अध्ययन निष्पत्ती केंद्रीत अध्यापनाची गरज

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने राज्य संपादणूक सर्वेक्षण अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. गेले काही वर्षात विषयात अध्ययन क्षती झाल्याचे विविध सर्वेक्षणात समोर आले होते. त्यामुळे या शासकीय सर्वेक्षण अहवालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते. अखेर सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात राज्याची शैक्षणिक संपादणूक राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर उंचावत असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी भाषा व गणिताच्या विशिष्ट अध्ययन निष्पत्तीत मात्र... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
अध्ययन निष्पत्ती केंद्रीत अध्यापनाची गरज

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने राज्य संपादणूक सर्वेक्षण अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. गेले काही वर्षात विषयात अध्ययन क्षती झाल्याचे विविध सर्वेक्षणात समोर आले होते. त्यामुळे या शासकीय सर्वेक्षण अहवालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते. अखेर सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात राज्याची शैक्षणिक संपादणूक राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर उंचावत असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी भाषा व गणिताच्या विशिष्ट अध्ययन निष्पत्तीत मात्र राज्याचे विद्यार्थी मागे पडत असल्याचेही समोर आले आहे. भाषेपेक्षा गणित विषयाची स्थिती निराशाजनक आहे.राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातही विशिष्ट अध्ययन निष्पत्तीमध्येच राज्याच्या विद्यार्थ्यांची संपादणूक कमी असल्याचे नोंदवले गेले आहे.

मागे पडलेल्या अध्ययन निष्पत्तींची कारणांचा शोध घेऊन येत्या काही काळात जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. शेवटी विद्यार्थ्यांचा समग्र विकास हेच आपले उद्दीष्ट आहे. काही अध्ययन निष्पत्ती साध्य करणे कठीण जात असले तरी त्यासाठी नवनविन अध्ययन अनुभवाची रचना आवश्यक ठरणार आहे. मागे पडणा-या कारणांचा शोध घेतला असता त्यात विद्यार्थी, शिक्षक, पुस्तकांतील आशय यांची भाषा भिन्न असणे, विद्यार्थ्यांचे पूर्वानुभवाच्या मर्यादा, वर्ग अध्यापनातील शिक्षकांच्या उणिवा, विद्यार्थ्यांचा सरावाचा अभाव, आकलन क्षमता कमी असणे यासारखी काही कारणे नोंदवली जातात. काही अध्ययन निष्पत्ती साध्य होत नसल्यामुळे राज्याच्या संपादणूकीची आलेख उंचावण्यात अडथळे निर्माण होत आहे. अर्थात राज्याची सरासरी संपादणूक ज्या अध्ययन निष्पत्तीत कमी आहेच त्या पलिकडे जाऊन प्रत्येक जिल्ह्याचा देखील विचार करता येईल. खरेतर प्रत्येक जिल्ह्यात ज्या अध्ययन निष्पत्ती संपादणूक कमी आहे त्या जिल्ह्यांत स्वतंत्रपणे काम होण्याची गरज आहे. तसे घडले तर राज्याची संपादणूक आपोआप उंचवण्यास मदत होईल. कमी संपादणूक असलेल्या अध्ययन निष्पत्ती देखील प्रत्येक जिल्ह्यात भिन्न आहेत. त्यामुळे उपाययोजना स्थानिक परीस्थिती लक्षात घेऊन करण्याची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यांने तसे नियोजन केले तरच राज्याचा आलेख उंचावण्याची शक्यता आहे.

परिषदेच्या वतीने राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात राज्यातील 11 हजार 933 शाळांची निवड करण्यात आली होती. 2 लाख 53 हजार 449 विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग नोंदवला गेला होता. सर्वेक्षणात तिसरीच्या सहभागी शाळांची संख्या 31.48 टक्के, पाचवीची 33.94 टक्के आणि आठवीची 34.58 टक्के आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मुलांचे शेकडा प्रमाण 48.57 टक्के तर मुलींचे 51.43 टक्के इतके आहे. सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांचा विचार करता शासकीय शाळांचे प्रमाण शेकडा 53.99 टक्के तर खाजगी अनुदानित शाळांचे प्रमाण 46.01 टक्के इतके आहे. शहरी शाळांचे शेकडा प्रमाणे 20.89 टक्के तर ग्रामीण शाळांचे शेकडा प्रमाण 79.11 टक्के इतके आहे. या सर्वेक्षणात मराठी व गणित या दोन विषयांची विविध अध्ययन निष्पत्तींचा विचार करून संपादणूक पडताळणी करण्यात आली.

इयत्ता तिसरीसाठी भाषा विषयाच्या दोन अध्ययन निष्पत्तींची पडताळणी करण्यात आली. आकलनासह वाचन करतो. मुख्य संकल्पना, तपशील, क्रम, निष्कर्ष काढणे या अध्ययन निष्पत्तीमध्ये सरासरी संपादणूक 73.7 टक्के इतकी आहे. दुसरी अध्ययन निष्पत्ती वर्गाच्या भिंतीवर लिहिलेल्या अथवा लावलेले पोस्टर्स, तक्ते वाचतो या अध्ययन निष्पत्तीत 80.3 टक्के संपादणूक प्राप्त आहे. पाचवीच्या भाषा विषयाच्या अध्ययन निष्पत्तीत आकलनासह मजकूर वाचतो. तपशील आणि घटनांचा क्रम शोधता या निष्पत्तीची सरासरी साध्यता 62.2 टक्के इतकी आहे. या निष्पत्तीत यवतमाळ जिल्हा सर्वात आघाडीवर असून त्या जिल्ह्याने 71 टक्के संपादणूक प्राप्त केली आहे. गडचिरोली जिल्ह्याने 52.6 टक्के संपादणूक प्राप्त केली असून ती राज्यात सर्वात कमी आहे. 50 ते 60 टक्के संपादणूकीत 9 जिल्हे आहेत तर 60 पेक्षा अधिक संपादणूक प्राप्त असलेल्या जिल्ह्यात उर्वरीत जिल्हयांचा समावशे आहे. 70 टक्के पेक्षा अधिक संपादणूक प्राप्त असलेला एकच जिल्हा आहे. इयत्ता आठवीमध्ये लिखित मजकूराचे साहित्याचे आकलनासह वाचन करतो. वाचताना तपशील, पात्र, मुख्य कल्पना व घटनांचा क्रम ओळखतो. या अध्ययन निष्पत्तीची सरासरी संपादणूक 69.52 टक्के आहे. सिंधूदूर्ग जिल्हयाची संपादणूक 79.50 टक्के आहे तर सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्याची 61.70 टक्के इतकी आहे. 70 टक्यापेक्षा अधिक संपादणूक ही 15 जिल्ह्याची आहे, तर उर्वरीत जिल्हे साठ टक्यापेक्षा अधिक आहे.

गणित विषयाचा विचार करता इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांची संपादणूक तेरा अध्ययन निष्पत्तीच्या आधारे पडताळणी करण्यात आली. गणितात सरासरी संपादणूक 68.50 टक्के आहे. गणितात डॉट ग्रिड कागद वापरून, घडया घालून, कागद कापून, सरळ रेषेच्या सहाय्याने व्दिमितीय आकार तयार करतात या निष्पत्तीत विद्यार्थ्यांची सर्वाधिक संपादणूक प्राप्त आहे. तिचे शेकडा प्रमाण 82.4 इतके आहे. सेंटीमिटर व मीटर या प्रमाणित एककांच्या साहाय्याने लांबी व अंतर मोजतात किंवा अंदाज करतात आणि एकाकातील संबंध ओळखतात या निष्पत्तीत विद्यार्थी सर्वात कमी संपादणूक प्राप्त आहे. ते प्रमाणे अवघे 38.4 टक्के इतके आहे. कडा, कोपरे आणि कर्णाच्या संख्येवरून व्दिमितीय आकाराचे वर्णन करतात. या निष्पतीचे साध्यतेचे प्रमाण 42.1 टक्के आहे. उर्वरीत निष्पत्तीपैकी दोन निष्पत्ती साध्यतेचे प्रमाण 60 टक्क्यापेक्षा अधिक असून बाकी सर्वच निष्पत्ती साध्यतेचे प्रमाण 70 टक्केपेक्षा अधिक आहे. एक निष्पत्ती वगळता उर्वरीत निष्पत्तीत आपण 75 टक्क्यापेक्षा अधिक यश मिळू शकलेलो नाही. पाचवीचा विचार करता दैंनदिन जीवनात संख्यावरील क्रियांचा वापर करतात या अध्ययन निष्पत्तीत संपादणूक 66 टक्के. दैनंदिन जीवनातील घटनांना लागणारा वेळ किंवा घटंनामधील कालावधी मोजून, तसेच बेरीज वजाबाकी करून गणन करतात या अध्ययन निष्पतीची संपादणूक 73.4 टक्के आहे. माहिती सारणी व स्तंभाकृतीने दाखवतात व अनुमान काढतात या अध्ययन निष्पत्तीची संपादणूक 66.3 टक्के आहे. एक हजारापेक्षा मोठया संख्यांवर स्थानिक किंमती जाणून घेऊन चार मूलभूत अंकगणित क्रीया करतात या निष्पत्तीत 73.5 टक्के संपादणूक आहे. लांबी वस्तूमान धारकता व एकाकाचे रूपांतरण या घटकात 57.4 टक्के संपादणूक प्राप्त आहे. गणिताच्या अध्ययन निष्पतीचा विचार करता ब-याच निष्पत्ती साध्य करण्यात विद्यार्थी मागे पडताना दिसता आहेत. आठवीत गणितात 22 अध्ययन निष्पत्तींची पडताळणी करण्यात आली. आठवीची सरासरी संपादणूक 49.10 टक्के इतकी आहे. ही सरारसरी संपादणूक सर्वात कमी आहे. स्तंभालेखावरून माहितीचे अर्थनिर्वचन करतात या अध्ययन निष्पत्तीत सर्वाधिक 73.76 टक्के संपादणूक आहे. आकृतीबंधाच्या साहाय्याने ऑयलरच्या सूत्राचा पडताळा घेतात या अध्ययन निष्पत्तीची संपादणूक अवघी 36.01 टक्के इतकी असून ती सर्वात कमी आहे. 22 पैकी अवघ्या 7 अध्ययन निष्पत्तीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक संपादणूक प्राप्त आहे. उर्वरीत सर्व अध्ययन निष्पत्ती या पन्नास टक्क्यापेक्षी कमी संपादणूक प्राप्त आहेत. आठवीच्या स्तरावर गणिताची स्थिती गंभीर आहे. या सर्व निष्पत्तींची वस्तूस्थिती लक्षात घेतली तर गणितात आपले राज्यातील अनेक जिल्ह्ये मागे असल्याचे दिसता आहेत. जशी जशी इयत्ता उंचावत जाते त्याप्रमाणात संपादूक स्तर खालावत आहे. हे वास्तव याही सर्वेक्षणात समोर आले आहे.गणितातील ज्या अध्ययन निष्पत्ती भूमितीशी संबंधित आहेत त्यात संपादणूक प्राप्त करण्यात अडचणी येत आहेत.

खरेतर भाषेचे आकलन ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर शिक्षण अभ्यासक असे सांगतात की, भाषेचे आकलन जितक्या प्रमाणात असते तितक्याच प्रमाणात सरासरी संपादणूक इतर विषयांची असते. त्यामुळे आपल्या राज्याची इयत्ता तिसरीत भाषेची सरासरी संपादणूक 77 टक्के, पाचवीची 62.21 टक्के, आठवीची 69.52 टक्के इतकी आहे. गणिताची सरासरी संपादणूकीचा विचार करता इयत्ता तिसरीत 68.50 टक्के, पाचवीत 64.47 टक्के, आठवीत 49.10 टक्के इतकी आहे. तिसरीत गणित व भाषेतील फरक 8.49 टक्के असून तेथे भाषेचे संपादणूक अधिक आहे. पाचवीचे चित्र मात्र वेगळे आहे येथील फरक 2.26 टक्के असून तेथे गणिताचे संपादणूक अधिक असल्याचे समोर आले आहे. आठवीतील दोन्ही विषयातील फरक सर्वाधिक असून तो 20.42 टक्के इतका आहे. भाषेची संपादणूक चांगली असूनही गणिताचे आकलन होण्यात विद्यार्थ्यांना अधिक समस्या असल्याचे दिसते आहे. पाचवीला भाषेची संपादणूक आठवी आणि तिसरीपेक्षा कमी झालेली दिसते आहे. राज्यातील एकाही इयत्तेची आणि विषयांची आणि अध्ययन निष्पत्तीचा अपवाद वगळता सरासरी संपादणूक 80 टक्क्याच्या वर जात नाही.

या सर्वेक्षणात जिल्हा निहाय विविध इयत्ता आणि विषयांची अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या संपादणूकीच्या आधारे प्रक्रियेत बदल घडवून आणणे योग्य ठरणार नाही. जिल्ह्यनिहाय आणि अध्ययन निष्पत्तीनिहाय अहवाल जाहीर झाल्याने अधिक सुक्ष्म नियोजन करता येणे शक्य आहे. गेले काही वर्ष राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्राचा आलेख घसरताना दिसतो आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय संपादणूकीतही महाराष्ट्राला वरचष्मा राखता आलेला नाही. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेला पाठयपुस्तकाच्या बाहेर नेऊन अध्ययन अनुभवांची रचना करावी लागणार आहे. पाठयपुस्तक केंद्रित असलेली अध्यापन प्रक्रिया अध्ययन निष्पत्तींचा विचार करून भविष्यात करावी लागणार आहे. त्यादृष्टीने ज्या निष्पत्तीत जिल्हा मागे आहे त्याचा विचार करून जिल्हानिहाय आऱाखडयासाठीचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसे झाले तर राज्याचा घसरलेला आलेख उंचावणे शक्य आहे. प्रत्येकवेळी राज्यस्तरावरून प्रयत्न करून सुधारणेसाठीची पावले टाकण्याची अपेक्षा केली जाते. मात्र आता किमान प्रत्येक जिल्ह्यची जबाबदारी असलेल्या प्रशिक्षण संस्थानी सुक्ष्म नियोजन केले तर भविष्याची पाऊलवाट अधिक प्रकाशमय करणे शक्य आहे. आजवर महाराष्ट्राने देशाला आपल्या वाटेने चालणे भाग पाडले होते .त्या वाटा आता अधिक अडथळ्याची बनत चालल्या आहे. त्यामुळे बदलाच्या दिशेने पावले टाकण्याची गरज हा अहवाल अधोरेखित करतो आहे. प्रत्येक जिल्ह्याने भाषेच्या अध्ययन निष्पत्तीसाठी जाणीव पूर्वक स्थानिक परीस्थिती लक्षात घेऊन प्रयत्न केले तर राज्याची शैक्षणिक संपादणूक निश्चित उंचावेल यात शंका नाही. शेवटी भाषेची संपादणूक उंचावली तरच गणित आणि इतर विषयाची संपादणूक उंचावेल यात शंका नाही.

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com