मी स्वस्थ कसा बसू?

खरा भारतीय नागरिक जोपर्यंत मुलांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या संधी निर्माण करून देत नाही तोवर खरा भारतीय नागरिक स्वस्थ बसू शकणार नाही. कारण तो मुलांच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतो. खरे तर समाजाने ती संवेदनशीलता जोपासली तरच... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
मी स्वस्थ कसा बसू?

प्रत्येक देशातील मुलांकडे तेथील नागरिक आणि तेथील समाज कसा पाहतो यावरती देशाचे भविष्य अवलंबून असते. मुलांवर काही लादण्यापेक्षा त्यांना त्यांच्या विकासासाठी स्वातंत्र्य देण्याची गरज असते. मुलं ही जर राष्ट्राची संपत्ती असेल तर त्या संपत्तीचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मुलांचे संवर्धन म्हणजे काय? तर त्यांच्या विकासासाठी जे जे लागेल त्या त्या सुविधा मोठयांनी निर्माण करणे होय.

खरा भारतीय नागरिक जोपर्यंत मुलांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या संधी निर्माण करून देत नाही तोवर खरा भारतीय नागरिक स्वस्थ बसू शकणार नाही. कारण तो मुलांच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतो. खरे तर समाजाने ती संवेदनशीलता जोपासली तरच आपल्याला विकासाची पाऊलवाट निर्माण करता येणार आहे. या वयातील मुलांना ज्या स्वरूपाचे वातावरण निर्माण करून दिले जाईल त्या वाटा मुलं चालत राहतील. त्यामुळे मुलांच्या वाटा कशा निर्माण करतो यावरच राष्ट्राच्या विकासाच्या वाटा अवलंबून असतात.

मी स्वस्थ कसा बसू?
फुकाची बडबड हवी कशाला?

या देशातील शिक्षणाच्या क्षेत्रात गिजूभाई हे असे एक नाव आहे, की जे नाव मुलांच्या हदयाशी नाते सांगणारे आहे. मुलांच्या बाबतीत त्यांनी जो विचार केला आहे तितकी संवेदनशीलता वर्तमानात जोपासली गेली तर सृजनशीलतेच्या वाटा सहजतेने निर्माण करणे शक्य आहे. त्यांनी संपूर्ण बाल विकासाच्या प्रक्रियेत बालकांचे स्वातंत्र जोपासले आहे. त्यांनी अगदी काही प्रश्न उपस्थिती करीत मुलांना समजावून घेण्यासाठी मोठयांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. एखाद्यावेळी मुलाला चौतीस गुण मिळाले तर तो नापास होतो आणि पस्तीस पडले तर पास होतो. हा एक मार्क मुलांच्या आयुष्यावरती विपरित परीणाम करणारा असतो. हा एक मार्क कदाचित त्यांने कविता पाठ केली नसेल, स्वाध्याय सोडविला नसेल मग तो उद्या करेल. त्यालाही कदाचित अडचणी असू शकतात.

मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आपण मुलांच्या जीवनाशी खेळत तर नाही ना? असा अत्यंत संवेदनशील प्रश्नही ते व्यवस्थेला विचारतात. मुलांच्या परीक्षा या मुलांचे शिकणे किती परीणामकारक झाले आहे हे पडताळून पाहण्यासाठी असतात. त्याचा उपयोग पास, नापास करणे, वर्गीकरण करणे यासाठी नाही हे लक्षात घ्यायला हवे. शिकण्याचा विचार शालेय शिक्षणात होण्याची गरज आहे. मुलांना सृजनशीलतेच्या वाटा दिसाव्यात यासाठी शिक्षणाची गरज आहे. मात्र त्यांच्या गरजा, कल, अभिरूची याचा विचार केला जात नाही. त्या ऐवजी त्यांच्यावरती लादणे हाच विचार महत्वाचा ठरतो.

मी स्वस्थ कसा बसू?
मुलं हाच आरसा..

त्यामुळे गिजूभाई म्हणतात, “मुले जोवर घरात विखूरली जातात आणि शाळेत अपमानित होतात तोवर मला स्वस्थ बसणे शक्य नाही”. खरंतर आपल्या व्यवस्थेत घर हेच मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. मात्र त्या ठिकाणी केवळ अन्न, वस्त्र, निवारा दिला म्हणजे आपण त्यांचे संगोपन केले असे होत नाही. घरात मुलांवर प्रेमाचा वर्षाव हवा. मुलांचे मानसिक स्वास्थ जोपासणारी व्यवस्था हवी. मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी घराला आणि घरातील माणसांना कान हवेत. मुक्तपणे खेळण्यासाठीची ठिकाणे हवीत. त्यांच्या मनातील भिती, चिंता संपेल असे वातावरण हवे. त्यांच्या पाठीवर हात ठेवत लढ म्हण असे सांगणारे कोणीतरी हवे असते. माणसांनी सतत त्यांना जोपासायला हवे. जाणून घ्यायला हवे. मात्र त्यांचे घरातील असणे गृहित असते. त्याना जाणून घेणारी कोणतीच व्यवस्था नसते. त्यांच्या मनातील प्रश्नांना कोणतीच उत्तरे नसतात. ती दिली जावीत असेही मोठयांना वाटत नाही.

एका अर्थाने घरात मुले विखूरलेले दिसतात. त्यांना त्या घरात मानसिक समाधान तरी मिळते का? हा प्रश्न आहे. मुलाच्या आस्तित्वाची दखल प्रत्येक ठिकाणी घेणे खूप महत्वाचे आहे. शाळेतील अनुभवही त्यांना गृहित धरण्याचा आहे. मुलांना प्रोत्साहित करणे, प्रेरणा देणे, उत्साहवर्धक वातावरण निर्माण करणे महत्वाचे असते. मात्र त्यांना मार्क कमी मिळाले, प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. शिक्षकांनी सांगितलेले ऐकले नाही. अभ्यास केला नाही. स्वाध्याय केला नाही.. अशी एक ना अनेक कारणामुळे मुलं वर्गात, शाळेत अपमानित होतात हे वर्तमान आहे. खरेतर मुलं एखादी गोष्ट का करीत नाही हे जाणून घ्यायला हवे. मुलं तर प्रत्येक कृतीतच आनंद शोधत असतात. त्यांना जेथे आनंद मिळेल ती कृती वेगाने आणि अचूकतेने करतात. पण शाळेतील प्रत्येक अपयशाला मुलंच जबाबदार असतात अशी आपली व्यवस्था सांगत असते.

मी स्वस्थ कसा बसू?
आपण मुलांना गृहित का धरतो?

मुलांच्या अपय़शासाठी व्यवस्थेने जबाबदारी स्विकारायला हवी. मात्र व्यवस्था मुलांवरती अपयशाची जबाबदारी लादून मोकळी होते हे व्यवस्थेचे अपय़श आहे. त्यामुळे एकतर शालेय स्तरावर तुलना केली जाऊ नये. कोणत्याही परीस्थितीत ढ चा शिक्का मारला जाऊ नये. वर्गीकरण केले जाऊ नये. त्यांना आनंदाने शिकू द्यावे. शिकणे महत्वाचे आहे. परीक्षा आणि परीक्षेतील मार्क नाही हे लक्षात घ्यायला हवे. मात्र शिकण्याचा विचार न करता अनेकदा त्यांच्या अपयशामुळे अपमानित करण्याची वृत्ती जोवर आहे तोवर संवेदनशील माणूस अस्वस्थच राहाणार आहे. गिजूभाई देखील तेच म्हणतात की आपल्या भोवताल मध्ये असे काही असेल तर मी स्वस्थ तरी कसा बसू? मुलांच्या प्रति असलेली ही संवेदनशीलता आहे.

त्याच बरोबर मुलांना खेळायला मैदाने नाहीत. कामासाठी बगीचे नाहीत आणि शिकायला जागा नाही असे असेल तर त्यात मुलांचा काय बर दोष? हे पाप तर आम्हा मोठयाचे आहे. मुलांच्या विकासासाठी केवळ शाळेतील अध्ययन अध्यापनाच्या विषयापलिकडे आणखी बरच काही गरजेचे असते. उत्तम शिक्षण म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक विकास होय. यातील शारीरिक विकासाकरीता मैदानाची नितांत गरज आहे. समजात समृध्द मैदाने असणे याचा अर्थ निकोप वृत्तीच्या माणसांची निर्मिती प्रक्रिया आहे. मैदाने जोवर आहे तोवरच आपल्याला अत्यंत समृध्द आणि उत्तम मानसिकतेचा समाज निर्माण करता येणार आहे. मैदाने हा बालकांचा श्वास असतो. ज्यांचे ज्यांचे नाते मैदानाशी ते ते बालक राष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचे ठरतात. त्यामुळे आम्ही त्या मुलांसाठी मैदाने ठेवणार आहोत की नाही? हा प्रश्न आहेच.

मी स्वस्थ कसा बसू?
आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

उन्नत समाजासाठी शाळां इतकीच मैदानांची गरज आहे. ती आम्ही स्वार्थापोटी नष्ट करीत आहोत. मनांच्या विकासाकरीता बागांची देखील गरज आहे. सौंदर्यवृत्ती विकसित करण्याबरोबर तेथे मातीत काम करणे असेल, फुलहार बनविणे असेल, फुलांची रांगोळी काढणे असले. पक्षांचे गुंजण ऐकणे असेल. बागा मुलांची मने अधिक आनंदी करतात. त्यामुळे शाळा म्हणजे भिंती नाही आणि गावे म्हणजे केवळ घराची गर्दी नाही. तर मुलांच्या विकासासाठी बागांची निर्मितीही महत्वाची आहे. त्याच बरोबर शिकण्याची स्थळे देखील महत्वाची आहे. त्याकरीता शाळा या सुंदर हव्यात. मुलांची मने रमतील अशा सुंदर देखण्या शाळांची गरज आहे. आज दुर्दैवाने शाळा फक्त उंच उंच इमारती बनल्या आहे. मुलांच्या विकासाची प्रक्रिया त्यात होणार असेल तर त्यांच्यासाठी त्यांच्या गरजाचा विचार करण्याची गरज आहे.

आज देशात सुव्यवस्थित वर्ग नाहीत. वर्ग गळता आहेत. उन्हाचे तिरिप आत येता आहेत. मैदाने नाहीत, बागा नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. स्वच्छतागृह नाही, मुलांसाठी प्रयोगशाळा, ग्रंथालये, विषयांच्या वर्ग नाहीत, अनेक ठिकाणी शिक्षक नाहीत ही सारी वंचना असताना मुलांना गुणवत्तेचे शिक्षण कसे मिळणार? जेथे मुलांचे मन रमत नाही. मुलांच्या विकासासाठी स्वातंत्र्य जोपासणारी घरे नाहीत. त्यांच्या विकासाची प्रक्रियेचा विचार केला जात नसेल तर अशा परीस्थिती असेल तर संवेदनशील नागरीक स्वस्थ तरी कसा बसेल?

मी स्वस्थ कसा बसू?
तुम्ही फक्त इतकेच करा..!

अनेकदा मुलांना मान दिला जात नाही. त्याच बरोबर प्रेम हा त्यांचा हक्क आहे. पण प्रेमही त्याना दिले जात नसेल तर मुलांच्या हक्काचे हनन होते आहे. प्रेम हीच मुलांची सर्वात मोठी गरज आहे. तो केवळ माता, पित्याच्या प्रेमापुरता विचार नाही. तर त्या पलिकडे समाजातील प्रत्येकाने देशातील प्रत्येक बालकावरती प्रेम करण्याची गरज आहे. आजही आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी, सिग्नलच्या ठिकाणी भीक मागताना दिसणारी मुले पाहिली; की आपण त्या मुलांच्या बाबतीत काय विचार करतो आहोत? त्या मुलांशी समाजाचे असणारे वर्तनाने त्या मुलांच्या मानसिकतेवरती होणारा परीणामाचा कोणीच विचार करीत नाही. त्या मुलांशी असणारा व्यवहार पाहिला; की ते प्रेमाला भुकेलेले असतात आणि प्रेमाची भूक भागत नाही.

समाजाचा मिळणारा अनुभव लक्षात घेतला तर ते गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता अधिक असते. जन्मतः कोणीच गुन्हेगार नसतो, मात्र समाजातील अनुभव त्यांना त्या क्षेत्राकडे घेऊन जात असतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे मुलांना प्रेम मिळत नाही आणि समाज जोवर त्यांचा सन्मान करत नाही तोवर मनात अस्वस्थता कायम राहणार आहे. ती अस्वस्थता जीवनभर संवेदनशील माणसांच्या मनी एक भळभळती जखम असते. मुलांच्या संदर्भाने व्यवस्था अत्यंत कठोर आहे. त्यांच्या विकासाकरीता हव्या असलेल्या अनेक गोष्टींचा विचारही नाही. त्यामुळे कोणताही सज्जन माणूस कधीच स्वस्थ बसू शकणार नाही.

मी स्वस्थ कसा बसू?
घर हीच शाळा...

ती खंत गिजूभाई सातत्याने व्यक्त करतात. ते लिहितात..

मी स्वस्थ कसा बसू?

जोपयंत मुले घरात विखुरली जातात

आणि शाळेत अपमानित होतात

तोपयंत मी स्वस्थ कसा बसू?

जोपयंत मुलांना खेळायला मैदाने, कामांसाठी बगिचे,

शिकायला जागा नाहीत.

स्वतंत्र वाढायला घरे नाहीत, मी स्वस्थ कसा बसू?

मुलांना प्रेम आणि मान मिळत नाही तर मी स्वस्थ कसा बसू?

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

मी स्वस्थ कसा बसू?
कठीण आहे वाट परी...

Related Stories

No stories found.