Friday, April 26, 2024
Homeब्लॉगज्ञान प्रसारासाठी मातृभाषाच हवी..

ज्ञान प्रसारासाठी मातृभाषाच हवी..

आपल्या पाल्याला कोणत्या भाषेत शिक्षण द्यावे असा प्रश्न अनेकदा पालक विचारत असतात. त्याचे उत्तर वर्तमानात इंग्रजी भाषेत शिक्षण द्यावे असे पालक स्वतःच सांगत असतात. इंग्रजी ही जगाच्या पाठीवरील ज्ञान भाषा आहे. ती जगातील ज्ञानाकडे पाहण्याची खिडकी आहे. इंग्रजी ज्यांना येते ते सारेच ज्ञानी आहेत, त्यांनी ज्ञान निर्मितीत योगदान दिले आहे असे आजवर काही सिध्द झालेले नाही. ज्ञान म्हणजे पुस्तकी शिक्षण एवढया पुरता तो विचार मर्यादित नाही हेही लक्षात घ्यायला हवे. ज्ञान आणि इंग्रजी याचा जो संबंध सतत अधोरेखित केला जातो मात्र ते काही खरे नाही.

शिक्षण आणि ज्ञान याचा निकटता संबंध आहे हे लक्षात घ्यायला हवे.आपल्या देशावर इंग्रजानी दिडशे वर्ष राज्य केले मग त्यांनी त्यांच्या भाषेत येथील व्यवहार सुरू केल्यावर आज आपण जे अपेक्षित करतो तसा परिणाम साध्य झाला का ? येथील माणसं इंग्रजी भाषेमुळे शहाणी बनली का ? ज्ञानासाठी शिक्षण कोणत्या भाषेत घेतले जाते हे महत्वाचे नाही तर शिकण्याची प्रक्रिया कशी केली जाते हे महत्वाचे आहे.आपल्या आयुष्यात आपण शिक्षणासाठी लागणारे अनुभव कशा स्वरूपात घेतो यावरच ज्ञानाची प्रक्रिया अवंलबून आहे.जगाच्या पाठीवर कोणत्याही एका भाषेत ज्ञान भाषा बनण्याची शक्ती सामावलेले आहे हे देखील खरे नाही.प्रत्येक भाषा ही ज्ञानभाषा आहे. प्रत्येक भाषेत मोठी शक्ती सामावलेली आहे.आपण आपल्या भाषेत किती व्यवहार करतो आणि तिला कितपत नव्या युगाशी जोडतो त्यावर भाषेचे मोल अवलंबून असते.

- Advertisement -

त्यामुळे विनोबा म्हणतात, की मनुष्याचे हदय तर मातृभाषाच ग्रहन करते. जे हदयाशी नाते सांगते तेथूनच शिक्षणाचा आरंभ होतो.त्यामुळे शिक्षण आणि माध्यम या विषयी प्रश्न निर्माण होता कामा नये. मुलांना इंग्रजी भाषेतील शिक्षण हवे आहे का ? इंग्रजी भाषेतील शिक्षण ही पालकांची मागणी आहे. इंग्रजी भाषेला असलेली प्रतिष्ठा हे त्यामागील मुख्य कारण आहे. खोटया प्रतिष्ठेसाठी आपण मुलांवर काही लादत आहोत मात्र त्या लादण्यात मुलांचे शिक्षण नाही हे लक्षात घ्यायला हवे.मुलांना शिक्षणात आनंद हवा आणि त्याचे माध्यम मातृभाषेतील शिक्षण हेच आहे. ज्ञानासाठी आपण मुलांना ज्ञानाची तहान लागू द्यावी.ती तहान भागविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी स्वतःहून प्रयत्न करेल.त्या प्रयत्नात मग त्याला मातृभाषेशिवाय देखील इतर भाषा मदतीला येतील.मात्र परकीय भाषेतील शिक्षण मुलांना ज्ञानाची तहान लागू देण्याची शक्यता नाही.याचा अर्थ इंग्रजी शिकू नये असे मात्र नाही..जगाकडे उघडया डोळ्यांने पाहायचे असेल तर जगातील हव्या तितक्या भाषा विद्यार्थ्यांने शिकाव्यात..फक्त प्रश्न माध्यमाचा आहे इतकेच.

विनोबा म्हणतात,की गाढवाच्या पिल्लाला विचारले की तुला गाढवाच्या भाषेत ज्ञान द्यावे , की सिंहाच्या भाषेत ? तर ते पिल्लू म्हणेल की सिंहाची भाषा कितीही चांगली असली तरी मला गाढवाच्याच भाषेत ज्ञान द्यावे.याचे कारण मला तर गाढवाचीच भाषा अधिक चांगली समजेल. प्रत्येकाला जे काही ज्ञान मिळवायचे आहे ते आपल्या मातृभाषेतून अधिक चांगले जाणता व प्राप्त करता येते. याचे कारण हदयाला जी भाषा स्पर्श करते त्या भाषेतून अधिक चांगले शिक्षण होते.विनोबा म्हणतात की ज्ञानासाठी शिक्षणाचे माध्यम महत्वाचे असत नाही , तर कृती महत्वाची असते. शिक्षण हे केवळ भाषेने किंवा शब्दांने होत नाही.शब्दांने फक्त माहिती मिळते.ती माहिती म्हणजे काही ज्ञान नाही. त्यामुळे आपल्याला शिक्षणासाठी कृतींची गरज असते.कृती केल्यानंतर त्यातून आपल्याला जे काही साध्य होते ,जाणता येते आणि ते आपल्या भाषेत प्रतिपादन केले तरी ज्ञानाची प्रक्रिया असते. कृती करण्यासाठी इंग्रजीमाध्यमातील शिक्षण हवे का ? प्रयोग,कृती, उपक्रम, प्रकल्प, चर्चा, गटचर्चा यासारख्या विविध साधन तंत्राच्या व्दारे आपले शिक्षण होत असते.ही साधनतंत्रे आपण उपयोगात आणणे आणि त्यातून जे काही शिक्षण होत असते. त्याकरीता भाषा कशी काय परीणाम करते हा खरा प्रश्न आहे.

फार तर विज्ञानातील प्रयोग केले तर त्यातील विज्ञानातील संज्ञा, यांची नावे इंग्रजीत असतील तेवढीच त्यांची गरज पडते.अर्थात त्या संज्ञांना जोवर आपल्या भाषेत नावे मिळत नाही तोवर त्या भाषेतील नावे जरूर वापरावित.मात्र त्या करीता इंग्रजी भाषेच्या माध्यमातून शिक्षण हवे घ्यायला हवे असे काही आहे का ? अनेकदा विज्ञानाचे शिक्षण हे इंग्रजीत दिले जाते.जगभरातील विज्ञानातील संकल्पना इंग्रजी भाषेत मांडल्या जातात म्हणून ती भाषा शिकली पाहिजे असे म्हटले जाते. विज्ञान आणि त्यातील संकल्पना या तर प्रयोगातून शिकायच्या असतात.त्याकरीता प्रयोग करता येण्याचे कौशल्य महत्वाचे आहे.विज्ञानाची एक परीभाषा आहे त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे असे म्हटले जाते.विषय म्हणून इंग्रजी शिकायला हवी आणि अगदी त्या भाषेबरोबर आपल्याला ज्या ज्या भाषेत ज्ञान आहेत अशा भाषा देखील शिकण्याची गरज आहे.भाषा शिकण्यास कोणाचाच विरोध असता कामा नये. ज्ञानासाठी प्रयत्न व्हायला हवेत मात्र सारेच ज्ञान इंग्रजीत आहे असे मात्र नाही हे जाणून घ्यायला हवे इतकेच. विनोबा म्हणतात , की शिकण्याच्या प्रक्रिये प्रथम अनुभव येतो मग परीभाषेचे आस्तित्व येते.कृतीमुळे अनुभवाचा साक्षात्कार होतो.प्रत्यक्ष कृतीनेच अनुभव साध्य होत असतो.

कृतींबरोबर शब्दांचा उपयोग होतो. त्यामुळे कृती करताना जे अनुभव येतात त्याची मांडणी मातृभाषेतून अधिक उत्तमतेने होते. शिकण्यासाठी भाषा नाही तर कृती महत्वाची असते हे लक्षात घ्यायला हवे.जेव्हा शिक्षण कृतीपासून दूर जाते तेव्हा ते शिक्षण केवळ भाषेच्याव्दारे होत जाते.आपल्याला एखाद्या विषयातील संकल्पना ज्या भाषेत आहेत त्या भाषा शिकण्याची गरज अधिक अधोरेखित होत जाते. पुस्तकातील माहिती भाषेत असते म्हणून ती शिकण्यापेक्षाही ती माहिती ज्या प्रयोगातून पुढे आली आहे ते प्रयोग करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आपण पुस्तकातील भाषेवर अधिक भरवसा ठेवल्याने इंग्रजांच्या काळात देखील विज्ञानाचा अपेक्षित प्रसार आणि प्रचार झाला नाही.शिक्षण पुस्तकापुरते मर्यादित राहिले की कृतींची गरज उरत नाही.कृतीपासून दूर झाले की ज्ञानाची प्रक्रिया घडत नाही मग शिक्षण केवळ माहिती पुरते उरते.

विज्ञानातील संशोधनासाठी इंग्रजी बरोबर जगातील इतर भाषा देखील यायला हव्यात. विनोबा म्हणतात की विज्ञानाचा जर मातृभाषेशी संबंध नसेल तर आपल्याला विज्ञानाची जाणीव समाजमनात निर्माण करता येणार नाही.जाणीवा मातृभाषेत झाल्या नाही तर विज्ञानाचे जीवनात उपयोजनाची शक्यता मावळते हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडे विज्ञान शिकवले जाते पण ते प्रयोग,कृतीपेक्षाही ते माहितीच्या आधारे अधिक शिकवले जाते.त्यामुळे विज्ञानाची पदवी घेतलेला विद्यार्थी देखील अंधश्रध्देच्या आहारी जाताना आपल्याला दिसतात.विज्ञान कार्यकारण भाव रूजवण्याचा विचार करते.मात्र ते कृतीतून अधिक चांगले रूजवणे शक्य आहे.आपण जेव्हा विज्ञान शब्दांतून रूजवण्याचा विचार करतो तेव्हा ते मार्कांचे शिक्षण असते ते जगण्यासाठीचे नाही.त्यामुळे विज्ञान शिकलेली माणसं देखील विज्ञानाचा विचार अंतकरणात रूजवण्यात अपयशी ठरलेले दिसतात.शिक्षण कृतीने युक्त असेल तर त्याचा परिणाम साधला जातो.त्यामुळे शिक्षणासाठी भाषा नाही तर कृतीच महत्वाची असते हे लक्षात घ्यायला हवे.

आता हेच पाहाना आपल्या देशात कृषी विषयक आपली पंरपरा आहे.त्यासंबंधीचा प्रचंड अनुभव आपल्या पाठीशी आहे.शेती आपल्या देशाची पंरपरा राहिली आहे. आपण शेतीचे ज्ञान आपल्या भाषेत लिहिण्याचा,मांडण्याचा प्रयत्न केला नाही. आता शेतीचे ज्ञानही इंग्रजीत उपलब्ध होत आहे त्याकरीता इंग्रजी शिकायची का ? आता शेती शिक्षण जर इंग्रजीत देण्याचा प्रयत्न केल्यांने शेतीच उत्पादन वाढणार आहे का ? खंरतर आपल्याला खरच प्रगती करायची असेल तर संशोधनाची गरज आहे.मग संशोधनासाठी आपण प्रयोग,कृती करण्याची गरज आहे.त्यातून संशोधन गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल.प्रगतीकरीता चिंतन करण्याची गरज अधोरेखित केली जाते मात्र त्यासाठी मातृभाषा हा सर्वात चांगला पर्याय आहे.आपण मातृभाषेपासून दूर जात असल्याने ज्ञानाच्या निर्मितीपासून देखील दूर जाणे घडत आहे.त्यामुळे मातृभाषेतील शिक्षणाचे मोल जाणल्याशिवाय अंतरिक परिवर्तनाची वाट तरी कशी चालणार हा खरा प्रश्न आहे.

आज आपण ज्ञानाच्या नावाखाली आणि पालक म्हणून आपल्याला हवी असलेली प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी इंग्रजी विषय लादला जात आहे. त्यातून मुलांचे नुकसान होते पण त्यापेक्षा राष्ट्राचे अधिक नुकसान होते आहे.जेव्हा आपण स्वभाषेपेक्षा परकीय भाषा आपण लादतो,सक्ती करतो तेव्हा आपली बुध्दी क्षीण होते.इंग्रजी शिकावी असे ज्याला वाटत असेल तर त्याला शिकू द्यावी पण कोणावर त्याची सक्ती करण्यात येऊ नये.मातृभाषा मरते तेव्हा स्वातंत्र्याची प्रेरणा मरते हे लक्षात घ्यायया हवे.मातृभाषेतून होणारे संशोधन आपल्याला अधिक उत्तम ज्ञानापर्यंत पोहचविण्यास मदत करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये उच्च शिक्षण मातृभाषेतून करणेबाबत सूचित केले आहे.मुलांना उच्च शिक्षण मातृभाषेत मिळाले तर त्या माहितीचे अधिक प्रभावी उपयोजन जीवन व्यवहारात होण्याची शक्यता अधिक आहे.आज आपल्याला प्रत्येक वेळी परदेशी संशोधनावर अवलंबून राहावे लागते.परदेशात संशोधन होते त्याचा लाभ त्यांना होतो .त्यामानाने आपण संशोधनात फारसे यश प्राप्त करू शकले नाही.त्यामुळे धोरणा प्रमाणे अमलबजावणी झाली तर उद्या भारतासाठी उज्ज्वलतेची वाट असेल.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या