पेरते होऊया या

शाळेत अनेक सुवचने, सुभाषित पाठ करून घेतली जातात. पाठयपुस्तकातील पाठही संस्काराची रूजवण करत असतात. अनेक कविता, संत साहित्यातून माणूसपण उन्नतीचा विचार अधोरेखित करण्याचा विचार असतो. त्या सुवचनांचा विचार परीक्षेतील मार्कापुरता मर्यादित असेल तर शिक्षण रूजले नाही असे समजावे. पाठयपुस्तकात अनेक धर्मतत्वज्ञान आणि संत, प्रेषित यांचे विचार सांगण्यात येतात. ते वाचने अपेक्षित नाही तर त्यामागील विचार रूजण्याची गरज असते. शालेय अभ्यासक्रमात संत तुकाराम महाराजाचा... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
पेरते होऊया या

शिक्षणाचे अनेक उद्दीष्टे असली तरी त्यातील काही उद्दीष्टे व्यापक असतात. त्याच बरोबर ती कोणत्याही एका विषयातून नव्हे तर म्हणजे व्यक्तीमध्ये माणूसपण रूजवणे असते. माणसांतील स्वार्थाचा भाव कमी होत जाणे आणि त्यागवृती वृध्दींगत होत जाण्याच्या दिशेने होणारा प्रवास म्हणजे शिक्षणाचा आरंभ असतो. शाळेत अनेक सुवचने, सुभाषित पाठ करून घेतली जातात. पाठयपुस्तकातील पाठही संस्काराची रूजवण करत असतात. अनेक कविता, संत साहित्यातून माणूसपण उन्नतीचा विचार अधोरेखित करण्याचा विचार असतो. त्या सुवचनांचा विचार परीक्षेतील मार्कापुरता मर्यादित असेल तर शिक्षण रूजले नाही असे समजावे. पाठयपुस्तकात अनेक धर्मतत्वज्ञान आणि संत, प्रेषित यांचे विचार सांगण्यात येतात. ते वाचने अपेक्षित नाही तर त्यामागील विचार रूजण्याची गरज असते. शालेय अभ्यासक्रमात संत तुकाराम महाराजाचा अभंग पाठयक्रमात होता, “अर्थेविन पाठांतर कासाया करावे.. व्यर्थची मरावे घोकूनिया” अर्थ समजून घेणे हा शब्दपातळीवरचा भाव नाही तर तो शब्दात असलेला विचार जगण्याच्या पातळीवर रूजणे महत्वाचे असते.

पाठयपुस्तकात उत्तम विचार आहेत. चांगले पाठ, कविता आहे. ते शिकविले जातातही, पण त्यातील आशय आणि भाव जगण्याच्या पातळीवर व्यवहारात अधोरेखित होत नसतील, तर ते शिक्षण केवळ साक्षरतेपुरते मर्यादित आहे असेच म्हणावे लागेल. शिक्षणांचा संबंध साक्षरता आणि मार्काच्या बाहेर येऊन माणूस, समाज व राष्ट्र निर्मिती आहे हा विचार रूजवल्याशिवाय आपल्याला अपेक्षित शिक्षणाचे फलित प्राप्त होणार नाही. राष्ट्र व समाज विकासाची प्रक्रिया केंद्रस्थानी ठेवून आपण शिक्षणातून विचार रूजवू शकलो तर अनेक प्रश्न सहजतेने सुटू शकतील. शिक्षण प्रत्येक माणसाला माणूसपणाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठीच आहे याचा सतत विचार करण्याची गरज आहे.

जगाने तोंडात बोट घालावे अशी परीस्थिती विनोबाच्या भूदान चळवळीने निर्माण केली होती. भारताच्या इतिहासात ती उभी राहिलेली आणि स्वतःहून गरीबांसाठी दान केलेली सर्वात मोठी चळवळ होती. ती चळवळ म्हणजे माणसांच्या चांगुलपणावरती विश्वास ठेवणारी होती. भूमीहीन असलेल्या समाजातील गरीब, निराधार लोकांसाठी अधिक जमीनीचे क्षेत्र असलेल्या बांधवानी जमिनी दान केल्या होत्या. हा वर्तमानासाठी इतिहास बनून राहिला आहे. काल असे घडले होते आज असे काही घडेल का? असा प्रश्न स्वतःला विचारला तर उत्तर आपोआप नकारात्मक येते. विनोबांनी यासाठी सातत्यांने भ्रमती करीत पंधरा वर्षात पन्नास लाख एकर जमीन मिळविली आणि ती गरीब भूमिहीनांना वाटली देखील. आरंभी विनोबाच्या या भूमिकेवर अनेकांनी टीका केली. आपल्याला आव्हानाला प्रतिसाद म्हणून अशी कोणी जमीन देईल का? अशा प्रश्न पुढे आला होता. वरवर पाहता त्याचे उत्तर नाही असेत येते, पण माणंसाच्या आत असलेला “माणंसा” वर विनोबाचा पक्का भरवसा होता. खरंतर त्या काळात निरक्षण असलेल्या परीस्थितीत माणसं अधिक शिक्षित होती का असा प्रश्न पडतो.. कदाचित ती माणसं औपचारिक शिक्षणाच्या प्रक्रियेतील शिक्षित नसतील पण अंतरिक शिक्षणाचा प्रकाश त्यांच्या हदयात मात्र सतत प्रज्वलीत होता हे लक्षात येते. शिक्षणाचा आलेख उंचावलेला नसलेल्या काळात माणसांवर अधिक भरवसा होता. वर्तमानात शिक्षणातून माणसांच्या आत दडलेल्या माणूसपणावरील भरवसा पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्याची निंतात गरज आहे. दुर्दैवाने माणसांवरचा भऱवसा खूपच कमी होतांना पाहवयास मिळत आहे. माणसांवर जोपर्यंत विश्वास वाढत नाही तोपर्यंत शिक्षणाला कोणताही अर्थ नाही. शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाचा विवेक जागा करण्याची गरज असते. आपण कोणाला तरी फसवत आहोत याची शरम वाटणे देखील महत्वाचे आहे. शिक्षणाने सत्व, तत्व, नीतीमूल्य जपण्याची गरज आहे. माणसांची मस्तके शिक्षणाने घडविली गेली तर ती मस्तके कोणाही पुढे लाचार होणार नाही. शिक्षण झालेले मस्तक मग कोणालाही फसविणार नाही. शिक्षणातून जर विवेकाचे पोषण झाले तर सद, खल, सत्य, असत्य,चांगले, वाईट याचा विचार करण्याची क्षमता निर्माण होईल. त्यामुळे त्यातून फसविण्याची वृत्तीचा स्पर्शही मनाला होऊ शकणार नाही. विनोबांची भूदान चळवळ सुरू होती. त्यावेळी लोक म्हणत होते, की विनोबांना लोकांनी फसविले आहे. लोकांनी जमीन दान करतांना नको असलेली, नापीक असलेली जमीन त्यांना दिली आहे. त्या खराब जमिनीचे भांडवल विनोबांनी केले आहे. अशा परीस्थितीत देशातील एका संस्थानिकाने देखील विनोबाच्या भूदान चळवळीत आपले योगदान दिले होते. मात्र त्यांनी दिलेली जमीन खराब, नापिक होती. संस्थानिक प्रमुखाच्या हे जेव्हा लक्षात आले की, आपल्या दिवानजीने खराब जमीन विनोबाच्या चळवळीला दान दिली आहे. आपण विनोबाना फसविले आहे. तेव्हा त्यांना त्याचा पश्चाताप झाला. खरेतर दिवानजीने खराब जमीन देऊन संस्थानिकांच्या पायी आपली निष्ठा वाहिली होती. त्याचे संस्थानिकाला वाईट वाटले म्हणून त्यांनी त्या नंतर तात्काळ चांगली जमीन दिली. त्या पाठोपाठ शेतीसाठी लागणारी अवजारे देखील त्यांनी भेट दिले. आपल्याकडून कोणी तरी फसविले जात आहेत ही भावना देखील मनाला स्पर्श करून गेली, तरी त्या भावनेतून आपण स्वतःला फसवू शकत नाही. आपण कोणालातरी फसवत आहोत ही भावनाच शिक्षणाच्या प्रक्रियेतून नष्ट होण्याची गरज आहे. शिक्षणाने चांगुलपणा निर्माण करण्याचे आव्हान पेलायला हवे. माणसांच्या चांगुलपणावरती विश्वास वाढविणारी ही घटना आहे.खरच असू घडू शकते का? असा प्रश्न जगभरातील अनेकांना पडला होता. त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक जण भारतात आले. त्यांनी या चळवळीचा अभ्यासही केला आणि अनेकांना त्याचा धक्का बसला. माणूस आपल्याकडील अतिरिक्त जमीन इतरांसाठी दान देतो ही गोष्ट विविध विचारधारेच्या नेत्यांना देखील या गोष्टीचे आश्चर्यच वाटले.

वर्तमानात आपल्या अवतीभोवती अशी सुंदर विचाराची प्रभा निर्माण होण्याची गरज आहेच. आपल्या मनातील विकृतीचा विचार जाऊन सत्प्रवृतीचा विकास होणे हे शिक्षण आहे. शिकल्यानंतरही आपण स्वार्थाच्या पलिकडे जाऊ शकलो नाही, तर आपण शेवटी विज्ञानाच्या भाषेत मानव प्राणी ठरू. शिक्षणाचे काम मानवाचे माणसात रूपांतर करणे आहे हे लक्षात घ्यायला हवे. मात्र जेव्हा शिकलेली माणसं जसे प्राणी गवत वेचतात आणि खातात. त्या प्रमाणे पैसा वेचून खात असतील तर त्यांचे काय होणार, तर जे प्राण्याचे होते तेच त्यांचे होणार आहे. शिक्षण म्हणजे संस्कार पेरणारी व्यवस्था आहे. माणूस घडविणारी शाळा आहे. माणूसपण निर्माण करणारे केंद्र आहेत. त्याचा विसर पडून भौतिक सुखासाठी केवळ स्वार्थ केंद्रस्थानी ठेवून, आपण जेव्हा माणूस टाळून प्रवास सुरू ठेवतो तेव्हा आपण शिकलो आहोत हा केवळ भास आहे. एकूण शिक्षणात माणूस उभा करण्याचा विचार केला म्हणून शाळेला मंदिराच्या रूपात पाहिले जाते.पूर्वी या शाळांना जीवन शिक्षण विद्या मंदिर म्हटले जायचे. जीवन हे मानवी प्रवासातील उत्तमतेचे दर्शन तेथे घडते. तेथे विद्या मिळेल,त्यातून समृध्दतेचा प्रवास घडेल. त्या करीता या मंदिरात आचार्यांचे दर्शन महत्वाचे आहे. तेथे आचार्य प्रतिबिंबित झाले, तर मानवी विकासाची प्रक्रिया सहजतेने घडेल. त्या करीता माणूसपणावर विश्वास ठेऊन पेरते राहण्याची गरज आहे.

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com