शिक्षणातील त्रिदोष

शिक्षण मिळालेल्या लोकांची संख्या फार मोठी होती असे नाही. अवघ्या पाच टक्के लोकांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होता आले होते. मात्र शिक्षणांची प्रक्रिया लक्षात घेता आपल्याकडे शिक्षण घेतलेली माणसं विद्वान आणि अशिक्षित असलेले अविद्वान असे दोन गट पडले होते. अर्थात इंग्रजानी सुरू केलेल्या शिक्षणाचा हेतू फारसा चांगला होता असे नाही. त्यामुळे त्यांनी येथील मातीशी नाते सांगणारे शिक्षण... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
शिक्षणातील त्रिदोष

शिक्षण म्हणजे भोग नाही तर त्याग आहे. शिक्षण म्हणजे आत्म्याची उन्नती आहे. चारित्र्याची जडणघडण आहे. समाजा सोबत विकसित होणे आहे. समाजा सोबत जगण्याचा विचार पेरण्याची कल्पना त्यात समाविष्ट आहे. श्रमाची प्रतिष्ठा त्यात सामावलेली असायलाच हवी. कष्टकरी वर्गाबाबत आदर आणि सन्मानाची पेरणी भारतीय शिक्षणातून अपेक्षित आहे पण, आपल्याला इंग्रजानी दिलेल्या शिक्षणपध्दतीने भारतीय शिक्षणाचा आत्माच काढून घेतला आहे.

विनोबानी म्हटले आहे की, आपल्याला इंग्रजानी दिलेल्या शिक्षणातून पाच टक्के लोक साक्षर झाली पण त्यांनी पेरलेल्या शिक्षणातून शिक्षित झालेली माणसं माणसांपासून दूर गेली . इंग्रजानी पेरलेल्या शिक्षणामुळे समाजात उघडपणे विभाजन झाले. त्याच बरोबर शिकलेली माणसं शिकली मात्र त्यांच्यात शिकले असल्याचे दर्शन मात्र घडले नाही .त्यांनी पेरलेल्या शिक्षणातून काही प्रमाणात चरित्रार्थाचा प्रश्न सुटला पण आणखी प्रश्न नव्याने उभे राहिले.त्यामुळे इंग्रजानी निर्माण केलेल्या शिक्षणाबददल निश्चित दोष असल्याचा आक्षेप विनोबानी नोंदविले होते. अर्थात इंग्रजानी सुरू केलेल्या शिक्षणासंदर्भाने इंग्रजांच्या काही उददीष्टे होती. त्यांनी ती साध्यही केली.मात्र त्यामुळे भारतीय समाजाचे निश्चित नुकसान झाले आहे.त्यामुळे शिक्षणाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.शेवटी आपल्याला आपल्या समाजाचे कल्याण ज्यात सामावलेले आहे तोच विचार शिक्षणातून पेरला गेला तरच समाजाचे भले आहे.

विनोबानी आपल्या देशाच्या शिक्षणाच्या प्रक्रियेबददल फारसे समाधान व्यक्त केलेले नाही. शिक्षण हा जीवन विकासाचा मार्ग आहे.त्यामुळे त्यातील प्रक्रियेत माणसांच्या विकासाचा विचार व्हायला हवा. मात्र जीवनाच्या उन्नतीचा आणि व्यक्तीच्या विकासाचा विचार होणार नसेल तर शिक्षण कुचकामी म्हणायला हवे. विनोबाना इंग्रजानी दिलेल्या शिक्षणात तीन दोष दिसले होते. त्या दोषा संदर्भात केलेली मांडणी विचार करायला भाग पाडते. त्यावेळी त्यांना जे दोष दिसले तेच दोष वर्तमानातही दिसता आहेत का? याचा विचार करण्याची गरज आहे. अर्थात त्यांना जे दिसले तेच आजही कमी अधिक प्रमाणात आपल्याला अनुभवास येता आहेत. इंग्रजानी आपल्या देशात शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केल्या.त्यांनी येथे सुरू केलेल्या शिक्षणाचा चांगला परिणाम झाला असल्याचे मतही काही विद्वान व्यक्त करतात. त्यांच्या शिक्षणाने येथे विज्ञानाचा पाया घातला असे म्हटले जाते याचा अर्थ आपल्याकडेच्या शिक्षणात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन नव्हता असे नाही. आपल्या शिक्षणाचा आत्मा वेगळा होता. दुर्दैवाने येथील समाज व्यवस्थेत चातुरवर्ण व्यवस्था होती.त्याचा परिणाम येथील समाजाला भोगावाही लागला होता.त्यामुळे येथे उघडपणे समाजात भेद उभे राहीलेच होते.इंग्रजानी सुरू केलेल्या शिक्षणाने देखील येथे अधिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या शिक्षणाचा येथे जो परिणाम झाला त्या संदर्भाने म्हटले आहे की, या देशातील काही लोकांना शिक्षण मिळाले आणि काही लोक त्या शिक्षणापासून दूर राहीले.

शिक्षण मिळालेल्या लोकांची संख्या फार मोठी होती असे नाही.अवघ्या पाच टक्के लोकांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होता आले होते.मात्र शिक्षणांची प्रक्रिया लक्षात घेता आपल्याकडे शिक्षण घेतलेली माणसं विद्वान आणि अशिक्षित असलेले अविद्वान असे दोन गट पडले होते .अर्थात इंग्रजानी सुरू केलेल्या शिक्षणाचा हेतू फारसा चांगला होता असे नाही.त्यामुळे त्यांनी येथील मातीशी नाते सांगणारे शिक्षण दिले नाही.त्यांनी परदेशी शिक्षणाचा विचार रूजविला हे खरे आहे पण त्याचा परिणाम म्हणून येथील मातीत भेद आणि संघर्ष वाढलेत हेही निरिक्षण विनोबा नोंदवितात.त्यांनी पेरलेल्या शिक्षणामुळे येथील माणसांच्या मनात माणसांसोबत न राहणे आणि समाजाच्या विकासापेक्षा स्वतःच्या विकासाचा विचार अधिक दृढ होत गेला आहे. इतरांच्या सोबतीने जगण्याचा विचारही मागे पडला. शिक्षणामुळे ग्रामीण व्यवस्थेपेक्षा शहरी व्यवस्थेचे अधिक आकर्षण वाढले आणि लोक शहराकडे वेगाने जाऊ लागले.आजही आपल्या व्यवस्थेत तेच चित्र आहे.आज शहरीकरणाचा वेग अधिक आहे.आपल्या राज्यातही सुमारे पन्नास टक्क्याचा टक्का ओलांडला आहे आणि शिकलेली माणसं गावात नको तर शहरात राहणे पसंत करू लागली आहे. त्यात उन्नतीचा विचार असेलही पण खरच ग्रामीण भागात जीवन उन्नतीचा विचार नाही का ? असा प्रश्न पडतोच.त्यांनी पेरलेल्या शिक्षणाच्या विचाराने माणसं अधिक विभाजीत होत गेली आणि त्यातून भेदाच्या भिंती अधिक दृढ होत गेल्या आहे. तो भेदाचा परिणाम आजही स्पष्ट दिसतो आहे.माणसं एकत्रित राहणार नाही अशा विचारांची बीजे त्यांनी पेरली आहे का ? याचाही विचार करण्याची गरज आहे. माणसं एकमेकाशी संवाद करत एकत्रित राहू शकणार नाही अशीच ती पेरणी होती. हा त्या शिक्षणाचा दोष आहे. त्यावेळी त्यांना हा दोष जाणवला मात्र त्यानंतर तो दोष दूर करण्याचा प्रयत्न आपण आजवर केला नाही हेही लक्षात घ्यायला हवे.

माणसं माणसांत भेद अधिक दृढ होता आहेत. कदाचित जाती,धर्माचे भेद वरवर अधोरेखित होत नसतील पण भेदाच्या भिंती वेगवेगळ्या स्वरूपात मात्र उभ्या राहताना दिसता आहेत.आपल्याकडे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्टया असलेल्या विषमतेतून भेदाच्या भिंती दृढ होता आहेत. शिकलेली माणसं स्वतःला अधिक श्रेष्ठ आणि अशिक्षित माणसं कनिष्ठ अशा भेद केला जातो. श्रमजीवी आणि बुध्दिजीवी असाही भेद होतो आहे. कष्टकरी वर्गाबददल बुध्दिजीवी वर्गाला तशी फारशी आस्था नाही.शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांबददल प्रिती नाही.उच्च पदावरील व्यक्तीला कनिष्ठांबददल प्रेम नाही.श्रीमंताना गरीबांबददल आस्था नाही.पुरूष आणि महिला असाही भेदही अधिक दृढ आहे.भेद अनेक प्रकारे पेरले जाता आहेत.समाजात एकात्मता निर्माण करण्याचे काम शिक्षणातून होण्याची अपेक्षा सातत्याने आपण व्यक्त करत आलो आहोत.लोकमान्यांनी सातत्याने स्वदेशी शिक्षणाचा विचार प्रतिपाद केला होता.त्या स्वदेशी शिक्षणात तर त्यागाचाच विचार होता आणि समाजातील एकात्मतेचा विचार केंद्रस्थानी होता.आपल्याकडे समाजात एकात्मतेचा विचार हरवत चालला आहे का ? याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

विनोबाना शिक्षणात दुसरा दोष जो दिसला तो नोंदविता ते म्हणतात, भारतीय शिक्षणात ज्ञान,विद्येच्या सोबत त्यागाशी नाते जोडलेले आहे. इंग्रजानी पेरलेल्या शिक्षणात त्यागाचा विचार नाही. त्यामुळे त्यागा शिवाय भोग समाजमनात आला आहे. ज्यांना विद्या प्राप्त नाही अशी माणसं आनंद उपभोगत असतील तर त्यात त्यांचे नुकसान आहे. अर्थात ते अज्ञानी आहेत. मात्र त्याचवेळी ज्ञानी माणसं त्याच वाटेने जाणार असतील तर योग्य नाही. ज्ञानी माणसं जेव्हा भोग आणि पैशाशी नाते सांगत असतील तर तो ज्ञानाचा, विद्येचा अपमान आहे. शिकलेली माणसं ज्ञानाच्या मागे न लागता केवळ आर्थिक सुबत्तेच्या दिशेचा प्रवास करत असतील तर त्या शिक्षणाचा उपयोग काय ? आपल्या जीवनाची समृध्दता नेमकी कशात आहे हे शिकलेला माणूस जाणू शकत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय ? शिक्षण जर आनंदाची दिशा देणार नसेल तर ते शिक्षण कुचकामी आहे.

शिक्षण घेतलेल्या माणसांला ज्ञानाची तहान लागत नसेल,शिकलेल्या माणसाला आपण विद्येची वाट चालावी असे वाटत नसेल तर तो शिक्षणाचा पराभव आहे.आज शिकलेली माणसं अधिक भ्रष्ट आहेत. पैसा खाणारी माणसं ही अशिक्षित नाहीत तर ती उच्च शिक्षित आहेत.शिकलेली माणसं एकमेकाला छळता आहेत.पैशासाठी वाटेल ते करण्याची मनोवृत्ती विकसित झाली आहे.व्देषाची भावना अधिक उंचावली आहे.संघर्षाची भावना देखील अधिक वाढली आहे.माणूस सस्ता झाला आणि बकरा महाग झाला आहे.सारे काही पैशासाठी ही भावना माणसांचे माणूसपण संपुष्टात आणते आहे.भौतिक सुखाची कल्पना उंचावत असताना ,आपल्यालाच सारे हवे आहे ही तहानच माणसाला भ्रष्ट बनवत आहे. ही वाढलेली तहान शिक्षणाचे अपयश आहे.कधी एकेकाळी या देशातील एक एक विद्वान माणूस म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने विद्यापीठाच्या उंचीची होती..आज शिक्षण देणा-या विद्यापीठांचीच उंची हरवत चालली आहे.त्यामुळे तेथून दिले जाणारे शिक्षण तरी त्या उंचीचे कसे असणार ? हा खरा प्रश्न आहे.विद्यापीठात केवळ पुस्तक शिकवली जात नव्हती तर तेथील माणसं हीच खरी आचार्य होती.त्यांचे जीवन हेच पुस्तक होते.आजचे पुस्तकही त्या दिशेचा शोध घेताना दिसत नाही.ज्ञानाची तहान त्यांना लागत होती.

आज विद्या,ज्ञानाची तहान हरवत चालली आहे.त्यामुळे ही तहान का हरवत चालली आहे ? याचा विचार करण्याची गरज आहे.पैशाची भूक वाढली की ज्ञानाची आणि विद्येची तहान आपोआप कमी होते.विनोबांनी एकदा तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी आपल्या देशाची परीस्थिती अशी का ? असा प्रश्न विचारला होता तेव्हा त्याचे कारण आपले शिक्षण आणि येथील मनुष्यबळ असल्याचे मत त्यांनी नोंदविले होते. कारण शिक्षणात काम करणा-या माणसांनाच मुळात ज्ञानाची भूक नसेल तर ज्ञानासाठी शिक्षण प्रक्रियेत समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना ती भूक-तहान तरी कशी लागणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे ज्ञान शुन्य भूकेची माणसं निर्माण करणे हेही आपल्या शिक्षणाचे अपय़श आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल.

तिसरा दोष म्हणून विनोबा शिक्षण आणि श्रम यांचे हरवलेले नात्याकडे पाहतात.आपल्याकडे शिकलेल्या माणसांना श्रम करावे वाटत नाही. शिक्षण म्हणजे काय तर अभ्यासासाठी असलेल्या पुस्तकामधून माहिती देणे होय.मात्र ते शिक्षण हाताला काम देण्यात पुरेशी ठरत नाही. शिकलेल्या माणसांना आनंद हवा आहे मात्र त्यासाठी कोणत्याही श्रमाची तयारी करण्याची गरज वाटत नाही. विना श्रमाचा आपल्याला आनंद हवा आहे. श्रमाला आपण कमी मानतो आहोत. शिकलेल्या व्यक्तीला श्रम करण्याची लज्जा का वाटते हा खरा प्रश्न आहे. शिक्षण आणि श्रम यांचे अतूट नाते निर्माण करण्याची गरज आहे. आपल्याकडे शिकलेल्या माणसांला श्रम करण्याची मनापासून इच्छा होत नाही. प्रत्येकाला श्रम न करण्यासाठी शिक्षण हवे आहे. “ तू शिकला नाही तर तुला घाम गाळावा लागेल..” असे शाळेत जाणा-या मुलाला त्याने अभ्यास करावा म्हणून सांगितले जाते.या सांगण्यात शिकला तर पुढे कष्टाचे काम नाही हे अधोरेखित आहे.त्यामुळे शिकणे म्हणजे आपल्या आयुष्यात श्रम नाही हे आपण सातत्याने जीवन व्यवहारात अधोरेखित करत आहोत.आयुष्यात कष्ट करावे लागू नाही म्हणून शिकणे महत्वाचे आहे ही धारणाच आपल्या शिक्षणाचे अपयश अधोरेखित करत आहे. गांधीजी म्हणत असे की, श्रमाशिवाय अन्न सेवन करणे हे पाप आहे. आज समाजात ही पाप करणा-यांची संख्या दिवंसेदिवस वाढत आहे. प्रत्येकाला श्रमाशिवाय आनंद हवा आहे आणि हा विचार दुर्दैवाने शिक्षणातून रूजला जात आहे.त्यामुळे या तीन दोषाने आपली शिक्षण व्यवस्था नासवली आहे. शिक्षण घेत असलो तरी शिक्षणाचा खरा अर्थ व्यक्तीत रूजत नाही. विनोबा म्हणतात की, व्यक्तीच्या जीवनात पित्त,कफ,वात असतात मात्र हे तीन दोषांने व्यक्तीचे आय़ुष्य संपवतात.त्याप्रमाणे आपले शिक्षण या त्रिदोषाने संपुष्टात आणले आहे.त्यामुळे आपल्याला भविष्यात पुन्हा एकदा ज्ञान संपन्न ,उन्नत समाज हवा असेल तर शिक्षणातील त्रिदोष निराकरणासाठी जाणीव पूर्वक विचार करण्याची गरज आहे..

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)


Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com