असत्याची बीजे पेरता...

शिक्षणाचा पाया असत्याचा आणि मुखवटयांचा असेल तर आपण निर्मळ चेहरे कसे निर्माण कसे करणार? भोवताल अंधारलेला असेल आणि हाती प्रकाशाचा दिवा नसेल तर सारेच अंधारलेले असणार यात शंका नाही. दिवा हाती घेतला तरच प्रकाशाची वाट निर्माण करता येईल. त्यामुळे भोवताल प्रकाशमय असायला हवा असे वाटत असेल तर प्रकाशाची पणती हाती घेऊन फिरावे लागेल. आपल्याला जे काही करायचे असेल... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
असत्याची बीजे पेरता...

आपल्या शिक्षणाचा पाया कोणत्या विचारांवर उभा आहे त्यावरच व्यक्तीचे आणि समाजाचे बाहय जीवन फुलत असते. आपण मस्तकी कोणता विचार घेऊन चाललो आहोत त्यानुसार वाट निर्माण होत असते.आपण जर हाती दिवा घेऊन प्रवास करत असू तर आपला भोवताल प्रकाशाने उजळून निघणार आहे. आपण मनात हिंसेचा सुरा घेऊन निघाल असाल तर आपल्याला अहिंसा कशी दिसणार..? आपण प्रेमाचा दिवा हाती घेतला असेल तर भोवताल सारा प्रेमानेच उजळून निघेल. आपण जी काही मनातून पेरणी करतो ते उगवते. पेरलेले उगवणे हा निसर्गाचा नियम आहे.

आपल्या जीवनात येणारे सण,उत्सव ही नात्याची वीण पक्की करण्यासाठी आहे. त्यातून आपण आपला भोवताल स्नेहाने जोडत असतो. त्या निमित्ताने मनात पेरणीचा विचार पक्का असतो. शिक्षण म्हणजे पेरणी करणारी व्यवस्था आहे आणि भोवतालमध्ये जे काही दिसते आहे ते सारे शिक्षणाच्या पेरणीची उगवण आहे.त्यामुळे आपण शिक्षणाचा पाया ज्या तत्वांवर उभा करत जावू त्याप्रमाणे समाजाची इमारत उभी रहाणार आहे. रजनीश यांनी म्हटले आहे की , “आपली व्यवस्था असत्यावर उभी आहे आणि आपले उददीष्ट मात्र सत्याची वाट आहे.” जी गोष्ट असत्याच्या पायावर उभी असेल तर ती सत्याच्या वाटेने चालण्याची शक्यता नाही. त्याच प्रमाणे व्यवस्था ही हिंसेच्या पायावर उभी आहे आणि आपले साध्य अहिंसा आहे. जर पेरणीच हिंसेची असेल तर अहिंसेचे दर्शन कसे घडणार हा खरा प्रश्न आहे.सारा व्यवहार बेईमानीचा आहे आणि अपेक्षा इमानदारीची आहे.खरंतर आपण जितके चांगुलपणाची अपेक्षा करतो तितकी वाईटाची पेरणी भोवतालमध्ये पेरत असू तर परिवर्तनाची अपेक्षा कशी करणार ?.त्यामुळे पेरणीचा विचार महत्वाचा आहे.

आपल्याला जर सत्याची पेरणी करायची असेल तर त्यासाठीची हिम्मत आपण कमवायला हवी आहे. सत्य नेहमी नग्न असते..आणि असे नग्न काहीच स्वीकारण्याची हिम्मत आपल्यात नाही.आपली वरीष्ठ व्यक्ती,नेतृत्व भ्रष्टाचारी असते पण सांगण्याची हिम्मत शिक्षण देत नाही.आपल्यापेक्षा कोणी मोठे असेल तर त्या व्यक्ती बददलचे सत्य काही असले तरी सांगण्याची हिम्मत करत नाही.आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबददल आदर नसेल तर आपण त्याला आदर देत असल्याची वरवरची भावना व्यक्त करतो.कारण व्यवस्था सांगते की,ती तुमच्यापेक्षा मोठी आहे..आणि मोठयांचा आदर करायल हवा..मग मोठयांचा आदरच करायचा असेल तर सर्वंच मोठयांचा आदर करायला हवा. बाप मोठा असेल तर त्याचा आदर करण्याची पेरणी केली जाते पण, त्या वयाचा घरातील नोकर असेल तर त्याचा आदर करायला हवा पण तसे घडत नाही.आपली सारी व्यवस्था असत्याचा पायावर उभी आहे.सत्याची पेरणी करण्याची आणि स्विकारण्याची हिम्मत आपण दाखवू शकलेलो नाही..त्यामुळे आपल्या समाज व्यवस्थेचे सारे प्रश्न आहे हे लक्षात घ्यायला हवे.

शिक्षणाचा पाया असत्याचा आणि मुखवटयांचा असेल तर आपण निर्मळ चेहरे कसे निर्माण कसे करणार? भोवताल अंधारलेला असेल आणि हाती प्रकाशाचा दिवा नसेल तर सारेच अंधारलेले असणार यात शंका नाही. दिवा हाती घेतला तरच प्रकाशाची वाट निर्माण करता येईल. त्यामुळे भोवताल प्रकाशमय असायला हवा असे वाटत असेल तर प्रकाशाची पणती हाती घेऊन फिरावे लागेल. आपल्याला जे काही करायचे असेल ते मनात ठेवावे लागेल. मनाची शुध्दता असेल तर बाहय विचारात आणि वर्तनात देखील शुध्दतेचे वर्तन आपोआप घडताना दिसेल.अन्यथा आपण मनात एक आणि बाहय एक असे कधीच घडत नाही. चित्ताची शुध्दता हेच यशाचे गमक आहे.संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते की, “ चित्त शुध्द तरी शत्रू मित्र होती,व्य़ाघ्र ही न खाती सर्प तया..” हा मूलभूत विचार आहे. आपल्या शिक्षणातून आपण सुविचारांची पेरणी करत असतो.पण मुळात सुविचाराची पेरणी करत असताना कुविचाराचा भोवताल असेल तर त्याची उगवण होण्याची शक्यता नाही. आपण जाणीवपूर्वक पेरणी करूनही अनेकदा ते विचार उगवत नाही. आणि ज्याची पेरणी केली जात नाही तरी ते उगवते हे कसे घडते..? जे उगवते ते मुळता त्या जमिनीत असते हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या भोवतालमध्ये मुळात ते असते का ? नसेल तर तो विचार कोठून येतो आणि आपल्याला सुविचाराची पेरणी करण्यासाठी अटटहास करावा लागतो. शिक्षण हे सत्याची वाट असते. आपण भोवताल जाणून देण्याची गरज शिक्षणातून अपेक्षित आहे. आपण ती जाणून देणार नसू ,त्याची अंतरिक पेरणी करणार नसू तर शिक्षण केवळ आदर्शाची वाटेने चालून उगवणार नाही. मुळात अगोदर जे काही आहे याची ओळख करून घेण्याची गरज आहे.जे नको आहे असे वाटते ते मुळात असेल तर दूर करावे लागेल. ते दूर न करता नवे काही पेरणी करण्याचा प्रयत्न केला तर उगवले तरी ते पीक जोमात येत नाही. त्यामुळे आहे त्या वास्तवाची ओळख करून देण्याचे काम शिक्षणातून घडायला हवे आहे.

आपण भोवतालच्या दबावाने चांगुलपणाची वाट धरत असतो...मात्र अंतकरणात तो विचारच नसतो. वरवर आपला प्रतिसाद नाही असे वाटत असले तरी मनात मात्र मुळ विचार खोलवर रूजलेला असतो. आपल्या आतमध्ये भावभावनाची पेरणी असते. आपण सत्याच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करतो मात्र तो प्रवास काही खरा असत नाही. रजनीश म्हणतात की, आपण सत्याबददल कितीतरी बोलत असतो..पण सत्य स्वीकारणे आणि वदने दोन्ही कठीण गोष्टी आहेत. सत्य स्वीकारण्यासाठीची हिम्मत आपल्याला शिक्षणातून मिळण्याची गरज असते. ती कितीही शिकलो तरी ती मिळत नाही.त्यामुळे सत्याची वाट चालावी असे वरवर वाटत असले तरी सत्याचा धोकाच मोठा वाटत असतो..समजा तुम्ही पती पत्नीच्या नात्याने बांधले गेलेले आहात. विवाहानंतरच्या काही काळाने तुम्ही फिरायला गेला आहात. रस्त्याने तुम्ही जात असताना एखादी सुंदर तरूणी चालली आहे. तीला पहाताच तुम्हाला तुमचा भूतकाळ स्मरतो आहे... ती तुमची पूर्वीची प्रियसी आहे. आता हे तुम्ही जाणता आणि ती आपला इतिहास सांगावा असे तुम्हाला वाटते..कारण ते सत्य असते.. मात्र मनात सांगितल्यानंतर काय काय घडेल याची भिती असते.त्यामुळे मन तयार होत नाही. कारण मन सत्य सांगण्यासाठी तयार नसते..आता तुम्ही धीर करून तिच्याकडे बोट दाखवत तुम्ही पत्नीला म्हणाला की, ही समोर दिसणारी सुंदर तरूणी ही महाविद्यालयात शिकत असताना माझी प्रियसी होती.महाविद्यालयात असताना आम्ही दोघे एकमेकावर प्रेम करत होतो.आता हे तुम्ही अत्यंत धाडसाने बोलला हे खरे पण ते सत्य स्वीकारणासाठी तुमच्या पत्नीच्या मनात खरच हिम्मत असेल का ? खरेतर ते सत्य भूतकाळातील होते..आणि पती आपल्या सोबत आहे हे वर्तमान आहे तरी पण, विधान ऐकल्यावर पत्नीच्या मनात काय भावना निर्माण झाल्या असतील.. ?

कदाचित ती तुमच्या सोबत चालताना घटट पकडलेला हात आता तिने सैल केला असेल. तुमच्या बददल मनात असलेला आदराचा भावही कमी झाला असेल. तुम्ही आता तिच्या नजरेतून उतरला असाल..सत्य स्वीकारणे आणि सांगणे घडत नाही.स्वीकारणे सर्वांसाठी जड जाते. सत्य हे सत्य असले तरी ते पकडण्यासाठी आपले मन कधीच तयार नसते.अर्थात नव-याने सत्य सांगण्याचे धाडस दाखविले हे विशेष. अर्थात सत्य सांगण्याचे धाडस वर्तमानात नाही आणि ते स्वीकारण्याची हिम्मतही नाही. त्यामुळे ती वाट चालणे पसंत करणे घडत नाही. प्रत्येक जन मनात असत्याची वाट चालत रहाते आणि सत्याची वाट चालावी अशी अपेक्षा करत असते. खरेतर सत्य कितीही वाईट असले तरी ते स्वीकारायला हवे असते मात्र आपल्या व्यवस्थेत ते घडत नाही.मुळात सत्य हे नग्न असते..ते नग्न स्विकारण्यासाठी आपल्या मनाची जडणघडण शिक्षणाच्या प्रक्रियेतून केली जात नाही.कधीकाळी बायबल मध्ये सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे सांगितले जात होते आणि कोपरनिकस सांगत होते की, नाही रे बाबा हे काही सत्य नाही. विज्ञानाचे सत्य तर हे आहे की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते..पण हे विज्ञानाचे सत्यही धर्म सांगणा-यांना स्वीकारता आलेले नाही. त्याचाही कोपरनिकसला त्रास सहन करावा लागला.सत्य सांगावे..सत्य हीच धर्माची वाट असते असे सांगणारे धर्माचे प्रचारकही सत्य स्वीकारू शकत नाही हे आपले वास्तव आहे. त्यामुळे आपण धर्माचा खरा विचारही अंगीकारणे करू शकलो नाही.धर्माची मांडणी ज्या तत्वाज्ञानावर आहे ते स्वीकारणे घडलेले नाही.आपण फार तर ते सांगत सुटू पण त्यावाटेने चालण्याची हिम्मत दाखवू शकलो नाही.शिक्षण हे सत्याची वाट दाखविण्यासाठी आहे.नेमकी वास्तव काय आहे हे शिक्षण सांगते कारण शिक्षणातून विवेकाची वाट निर्माण केली जात असते.विवेकाबरोबर येणारे शहाणपण ही सत्याची धारणा असते.सत्य म्हणजे प्रखर प्रकाश असतो...आपल्याला प्रकाश हवा असतो पण तो मंद स्वरूपातील हवा असतो..त्यामुळे सत्य हे काही मंद प्रकाशाची वाट नाही.हे कधीतरी जाणून घेण्याची गरज आहे.आपल्या भोवतालमध्ये असत्याची वाट चालणारे अधिक आहेत म्हणून सारे कसे गोड गोड दिसते आहे.सत्य हा संघर्ष असतो असे म्हटले जाते मात्र ते काही खरे नाही.सत्य वदने आणि स्वीकारणे घडले तर संघर्षाची वाट निर्माण होणार नाही.मात्र एक सत्याची वाट चालेल आणि दुसरा असत्याची तर संघर्ष होणारच..त्यामुळे शिक्षणाने सत्याची आणि असत्याची ओळख करून देण्याची गरज आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com