Sunday, April 28, 2024
Homeब्लॉगवाचते होऊया... स्वतःला घडवूया

वाचते होऊया… स्वतःला घडवूया

पुस्तके मानवी जीवनाला उध्दराचा मार्ग दाखवत असतात. शिक्षणाने शिक्षित झालेली माणसं पुस्तकाच्या सहवासात अधिक फुलतात आणि बहरतात. मात्र केवळ शाळेची पाठयपुस्तके वाचून बहरणे आणि फुलणे होईलच असे नाही. शाळेत अक्षराची साक्षरता येते, पण त्या साक्षरतेला समृध्दतेच्या आणि अर्थपूर्णतेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी पुस्तकातील शब्दांना अर्थ प्राप्त करून देण्याचे काम वाचनाने घडते. शिकलेली माणसं पदव्या मिळवितील पण शिक्षणातील अपेक्षित बदल आणि ध्येयापर्यतचा प्रवास पुस्तके घडवत असतात. शिक्षणांने वर्तमानात शहाणपण येते असे काही दिसत नाही त्याचे कारण शिक्षण केवळ पुस्तक आणि मार्कांपुरते मर्य़ादित झाले आहे. त्यामुळे शालेय जीवनात जो पर्य़ंत अवांतर पुस्तके हाती पडून इतिहास आणि वर्तमान जाणून घेता येणार नाही तो पर्यंत शिक्षण केवळ हुशारी पेरत राहील आणि शहाणपणाला समाज पोरका बनत राहील. पुस्तके म्हणजे वास्तवाचे दर्शन असते. विवेकाची पेरणी असते. शहाणपणाचे जोपासणे असते. प्रामाणिकपणाची ओळख असते.. सत्ता आणि संपत्तीचा अर्थ जाणणे असते. पदाची आणि माणंसाच्या उंचीतील फरक ओळखणे असते.जीवनात सत्य की सत्ता, चेहरा की मुखवटा.. प्रामाणिकपणा की अंहकार, सत्व,तत्व की खोटी प्रतिष्ठा यात नेमके काय? हे पुस्तकांच्या सहवासाने कळत जाते. पुस्तकांमुळे सत्तेची आणि संपत्तीची उंची आणि माणूसपणाची उंची यातील महत्व अधोरेखित होत जाते आणि योग्य निवडीचा विवेक अंगी येण्यास मदत होते. पुस्तकांनी जीवन फुलते हे खरेच, पण त्याचवेळी पुस्तके जीवनाची समृध्दतेची वाटचाल सुरू राहावी या करीता शक्ती बहाल करत असतात. पुस्तकांनी घडवलेली मस्तके कोणाच्याही चरणावर नतमस्तक होत नाही.ती माणसें स्वाभिमान जपून असतात..त्यांना आनंदाच्या वाटा सापडत जातात. राज्य शासनाने वाचन महा अभियान सुरू केले, पुण्यात राष्ट्रीय स्तरावरील पुस्तक महोत्सव घडतो आहे. अशावेळी पुस्तके वाचनारी माणसांची संख्या उंचावत राहण घडायला हवे. नवे वर्षाचे आगमन होऊ घातले आहे अशावेळी अवांतर वाचनाचा संकल्प करायला हवा. वाचनाने समाजात शहाणपणाची पेरणी होते आणि गर्दीला समाजाचे रूप प्राप्त होते.त्यामुळे देशाला राष्ट्राच्या दिशेने प्रवास करणे सुलभ होते.

भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दूल कलाम यांचे स्मरण करत आपण दरवर्षी वाचन प्रेरणा दिन साजरा करत असतो. खरेतर कलमांसारखे राष्ट्रपती हे त्या पदाचा सन्मान होता. पदावर पोहचल्यानंतरही आपल्याला त्या पदाचा लाभ नको.त्या पदाचा कोणताही अतिरिक्त फायदा देखील नको. पद हे विश्वस्त म्हणून भोगायचे असते मालक नाही. देशातील सर्वोच्च पद मिळाल्यानंतर अंहकारांने त्यांना स्पर्श केला नाही. त्यांच्यातील संवेदना संपल्या नाही.त्यांच्यातील सहदयता सातत्यांने त्यांनी जोपासली होती.कधीकाळी अपंग मुलांच्या कार्यक्रमाला गेल्या नंतर त्या मुलांच्या हाती असलेल्या काठीचे वजन त्यांनी विचारले, तेव्हा ते वजन खूपच होते.त्या वजनामुळे अंपगांना काठी घेऊन चालतांना देखील अडचणीचे ठरते. तेव्हा त्या काठीचे वजन कमी करण्यासाठी त्यांनी आपल्या सहका-यांना हलकी काठी तयार करण्यासाठी आदेश दिले. आपल्या पदाच्याव्दारे त्यांनी अंपगासाठी संवेदनाचे दर्शन घडविले. ही संवेदना येते कोठून? असा प्रश्न कोणालाही पडेलच.. त्याचवेळी पुन्हा राष्ट्रपती होण्याची संधी मिळत असतांना देखील त्यांनी नकार देणे.इतकी अपेक्षा शुन्यता येते कोठून..? आपण सर्वोच्च पदावर असतांना आपले कुंटुब गरिबीत आहे म्हणून देखील त्यांना कोणताही फायदा, लाभ मिळवून देण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. हा प्रामाणिकपणा ठासून भरलेला दिसतो.. त्याचे कारण त्यांच्यावरती पुस्तकांनी केलेले संस्कार. त्यांनी जीवनभर पुस्तकांशी केलेली मैत्री. राष्ट्रपती भवन सोडतांना केवळ आपली संपत्ती म्हणजे पुस्तके तेवढीच बरोबर नेण्याचा प्रयत्न म्हणजे जीवनातील सत्याचा प्रवास आहे. पुस्तकाच्या सहवासात राहिल्यानंतर जीवनाचा अर्थ उलगड जातो. जीवनाची सत्यता कळते.जीवनात आनंदाच्या वाटा कोणत्या याचे आकलन होत जाते आणि खोटया आणि फसव्या मुखवटयाचे कधीच आकर्षण वाटत नाही.

- Advertisement -

पुस्तके आपल्या हाती येणे,त्यांच्या सहवासात राहायला मिळणे ही तर खरी समृध्दी असते.पुस्तके ही सतत मार्गदर्शक असतात. ती कधीच आपल्यावर अन्याय करण्याची शक्यता नसते. जीवनाचा मार्ग त्या पुस्तकातून दिसू लागतो.जगप्रसिध्द वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांना वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे गुरू मॅक्स टॅलमूड यांनी युक्लिडीयन भूमिती हे पुस्तक भेट दिले होते.हे पुस्तक हाती आल्यावर त्यांनी असे म्हटले, की या पुस्तकात मला अनेक आश्चर्य सापडली आहेत. या पुस्तकामुळे विशुध्द विचार आणि प्रांत या संकल्पनेची ओळख झाली. त्यासाठी त्यांना पुस्तकांने मदत केली. हे सामर्थ्य त्यांना पुस्तकांच्या मदतीने प्राप्त झाले. कलामांनी देखील जीवनभर सत्याची वाट चालत राहाण्यासाठी पुस्तकांचीच निवड केली होती.त्यांनी म्हटले आहे , की मी लाईट फॉर मेनी लॅंम्प्स हे लिलियन आय़शर वॅटसन यांनी संपादित केलेले पुस्तक 1953 ला जुन्या बाजारातून खरेदी केले होते. हे पुस्तक पाच दशकाहून अधिक काळ माझी सोबत करीत आहे. ते वाचून इतके जुने झाले आहे, की अनेक वेळा बाईंडीग केले आहे. माझ्या आय़ुष्यात जेव्हा जेव्हा समस्या उभी राहाते तेव्हा तेव्हा ते पुस्तक मी उघडतो. तेव्हा ते पुस्तक मला सावरते. अनेकदा जीवनात आनंदाचे भरते येते तेव्हा मन सैरभैर होते तेव्हा मनाचा समतोल पणा साधण्याकरीता पुस्तकंच मदत करतात. पुस्तके जीवनाच्या कोणत्याही प्रसंगी विचाराचा आधार देतात. त्यांचा आवाज खरच अंतकरणापासून ऐकला तर प्रत्येक व्यक्ती योग्य पावलावर चालण्याची शक्यता अधिक आहे.

जीवनाची उंची आणि हिमालया एवढी उंचीचे माणसें पुस्तकातील शब्दांनी उलगड गेल्यांने त्यांच्या आय़ुष्याच्या प्रकाशवाटा वाचणा-याचे आय़ुष्य उजळून टाकतात. पुस्तकांच्या प्रकाशात उजळणारे आय़ुष्य कधीच खोटया प्रतिष्ठेमागे चालत जात नाही. आपण काय आहोत? याची जाणीव होत जाते. आपण स्वतःला ओळखायला शिकतो. आपल्या मर्यांदा आणि आपली बलस्थाने यांची ओळख होते. त्यातून वाचणा-याच्या मनावर देखील शब्दांचा प्रभाव पडतो.त्या शब्दांतील केवळ अक्षर वाचण्याऐवजी त्या अक्षरातील अर्थ उलगडत जातात. त्या अर्थातून जीवनाचा अर्थ शोधने घडते.ती केवळ शब्द नसतात.. तो प्रत्येक शब्द म्हणजे एक अनुभव असतो. त्या प्रत्येक अनुभवात जीवन उभे करण्याची शक्ती असते. बाबासाहेब आबेंडकर यांनी पुस्तकाचे महत्व जाणले होते. जीवन पुस्तके वाचण्यासाठी आहे.आपल्या आयुष्यात ही पुस्तके क्रांती घडून आणतील याची त्यांना जाणीव होती, म्हणून परदेशातून येतांना त्यांनी सोबत केवळ पुस्तके आणली होती. त्यांना जीवनाचा अर्थ पुस्तकात दिसला होता. त्यांना ना परदेशी वस्तू आकर्षित करू शकल्या, ना त्यांना धन, संपदा. वाचन जीवनाला अर्थ देत जाते. महात्मा फुले यांच्या आय़ुष्यात आलेल्या एका पुस्तकांने त्यांना जीवनाची वाट सापडली.. महात्मा गांधी यांच्या जीवनात आलेल्या एका गोष्टीने त्यांचा मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा हा प्रवास घडविला… नरेंद्र दत्त यांच्या आयुष्यात आलेली वर्डस्वथच्या कवितेने त्यांना जीवनाचा अर्थ उलगड गेला. मोठया माणसांच्या आय़ुष्यावरती पुस्तकांचा मोठा प्रभाव होता हे त्यांचे चरित्र सांगत आले आहेत. अनेकांना त्यांच्या जीवन प्रवासात पुस्तकांनी दिशादर्शन घडविले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पुस्तकांमध्ये न रमणारी माणसं अनेकदा दुःखाच्या सोबच जगत असतात. त्याचे कारण जीवनाचे सार कशात आहे याचे दिशादर्शन झालेले नसते. जीवनात पुस्तके दृष्टीत बदल घडवतात. एखाद्या प्रश्नाकडे, परीस्थितीकडे, प्रसंगाकडे कसे पाहायचे असते हे त्या दृष्टीने घडते. अनेकदा जीवन न कळलेल्या माणसांच्या आयुष्यात अर्थ न सापडता प्रवास करत जातांना त्यांना आनंद मिळतो,पण ते कोठे चालले आहे याची वाट ते हरवलेले असतात. पुस्तके आय़ुष्याला घडविण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून पुस्तकांच्या सहवासातील समृध्दता वेळेचे महत्व सांगत जाते. पुस्तके आपण कोण आहोत आणि आपल्या मर्य़ादा काय आहेत याची जाणीव करून देत असतात. आपली बलस्थानांची ओळख होते आणि जीवनाच्या उन्नतीसाठी उत्तम गुणांची जाणीव करीत जातात. त्याच बरोबर परीस्थिती, संकटे येतात तेव्हा त्यांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. पुस्तकांमुळे मनात सकारात्मकता ठासून भरली जाते. भाषेतील शुध्दता आणि मानवी जीवनासाठी लागणारे शहाणपण याची ओळख होते. पुस्तके वाचणा-या माणंसांची प्रतिमा समाजामनात वेगळीच असते. ती माणसं संपूर्ण प्रवासात माणूसपण केंद्रस्थानी ठेवतात. पुस्तके, लेखक, कवी हे वाचकांची सदसदविवेक बुध्दी जागृत ठेवण्याचे काम करीत असतात. पुस्तकाची किंमत कधीकधी वाचतांना कळत नसेल पण प्रसंग आल्यावरती त्या पुस्तकातील विचार मात्र निश्चित उपयोगी पडू शकतात. पुस्तकांच्या सहवासाने चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता नाही. भ्रष्ट आचरण आणि पैशाचा भ्रष्टाचार करण्याकडे त्यांचा कल फारच कमी असू शकतो.. मात्र पुस्तके वाचून जीवन परिवर्तनाच्या वाटेने जात नसेल, तर तो पुस्तकांचा पराभव नाही. तर त्या पुस्तकांनी जे काही सांगितले आहे त्या विचारांचे चिंतन,मनन झालेले नाही.पुस्तकांचे वाचन म्हणजे काही शब्दांचे वाचन नाही तर त्यात दडलेल्या विचाराचे जगणे असते. त्यामुळे प्रत्येकानाचे वाचण्याचा संकल्प सोडला तर उद्याची पहाट अधिक प्रकाशमान असण्याची शक्यता आहे.

जीवनात ज्ञानाच्या क्षेत्रात आदान प्रदान करण्याच्या व्यवसाय करणा-यांनी तर पुस्तकांशी संगत करायला हवीच. त्या संगतीने त्या व्यक्तिची उंची वाढते आणि अंखड ज्ञानाचा प्रवास घडत जातो. त्या प्रवासाने त्यांच्या सोबत काम करणा-या प्रत्येकाला ज्ञानाची वाट दिसत जाते. ज्ञानाचे तेज प्रचंड असते. त्या तेजात बाहूंच्या शक्तीचा विचार करावा लागत नाही. त्या तेजापुढे बाहूची शक्ती देखील चालत नाही.ज्ञानाच्या शक्तीने हजारो माणसं दिपत जातात आणि लाखो माणसं प्रतिभेच्या मागे चालत येतात. खोटया वाटा शोधून भक्त शोधावे लागत नाही. मुखयटयांची गरजच पडत नाही. समाजात पोलीस, न्यायालयाची संख्या,तुरूंगाची संख्या वाढत जाते तेव्हा ते चांगल्या समाजाचे लक्षण नसते. याचा अर्थ उत्तम काही पेरायचे राहून गेले असेच काहीसे असते. तो शिक्षणांचाही पराभव असतो. शिक्षणांतून अखंड शिक्षणाचा विचार पेरायला हवा असतो. तो शिक्षण विचार म्हणजे केवळ औपचारिक शिक्षणांचा भाग नाही तर अखंड ज्ञानसाधना देखील आहे. त्या साधनेने शिक्षण होत राहते. त्यामुळे समाजात ज्ञानसपन्न आणि सातत्याने ज्ञानाचा प्रवास करणारी माणसं हीच समाजाची श्रीमंती आहे. ज्या समाजात ही संपन्न माणसं असतात तिथे संघर्ष आणि युध्दाची शक्यता नसते.वाचता समाज हा शांतता प्रिय असतो. तो उत्तमतेचा ध्यास घेऊन कार्यरत राहतो. नव्याचा शोध आणि सर्जनशील विचाराची पेरणी करत राहतो.आपण त्या दिशेने जाण्यासाठी वाचते होण्याची गरज आहे. गाव तेथे ग्रंथालय असायला हवे. शाळा, महाविद्यालयातून आपल्याला अधिक चांगला माणूस व राष्ट्र निर्माण करायचे असेल तर शाळा महाविद्यालयात समृध्द ग्रंथालय असायला हवीत. त्यातून मोठी माणसं जाणता येतील आणि वर्तमानात छोटया माणंसाच्या दिसणा-या मोठया सावल्या हळूहळू हटतील. हे घडेल तर आपल्याला नव समाजनिर्मितीचे आव्हान सहज पेलता येईल.. हाती पुस्तके आली तर हिंसेच्या बंदूका गळून पडतीस.. व्देषाचे शस्त्र निकामी बनतील..लोकशाहीच्या नावाखाली होणारे खोटे खेळही थांबतील. उत्तम काय याचा विचार अंतकरणात रूजेलही..म्हणून चला वाचते होऊया..

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या