शिक्षण म्हणजे काय रे भाऊ ?

जगप्रसिध्द विचारवंत अरिस्टॉटल म्हणत असे “ज्यांना शिक्षण देणं हा आपला हक्क वाटतो ते स्वतःला शिक्षण देण्यात रस असल्यामुळे शिकवत राहातील. त्यात मुलांच्या स्वातंत्र्याचा बळी देतील. खरं तर शिक्षण देण्याचा हक्क कोणालाही नाही, पण मुलांना मात्र शिक्षण घेण्याचा हक्क आहे”. अरिस्टॉटल यांना त्याकाळात जे वाटत होते तेच तत्व आजही शिक्षणाला लागू आहे.... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
शिक्षण म्हणजे काय रे भाऊ ?

शिक्षण ही काही बळजबरीने लादण्याची गोष्ट नाही.. कोणी लादले म्हणून मुलं शिकत नाही. मी शिकवितो म्हणून मुले शिकतात असे म्हणणे म्हणजे शिक्षण प्रक्रियेचा अर्थ न कळणे आहे. माझ्यामुळे मुले शिकली असे आपले म्हणणे असेल तर जी मुले शिकली नाहीत त्याचीही जबाबदारी देखील मीच स्विकारायला हवी. शिक्षण ही जाणीवपूर्वक शिकविण्याची अजिबात गोष्ट नाही.

शिक्षणाची वाट ही सृजनशील असते. प्रत्येक बालकाच्या आत जे काही असते त्याला बाहेर काढत फुलविणे म्हणजे शिक्षण असते. त्यामुळे शिक्षणाची वाट चालण्यासाठी जमीन पाहून पेरणीची गरज आहे. कसरदार जमीनीत पीक अधिक जोमदार पिकते आणि निकस जमिणीवर पेरणी केली तर त्यावर पीक बहरदार होण्याची शक्यता नसते.त्यामुळे पीक पिकले नाही हा दोष जमिणीचा नाही तर त्यापेक्षा जमिन पाहून पीकांची निवड केली नाही हे लक्षात घ्यायला हवे. जमीन पाहून पिकाची पेरणी केली तर दोन्ही ठिकाणी पीक चांगले येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत देखील सुक्ष्मतेने विचार करण्याची गरज आहे.शिक्षण स्वातंत्र्याच्या भावनेतून आणि विचाराधारेतून होत असते. त्यासाठी सृजनशीलतेच्या वाटा निर्माण करणे महत्वाच्या असते.

शिक्षण म्हणजे काय रे भाऊ ?
आमच्या शिक्षणाचे काय..?

जगप्रसिध्द विचारवंत अरिस्टॉटल म्हणत असे “ज्यांना शिक्षण देणं हा आपला हक्क वाटतो ते स्वतःला शिक्षण देण्यात रस असल्यामुळे शिकवत राहातील.त्यात मुलांच्या स्वातंत्र्याचा बळी देतील.खरं तर शिक्षण देण्याचा हक्क कोणालाही नाही, पण मुलांना मात्र शिक्षण घेण्याचा हक्क आहे”. अरिस्टॉटल यांना त्याकाळात जे वाटत होते तेच तत्व आजही शिक्षणाला लागू आहे. शिक्षण देणे म्हणजे कोणावर काही तरी लादणे नसते. शिक्षण घेण्याची उर्मी प्रत्येक मुलात दडलेली असते.मग ती उर्मी शांत बसू देत नाही.ती नवनविन वाटा धुंडाळण्याची शक्ती देत जाते. आपण कोणावर काही तरी लादले तर त्यातील असलेला आनंद हरवला जातो. कोणत्याही गोष्टीची सक्ती होते तेव्हा शिकणे होण्याची शक्यता नसते. कोणत्याही स्वरूपात केलेली सक्तीचे गुणवत्तेत रूपांतर होत नाही. त्यामुळे आपण मुलांना शिकविण्यासाठी शिक्षक झालो आहोत असे म्हणणे म्हणजे शिक्षणांच्या मुलभूत धारणेला धक्का लावणे आहे. त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेत आपला हक्क म्हणून कोणी शिकवत असेल तर तो चूकीच्या दिशेचा प्रवास आहे.आपल्याला शिकवायला आवडते म्हणून शिकवत असाल , तर तो आंनदाचा भाग आहे , पण त्यात विद्यार्थ्यांचा आंनद कोठे आहे? हा प्रश्न आहे.

शिक्षणातून आनंद मिळेल असा मार्ग निर्माण करणे महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्या आंनदासाठी शिक्षक शिकवत राहिल पण ती शिकण्याची सक्ती असणार आहे. मात्र मुलं आपल्या आनंदासाठी त्याचे स्वातंत्र्य गमावत आहे हे लक्षात घ्यायला हवे. परदेशात एकदा एका राष्ट्रप्रमुखांची पुतणी शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करीत होती .त्यांनी शिक्षक होण्यासाठीची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता प्राप्त केली होती. त्यानंतरही त्या शिक्षणांसंदर्भाने प्रयोग करीत होत्या.शिक्षक होण्याच्या जाहिराती नंतर त्यांनी अर्ज सादर केला .त्या अत्यंत हुशार म्हणून ओळखल्या जात होत्या. संपूर्ण शैक्षणिक प्रवासात गुणही चांगले मिळाले होते. त्यांच्या अर्जानंतर राष्ट्रीय निवड समितीने त्यांना मुलाखतीसाठी बोलाविले. त्यांची मुलाखत झाली आणि निवड समितीने त्यांना नाकारले.त्यांची निवड झाली नाही..खरेतर मुलाखत छान झाली होती..त्यांची निवड होण्याची अपेक्षा होती.

शिक्षण म्हणजे काय रे भाऊ ?
श्रमाविना स्मार्ट शिक्षण..

निवड होण्याची अपेक्षा असतांना पदरी अपयश आले. त्यानंतर एकदा राष्ट्रीय निवड समितीला राष्ट्र अध्यक्षांनी स्नेहपानासाठी निमंत्रण दिले..स्नेहपान सुरू असतांना अध्यक्षांनी माफी मागत म्हणाले “ तुमच्या कामात हस्तक्षेप करण्याचा माझा उददेश नाही.केवळ मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे म्हणून एक प्रश्न विचारला तर चालेल का ? ” राष्ट्राध्यक्षांची विनंती ऐकून समितीला आश्चर्य वाटले.अनेक राष्ट्रात अध्यक्षांना आपल्या मर्यादांची जाणीव असते.पदावर असलो तरी नागरिक म्हणून समतेचा विचार दृढ असतो.अधिकार असले तरी त्याची मर्यादा व व्याप्तीची पुरेपुर माहिती असते.त्यामुळे समितीलाही प्रश्न पडला काय असेल अध्यक्षांचा प्रश्न ? म्हणून त्यांनी होकार दिला..प्रश्न विचारण्याची विनंती केली.अखेर अध्यक्ष म्हणाले “ तुमच्या निवड समितीच्या समोर माझी पुतणी मुलाखतीसाठी सामोरी आली होती. तीचा बायोडाटा उत्तम होता. गुणवत्ता चांगली होती, पण तरी सुध्दा तिची मुलाखतीत ती नापास झाली. तीचे शिक्षक होण्यासाठी निवड न होण्याचे कारण काय ? ” तेव्हा समिती सदस्य म्हणाले ‘त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे छान दिली.मात्र त्यांना आम्ही विचारले की तुम्हाला शिक्षक का व्हायचे आहे ? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, की मला माझ्या आनंदासाठी शिक्षक व्हायचे आहे. खरंतर शिक्षकीपेशा हा स्वतःच्या आनंदासाठीचा नाही. स्वतःच्या आनंदाचे अनेक मार्ग आहेत.शिक्षक होणे म्हणजे मुलांच्या आनंदाचा निर्माता होणे आहे. त्या दिशेने प्रवास करणारे शिक्षक हवे हवेत.

स्वतःच्या आनंदासाठी रममान होणारे शिक्षक केवळ स्वतःचा आनंद शोधतील आणि मुले आनंदापासून वचिंत असतील. तेव्हा शिक्षण मुलांसाठी आहे आणि त्या प्रक्रियेत त्यांना जाणून घेणे आणि त्यांच्या आनंदाच्या शोधात चालत राहाणे महत्वाचे आहे.शिक्षणाच्या केंद्रस्थानी बालक महत्वाचे आहे स्वतः नाही म्हणून आम्ही त्यांना नाकारले ’.हे ऐकूण अध्यक्षांना देखील आश्चर्य वाटले. जग शिक्षणाच्या संदर्भाने किती सुक्ष्म स्वरूपाचे चिंतन करते आहे हे लक्षात येईल.त्यामुळे शिक्षक निर्मितीतच प्रयोगशीलता आणि शिकविण्याऐवजी मुलांच्या आत जे दडले आहे त्याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेशी नाते सांगणारे काही घडायला हवे असते.सध्या शाळा रचनावादाची प्रक्रिया करता आहेत. शिक्षक निर्मिती प्रक्रियेत वर्तनवादी विचाराचे प्रतिबिंब असेल तर शिक्षण हक्क कायदा आस्तित्वात येऊन परिवर्तन कसे घडणार ? हा प्रश्न आहे.मुल समजून घेणे,मुलं कसे शिकते हे जाणणे,त्यासाठीची प्रक्रिया जाणून घेणे याबाबतही फारसा विचार होतांना दिसत नाही.त्यामुळे अजूनही वर्गात शिकविणे होत राहाते.आम्ही बालकद्रोही...

शिक्षण म्हणजे काय रे भाऊ ?
आम्ही बालकद्रोही...

मुलांच्या आत जे आहे ते बाहेर काढत पुस्तकांच्या आशयाशी जोडण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करायला हवी.मात्र आम्ही केवळ पुस्तकातील आशय पोहचविणे म्हणजे शिकविणे म्हणतो. तो पोहचवितांना खरचं मुलाशी नाते असते का ? याचा विचार करायला हवा. शिक्षण म्हणजे पुस्तकातील तत्व पटवून देण्याची प्रक्रिया नाही, तर शिकणा-यांमध्ये स्वतःचं जीवन घडविण्याची क्षमता असते यावर नितांत विश्वास असणं आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करणे असते. मात्र पुस्तकात काय आहे ? हे सांगणे,त्यासाठी प्रयत्न करत राहाणे म्हणजे शिक्षण नाही. मुळात मुल पुस्तकातील तत्वापर्यंत पोहचतांना त्याचा काही पूर्व अनुभव असतो .त्या प्रवासाविषयी जाणून तत्वापर्यंत पोहचणे महत्वाचे आहे. अनेकदा विद्यार्थ्याला तत्वे जाणून घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यापेक्षा ते तत्व लादणे घडत जाते आणि त्यासाठीचा प्रवास घडविला जात नाही.त्यामुळे शिकणे घडत नाही.

त्यामुळे अरिस्टॉटल यांनी जे काही प्रतिपादन केले आहे.त्याचा गंभीरपणे विचारण्याची गरज आहे.पारंपारिक शिक्षणाच्या प्रक्रियेपासून दूरावत प्रयोगशीलतेच्या वाटा चालण्याची गरज आहे.राज्यात आणि राज्याबाहेरही अशा अनेक शाळा या वाटा धुंडाळत आहे.सृजन आंनद,कृष्णमूर्ती यांच्या शाळा,आनंद निकेतन, प्रगत संस्थेची शाळा, ग्रांममंगलच्या मार्गदर्शनाखाली चालविल्या जाणा-या शाळा वेगळ्या वाटा चालत जातात आणि त्या शिक्षणाच्या मुलभूत तत्वापर्यंत पोहचत असतील ,त्यातून चांगला माणूस घडत असेल तर त्या प्रयोगशीलतेच्या वाटा सर्वांनी चालायला हव्यात.प्रयोगशीलता जोपासल्यांने पारंपारिक शिक्षणातून साध्य होणा-या सर्वगोष्टी साध्य होत जातात. मात्र त्या पलिकडे शिक्षणाची ध्येय आणि अभ्यासक्रमाची उददीष्टे साध्य होतात हे महत्वाचे.शिक्षणातून काय पेरायचे असते तर विवेक . करून शिकण्याची प्रक्रिया जेव्हा होते तेव्हा कृती करण्यातून विचार निर्माण होतात.त्याच बरोबर मनात काही प्रश्न घर करतात.त्या प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्न सुरू होतात आणि ज्ञानाच्या मुळाशी जाणे घडते.त्यामुळे पारंपारिक शिक्षणाच्या वाटा बदलत चालण्याची गरज आहे.

शिक्षण म्हणजे काय रे भाऊ ?
....तरच आनंदाचा प्रवास

आपण शिक्षणाच्या निमित्ताने डोक्यात काही कोंदत राहाण्यापेक्षा मुलांच्या गरजा आणि त्यांच्या क्षमतेचा विचार करीत त्यांना स्वतःहून शिकण्यासाठी प्रेरित करण्याची गरज आहे.शिक्षण म्हणजे शिकविणे नाहीच तर त्यांना शिकण्यासाठी वातावरण देणे आहे.त्यासाठी संधी निर्माण करणे आहे.त्या संधी जितक्या अधिक असतील तितके शिकणे अधिक असते.शिकता शिकता जितक्या चूका अधिक होतात तितके शिकणे अधिक पक्के व दीर्घकाळ टिकणारे होते.त्यामुळे कृती करत करत मुले स्वतः शिकतात.व्यक्ती स्वतः जितकी शिकते ते शिकणेच जीवनभर टिकते आणि जे लादून शिकले जाते त्याचा केवळ मार्कांपुरता विचार असतो.परीक्षा झाली आणि वर्ष उलटले की शिकलेले देखील पुसले जाते.त्यामुळे कोणाला सक्तीने शिकविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिकण्यासाठी मदत करूया..म्हणजे त्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट प्रकाशवाट ठरेल,त्यातून त्या वाटा प्रकाशमान होतील.शेवटी शिक्षणाबददल ज्यांनी मुलभूत चिंतन केले त्या वाटेने चालत राहिलो तरच शिक्षणाचे भले आहे.म्हणून खलील जिब्राण म्हणाले होते की माणंस दोन ठिकाणी स्वतःहून जात नाही ..त्यापैकी एक ठिकाण आहे तुरूंग आणि दुसरे ठिकाण आहे शाळा..त्यामुळे प्रयोगशीलतेने चालत राहीले तर यातील शाळा हे ठिकाण वजा होईल आणि ते होणे म्हणजेच शिक्षणाचा प्रवास ठरेल..

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com