परिश्रमाची निष्ठा हवी...

आपण समाजमनात विवेक निर्माण करण्यात कमी पडल्याने आपल्या समाजात सारेच प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रश्न व्यक्तीगत असू दे, नाहीतर जागतिक असू दे त्यांच्या मुळाशी अविवेकीपणा हेच एकमेव कारण आहे हे लक्षात घ्यायला हवे. आज आपल्या शिक्षणातून परिश्रमाचे विचार गायब झाले आहेत. श्रमापेक्षा बौध्दिक विकासाला प्राध्यान्य मिळू लागले आहे. त्या विचाराच्या दिशेने... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
परिश्रमाची निष्ठा हवी...

शिक्षण हे माणसाला अधिक पुण्यांच्या दिशेन घेऊन जाण्यासाठी आहे. आपल्या समजाव्यवस्थेत पुण्य ही अध्यात्मिक कल्पना मानली जाते. मात्र पाप आणि पुण्य यात मूल्यांचा विचार गृहीत आहे. आपल्या संत परंपरेतील कळस असलेले तुकाराम महाराज अत्यंत सहजतेने त्याबददलचा विचार प्रतिपादन करताना म्हणतात, की “पाप ते परपिडा, पुण्य ते परोपकार”. आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होणे म्हणजे पाप आणि आपल्यामुळे इतरांना आनंद मिळेल अशा प्रकारचे वर्तन म्हणजे पुण्य.

आपल्या शिक्षणातून हा विचार पेरण्याचे काम केले तरी समाज आनंदमय होईल. त्यातूनच समाजाची उन्नती साधली जाईल. शिक्षणाने आरंभी व्यक्तीची उन्नती साधली ,की त्यातून समाज शहाणा बनतो आणि समाज शहाणा बनला ,की राष्ट्राची उन्नती होते. हे घडण्यासाठी शिक्षणातून विवेकाची पेरणीसाठी जगभरातील सर्वच शिक्षणतज्ज्ञानी आग्रही भूमिका घेतली आहे. जर कोणी म्हटले , की शिक्षणातून एकच गोष्ट साध्य करावी असे वाटत असेल तर ती कोणती ? तर त्याचे उत्तर हे केवळ विवेकी दृष्टी साध्य करावी. विवेक विकसित करण्याचा प्रयत्न केला तरी शिक्षणाच्या इतर उद्दीष्टांची साध्यता आपोआप घडेल.

आपण समाजमनात विवेक निर्माण करण्यात कमी पडल्याने आपल्या समाजात सारेच प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रश्न व्यक्तीगत असू दे , नाहीतर जागतिक असू दे त्यांच्या मुळाशी अविवेकीपणा हेच एकमेव कारण आहे हे लक्षात घ्यायला हवे. आज आपल्या शिक्षणातून परिश्रमाचे विचार गायब झाले आहेत.श्रमापेक्षा बौध्दिक विकासाला प्राध्यान्य मिळू लागले आहे. त्या विचाराच्या दिशेने त्यामुळे विनोबा शिक्षणाचा विचार करताना जी भूमिका प्रतिपादन करता आहेत त्याचा अधिक गंभीपपणे विचार करण्याची गरज आहे. तो विचार अनेकदा वर्तमानात नकोसाही वाटेल , मात्र आपल्याला त्या वाटेने गेल्याशिवाय उद्याचे भविष्य नाही हे लक्षात घ्यायला हवे.विनोबाची वाट सत्याची आहे त्यामुळे ती सत्तेपर्यंत पोहचविणार नाही मात्र राष्ट्र आणि समाजाचे उत्थान घडविल्याशिवाय राहणार नाही.ती वाट मूल्यांची आहे.ती वाट माणूसपणाची आहे.ती वाट न्यायाची आहे. ती वाट जीवनोध्दराची आहे.त्यामुळे वाट सोपी नाही मात्र ती कठीणच आहे आहे असे देखील नाही.

शिक्षणातून विवेक निर्माण झाला तर शिक्षणाने जी ध्येय राखली आहे त्या दिशेचा प्रवास घडण्यास निश्चित मदत होणार आहे .शिक्षण म्हणजे शारीरिक,मानसिक,बौध्दिक विकासाची अपेक्षा आहे.आपले सर्व शिक्षण हे बौध्दिक विकासासाठी प्रयत्न करत आहे. समाजमनातही शिक्षणाचा विचार केवळ बौध्दिक विकासाच्या अंगाने केला जात आहे. शारीरिक विकासाच्या दृष्टीने परिश्रमाचा विचार अभ्यासक्रमात आहे. मात्र तो प्रत्यक्ष अधोरेखित होत नाही.परिश्रमाचा विचार सांगून चालणार नाही त्यासाठी ती पाऊलवाट चालावी लागेल. परिश्रमाच्या विचाराची वाट धरणे याचा अर्थ समग्र विकासाच्या दिशेने प्रवास करणे आहे. कधीकाळी शाळा मातीच्या होत्या.त्या सारवण्यासाठी स्पर्धा असायची. मुली-मुले स्वतःच्या घरून शेण आणायच्या.मुले नदिवरून पाणी आणायचे. हे सारे घरच्यांच्या समोर होत होते.कोणी कधी तक्रार केली नाही.उलट अगदी प्रेमाने हे व्हावे म्हणून सांगायचे.मुलांना या कामात आनंद वाटायचा.शाळा आपली वाटायची. त्याचवेळी वर्ग झाडण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा असायची.शाळेचे अंगनाची मुलेच साफ सफाई करायचे. मुलांमध्ये त्यासाठी कोणी श्रमप्रतिष्ठा रूजवली नाही ती रूजत गेली. आज असे कामे मुलांना सांगितले तर घरचे विरोध करतात. ते काम करावे लागू नये म्हणून मुलांना शाळेत उशिरा पाठविणारे आईबाबा आहेत.

मुलांनाही ही कामे करण्यात आता आनंद वाटत नाही. हे श्रमाचे संस्कार रूजल्याने मुलामुलींच्या मनात असलेला लिंगभेदाचा विचारही कमी होत होता. कामाची लज्जा वाटत नाही.कामातील भेदाभेदही कमी होत होता.श्रमकरी आणि बुध्दिजीवी असा भेदही कमी होतो. श्रम करणा-या व्यक्तीबददल बुध्दिवान असलेल्या माणसांला आदर वाटायचा. श्रमाच्या संस्काराचा व्यक्तीच्या आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होत होता. मात्र अलिकडे शाळेत परिश्रमाचा विचार पेरला गेला, तरी प्रत्यक्ष कृती करण्यावर भर दिला जात नाही. विनोबा म्हणतात , की “ आपण शिक्षणातून परिश्रम करण्याची वृत्ती विकसित करायला हवी. त्या काळात शाळांना शेती होती. अनेक शाळांमध्ये चरख्यावरील सूत काढले जात होते. शिक्षणातूनच परिश्रमाचा विचार रूजविला जात होता. व्यक्तीच्या जीवनात परीश्रमाचे मोल निर्माण होण्यास त्यामुळे मदत होत होती. विनोबा म्हणतात , परिश्रम निराळे, परिश्रम-निष्ठा निराळी.

जगात बहुसंख्य लोक शरीर परिश्रम करणारेच आहेत. पण त्या परिश्रमामागील विचार जो आहे तो श्रमाचा विचार प्राय: लाचारीने करणारे आहेत. अनेकांना श्रम नको आहेत. अनेकांना शक्य झाले तर त्यांना श्रम टाळण्यात अधिक रस असतो. काही लोक स्वतः शरीरश्रम टाळत त्यांच्या श्रमाच्या बोजा इतरांवर लादण्यात त्यांना अधिक आनंद आहे. श्रम टाळून आणि आपला बोजा इतरांवर लादत पुन्हा प्रतिष्ठित होऊन बसले आहेत. यातूनच साम्राज्यवाद, भांडवलशाही, युद्धे, विषमता इत्यादी निर्माण झाली आहेत ”. श्रम न करणारी आणि श्रम करणारी ही समाजातील उभ्या राहिलेल्या भेदाभेदाने समाजातील संघर्ष उभे ठाकले आहेत.त्यामुळे शिक्षणातून श्रम करणारी माणंस उभी करण्याची गरज आहे. काल ती गरज होती की नाही यापेक्षा आज मात्र अधिक गरज निर्माण झाली आहे. आज लोक श्रमापासून दूर जाता आहेत.त्या श्रमाचा विचार रूजवण्यासाठीच परिश्रम करावे लागणार आहेत. यासाठी विनोबांनी उपाय सूचविला आहे.ते म्हणतात , शरीर- परिश्रमनिष्ठा असायला हवे.

शरीराने काहीतरी परिश्रम केल्याशिवाय शरीराला अन्न देणे हा एक स्वतः विरुद्ध आणि समाजाविरुद्ध गुन्हा आहे अशी भावना, हाच एक उपाय आहे. गांधीनी देखील परिश्रमाशिवाय अन्न सेवन करणे हे पाप मानले होते. त्यामुळे आज आपण परिश्रमाशिवाय अन्न सेवन करायचे नाही असे प्रत्येकाने ठरविले तर उत्थान घडल्या शिवाय राहणार नाही. हा विचार व्यक्तीला जीवनाची दिशा दाखवते. आपल्याकडे परिश्रम करणे हे अप्रतिष्ठेचे मानले जाते. श्रमाचे काम करणारी माणसं बहुतेक अशिक्षित असतात आणि शिकलेली माणसं परिश्रमापासून दूर गेलेले असतात. शिकलेल्या माणसांना आपली कामे करायची असली तरी ती करण्यात रस वाटत नाही. वेळ नसेल तर समजण्यासारखे आहे , मात्र तरीसुध्दा ते आपण का करायचे ? शिक्षण घेतले आहे .हाती मोठी पदवी आहे मग आपण श्रम करण्यासाठी शिक्षण घेतले आहे का ? असा प्रश्नही ते उपस्थित करतात.शिकलेला पुरूष आपले घर,अंगण साफ करत असले तरी त्याबददल नाक मुरडणारे अनेक माणसं भोवतालमध्ये असतात.

अनेकदा त्याबददल नाराजी, नापसंती व्यक्त केली जाते. त्यामुळे शिक्षणातून परिश्रमाचा विचार कसा रूजवयाचा हा खरा प्रश्न आहे. अनेकदा आपल्याला वाटते मुलगा शिकायला पाठविला म्हणजे तो गाईचे शेण काढायला कंटाळतो आणि दूध प्यायला उल्हासतो असा आपल्याकडील आजवरचा अनुभव आहे. बुनियादी शिक्षणपद्धतीतून बाहेर पडलेला मुलगा गाईचे शेण काढायला उल्हासतो, आणि दूध प्यायला इतरांना ते मिळत नसताना संकोचतो अशी स्थिती असली पाहिजे. बुनियादी शिक्षणात तर हाच विचार अधोरेखित करण्यात आला आहे. गांधीजीनी जीवनभर परिश्रमाचा विचार अंगी बानला. त्यांनी स्वयंपाक घरातही स्वतःच्या हाताने काम करणे पसंत केले होते. भाजी कापण्यापासून स्वच्छतागृह साफ करण्यापर्यंतची कामे करण्यात त्यांना लज्जा वाटली नाही. त्यामुळे विनोबांच्या शिक्षण विचारात अगोदर शेण काढणे आणि नंतर दूध पिण्याचा विचार येतो.आज तर आपण दूधासाठी रांगा लावतो आहोत पण ज्या गाईचे ते दूध आहे त्या गाईचे शेण काढणे प्रतिष्ठेचे वाटत नाही. शेतात राबून त्या घामावर आपले शिक्षण झाले आहे .मात्र ज्या कष्टाच्या घामाची लज्जा वाटणे हे आपल्या शिक्षणाचे दुर्दैव आहे. विद्यार्थ्यांना परिश्रमाची सवय लागावी या करीता विनोबा म्हणतात, की विद्यार्थ्याबरोबर शिक्षकानेही परिश्रमात यथा शक्य भाग घेतला पाहिजे.

शाळेच्या वेळात त्याने केलेला परिश्रमाचा उद्योग हा शैक्षणिक प्रक्रियेचा अर्थात शाळेचा भाग समजायचा.कारण विद्यार्थी केवळ विचाराने प्रभावित होत नाही. विद्यार्थी अनुकरणाने शिकतात हे लक्षात घ्यायला हवे. तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या घरची मंडळी फावल्या वेळात आणि सुट्टीच्या दिवशी खेड्यातील कामकरी मंडळींप्रमाणे हौसेने अंग मेहनत करीत आहेत असे दृश्य विद्यार्थ्यांना नेहमी दिसले पाहिजे. असे दृश्य सर्वदूर दिसले तर आपल्याकडे भारताचे उत्थान घडलेले आपल्याला अनुभवास येईल. खेडेगावातील घाण साफ करणे इत्यादी सार्वजनिक कार्ये शिक्षकाने आणि मुलांनी एकत्र होऊन यथाप्रसंग करायची आहेत. शाळा झाडणे, शाळेचे आवार साफ करणे इत्यादी कार्येही मुलांबरोबर शिक्षक करीत आहेत अशी रीत असावी. हलके मानलेले कोणतेही काम केवळ मुलांवर सोपवायचे नाही, आपण स्वतः करून मुलांकडून ते करवायचे. असे केल्याशिवाय परिश्रम निष्ठा निर्माण होणार नाही.परिश्रम निष्ठा निर्माण झाली तरच परिश्रमाची सवय अंगी बानली जाईल हा विनोबा विचार वर्तमानात शासकिय शाळांमध्ये अजून तरी काही प्रमाणात दिसता आहेत.शासकिय शाळांमध्ये शिपाई नाहीत त्यामुळे त्यांना त्या दिशेने आपोआप जावे लागते.खाजगी शाळेत तर प्रत्येक कामासाठी स्वतंत्र माणूस नेमला जातो.त्यामुळे श्रमकरी वर्ग स्वतंत्र अधोरेखित होतो.

जे बौध्दिक काम करतात त्यांनी श्रमाची कामे करायची नाहीत हे त्यांना दिसते त्यातून तशी धारणा पक्की होण्यास मदत होते.मुलांना ज्या वयात जे संस्कार पक्के होत जातात त्या काळात अधिक चांगले भोवतालमध्ये दिसायला हवे.त्यामुळे श्रम आणि शिक्षण यांचे नाते पक्के होण्यासाठी भोवतालमधील नाते अधिक पक्के होण्याची गरज आहे.त्यामुळे 'उद्योग कातण्याचा असो, सुतारीचा असो, किंवा शेतीचा असो, चरखा अविरोधी शरीरपरिश्रमाचे, म्हणजेच अहिंसेचे चिह्न आहे ते दृढ होण्याची गरज आहे.परिश्रमातून सत्य,अहिंसेचा विचार दृढ होण्यासाठी मदत होईल.ही वाट सर्वांनाच आनंद देणारी असणार आहे.मात्र श्रमाचे नाते तुटले तर आपल्याला अंधाराची वाट चालावी लागेल...अंधाराचे साम्राज्य दूर सारत आपल्याला प्रकाशाची वाट धरायची असेल तर परिश्रमापासून दूर जाता येणार नाही.

- संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण अभ्यासक आहेत.)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com