शिकता शिकवता घडू या सारे...

आपल्याकडे आजही शिक्षकाला ‘गुरूजी’ म्हणूनच ओळखले जाते. यातही गुरूत्वाचा भाव आहे. शिक्षक गुरू असतो हे खरे असले तरी विनोबा म्हणतात की, “शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यासाठी शिक्षक हे गुरू असले, तरी विद्यार्थी हे देखील शिक्षकांसाठी गुरू आहेत. विद्यार्थ्याच्या उध्दारासाठी शिक्षक समर्पणाच्या वृत्तीने ज्ञानदान करत असतो.त्याच्या या वृत्तीमुळे तो गुरूपदास पात्र होतो.शिक्षकांसाठी विद्यार्थी... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
File Photo
File Photo

शिक्षणाच्या प्रक्रियेत शिकवणारा शिक्षक आणि शिकणारा विद्यार्थी असे नाते सर्वमान्य झालेले आहे. या औपचारिक नात्याच्या पलीकडे देखील या दोघांत निस्सिम श्रध्देचे बंध असतात. हे नाते औपचारिक असले तरी त्या दोघांमधील नात्याची वीण प्रेमबंधाने अधिक घटट झालेली असते. विद्यार्थी व शिक्षकांच्या नात्यातील प्रेमाला आई बाबांच्या प्रेमा इतकेच मोल असते. अनेकदा असेही म्हटले जाते की, शिक्षण प्रक्रियेत शिक्षक शिकवत असतो, मात्र ते शिकवणे हे केवळ फळा, पुस्तकांपुरते मर्यादित नसते. शिक्षक या शब्दात केवळ देण्याचा भाव दडलेला आहे.त्यांच्या शिकवण्यात केवळ ज्ञान देण्याचा भाव असतो. त्या देण्यात निरपेक्षता असते. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो आणि त्या देण्यात काही राखून ठेवण्याचा विचारही असत नाही.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीच शिक्षक शिकवत असतो आणि त्यासाठी इतरही अनेक उपक्रम राबवत असतो.शिक्षक ही अशी व्यक्ती आहे की , ज्याला देण्यात आनंद वाटत असतो. तो मुक्तपणे प्राप्त ज्ञानाची उधळण करत असतो.ती उधळण करण्यात कोणत्याही प्रकाराचा स्वार्थ असत नाही. प्रत्येक शिक्षकाला नेहमीच वाटत असते , की आपला विद्यार्थी अधिकाधिक बुध्दिवान आणि चांगला माणूस व्हावा.अगदी आपल्यापेक्षा मोठे यश त्याच्या वाटयाला यायला हवे ही धारणा प्रत्येक शिक्षकाच्या अंतकरणात असते. त्यांच्या निर्मळ विचारामुळे आणि जगाच्या कल्याणाचा भाव अंतकरणात असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी तो गुरू असतो.असे समर्पणाने काम करणारे शिक्षक आपले गुरू आहेत. हे प्रत्येक विद्यार्थ्याला नेहमीच वाटत असते. शिक्षक हा गुरू असतो हे खरेच आहे.आजही जगाच्या पाठीवर गुरू म्हणूनच शिक्षकाचा सन्मान केला जातो.

आपल्याकडे आजही शिक्षकाला ‘ गुरूजी ’ म्हणूनच ओळखले जाते. यातही गुरूत्वाचा भाव आहे. शिक्षक गुरू असतो हे खरे असले तरी विनोबा म्हणतात की, “ शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यासाठी शिक्षक हे गुरू असले , तरी विद्यार्थी हे देखील शिक्षकांसाठी गुरू आहेत. विद्यार्थ्याच्या उध्दारासाठी शिक्षक समर्पणाच्या वृत्तीने ज्ञानदान करत असतो.त्याच्या या वृत्तीमुळे तो गुरूपदास पात्र होतो.शिक्षकांसाठी विद्यार्थी सर्वस्व आहे.विद्यार्थ्यांची काळजी वाहने हे त्यांचे कर्तव्य आहे.त्यांच्या या कर्तव्यभावनेमुळे ते विद्यार्थ्यांसाठी गुरू बनतात ” . शिक्षकांच्या अंगी असलेल्या या मूलभूत विचारामुळे त्यांना आदर मिळत असतो.तो आदर व्यक्तीला नाही तर त्या व्यक्तीमध्ये सामावलेल्या आणि दर्शित होणा-या गुणांचा असतो. शिक्षकांचे गुरूत्व कशात सामावले आहे हे विनोबांनी अगदी सुस्पष्टपणे नमूद केले आहे. शिक्षकांच्या कर्तव्य भावनेत नेहमीच समर्पण असायला हवे असते. तो भाव जोपासला गेली तर ते शिक्षक आदराला पात्र ठरतात. अर्थात शिक्षक जे काम करत असतो ते काम नाही तर कर्म असते.

जेथे कर्माचा भाव असतो तेथे समर्पण असते.कर्मात कोणताही स्वार्थ असत नाही. त्या प्रमाणेच कोणत्याही अपेक्षाही असत नाही,कोणतेही मागणे असत नाही. आपण करत असलेले कर्म म्हणजे परमेश्वराचीच सेवा आहे ही त्यामागील भावना शिक्षकामध्ये असते.परमेश्वराच्या सेवेत सक्ती नाही. परमेश्वराची सेवा करताना मनात आनंदाचा भाव असतो.परमेश्वराच्या सेवेत केवळ समर्पण असते आणि त्याचे दर्शन झाले , की तृप्तचेचा भाव असतो.तसे शिक्षणात काम करणा-या माणसाच्या आयुष्याचे असते.तो मुलांना शिकवतो ते शिकवणे ही परमेश्वराची भक्ती आहे.त्या भक्तीत पाने फुले नसली तरी शब्दांचे भाव असतात.मुले हीच शिक्षकासाठी परमेश्वर असतात. मुलांमध्ये देव असतोच. त्यामुळे मुलांसाठीचे अध्यापन म्हणजे पूजा आहे.मुलांसाठीची प्रत्येक कृती ही परमेश्वराची भक्ती वाटत असेल तर त्यातील स्वार्थाचे भाव आपोआप संपुष्टात येतात.

विद्यार्थी हा देव असतो असे मानणारा एक समूह आहे.त्यामुळे परमेश्वराकडे पाहण्याची जी दृष्टी असते तोच भाव शिक्षकाच्या नजरेत असतो.प्रेमाचा ओतप्रोत भाव दडलेला आहे.त्यामुळे शाळा हे मंदीर आहे असे म्हटले जाते..तेथील विद्यार्थी ही देवता आणि शिक्षक हा पुजारी,प्रभावीपणे केलेले अध्यापन हा अभिषेक.नवनविन प्रकारचे अध्यापन करण्यासाठी शिक्षक उपयोगात आणत असलेले संदर्भ आणि त्याकरीता करत असलेले अभ्यासाचे प्रयत्न म्हणजे साधना.येथील पूजेसाठी फुले हार नाही तर केवळ शब्दांच्याव्दारे केली जाणारी पूजा असते.

आता परमेश्वर आहे की नाही असा वाद होऊ शकतो...मात्र ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी तो विचार आहे.विश्वास नसेल तर त्या माणसांचा विवेकावर विश्वास असतोच. त्या विवेकातही निर्पेक्षता,कल्याणाचा मंत्र आहे.विवेकवादी माणसं अधिक समर्पित असतात.त्यांना चांगले वाईट याचा विचार अधिक उत्तमतेने जाणत असतात.त्यामुळे संत ज्ञानेश्वरानी देखील संताचे लक्षण नमूद करताना म्हटले आहे की, “ संत तेथे विवेक असणे केजी ” . शिक्षक हा विवेकशील असेल तर त्याचा प्रवास गुरू पदापर्यंत होण्यास निश्चित मदत होत असतो.त्यामुळे विनोबांचा विश्वास गुरूत्वावर आहे..याचे कारण गुरूत्वात विशेष असे काही सामावलेले आहे.खरेतर शिक्षक जेव्हा आपले अध्यापन करत असतो तेव्हा ते आपले कर्म आहे ही जाणीव अंतकरणात असते. त्यात आपल्या कर्तव्याची भावना सामावलेली आहे. त्यामुळे आपण समाजाची सेवा करतो असे म्हणता कामा नये. मी सेवा करतो.त्यातून आणखी मी माझा काही स्वार्थ साधतो.अशी गुरूला जाणीव असू नये आणि तशा भावनेची तरंग देखील मनात उमटू नये अशी अपेक्षा आहे.

गुरूत्वाच्या भावनेत कोणताही भाव असता कामा नये याची जाणीव पुन्हा पुन्हा आपल्या अंतर मनाला करून देण्याची गरज आहे. आपला अहंकार उंचावेल असा विचारही मनात निर्माण होता कामा नये.आपल्या कर्मात देखील थोडासाही उपकाराचा भाव असता कामा नये. खरतर ही भावनाच माणसांच माणूसपण दर्शवते.दुर्दैवाने आपण आज अहंकार शुन्यतेच्या भावनेत जगू शकत नाही. शिक्षकांचे सरकारी नोकर म्हणून होत जाणारी धारणा समाजाच्या विकासातील अडथळा बनत आहे. एकदा का माणूस नोकर झाला , की आपल्या जबाबदारीतील कर्माचा भाव संपुष्टात येतो.मग आपली जबाबदारी देखील कर्तव्य न वाटता काम वाटू लागते. हळूहळू त्या कामातील सर्जनशीलता संपते..त्यातील आनंदाचे भावही संपतात. मग केवळ वेतनासाठी काम इतकेच काय ते उरते.असा भाव निर्माण झाला की समजावे आपल्यातील शिक्षकत्व संपुष्टात आले आहे.जोवर कर्म करतो आहोत ही भावना आहे . मग त्या कामात कोणतेही दुःख नाही..त्यात अपेक्षा नाही..कामातील प्रसिध्दीचा भाव नाही आणि अंहकाराचा वाराही लागलेला नाही .अशा स्वरूपात काम करणारी व्यक्ती गुरू म्हणून पात्र असते. शिक्षकाने ज्या प्रमाणे आपल्यातील शुध्दतेच्या भावनेचे दर्शन घडविण्याची गरज आहे त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनात देखील एका उच्चतम विचाराचे दर्शन घडविण्याची गरज विनोबा व्यक्त करतात.

विद्यार्थ्यांच्या अंतकरणात आपण गुरूची सेवा करतो, तर त्यातून आणखी आपला काही स्वार्थ साधतो असे विद्यार्थ्यानाही वाटता कामा नये. आपण गुरू आणि शिष्य यांच्या नात्यातील भाव जेव्हा जोपासतो तेव्हा कोणताही स्वार्थ असता कामा नये.शिक्षकावर निस्सिम प्रेम असणं हेच आपले शिष्य असल्याचे लक्षण आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यात विश्वास व श्रध्दा आणि प्रेम या गोष्टी कितीतरी महत्वाच्या मानल्या जातात. एका गुरूच्या आयुष्यात घडलेला प्रसंग अनेकदा कीर्तनकार आपली कीर्तन सेवा बजावताना कायम सांगत असतात .एकदा एक गुरू आजारी पडल्याचे नाटक करतात. त्यांच्या पायाला मोठी जखम होते.त्यावर ते पटटी बांधतात..ती ठसठसत असल्याचे ते सांगतात. त्यांना प्रचंड वेदना होत असते.त्या जखमेतील पू बाहेर काढण्याची गरज आहे असे ते सांगतात. तो तोंडाने कोणी तरी काढला पाहिजे असे मुददामहून सांगतात. सारे शिष्य ऐकत असतात पण कोणी तयार होत नव्हते..अखेर कल्याणी नावाचा शिष्य आपल्या गुरूच्या वेदना पाहून कृती करण्यास तयार झाला.आपल्यासाठी गुरूंनी इतके केले आहे की त्यांच्यासाठी आपण काही तरी करायला हवे. आपल्या गुरूनां वेदना नको..म्हणून शिष्यही कासाविस होत होते.अखेर शिष्याने जिथे जखम बांधलेली होती तेथे आपले ओठ लावले आणि जखमेतील पू तोंडाने काढण्यास सुरूवात केली. त्या जखमेतून पू बाहेर येत नव्हता तर त्यातून आंब्याचा रस बाहेर येत होता.

शिष्य अत्यंत आनंदाने त्याचा आस्वाद घेत होता..हे इतर शिष्य पाहत होते.जसा अधिक वेळ जात होता तसा शिष्याच्या चेह-यावरील आनंद व्दिगुणीत होत होता. मुळात गुरूने घेतलेली ती परीक्षा होती.महाभारतात वेद आणि अरूणी यांचीही गुरू निष्ठा समोर आली आहे.असे अनेक प्रसंग गुरू आणि शिष्य यांच्या आय़ुष्यात आलेले आहेत. त्याचा अर्थ हा की, विद्यार्थ्यांसाठी गुरूसेवा व शिक्षकांसाठी विद्यार्थी सेवा हेच पर्याप्त ,एकमेव व अनन्य ध्येय असले पाहिजे.दोघे मिळून परमेश्वराची सेवा करीत आहोत अशी अनुभूती असली पाहिजे असे विनोबा सांगतात.विनोबांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यातील ओलावा महत्वाचा मानला आहे, पण त्या पलिकडे त्यांच्यातील सेवाभाव आणि त्याच प्रमाणे अंतकरणातील शुध्दतेचा विचारही महत्वाचा आहे असे नमूद केले आहे.आपण कोणतेही काम करताना मनातील विचाराचे होणारे दर्शन महत्वाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.त्यासाठी मनातील विचारात प्रेम आणि श्रध्दा असेल तर कामाचेही कर्मात रूपांतर होते.त्यामुळे हे नातेच अधिक गुणवत्तेपर्यंत घेऊन जाईल..त्यासाठीच ही वाट चालायला काय हरकत आहे ?

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com