Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगबालशिक्षणांच्या दिशेने...

बालशिक्षणांच्या दिशेने…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आस्तित्वानंतर देशातील अंगणवाडी, बालवाडी प्राथमिक शिक्षणाशी जोडल्या जाणार आहे. नव्या धोरणात अंगणवाडीचे तीन वर्ष पहिली आणि दुसरीच्या वर्गाशी जोडून एक पायाभूत शिक्षणाचा स्तर निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षणांची गुणवत्ता उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मात्र ही गुणवत्ता उंचावताना बालकांचे बालपण करपण्याची आणि त्यांची शिकण्याची उर्मी संपुष्टात येणार तर नाही ना? अशी भिती व्यक्त होते. त्यात गेले काही वर्ष पूर्वप्राथमिक स्तरावर मुलांचे शिकणे करण्यासाठी ज्या पध्दतीने प्रयत्न केला जात आहेत. त्यातून मुलांचे भविष्यातील शिक्षण कायमचे थांबण्याचा आणि शिक्षण म्हणजे काही तर लादलेली गोष्ट आहे अशी धारणा पक्की करण्यास मदत करणारे ठरत आहे. आनंददायी विचारापासून बालकाला दूर नेण्यास भाग पाडणारी व्यवस्था आपण उभी करीत आहोत. हे या देशाच्या भविष्यासाठी अडथळा ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे नव्या टप्प्यावरती काम करतांना अधिक जागृतने करावे लागेल. अन्यथा सध्या खाजगीकरणाच्या व्यवस्थेत ज्या पध्दतीने काम सुरू आहे ते आदर्शवत माणून पावले टाकली गेली, तर शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे सोडा आपण नवी अधोगतीची वाट निर्माण करून भविष्यच अंधारमय करण्याचा धोका आहे.

- Advertisement -

शिक्षण धोरणातून आपल्याला गुणवत्तेच्या दिशेने पावले टाकायची आहेत. जे काही नव्याने करण्याचे सुतोवाच धोरणात करण्यात आले आहेत. त्या सर्वांचा संबंध गुणवत्तेशी असणार आहे. त्यामुळे काल पर्यंत शिक्षणाशी न जोडलेल्या अंगणवाडया आता शालेय शिक्षणाशी जोडण्याचा विचाराचे स्वागत करायला हवे. त्यामुळे प्राथमिक शाळांशी जोडण्याचा फायदा अनेक प्रकारे अंगणवाडीत शिकणा-या बालकांना होणार आहे. बालकांना व्यापक शालेय परिसर मिळणार आहे. त्याच बरोबर सामाजिकीकरणाची संधी देखील असणार आहे. खरेतर अंगणवाडीत दाखल होणा-या बालकांचे वय अवघे तीन ते सहा वर्षाचे असणार आहे. या वयात मुलांना स्वतःच्या भविष्यासाठीचे विविध अनुभव दिले जाणे अपेक्षित असताना त्या स्वरूपाचे अनुभव न देता लेखन, वाचन करण्याची सक्ती हे अशैक्षणिक आणि अशास्त्रीय आहे.

मात्र सध्या खाजगी शिक्षणाची वाट तुटविताना अनेक ठिकाणी मुलांना लिहिण्याची सक्ती, वाचनासाठीचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न पालकांना हवा आहे. आपले बाळ कसे वेगाने शिकते आहे याचे त्यांना भारी कौतूक वाटत असते. मुले उजळणी, गाणे, इंग्रजी, मराठी वर्णमाला पाठांतर करते याचेही त्यांना अप्रुप असते. हे चूकीच्या पध्दतीने सुरू आहे, बालकांना हे सर्व शिकण्यासाठी ताण येतो आहे. त्यांच्यातून निराशा निर्माण होते. पण आपल्या बालकावरती जेथे हे सर्व करून घेतले जाते त्या ठिकाणाला उत्तमतेचे प्रमाणपत्र देऊन मोकळे होतो. पालकांची मागणी लक्षात घेऊन संस्था या पाऊलवाटा तुटवत जातात. कारण खाजगी करणाच्या प्रक्रियेत पालकांच्या अपेक्षा जर पूर्ण होणार नसतील त्यांच्या व्यवहाराला बाधा येण्याची शक्यता असते म्हणून मागणी तसा पुरवठा करण्याकडे कल असणे साहजिक आहे. त्यात मुलांच्या भविष्याचा बळी जातो आहे हे लक्षात कोण घेते?

देशातील बालशिक्षणांच्या संदर्भाने झालेले अनेक अभ्यास याबददल चिंता व्यक्त करीत आहेत. त्याचा काय परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो याचा अभ्यास राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली या सरकारी संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या एका अभ्यासात नोंदविण्यात आलेले निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहे. या संशोधन संस्थेने देशातील दहा महानगरातील खाजगी शाळांचे सर्वेक्षण केल. त्यातील निष्कर्षानुसार पूर्वप्राथमिक स्तरावरती बालकांना पहिली व दुसरीच्या अभ्यासक्रमासंबंधीची उददीष्टांची पूर्तता करणारा अभ्यासक्रम शिकविला जातो. आता पहिली, दुसरीच्या वयोगटासाठी तयार केलेला अभ्यासक्रम त्या मुलांच्या मानसिक, शारीरिक क्षमताचा विकास गृहित धरून तयार केलेला असतो. तो तर वयाच्या तीन चार वर्षाच्या मुलांना शिकविला जाणार असेल तर त्यासाठी या वयोगटातील मुलांची बौध्दीक, मानसिक व शारिरीक तयारीच झालेली नसते. तरी ती लिहिणे आणि वाचणे शिकविले जाणे हे त्या वयोगटाच्या मुलांसाठी धोकादायक आहे.

खरेतर या वयोगटाच्या मुलांच्या स्नायूंचा पुरेसा विकास झालेला नसतो, मेदूंही पुरेसा विकसित नसतो. अशा परीस्थितीत मुलांच्या हाती पाटी, पेन्सिल दिली गेली तर शिकण्यासाठीच्या भविष्याच्या क्षमतांची नुकसान होते. त्या सक्तीचा मुलांच्या शारीरिक, सामाजिक, मानसिक, बौध्दीक क्षमतांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. अशा प्रकारे अशास्त्रीय प्रक्रिया सुरू ठेवल्यांने झालेला परिणामही त्या सर्वेतून पुढे आला आहे. यासारख्या चूकीच्या दिशेने टाकलेल्या पावलाचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांचे हातपाय दुखणे, ताप येणे. श्वसनाचा, त्रास होणे घडते. त्याच बरोबर सुमारे 85 टक्के मुलांना पोटाचा त्रास झालेला दिसून आला. कंटाळा, थकवा आणि झोपेचा देखील त्रास झालेल्याचे परिणाम समोर आले आहेत. त्याच बरोबर शिकण्याचा उत्साह, जिज्ञासा संपुष्टात येते. या वयाला न झेपणा-या गोष्टी लादल्या जात असल्यांने त्यात अपयश येते आणि त्याचा दुष्परिणाम बालकांच्या पुढील समग्र विकासावरती होतो. यासक्तीच्या प्रयोगातून बालकांच्या मनात अपयशाची भिती निर्माण होते. आपण सक्षम नाही ही भावना विकसित होते.त्याचा विपरित परिणाम संपादनावरती आणि शिकण्याच्या प्रक्रियेवरती होतो.

मुले भविष्यात कायमचे शिकण्यास पासून दूरावतात.म्हणजे या वयात अपेक्षित नसलेल्या गोष्टी लादल्यामुळे आपण मुलांचे भविष्य अंधारमय करीत असतो. पण केवळ मुलांचे नाही तर त्या पाठोपाठ राष्ट्राचे भविष्य देखील कुंठित करीत असतो.खरेतर या वयात क्रीडन पध्दतीने शिक्षण होण्याची गरज आहे. मुलांना खेळू देणे. क्रीडन पध्दतीने शिकू देणे, वस्तू हाताळू देणे, शिकण्यासाठी पूर्वानुभव देणे, गाणी, गोष्टी ऐकणे, मनात जिज्ञासा निर्माण करण्यासाठीचे वातावरण उपलब्ध करून देणे. मुक्त खेळू देणे. यासारख्या पूर्वतयारीचा विचार केला जात असतो. तो विचार गरजेचा आहे. इथे फक्त कान तयार होण्याची गरज आहे. पण केवळ पालकांच्या अपेक्षा लादल्या जात असल्यांने मुलांवर नको असलेल्या गोष्टी मुंलावर लादले जाणे म्हणजे आपण पैसे मोजून स्वतःचे भविष्य अंधारमय करणे आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुकतेच जाहिर झाले आहे. अमंलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. त्या धोरणात पायाभूत स्तरास महत्व देण्यात आले आहे. या अंगणवाडयांकरीता अभ्यासक्रमाची गरज आहेच. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून “आकार” नावाने स्वतंत्र्य अभ्यासक्रम विकसित केला आहे. त्या अभ्यासक्रमाची राज्यात अमलबजावणी प्रभावीपणे केली गेली तर आपण राज्याचे चित्र बदलू शकतो. “आकारचा” अभ्यासक्रम बालकांचा विचार करून विकसित करण्यात आल्यांने त्यात त्याचे शिकणे आहे, पण प्रत्यक्ष लिहिणे आणि वाचने नाही तर त्यासाठीच्या पूर्व तयारीचा विचार अधोरेखित करण्यात आला आहे. या स्तरावरती अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. मुलांसाठी अभ्यासक्रम हवाच पण त्याच बरोबर या स्तरावरती काम करणा-या ज्या शिक्षिका आहेत त्यांच्यासाठी देखील स्वतंत्र्य पदविका, पदवी अभ्यासक्रमाची स्वतंत्र गरज आहे.

भविष्यात आपणाला यासाठी पावले टाकावी लागतील.शेवटी भविष्यातील शिक्षणासाठी लागणारी मानसिकता याच स्तरावरती तयार होत असल्याने येथील शिकण्याच्या प्रक्रियेला खूप महत्व आहे. त्यासाठी अत्यंत प्रशिक्षित शिक्षिकांचा गरज आहे. तसेच या प्रक्रियेत जितकी म्हणून शास्त्रीयता आणली जाईल तितके शिकणे प्रभावी होणार आहे. त्यामुळे राज्यात यासाठी डी.एड, बी.एडच्या धर्तीवर स्वतंत्र पदविका, पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे देशासाठी शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. त्या प्रयोगशाळेत नव्याने पायाभूत शिक्षणात समाविष्ट झालेल्या या स्तराचा गंभीर विचार करून पावले टाकण्याची गरज आहे.

देशाचे व समाजाचे भविष्य शिक्षणाच्या महाव्दारातून जात असते. त्यामुळे शिक्षणाकडे अधिक सुक्ष्मतने राज्यकर्त्यांनी लक्ष दिले तर प्रगत राष्ट्राच्या दिशेने प्रवास करता येईल. प्रगत राष्ट्र निर्माण करण्यासाठी केवळ योजना देऊन काही साधले जात नाही. त्याकरीता शिक्षण प्रभावी आणि सक्षम करावे लागते. घराघरात उत्तम दर्जाचे शिक्षण पोहचले तर देशातील दारिद्र नष्ट होण्याबरोबर माणंस विचाराने उभी राहाण्याची प्रक्रिया गतीमान होते. त्यामुळे शिक्षणाबाबत प्रगत राष्ट्र जितके गंभीर विचार करीत आहेत, तितका विचार केल्य़ाशिवाय आपणाला त्या दिशेचा प्रवास घडणे कठिण आहे. शेवटी आर्थिक विकास केला तरी त्या विकासाची सुयोग्य दृष्टी आणि लाभ घेण्यासाठी लागणारी मानसिकता शिक्षणात पेरली जात असते. त्यामुळे योजना देऊन विकास साधला गेला तरी त्या विकासाकरीता माणंस घडविणे महत्वाचे असते. त्यादृष्टीने लहाण वयातच शिक्षणांचे संस्कार पेरले गेले तर आपल्याला नवा भारत निर्माण घडविणे कठिण नाही.

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या