Friday, April 26, 2024
Homeब्लॉगआनंदाहूनी थोर मज नाही काही...

आनंदाहूनी थोर मज नाही काही…

आपण शिक्षणाचा उद्देश समजावून घेतला तर शिक्षण ज्ञानासाठी असते असे म्हटले जाते. ज्ञान कशासाठी असा प्रश्न विचारला गेला तरी त्याचा उददेश हा आनंद मिळवण्यासाठी. आपण जीवनात जे काही प्रयत्न करत आहोत त्याचा उद्देश आनंद प्राप्त करणे हाच आहे. त्यामुळे शिक्षणाचा उददेशही माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हाच असणार यात शंका नाही. आनंद हा माणसांचा स्थायी भाव आहे. माणसांच्या जीवनाचे ध्येय नेमके काय ? माणूस जीवनात अनंत कष्ट सोसत हवे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो ते कशासाठी? जीवनाचा सारा प्रवास, सारी संपत्ती, सत्ता ,पदव्या या केवळ आनंद मिळवण्याचा राजमार्ग म्हणून तो प्रयत्न करत असतो.

एका अर्थाने माणूस आनंदासाठीच जगत असतो. जिथे जिथे आनंद मिळतो त्या गोष्टी माणूस पुन्हा पुन्हा करत असतो. त्यामुळे शिक्षणातून आनंद मिळत गेला तर माणूस शिक्षणातील अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहणे पसंत करेल, त्याकरता शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी व्हायला हवी.मुळात शिक्षण प्रक्रिया आनंददायी आहेच, मात्र जेव्हा ती प्रक्रिया स्पर्धात्मक बनते तेव्हा त्यातील आनंद हरवला जातो. कारण कोणतीही स्पर्धा ही आनंद देऊ शकत नाही . स्पर्धेत नेहमीच दुःख सामावलेले आहे. शिक्षणाचा मुळचा गाभा आहे तसाच राहिला आणि नैसर्गिकतेने प्रवास सुरू ठेवला तर शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी अनुभवास आल्याशिवाय राहाणार नाही.

- Advertisement -

जीवनात फक्त आनंद मिळायला हवा यासाठी सारा अट्टहास केला जातो. तो काही चुकीचा नाही.शिक्षण हा आनंदाचा मार्ग आहे. त्यामुळे शिक्षणात सहभागी असलेला प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा अनुभव यायला हवा. शिक्षणाचे स्वरूप व्यक्त करताना विनोबा म्हणतात ,की “विद्यालयात परमेश्वराचे आनंदस्वरूप प्रकट व्हायला पाहिजे. ईश्वराची रूपे अनंत आहेत, परंतु त्याची तीन रूपे विशेष प्रसिद्ध आहेत. एक आहे सत्, दुसरे चित् म्हणजे ज्ञान आणि तिसरे आनंद”. परमेश्वराचे स्वरूप जर आनंदमय असेल तर आपल्या आयुष्यात आपण आनंद प्राप्त केला तर परमेश्वराचे दर्शन झाले असे म्हणता येईल. शिक्षणातून तो आनंद प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्नाची गरज आहे. आपण सातत्याने शिक्षण आनंददायी करण्यासंदर्भाने बोलतो आहोत , पण त्यासाठीचे काही प्रयत्न देखील करत आहोत .त्या दिशेने प्रयत्न करत असलो तरी शिक्षणात जोवर स्पर्धेचा विचार आहे तोवर माणसात व्देष, मत्सर, राग, लोभाचे दर्शन घडत राहणार आहे. शिक्षण म्हणजे आनंद आहे तरी शिक्षणातून अपेक्षित आनंदाचे प्रतिबिबी पडत नाही याचे कारण काय ? तर शिक्षणाच्या मूळ कल्पनेपासून वर्तमानात दूर जाणे झाले आहे त्यामुळे शिक्षणात आनंदाचे दर्शन घडताना दिसत नाही.

कर्मयोगात, जगात, जीवनात सत्य प्रधान असते. ज्ञानाच्या गुहेत आणि विद्वानांच्या पुस्तकालयात ज्ञान प्रधान असते. भक्तिमार्गात आनंद प्रधान असतो. विद्यालयात घडणारी प्रत्येक गोष्ट भक्तिमार्गाने जाणारी आहे . त्यामुळेच विद्यालयात दिले जाणारे ज्ञान हा भक्तीचामार्गाचा विचार आहे. त्या मार्गात केवळ आनंद सामावलेला आहे. त्यामुळे त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करणा-या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद मिळायला हवा. शिक्षणात आनंद मिळत नसेल तर तो आपण ज्या वाटेने चाललो आहोत तो मार्ग चुकीचा असला पाहिजे. शिक्षण हे केवळ आनंद देत आले आहे आणि देत राहणार आहे कारण शिक्षणात आनंद भरलेला आहे. अपेक्षित असलेली शिक्षणाची वाट प्रत्येकाच्या जीवनात आनंद देत राहील यात शंका नाही. आज आनंद जर हरवला असेल तर पुनर्विचार करण्याची गरज आहे. अलिकडे माणसं आपल्या मुळ स्वभावाचे दर्शन घडवणे लपवत आहे.आपल्याला ज्यात आनंद मिळतो त्या गोष्टी मानवी स्वभावाप्रमाणे करायला हव्यात. निसर्ग आनंद पेरतो. निसर्गासारख्या असलेल्या भावनाच माणसाला आनंद देत जातील.मात्र माणसं खोटया प्रतिष्ठेपायी आनंदाला पारखे होता आहेत.

आपल्याला आनंद देणा-या वाटांचा स्वतः शोध घेण्याची गरज आहे. त्या वाटांपासून दूर जाणे झाले, की दुःखाचा स्पर्श होणार. शिक्षण माणसांच्या सुप्त गुणांच्या परिपोषासाठी आहे. त्यामुळे मुळतः आनंद देणा-या गोष्टींचा शोध घ्यायला हवा. आपला आतला आवाज जे सांगतो ते ऐकायला हवे. आतला आवाज ऐकला की आनंदाला पारखे होण्याची गरज वाटणार नाही. शिक्षण सतत स्वतःशी बोलायला सांगत आहे. आपली धाव मात्र सतत बाहेर आहे.शिक्षण संवादासाठी आहे मात्र आपला आभासी संवाद अधिक वाढला आहे. अंतरिक असेलेला स्वसंवाद दिवंसेदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे शिक्षणातून आनंदाला पारखे व्हावे लागते आहे. शिकलेल्या माणसांच्या आयुष्यात संवाद नाही आणि मुक्तपणे करावा वाटला तर भिती वाटते.आपण प्रतिष्ठेपायी संवादाला मुकलो आहोत. खोटया प्रतिष्ठेसाठी सुरू असलेला प्रवास आपला मुळतः आनंदापासून तोडतो आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे शिक्षण सुप्त गुणांचा विकास करू पाहते आहे. मात्र आज शिक्षण नसलेल्या गोष्टींचा शोध घेऊ पाहते आहे. जे नाही ते साध्य करण्याचा प्रयत्न केला तर ते साध्यही होणार नाही आणि आनंदही मिळणार नाही. त्यामुळे आपण शिक्षणाच्या मुळ ध्येयाच्या दिशेने चालण्याची गरज आहे.

शिक्षण आणि शिक्षण प्रक्रियेत आपण जी गोष्ट करण्याचा प्रयत्न करू ती आनंदासाठीच केली जाईल. शिक्षण हा भक्तीमार्ग आहे. भक्तीत भक्त परमेश्वरावर विश्वास ठेऊन असतो. त्याची नितांत श्रध्दा असते. अध्यात्मात नवरस भक्ती सांगितली आहे.शिक्षणातून ज्ञान प्राप्त करण्यासाठी असेच बहुविध प्रयत्नांची गरज आहे. त्या मार्गाने गेला तर आपल्याला परमेश्वर प्राप्त करता येईल. ज्ञान देखील परमेश्वर स्वरूप आहे. ज्ञान म्हणजे सत्याची वाट आहे. ज्ञानापर्यंत पोहचणे म्हणजे सत्याच्या दिशेचा प्रवास आहे. सत्याचा शोध लागला की आनंदाला भरते येत जाईल. शिक्षण म्हणजे सत्याचा शोध आहे. जीवनातील सत्य नेमके काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न शिक्षणातून होण्याची गरज आहे.त्यामुळे ती वाट चालत राहिले की आनंद मिळत असतो.सत्याचा शोध ही ईश्वराची प्राप्ती आहे. ईश्वराचे स्वरूप व्यक्त करताना सांगितले जाते ; की परमानंद रूपं हरी ओम हरी ओम. ईश्वराचे स्वरूपच परम आनंद स्वरूप आहे.जेथे जेथे आनंद आहे ते ठिकाण आणि कृती म्हणजे ईश्वराचे आस्तित्व आहे. शिक्षण घेणा-या प्रत्येकाला आनंद हवा असेल तर त्याला ज्ञानाची वाट चालावी लागेल. कारण ज्ञानात आनंद सामावलेला आहे.त्यामुळे त्या वाटेने सर्वांच्या जीवनात आनंद मिळत राहणार आहे यात शंका नाही.

खरेतर जी लोक भक्तिमार्गी नाही, त्यांना त्यांचा आनंद वेगवेगळ्या मार्गाने प्राप्त करता येतो. कोणी तरी भोजनात आनंद अनुभवत असतो. त्यांना मात्र स्वयंपाकात त्यांना आनंद वाटत नाही. भक्ती मार्गी असलेल्या प्रत्येकालाच भोजना बरोबर स्वयंपाक करण्यात देखील आनंद वाटत असतो. शाळेत विद्यार्थ्यांना आनंद हवा असेल तर विद्यार्थी प्रत्येक गोष्ट आनंदानेच करतील.अगदी हवे तर आनंदासाठी स्वयंपाक करतील. त्यांना तेथील अगदी छोटया छोटया गोष्टीत आनंद मिळत असतो. तव्यावर टाकलेली पोळी कशी फुगते हे पाहताना देखील त्यांना आनंद मिळत असतो. लाकूड जळते आहे आणि दूध उकळते आहे हे पाहताना त्यांना मजा वाटेल. पोळपाटावर पोळी लाटताना ती कशी गोल गोल बनते. तांदूळ शिजताना पातेल्यात ते कसे नाचतात, हे सारे पाहत असताना त्यांना आनंद वाटत असतो. हा सारा आनंद उपभोगण्यासाठी ती मुले स्वयंपाक करतील. त्यांना त्याप्रत्येक कृतीत आनंद मिळेल. त्यांनी त्या कृतीत आनंद प्राप्त केलेला असल्यामुळे त्यांना जेवण करतानाही आनंद मिळवतील.

आनंदासाठीच ते तोलून-मापून खातील आणि भाजीत मोजून मीठ न टाकता वारेमाप टाकून दिले तर खाताना आनंद कसा मिळेल ? भाजीत मोजके मीठ टाकण्यानेच ती रुचकर लागते. मात्र पोट फुगेपर्यंत जेवण केले तर आनंद कसा मिळणार ? आमचे भोजन आनंदासाठी असेल तर आम्ही आनंदाने भांडे घासू.त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आनंद असला तरी त्यात मर्यांदा लक्षात घ्यायला हव्यात. आनंद ज्यात ज्यात प्राप्त आहे त्यातून केवळ आनंद प्राप्त करणे अपेक्षित नाही , तर त्यासाठीचा मार्ग चालण्याची देखील गरज आहे.जेवणात आनंद असेल तर स्वयंपाक करण्यातही तो मिळवायला हवा.परमेश्वर भेटीत आनंद आहे पण त्यासाठीची साधना देखील महत्वाची आहे. साधना न करता आनंद काही खरा नाही.त्यामुळे शिक्षणातून आनंद मिळवायचा असेल तर त्या करीता साधना महत्वाची आहे.शिक्षणातील अभ्यास ही साधना आहे.त्या साधनेतून ज्ञानापर्यंतचा प्रवास घडेल.ज्ञानाची साधना अपेक्षित आहे. ज्ञानाची वाट चालणा-या प्रत्येक शिक्षकाला आनंद मिळत असतो.तो साधना करतो त्यासाठी तो ग्रंथालयापासून तर तज्ज्ञांपर्यंत चर्चा करतो.त्यासाठी पदरमोड करतो पण त्याचे त्याला काही वाटत नाही कारण त्यात त्याचा आनंद सामावलेला असतो. माणसं स्वतःच्या आनंदासाठी वेडी होतात. ज्ञानाची वाट चालली की आनंद ठरलेलाच. ज्ञानासाठी शाळा महत्वाची आहे..पण शाळेत गेले म्हणजे ते साध्य होईल असे नाही.तेथे आपण कोणत्या वाटा निवडतो हे महत्वाचे.

साधना करण्यासाठी तो प्रवास आनंदाचा असायला हवा.ज्ञान म्हणजे आनंदाचा प्रवास आहे.मात्र त्यासाठी ते ठिकाणही महत्वाचे आहे. विनोबा म्हणतात की, अलिकडे लोक मुलांना आठ तास गिरणीत आणि खाणीत अडकून ठेवावे तसे शाळेत बांधून ठेवतात. शाळांमध्ये असे बांधून ठेवल्यावर आनंद कसा मिळणार ? दिवसभर आनंद न मिळणारा प्रवास केल्यावर म्हणतात आता एक तास आनंद घ्या आणि त्यासाठी खेळा असे सांगितले जाते. खेळणे हा आनंदाचा भाग आहे. मुलांना ज्या वयात जे करावे वाटते ते करू द्यावे.मुलांच्या आनंदाच्या वाटा भिन्न आहेत पण त्या वाटा मोठी माणसंच ठरू पाहता आहे.मोठयांना इतके सारे करूनही आनंद मिळत नाही आणि ते लहान्याच्या वाटा आनंदी होऊ देत नाही. लहान्याना चित्र काढणे, खेळणे, गाणी म्हणणे यात आनंद असतो. एकमेकाशी गप्पा मारणे भावते. त्यांना प्रत्येक गोष्ट करून पाहयला आवडते. त्यांच्या आनंदासाठी त्यांना स्वातंत्र्य हवे असते. मोठी माणसं त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी सरसावलेले असतात म्हणून मुल घरी आनंदी असत नाही.

शाळेत त्यांना आनंद वाटत नाही. त्यांना स्वातंत्र्य देत त्यांना त्या दिशेने प्रवास करू देणे हा मुलांच्या आयुष्यात अधिक समृध्द्ता निर्माण करत असतो. मुलांना जेथे आनंद आहे त्या दिशेने आपण त्यांना जाऊ देणे आणि त्यांना ज्ञान प्राप्त करू देणे महत्वाचे आहे. आपण त्यांचेवर काही लादत गेलो ,की त्यांचा आनंद मावळतो. त्यांना समाधान मिळत नाही.त्यातून शिक्षणाची वाट दुःखाची बनत जाते. शाळेत हातपायांना काम नाही. सतत बसून राहावे लागते.बिचारी मुले त्रासून जातात.सहा दिवस शाळा आणि सातव्या दिवशी सुटटी ही वर्तमान शिक्षणाची व्यवस्था आहे. सहा दिवस कुटटी आणि एक दिवस सुटटी असे चित्र आहे .विनोबा म्हणतात ,की आमची शाळा तशी नसेल कारण आमच्या शाळा कुटटी नसेल. नयी तालीममध्ये केवळ एक तास आनंदाचा करणे मान्य नाही. बाकीचा वेळ दुःखात घालणे आम्हाला मान्य नाही.आमचा तर विश्वास आहे की आम्ही चोवीस तास ज्ञान प्राप्त करू. चोवीस तास काम करू आणि चोवीस तास आनंद भोगू. आमचा आनंद ज्ञान आणि श्रमाहून वेगळा नसेल. त्यामुळे श्रम आणि आनंद यांचे नाते भक्कम असायला हवे. नई तालीम मध्ये ते नाते भक्कम असल्याने तेथे सतत आनंद आहे.

विनोबा म्हणतात , की अलिकडच्या काळात शाळा-कॉलेजांना विद्यालय म्हणतात . त्या विद्यालयांचा अर्थ विद्येचे निवासस्थान असा होतो. आज त्या व्य़ाख्येची पुनर्रचना होते आहे. मात्र विद्यालयांना अलिकडे त्यांना नवा अर्थ प्राप्त होतो आहे. जेथे विद्येचा लय होतो, विद्या लोप पावते असे ठिकाणे म्हणजे विद्यालये . या अर्थाची विद्यालये आपल्या देशात हजारोंनी निर्माण होता आहेत. लोक शिकत आहेत, परीक्षा देत आहेत आणि जणू काही जुलाबाची गोळी घेतल्याप्रमाणे ज्ञानाचे रेचन होत आहे. सारे ज्ञान खतम होत आहे. सारेच ज्ञान नष्ट होणार असेल तर आनंद देखील संपलेला असणार यात शंका नाही. ज्ञानाची वाट चालणे थांबले , की आनंदाच्या वाटा लुप्त होतात. त्यामुळे शिक्षणात माहितीचे प्रस्थ वाढले आहे आणि ज्ञानाची साधना थांबली आहे.हा प्रवास आनंदाच्या दिशेने घेऊन जाणार नाही.

– संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या