शिक्षण ‘दासी’ नको ‘राणी’ हवी...

आपल्याकडे समाजात असलेला संघर्ष, युध्द, व्दंद, लढाई संपुष्टात आणण्यासाठीची जबाबदारी रक्षकांची असते असे मान्य केल्याने त्यांची गरज व्यक्त होत असते. समाजात रक्षक हवेत असे सातत्याने बोलले जाते. गरज वाटते आहे याचा अर्थ समाजात वाईट प्रवृत्ती आहे. समाजात अन्याय करणारे आहे. समाजात हिंसा भरलेली आहे. यासारख्या गोष्टी सातत्याने प्रतिबिबींत होत आहे. या गोष्टी आपल्या भोवतालमध्ये आहेत म्हणून आपल्याला पोलीस हवे आहेत. पण पोलीसांचे... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
शिक्षण ‘दासी’ नको ‘राणी’ हवी...

समाज प्रक्रियेत "शिक्षण आणि रक्षक हे दोन विभाग असतात. परंतु अहिंसक समाजात शिक्षण हेच रक्षण असते. पोलिस व सैन्य यांना खतम करण्याची जबाबदारी शिक्षणाची असली पाहिजे. अशी शक्ती ज्या शिक्षणात नाही ते शिक्षण दासी आहे,राणी नाही.असे शिक्षण नेहमीच पराधीन राहील” हा अत्यंत महत्वाचा विचार आणि शिक्षणाची शक्ती दर्शित करणारा विचार संदेश विनोबानी बिहारमध्ये आयोजित शिक्षण परिषदेला पाठवला होता. इतक्या छोटयाशा परिच्छेदात शिक्षणाची दिशा, जबाबदारी आणि समाजाच्या परिवर्तनाची शिक्षणातील शक्ती स्पष्ट केली आहे.

आपल्याकडे समाजात असलेला संघर्ष, युध्द, व्दंद, लढाई संपुष्टात आणण्यासाठीची जबाबदारी रक्षकांची असते असे मान्य केल्याने त्यांची गरज व्यक्त होत असते. समाजात रक्षक हवेत असे सातत्याने बोलले जाते. गरज वाटते आहे याचा अर्थ समाजात वाईट प्रवृत्ती आहे. समाजात अन्याय करणारे आहे. समाजात हिंसा भरलेली आहे. यासारख्या गोष्टी सातत्याने प्रतिबिबींत होत आहे. या गोष्टी आपल्या भोवतालमध्ये आहेत म्हणून आपल्याला पोलीस हवे आहेत. पण पोलीसांचे आस्तित्व असले, की म्हणजे विकृती थांबते, हिंसा थांबत असे म्हटले जाते. पण खरच या गोष्टी थांबतात का? त्याचे उत्तर नाही असे आहे. मात्र पोलीसांचे आस्तित्व असले तर थांबल्यासारखे वाटते हे मात्र खरे आहे.

पोलीसांना पाहिले, की माणसं त्यापासून दूर जाण्याचा तात्पुरता प्रयत्न करतात. पोलीसांच्या आस्तित्वाने वाईट गोष्टींवर निर्बंध येतात पण त्या प्रयत्नाने केवळ बदल होतो परिवर्तन नाही. हे नेहमी लक्षात घ्यायला हवे, की बाहयांगाने बदल झाला तरी त्याचा परिणाम साधला जात नाही. त्यामुळे समाज उन्नत आणि प्रगत करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला परिवर्तनाची वाट चालावी लागणार आहे. व्यक्तीच्या मानसिकतेत परिवर्तन झाले की, माणसे आपोआप विवेकाची वाट चालू लागतात. विवेकाची वाट चालण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाच्या वाटेचा प्रवास हा माणसांला अधिक अहिंसक आणि वाईट विचारापासून दूर सारण्यास मदत करणारा ठरतो.. म्हणून समाजाचे रक्षण हे शिक्षण करते असे म्हटले जाते. मात्र ते शिक्षण तेवढया सशक्तपणे समाज मनात रूजविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तो मार्ग अधिक उत्तम आहे. त्यामुळे सैन्य आणि पोलीसांच्या सोबत शिक्षण हे रक्षक आहे असे विनोबा म्हणतात.

शिक्षण हे समाजाचे व राष्ट्राचे रक्षक आहे असे म्हटले जाते मग शिक्षण नेमके कशासाठी? असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा त्या प्रश्नांच्या उत्तराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तर त्याची आपल्याला अनेक उत्तरे मिळतात. मात्र त्या प्रश्नांच्या मुळाशी एक गोष्ट आहे ती म्हणजे माणसातील विवेक जागृत करण्यासाठी. शिक्षणाने मुलांना साक्षर करायचे असते.. त्यांना अभ्यासक्रमाची उददीष्टे साध्य होतील असे पाहयचे असते. अध्ययन निष्पत्ती साध्य होतील. लेखन, वाचन, गणन करता येईल असे पाहयचे असते.. मात्र ते सारेच करायचे असेल तरी या गोष्टी शिक्षणाकडून अपेक्षित करत असलो तरी त्या खूप छोटया अपेक्षा आहेत. शिक्षणातून आपल्याला माणूस घडविण्याचे अंतिम उददीष्ट साध्य करायचे आहे. शिक्षणाने मानवाचे मनुष्यात रूपांतर करणे घडण्याची अपेक्षा आहे. मनुष्यत्व प्राप्त करण्यासाठी शिक्षणाने विवेक जागृत करायला हवा. विवेक निर्माण करण्यात यश मिळाले तर शिक्षणातील असलेल्या समस्या देखल आपोआप सुटण्यास मदत होईल. कॉपी सारखे वाढलेले प्रस्थ देखील कमी होण्यास मदत होईल. प्रयत्नपूर्वक कष्ट करत आपण मिळवलेले मार्क कमी असले तरी चालतील पण वाममार्गाने आपण मार्क मिळवता कामा नये हे प्रत्येकाच्या अंतकरणात ठसल्याशिवाय राहणार नाही.

विवेकामुळे चांगले काय,वाईट काय या गोष्टी आपोआप कळण्यास मदत होते. त्याच बरोबर अन्याय, न्याय, सत्य, असत्य यासारख्या गोष्टी देखील जाणता येण्यास मदत होते. या गोष्टी कळत गेल्या तर आपण जे काही करतो आहोत ते योग्य की अयोग्य आहे ही जाणीव होण्यास मदत झाली तरी माणूस योग्य वाटेने चालण्याची शक्यता अधिक उंचावते. समाजात प्रश्न, समस्या, अडचणी आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकजन काहींना काही प्रयत्न करत असतात. मात्र त्यावर मात करण्यासाठी उपाय शोधण्याचा प्रयत्न होतो पण ते प्रयत्न केवळ वरवरचे असत नाही. विवेकी माणूस त्या प्रश्नांच्या मुळाशी जाणे पसंत करतो. कोणताही प्रश्न का निर्माण झाला याचा शोध घेतला गेला, त्या समस्येचे मूळ समजले, की समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मोठी मदत होत असते. विवेकी माणूस नेमके कारण शोधतो आणि तेच दूर सारतो. अंधार आहे तर त्यामागे प्रकाशाचा अभाव हे कारण आहे.. त्यामुळे अंधार उपसण्यापेक्षा एक दिवा लावला तरी अंधाराचे साम्राज्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. माणसांच्या आय़ुष्यात दुःख का ? याचे कारण माणसांच्या मनात असलेले षडरिपू.राग,लोभ,मद,मत्सर,अंहकार दूर केले की आनंद, समाधानाची वाट सापडते. संत याच वाटेने गेले म्हणून त्यांना आनंदाच्या वाटा सापडल्या. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की, संत तिथे विवेक असणे के जी.. संताच्या ठाई विवेक भरलेला असतो.. किंबहूना जेथे विवेक असतो तेच संत असतात. त्यामुळे संतानी जीवनातील अनेक संकटावर अत्यंत यशस्वीरित्या मात केल्याचे आपल्याला दिसून येते. विवेकाशिवाय समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला तर केवळ तात्पुरती समस्या दूर होईल.मात्र प्रश्न काही सुटत नाही.

समाजात शांतता निर्माण करण्यासाठी पोलीस,सैन्य या सर्व गोष्टींचे आस्तित्व म्हणजे ही तात्पुरती मलमपट्टी आहे. आपण हे पाहतो की, रस्त्यावरती असलेला सिग्नल असतो.त्यावरील रंगाचे दिवे वेगवेगळे संदेश देत असतात.त्यामुळे मानवाच्या आयुष्याची सुखाची वाट दिसणे घडते.अपघात झाले नाही तर समाजातील सर्वांनाच आनंददायी जीवन जगता येणे शक्य आहे. मात्र सिग्नलचा लाल रंगा सांगत असतो तो असे सांगतो , की काहीकाळ थांबा. विवेक असलेली लोक थांबतात पण शिक्षण घेऊनही ज्यांचे शिक्षण माहित पलीकडे गेले नाही अशा अविवेकी लोकांना थांबण्याची सूचना असताना देखील नियम पालन करताना ते दिसत नाही.आपण एकाने नियम न पाळल्यामुळे कोणाच्या तरी जीवावर बेतले जाऊ शकते. मात्र तरी लोकांना त्यातच प्रतिष्ठा वाटत असते. अशावेळी माणसं सिग्नल तोडण्यापूर्वी दिवा कोणताही रंगाचा असला तरी भोवती पोलीस उभे आहेत का ? याची पाहणी करतात आणि मग निर्णय घेतात , म्हणजे आपण विवेक गमावल्यामुळे आपल्याला पोलीसांची गरज निर्माण झाली.

नियम मोडणे ही प्रतिष्ठा वाटू लागली याचे कारणही अविवेक हेच आहे.आपण चुका केल्या तर मान लाजेने खाली जायला हवी.मात्र त्याऐवजी नियम मोडला म्हणून अभिमान वाटत असेल तर आपण विवेक गमावल्याचे ते लक्षण आहे. विवेक गमावलेल्या समाजासाठी पोलीस,सैन्याची गरज निर्माण होते. माणसं चांगली वागत नाही म्हणून पोलीसांची गरज निर्माण झाली आहे.माणसं चांगली का वागत नाही , तर विवेकाची कास सुटली आहे. चांगले म्हणजे काय हे जोवर आपल्याला मनाला स्पर्श करत नाही तोवर आपण ती वाट चालण्याची शक्यता नाही.आपला स्वार्थ साधने..आपले हित साधले जाणे.आपल्याला सुख प्राप्त होणे म्हणजे चांगले असे वाटत असते.मात्र आपल्यासाठी जरी चांगले असले तरी समाज व राष्ट्राकरीता ते चांगले आहे की नाही हे ठरविता येणे महत्वाचे आहे. समाज व राष्ट्राला धोका असेल आणि आपण जर स्वतःचा स्वार्थ साधणार असू तर ती गोष्ट चांगली असण्याची शक्यता नाही.समाजाच्या व राष्ट्राच्या हितासाठी मी कार्यरत राहणे आणि त्यासोबत मला लाभ होणे घडत असेल तर ती वाट चांगली समजायला हरकत नाही.त्यादृष्टीने आपण किती प्रयत्न करणार याचा विचार करायला हवा.त्यातच कल्याण सामावलेले आहे.त्यामुळे विनोबा शिक्षणाचे बलस्थान त्याच्या विवेक पेरणीत आहेत हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करतात.

विवेकशील समाज निर्माण झाला तर ज्या कारणासाठी आपल्याला पोलीस लागतात तेच कारण दूर होणार असल्याने पोलिस व सैन्याची गरज उऱणार नाही.त्यामुळे विनोबा म्हणतात ,की पोलीस आणि सैन्य खतम करण्याची जबाबदारी शिक्षणाची असली पाहिजे.त्यांना खतम करणे या विधानामागे अधिक चांगला समाज निर्माण करणे अभिप्रेत आहे.त्यांची गरज संपुष्टात आणणे आहे. प्रत्येकाने विवेक जागृत ठेवत आपणाला पोलीस का हवेत या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करत गेलो ,तर अविवेक हेच त्यामागील कारण असल्याचे दिसते.मग अविवेकाने आपण जे वर्तन करतो ते नियंत्रित करण्यासाठी पोलीसांची गरज वाटत असते. शिक्षणाने ती गरज संपुष्टात आणण्याची गरज व्यक्त केली जाते. जर शिक्षण सैन्य आणि पोलीसांची गरज संपुष्टात आणू शकत नसेल , तर ते शिक्षण कुचकामी आहे.शिक्षण आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडत नाही. त्यामुळे शिक्षणाची प्रतिष्ठा लोप पावत आहे.शिक्षण घेतलेली माणसं आणि निरक्षर माणसं यांच्यात कोणतेच भेद दिसत नाही.शिकलेली माणसं विचार करत नसल्याने शिक्षणाला दासीचे स्वरूप येते.तीच्यावर हुकमत गाजवली जाते.शिक्षणाने आपली शक्ती गमवली , की ते शिक्षण दासी बनते. शिक्षणाने दासी नव्हे तर राणी सारखे प्रतिष्ठीत ,अधिकार संपन्न असण्याची गरज आहे. जेव्हा शिक्षण दासी बनते तेव्हा ते शिक्षण नेहमीच पराधीन राहते.पराधीन असलेले शिक्षण शिक्षित असलेल्या कोणाही व्यक्तीच्या जीवनाचा उद्धार करू शकणार नाही.जीवनाला योग्य वाटेने घेऊन जाण्याची शक्यता नाही. दासी सारखे शिक्षण माणसांला दास्यत्वातच गुंतून ठेवेल आणि राणी सारखे शिक्षण माणसाला मुक्त करेल..आपल्याला मुक्त करणारे शिक्षण हवे आहे हे लक्षात घ्यायला हवे..कोणती वाट योग्य हे ठरविण्यासाठी शिक्षण उपयोगी पडायला हवे. त्याशिवाय त्या शिक्षणाला मोल नाही.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com