्याला पुस्तकातून समाज व राष्ट्र निर्माण करणा-या माणसांचा संघर्ष कळत जातो.त्यांनी स्वतःला सिध्द करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहिले की वाचना-या माणसाला देखील शक्ती मिळते. अनेकाचे दुःख वाचता वाचता आपल्या दुःखाचा विसर होत जातो. आपल्याला जगण्यासाठी लागणारी उर्मी पुस्तकातून मिळत जाते. आपल्याला जगण्यासाठी लागणारा चार्म पुस्तकातून मिळत जातो. शब्दांच्या प्रेमात पडणे घडल्याने नवनिर्मितीची वाट सहज मोकळी होते. त्यातून आस्तित्वाच्या खुणा निर्माण करता येतात.कधीकाळी आपल्या समाजात आकाशा एवढी उंचीचे माणसे होती.. एक एक माणूस म्हणजे एक विद्यापीठ होते. अनेकानी आपल्या ज्ञानाच्या जोरावरती देशाची प्रतिमा बदलविली. हे जेव्हा वाचनातून विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल. तेव्हा आपल्या देशाबददलचा अभिमान निश्चित उंचावलेला दिसेल. राष्ट्रप्रेम विकासाची प्रक्रिया आणि मार्गही ग्रंथालयाच्या माध्यमातून जात असतो. आपणही आपल्या देशासाठी काही करावे या भावनानी वृध्दींगत होण्यास मदत होत असते.

पुस्तकातील स्वातंत्र्यसैनिकाचा संघर्ष वाचल्यानंतर आपल्या देशाचे स्वातंत्र्य सहजपणे मिळालेले नाही. हे जाणवत रहाते. त्यासाठी अनेकानी बलीदान केले आहे. आपण आज स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत. ते अनेकांच्या बलीदानाने प्राप्त झाले आहे ते आपण अधिक जपूण उपभोगण्याची गरज असल्याची जाणीव होत रहाते. आपल्या भोवताल मध्ये ज्या घटना आपण पहातो त्या घटनांनी नकारत्मकता येते. मात्र तरीसुध्दा सारे काही बिघडलेले नसते याची जाणीवही होत रहाते. आपल्यातील सकारात्मकता उंचावण्यास मदत होते. कधीकधी मनावरती येणारे निराशेचे मळभही हाती येणा-या पुस्तकातून दूर होण्यास मदत होत असते. त्यातून अनेक गोष्टींचे मोठेपणही जाणवत रहाते. लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज, राजे सयाजी महाराज गायकवाड, महात्मा गांधी, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, लाल बहादूर शास्त्री ही माणस आपण जशी वाचत जातो त्याप्रमाणे राजकीय लोकांच्या प्रति असलेली तिरस्काराची भावना देखील कमी होत जाते.

पुस्तकांशी करूया मैत्री
आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

कधीकधी वर्तमानातील माणस खुजी देखील वाटायला लागतात. सारे काही बिघडलेले नसते.ही दृष्टी निर्माण होण्यास मदत होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकाच्या कथा वाचतानाही आपले मन भरून येते. त्यांच्याप्रति असलेला आदर अंतरमनात कोरला जातो. मग वर्तमानात राजकारणी राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमाचा करीत असलेला उपयोग पाहून विवेकाने निर्णय घेण्याची बुध्दी वाचकांना होते. त्याच प्रमाणे विज्ञान, इतिहास, आरोग्य यासारख्या अनेक क्षेत्रातून आपल्याला त्या त्या क्षेत्रात नेमके काय सुरू आहे याची होणारी ओळख आपल्याला धक्क करून सोडते. जग किती प्रचंड मोठे आहे. ज्ञानाचा प्रचंड मोठा सागर आपल्या भोवताल मध्ये आहे. आपण त्यात तर कोठेच नाही ही शुन्यत्वाची जाणीव होते. पुस्तके माणसाला सतत जमिनीशी नाते ठेवण्यास भाग पाडतात. पुस्तके वाचनारी माणसांचा प्रवास अंहकार शुन्यतेच्या दिशेने होण्यास मदत होते असे अनेक वाचकांनी आपले अनुभव लिहिले आहे. आपल्याला चांगला माणूस बनविण्याचा पुस्तक वाचन हा प्रवास आहे.

ग्रंथालयामुळे मुलांचे शिकणे प्रभावी होते. पुस्तके हाती पडली तर मुलांच्या वाचन कौशल्यात निश्चित वृध्दी होताना दिसते. विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढण्यास मदत होत असते. अवांतर पुस्तकातून मुलांना जे काही वाचायला मिळते त्यातून मुलांना अभ्यासक्रमाशी संबंधित अनेक गोष्टी शिकण्यास मिळत असल्याचे पहायला मिळते. व्यापक दृष्टी विकसित होते. पुस्तकातील आशयाचे आकलन होण्यास मदत होत असते. पुस्तके मुलांना जगण्यासाठी प्रेरणा आणि शक्ती देत असतात. आपण आज वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रम आनंद लुटतो. त्यासाठी हजारो रूपये खर्च केले जातात पण त्यापेक्षाही मुलांच्या वाढदिवसाला आपण खर्च कमी करीत पुस्तकाच्या सहवासात मुलांना सोडले तर कुटुंबाचे भविष्य अधिक उज्वलतेच्या दिशेने प्रवास करेल.

पुस्तकांशी करूया मैत्री
आपण मुलांना गृहित का धरतो?

पुस्तकांचा सहवास म्हणजे विकास आहे... बाकी सारे प्रयत्न वाढीचेच.. आतून विकसित झालेली माणस समाज निर्माण करीत असतात.त्यांचा उत्तमतेचा प्रवास हा नागरिकत्वासाठीचा आहे. त्यामुळे उत्तम समाजाच्या कल्याणासाठी तरी शाळा तेथे ग्रंथालय आणि ग्रंथालय तेथे विद्यार्थी असे नाते निर्माण केले तरच भविष्य उज्वल असणार आहे अन्यथा हा प्रवास असाच सुरूच राहील. त्यामुळे पालक आणि शाळांनीच यासाठी भूमिका घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Related Stories

No stories found.