वाटा आनंदाच्या

जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी शिक्षण आहे. आपण कोणालाही विचारले की, तू का शिकतो? तर त्याची उत्तरे निश्चितपणे एक आणि एकच मिळण्याची शक्यता नाही. कोणी नोकरीसाठी,कोणी पैशासाठी,कोणी लग्नासाठी, कोणी ज्ञानासाठी, कोणी समाज मान्यतेसाठी शिकत असेल... पण त्याच्या मुळाशी जाऊन आपण प्रत्येकाला विचारले की.. हे कशासाठी ? तर त्याचे उत्तर मात्र सर्वांचे समान आहे आणि ते म्हणजे... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
वाटा आनंदाच्या

जीवनात आनंदमय असायला हवे आहे म्हणून सारे प्रयत्न करता आहेत. प्रत्येकालाच दुःख नको आहे ,ते टाळण्यासाठीचा प्रयत्न प्रत्येकजन सातत्याने करतो आहे. पण प्रयत्न करूनही दुःख संपुष्टात येत नाही. कारण दुःखाचा नाश म्हणजे आनंद नाही. आनंदासाठी अखंड जीवन जागृतीची गरज आहे. आपण जोवर जागृतीच्या दिशेचा प्रवास करत राहू तोवरच आनंदाच्या वाटा सापडत राहतील. मात्र आपण केवळ परीस्थिती जाणून न घेता प्रवास सुरू ठेवला तर आपल्याला त्या आनंदाच्या वाटा सापडण्याची शक्यता नाही.

त्यामुळे जीवनात आनंदाची वाट निर्माण करण्यासाठी रजनीशाची भोवताल स्वीकृतीचा विचार प्रतिपादन केला आहे.शिक्षणातून आस्तित्वाचा शोध आणि त्यामागील भूमिका जाणून देण्याची गरज आहे.शिक्षण हा अंतरिक शोधाचा मार्ग आहे.आपण जर केवळ बाहयांगे विचार करत पुढे जाणार असू तर त्याचा लाभही अंतिरक आनंदासाठी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जागृतीचा विचार निर्माण पेरण्याचे काम शिक्षणातून करणा-याची गरज आहे.तोच प्रयत्न माणसांच्या जीवनात प्रकाशाची वाट निर्माण करेल.

जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी शिक्षण आहे. आपण कोणालाही विचारले की, तू का शिकतो? तर त्याची उत्तरे निश्चितपणे एक आणि एकच मिळण्याची शक्यता नाही. कोणी नोकरीसाठी,कोणी पैशासाठी,कोणी लग्नासाठी, कोणी ज्ञानासाठी, कोणी समाज मान्यतेसाठी शिकत असेल... पण त्याच्या मुळाशी जाऊन आपण प्रत्येकाला विचारले की.. हे कशासाठी ? तर त्याचे उत्तर मात्र सर्वांचे समान आहे आणि ते म्हणजे आनंदासाठी. याचा मुळ अर्थच शिक्षणाचा उददेश हा आनंद निर्माण करणे हाच आहे. मात्र शिकलेली सारीच माणसं आनंदी असतात का ? तर त्याचे उत्तर नाही असेच असते. शिकल्यानंतरही ते समाधान नाही.मग शिक्षण अपयशी झाले असे म्हणायचे का ? खरेतर शिक्षण अपयशी झाले असे नाही तर त्या दिशेचा प्रवास आपण करू शकलो नाही म्हणून आपल्याला त्या वाटा सापडल्या नाहीत.

आपण जमिनीत एखादे बी लावतो.त्या बी ला बाहेरून पाणी, सूर्यप्रकाश,हवा मिळते आणि जमिनीत रूजलेले बीचा कोंब बाहेर येतो..आणि एका रोपाच्या अंकुरातून उद्याच्या महाकाय वृक्षाचा प्रवास सुरू होतो..आता बाहेर तर प्रकाश आहे,हवा आहे आणि पाणी पण आहे..मात्र बीज जर खडकावर लावले तर बाहेर सारे असूनही ते उगविण्याची शक्यता नाही.सारे असले तरी बी तून कोंब उगवणार नाही कारण त्यासाठी लागणारे जमीन नाही. प्रकाश,पाणी,हवा म्हणजे अंकूराची निर्मिती नाही. हीसारी माध्यम आहेत.त्याप्रमाणे शिक्षणाच्या प्रक्रियेत अध्ययन, अध्यापन, शिक्षक, अभ्यासक्रम ही माध्यम आहेत.. त्यांच्यात शक्ती अंकूर निर्मितीची शक्ती सामावलेली आहेत. मात्र ते म्हणजे अंकूर निर्मितीचे केंद्र नाही.त्याकरता अंतरिक जाणिवा व्यक्तीत असाव्या लागतात. याचा अर्थ व्यक्तीत परिवर्तनाची वाट निर्माण करण्याची गरज असते.

स्वतःलाच परिवर्तनाची वाट चालण्यासाठी हिम्मत दाखवावी लागते. बाहेर सारे असले तरी कोंब उगवण्यासाठी बी ला जमिनीच्या आत गाढून घेतले तरच उगवण्याची शक्यता असते.त्यामुळे स्वतःलाच गाढून घेण्याची तयारी दाखवावी लागते. आपल्या भोवतालमध्ये तर अनेक लोक जन्माला येतात..अनेक जन शिकतात ..अनेक जन एकाच वाटेचा प्रवास करतात म्हणून काही सारे जन उंचीवर पोहचतात असे घडत नाही. जगातील अनेक माणसं एकाच शाळेत शिकतात..त्या सर्वांना शिकवणारे तेच शिक्षक असतात, तोच अभ्यासक्रम असतो.. मात्र तरी सर्वांनी समान उंची प्राप्त करता येते असे घडत नाही, कारण बीज उगवण्यासाठी अंतरिक गाढून घेणे सर्वांचे घडतेच असे घडत नाही. सारे बाहय असले तरी अंकूर फुटत नाही..त्यामुळे एकाच भूमित जन्माला येऊनही सर्वांनाच आनंदाच्या वाटा सापडतील असे नाही.

रवींद्रनाथ टागोर यांना काही भावंडे होती.या मुलाच्या अंतरिक शोधाच्या वाटेने जाण्याच्या वृत्तीमुळे आणि आनंदाच्या शोधाच्या वाटा शोधत असताना ते निसर्गाच्या सोबत चालत होते.पण ही वाट काही इतरांच्या दृष्टीने प्रतिष्ठीत नव्हती.निसर्गासोबतचा प्रवास होता.मात्र तो प्रवास काही इतरांच्यासाठी दुर्लक्षितच होता..बाहयांगाने विकसित होण्याच्या प्रवासात अनेकाना सुख होते.त्यामुळे ती वाट न चालणा-या रवींद्रनाथा विषयी सर्वाधिक चिंता त्यांच्या आईबाबांना होती पण , आज इतिहासाच्या पानावर बाहयांगाने फुलणा-या आणि वाटा चालणारी इतर भावडं कोण हेही अनेकाना ठाऊक नाही. त्यामुळे त्या अंतरिक परिवर्तनाची वाट चालणारी माणसं हीच जीवनाच्या य़शाचे शिखर पादाक्रांत करत असतात हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षणाने या वाटा निर्माण करायच्या असतात. शिक्षणाचा मूलभूत अर्थच मुळात अंतिरकदृष्टया फुलणे हा आहे.त्यामुळे आपण आतून फुलण्याच्या प्रक्रियेत यशस्वी झालो की जीवनात आनंदाची वाट मिळाली म्हणून समजा.आज अशा वाटांचा प्रवास घडताना दिसत नाही.याचे कारण बाहेरील वातावरण आहेत.. त्यावर कोंब फुटेल या अपेक्षेने आपण प्रतिक्षा करत राहतो.. पण विचाराच्या मातीत स्वतःला गाढून घेण्याचा प्रयत्न न केल्याने अनेक प्रश्न जीवनात निर्माण होतात.

रजनीश यांनी या संदर्भान काही सूत्र दर्शित केले आहे.ते म्हणतात की,जीवनात आपल्याला आनंद प्राप्त करायचा आहे ना ! मग आपण समग्र स्वीकार करण्याचा विचार केला पाहीजे. स्वीकार याचा अर्थ सर्वस्वाचा स्वीकार .खरेतर ही स्वीकृती हेच ख-या अर्थाने ध्यान आहे. स्वीकृती ही समग्रतेने असायला हवी असते .जे अंतिरक असेल आणि जेथे बाहय जागृतीचा विचार असेल त्या सर्वांची स्वीकृती हा महत्वाचा विचार आहे.आपण जीवनात एकदा की स्वीकृतीची मनोवृत्ती विकसित केली की, मग दुःख कमी होण्याची वाट सापडण्याचा मार्ग मोकळे होतो.मात्र दुःख संपणे म्हणजे आनंद नाही.आनंद ही मनोवृत्ती आहे.त्या मनोवृत्तीत आपण स्वतःला अधिक सकारात्मक ठेवत असतो.जीवनात दुःख आहे ही भावना स्वीकारली की, मग आहे त्या दुःखाचे काहीच वाट नाही. जगाच्या पाठीवर संत,विचारवंत,श्रीमंत ,गरीब या सर्वांना दुःख मिळाले. देवालाही दुःख चुकले नाही मग आपल्याला कसे चुकेल ही भावना आपल्याला सकारात्मकते कडे घेऊन जाते. ही सकारात्मक भावना जीवनातील दुःख कमी करत असते. आनंद ही सकारात्मक भावना आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे जीवनात सुख आहे त्याप्रमाणे दुःख असणारच आहे हा भावच जीवन आनंदाचे क्षण निर्माण करत असते.

शिक्षणाने जीवनातील सत्याचे दर्शन घडविण्याचे काम करण्याची गरज असते.आपल्या विचार प्रक्रियेतच मूलभूत बदल घडविण्याचे काम करण्याची गरज असते.ओशो म्हणतात की, स्व ची जाणीव ही महत्वाची गोष्ट आहे .त्या जाणीवेतून जीवनातील दुःख आणि सुखाचा भाव विकसित होत असतो.निसर्गातील झाडाच्या दोन काडया नदिच्या प्रवाहात पडतात.त्यातील एक काडी म्हणते की , “ मी प्रयत्न कले पण या नदिच्या पाण्याला समुद्रापर्यंत घेऊन जाईल आणि त्याला समुद्रात मिसळवेल ” .दुसरी काडी म्हणते की, “ मी या पाण्याला समुद्रापर्यंत जाऊच देणार नाही.त्याला काही केले तरी अडविण्याचा प्रयत्न करेल ” .अर्थात ते पाणी समुद्राला जाऊन मिळते .जी म्हणाली होती की, मी नदिचे पाणी समुद्रापर्यंत घेऊन जाईल तीने तसे काहीच केले नव्हते.तिच्या कोणत्याच प्रयत्नाने पाणी समुद्रापर्यंत पोहचले नव्हते. ते निसर्गनियम आणि गतीने ते पोहचले होते. पाणी पोहचल्याने ती काडी प्रचंड आनंदी होती.

दुसरीने प्रयत्नही केले तरी पाणी अडविणे तीला शक्य नव्हते.मात्र पाणी तर समुद्राला मिळाले होते.त्यामुळे ती निराश झाली होती.तीच्या पदरी निराशा,दुःख निर्माण झाले होते.आपल्याला वास्तवाचे दर्शन आणि वास्तवाचा शोध घेण्याची वृत्ती शिक्षणाने निर्माण केली तर जीवनातील आनंदाच्या वाटा सापडल्या शिवाय राहणार नाही.म्हणून जे काही भोवतालमध्ये आहे त्याचे वास्तव स्वीकारण्याची हिम्मत आपण कमवायला हवी आहे. समग्रतेचा स्वीकार हाच जीवन आनंदाचा राजमार्ग आहे.त्यासाठीची मनोभूमिका तत्वज्ञानाच्या पातळीवर तयार केली जात असते..मात्र त्या सत्याचा शोध आपण घेण्याचा प्रयत्न ना जीवन व्यवहार करतो , ना आपल्या शिक्षणाच्या प्रक्रियेतून करून देण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

दुसरे सूत्र म्हणून जागृकततेचा विचार प्रतिपादन केला आहे.जीवनाच्या य़शोशिखरावर जी माणसं आज दिसता आहे..काल दिसत होती. ती सारीच त्या ध्येयमार्गावर पोहचली याचे कारणच मुळात जागृकता हेच होते. आपल्या जीवनात जागृततेचा विचार हा प्रामुख्याने दुःखाचे क्षण आले की येत असतो. दुःखात आपल्याला ख-या आस्तित्वाचा शोध लागत असतो..संताचे विचारही तेव्हाच पटत जातात.संत तुकाराम महाराज म्हणाले होते की, “ जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे..अंतक काळीचे कोणी नाही..” हा विचार प्रापंचिक, पैशाची मुबलकता असलेल्या व्यक्तीला पटण्याची शक्यता नाही. ज्याला आपण वरवर सुखी म्हणतो असी अवस्था असली तरी त्या स्थितीत देखील संत,विचारवंताचे विचार पटण्याची शक्यता नाही..पण आपण कोरोनाच्या काळात हे अनुभवले की,अगदी आपल्या अत्यंत जवळचे लोकही आपल्या जवळ आले नाही.पैसा कितीही दिला तरी काहीच मिळत नव्हते.जीवन किती नश्वर आहे याचा शोध त्यावेळी लागत गेला.मेलेल्या माणसांवर अंत्यसंस्कार करायला देखील घरातील नातेवाईक आले नाही.

उपचार सुरू असताना भेटायला देखील पावले फिरकली नाही..म्हणजे संतानी सांगितले होते तो विचार जागृकतेचा आहे हे आपण सुखाच्या भावनेत असताना जाणून घेतले नाही.मात्र जेव्हा जेव्हा जीवनात दुःखाचे क्षण येतात तेव्हा तेव्हा परीस्थितीची ओळख होते. आपल्याला सुखात परमेश्वर आठवत नाही आणि दुःखात आठवल्याशिवाय राहत नाही.म्हणून गांधीरीने जीवनभर दुःखाची मागणी केली होती. मृत्यू समोर दिसत असेल तर आपल्या भोवतालचे सारेच विसरण्यास होते.माणूस एका शुन्यत्वाच्या अवस्थेला पोहचलेला दिसतो.त्याला काही देखील स्मरणार नाही.एखादा माणूस आपल्या छातीवर धारदार शस्त्र घेऊन बसला आहे...आणि तुम्ही जीवनभर जे काही कमवले आहे ते मागतो आहे ..तरी तुम्ही देण्यास तयार होतात..अशावेळी तुम्हाला ना मंदिराचा रस्ता दिसतो...ना तुम्हाला बॅंकेची शिल्लक आठवते..ना तुम्हाल शत्रुचे वाईटपण आठवते, ना तुम्हाला कोणावर हल्ला करावा वाटतो..सारेच विसरणे घडते..फक्त एका दुःखाच्या प्रसंगाने तुम्हाला जागेवर आणले आहे. त्यामुळे प्रत्येकक्षणी जागृकतेचा विचार महत्वाचा आहे.संघर्ष, दुःख,संकटे आली की माणसं अधिक जागृत होतात हे नेसर्गिक आहे. मात्र ही जागृकता केवळ संकटात नको तर ते स्वाभाविक बनायला हवी.त्यासाठी शिक्षणाने दृष्टीकोन पेरण्याची गरज आहे.ही जागृकता जीवनात जितकी अधिक असेल तितक्या मोठया प्रमाणावर आनंदाच्या वाटा निर्माण होतील.जागृकता हेच आपल्या निरंतर आनंदाचे माध्यम आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com