शिक्षणाचे निसर्गाशी नाते हवे...

भारतीय वेद, उपनिषदे, ब्राम्हणके इत्यादी प्राचीन साहित्यात शिक्षणाबददल बरेच काही सामावलेले आहे. आपल्या प्राचीन पंरपरेतही शिक्षण विषयक तत्वज्ञानाची महत्वपूर्ण मांडणी आपल्याला दिसते आहे. वर्तमानात शिक्षण हे जीवनानुभवाशी निगडीत असावे असे सातत्याने बोलले जाते आहे. मात्र तो विचार काही नवा नाही. मुळात तो विचार आपल्या... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
शिक्षणाचे निसर्गाशी नाते हवे...

वर्तमानात शिक्षण घ्यायचे आहे असे म्हटले की, त्याकरीता शाळा आणि महाविद्यालयांच्या वाटा चालाव्या लागतात. उच्च शिक्षणासाठी विद्यापीठे स्थापन होता आहेत. सध्याचे शिक्षण हे सारे हे पुस्तक केंद्रीत आहेच. आपल्याकडे शिक्षण ही जीवनानुभवाची गोष्ट आहे. आपल्या प्राचीन इतिहासात सारे शिक्षण आश्रम व्यवस्थेत होते. तेथील शिक्षण चार भिंतीच्या आत कधीच नव्हते. वर्तमानात चार भिंतीच्या आतील शिक्षणाचा विचार केला जातो.

शिक्षण हे त्या पलिकडे असतेच..आपले जीवन आणि त्या जीवन प्रवासातील अनुभव यांचेही शिक्षणाशी नाते असते. जीवनाशी असणारे अतुट नात्याचे शिक्षण तुटत चालले आहे.सध्याच्या शिक्षण प्रक्रियेत प्रत्येक वर्षासाठीची निर्धारित पुस्तके शिकली आणि त्यावर आधारित शंभर गुणांची परिक्षेत पस्तीस चाळीस मार्क मिळाले की शिक्षणाचे प्रमाणपत्र हाती पडते. त्या मार्काने फक्त पदवीधर झाल्याचे समजते मात्र , शिक्षण झाले आहे असा तो पुरावा ठरत नाही. त्यामुळे शिक्षण घेऊनही पदवीधर विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो असे दिसत नाही.

खरंतर जीवानसाठीचे शिक्षण पुस्तकातून होत नसते हेही लक्षात घ्यायला हवे. ख-या शिक्षणासाठी जीवनातील अनुभव महत्वाचे असतात. ते प्रत्यक्ष जगण्यातून आणि आपल्या भोवतालमध्ये मिळणा-या विविध जीवन अनुभव मिळत असतात. त्यातूनच खरे शिक्षण होत असते . जीवनाभुवाच्या शिक्षणात जीवनाच्या य़शाचा मंत्र दडलेला असतो. पुस्तका बाहेरच्या होणा-या शिक्षणाचा मात्र वर्तमान शिक्षणात विचार केला जात नाही. विनोबाजी म्हणत असे की , “ जे शिक्षण जीवन अनुभवाशी नाते सांगत नाही ते खरे शिक्षण नाही ” . शिक्षण म्हणजे जीवन अनुभवाचे पुस्तक आहे. पुस्तकातील माहितीने फार तर मार्क मिळतील पण जीवनानुभवाच्या शिक्षणाने जीवनात आनंद मिळेल. त्या अनुभवाने जीवनाच्या यशाचा मार्ग सुलभ होत असतो.त्यातून शहाणपण आणि विवेक निर्माण होण्यास मदत होत असते. त्या शिक्षणाने जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याची शक्ती मिळत असते.त्यामुळे शिक्षणाचा विचार हा पुस्तकाच्या बाहेर जाऊन करण्याची गरज आहे. विनोबा हे सातत्याने अनुभवाच्या शिक्षणाबददल आग्रही भूमिका घेताना दिसता आहेत.त्यांच्या शिक्षण विचाराची मांडणी ही माणूस घडविणारी आणि निर्मिणारी होती हे लक्षात घ्यायला हवे.

भारतीय वेद, उपनिषदे, ब्राम्हणके इत्यादी प्राचीन साहित्यात शिक्षणाबददल बरेच काही सामावलेले आहे. आपल्या प्राचीन पंरपरेतही शिक्षण विषयक तत्वज्ञानाची महत्वपूर्ण मांडणी आपल्याला दिसते आहे. वर्तमानात शिक्षण हे जीवनानुभवाशी निगडीत असावे असे सातत्याने बोलले जाते आहे. मात्र तो विचार काही नवा नाही. मुळात तो विचार आपल्या भारतीय उपनिषदात देखील प्रतिबिंबीत झालेला आहे . आपले सारे शिक्षण जीवन अनुभवाशी नाते सांगते आहे . आपल्या उपनिषदांमध्ये एक गोष्ट आली आहे. त्यात गोष्टीत म्हटले आहे की, एकदा एक विद्यार्थी आचार्यांकडे गेला आणि “ मला ज्ञान प्राप्त करायचे ” असे तो म्हणाला. तेव्हा गुरूजी म्हणाले “ हे चारशे गुरे घे आणि त्याचे हजारापेक्षा जास्त झाली की मग माझेकडे ज्ञानासाठी परत ये ” . आता गुरूजींचा आदेश होता म्हणून हा विद्यार्थी गुरूजींनी दिलेले गुरे घेऊन निघाला. जंगलात गुरे चारत होता. भोवताल मध्ये जे दिसेल ते पाहत होता. त्या निरिक्षणातून त्याला जे काही मिळत होते त्याप्रमाणे तो जाणून पुढे जात होता. काही वर्षातच गुरांची संख्या हजारापेक्षा अधिक झाली.आता आपण ज्ञानासाठी पात्र झालो अशी त्याची धारणा झाली . त्याप्रमाणे गुरे घेऊन तो आपल्या आचार्यांकडे गेला.तेव्हा या मुलाच्या चेह-यावर ज्ञानाचे तेज चमकत होते.तेव्हा आचार्यांनी विचारले “ कारे,तुला काही ज्ञान प्राप्त झाले आहे का ? तुझ्या चेह-यावर त्या ज्ञानाची चमक दिसत आहे ” . तेव्हा विद्यार्थी म्हणाला “ ज्ञान तर मला गुरू कडून मिळणार आहे.तुम्ही माझे गुरू आहात.तुम्हीच ज्ञान देणार ना...” तेव्हा गुरू म्हणाले, “ ते ठिक आहे..मात्र तरी तुझ्या चेह-यावरील ज्ञानाचे तेज आहे..तेव्हा इतर कोणी ज्ञान दिले का ? ” तेव्हा तो म्हणाला “ माणूस सोडून इतरांकडून मला ज्ञान मिळाले आहे ” .तेव्हा आचार्य म्हणाले “ ते कोण आहेत..? ” तेव्हा तो म्हणाले “ मला निसर्गातील प्राणी,पक्षी,निसर्गातील असलेल्या विविध घटकांनी मला ज्ञान दिले आहे ”. आपल्या पंरपरेत ज्ञान प्राप्त करण्याचे अनेक साधने आहेत. पूर्वी ज्ञानाची साधने अनंत होती ती आजही आहेत . आचार्य त्या सर्व माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करत होती.आपल्या भोवतालमध्ये ज्ञानाची अनेक साधने असताना आपण त्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ? म्हणून पूर्वी आपले गुरू आपल्या शिष्यांना निसर्गाशी बोलावे असे सांगत होते.अनुभव घेण्यासाठी त्यांना प्रेरणा देत होते.वेद,अरूणी,महाभारत,रामायणातील अनेक व्यक्ती पात्रे आहेत त्यातील सारेच पात्रे ही अनुभवाच्या शाळेत शिकतील असे शिक्षक पाहत होते.निसर्गाशी असलेल्या संवादातून ज्ञानाची प्राप्त होत होती. आज आपले शिक्षण चार भिंतीच्या आत घडताना दिसते आहे. त्या चार भिंतीत अधिक मोठया करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. शिक्षणासाठीच्या या चार भिंती जितक्या उंच असतील तितक्या मोठया प्रमाणावर शाळा स्मार्ट मानल्या जातात..पण ख-या तर शाळा तर निसर्गासोबत उंचावत असतात.ज्या शाळेच्या भोवती झाडे,वेली,पाने,फुले,प्राणी ,पक्षी असतात तेथे शिक्षण अधिक घडत असते.त्यामुळे शिक्षण करण्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज आहे.आपण निसर्गाशी जोडत शिक्षणाचा मार्ग पुढे नेला तर जीवनात अनुभवाची साध्यता साधता य़ेईल. रवींद्रनाथ टागोरांचे सारे शिक्षण हे निसर्ग केंद्रीत आहे.रवींद्रनाथ हे जीवनभर निसर्गात राहीले आणि निसर्गासी संवाद करत जगले त्यामुळे अत्यंत निर्मळ झरा त्यांच्या जीवनात सातत्याने दिसतो आहे.निसर्ग जीवनात काय देतो हे आपल्याला त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला तर त्याचे उत्तर मिळते.

आपण शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारले की, तु पुढे जाऊन काय करणार आहे ? तर उत्तर असते “ अजून विचार केला नाही,आणि केला असेल तर महाविद्यालयात जाणार आहे ” हे उत्तर ठरलेले. महाविद्यालयात जाऊन पुढे काय करणार ? असा प्रश्न विचारला तर “ आता कशाला विचार करायचा.? तो नंतर करता येईल ” . आता महाविद्यालययातून बाहेर पडल्यावर विचारले की , “ आता पुढे काय ? तर आता विचार करायचा आहे ” असे त्याचे उत्तर ठरलेले आहे म्हणजे आपल्याकडे शिक्षण सुरू असताना जीवन विषयक विचार करण्याची दृष्टी आपण निर्माण करण्यात यशस्वी झालेलो नाहीत.आपल्या शिक्षणाने जीवनाचे दोन टप्प्यात विभाजन केले आहे.जो शिक्षण घेतो त्याला विचारले की , “ काय करतो आहे ? ” तर, तो म्हणतो “ शिक्षण घेतो आहे..” जगण्याचे काय ? तर उत्तर असते “ शिक्षण घेतले की, मग जगता येईल ” ज्याचे शिक्षण संपले आहे त्याला विचारल की , आता तु काय करतो आहे ? तर उत्तर असते.. “ आता छान जगतो आहे..” शिक्षणाचे काय...? तर ते आता थांबले आहे..म्हणजे जो जगतो आहे त्याचे शिक्षण बंद आहे आणि जो शिकतो आहे त्याचे जगणे थांबले आहे.शिक्षण आणि जीवन हे सोबतीने चालण्याची अपेक्षा ही सातत्याने विनोबानी व्यक्त केली होती. आपल्या जगण्याच्या अनुभवातूनच चांगले शिक्षण होत असते.मात्र आपण जीवनापासून शिक्षण तोडले आहे.त्याचा मोठा दुष्परिणाम सध्याच्या सामाजिक जीवनात अनुभवाला येतो आहे.

इतिहासातील ज्ञानाची केंद्र ही ग्रामीण भागात आणि विशेषता नदिच्या काठी होती. याचे कारण नदिच्या काठीवर निसर्ग फुललेला असायचा. तेथे असलेली झाडे, निसर्ग हे शिक्षणाचे व्दारे होती. तेथे असलेल्या गुरूंच्या उदर निर्वाहाची काळजी देखील गावेच घेत होती.गांधीजी म्हणत होती की, खेडयाकडे चला या भूमिकेत देखील शिक्षणाचा एक दृष्टीकोन होता.गावांतील शिक्षण हे जीवनाशी जोडलेले असते. तेथे अनेक व्यावसायिक असतात.शेती असते..आणि त्यातून शिक्षणाशी नाते पक्के होण्यास मदत होत असते. त्याच बरोबर तेथे असलेल्या निसर्गानेमुळे शिक्षण निसर्गाशी नाते सांगणारे असते. मात्र आपण अलिकडे शिक्षण शहराकडे जाताना दिसते आहे. शहराकडे शिक्षणाचे केंद्र सरकत चालले असल्याने शिक्षण निसर्गापासून दूरावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिक्षणाचे उददीष्टे देखील बदलते आहे.आपल्याकडे शिक्षण महाग होत असताना शिक्षणापासून आपण दूरावत आहोत.त्यामुळे शिक्षणाचा विचार अधिक गंभीरपणे करण्याची गरज आहे.शिक्षण जितके निसर्गापासून दूर जाईल तितके ते माणूसपणापासून हरवत जाणार आहे.त्यामुळे आपल्याला शिक्षणाच्या नव्या प्रवाहाशी जोडून ठेवण्याबरोबर निसर्ग आणि जीवन यांच्याशी नाते सांगणा-या शिक्षणाचा विचार केंद्रीस्थानी ठेऊन बांधणी करण्याची गरज आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)


Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com