
शिक्षण हे स्वतःचे जीवन उन्नत बनविण्यासाठी जसे आहे त्याप्रमाणे समाजाच्या कल्याणाचा विचारही शिक्षण विचाराच्या प्रक्रियेत सामावलेले असायला हवा. शिक्षणातून राष्ट्र व समाजाच्या कल्याणाचा विचार अधोरेखित होण्याची गरज आहे. आपण जेव्हा समाजाच्या कल्याणाच्या विचाराची भूमिका शिक्षणातून अपेक्षित करतो तेव्हा ते शिक्षण कृतीशील आणि श्रमाधारीत असण्याची गरज आहे. ज्या शिक्षणातून आपण विद्यार्थ्याच्या चेह-यावर तेज निर्माण करू पाहत असतो त्यासाठी त्याला श्रमाची जोड असायला हवी. श्रमातून बुध्दिला तेज येते हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षणातून श्रमाचा विचार पेरण्याचे फारसे काम घडताना दिसत नाही.
मात्र आपले शिक्षण हे बौध्दिक विकासाचे उददीष्टे काही प्रमाणात साध्य करताना दिसत आहे. शिक्षण घेत असलेल्या प्रत्येकाच्या मनात सेवा भावनेची वृत्ती विकसित करण्याचे वर्तमानात आव्हान आहे. विनोबाच्या मते सेवा ही स्थानिक असावी तर विचार वैश्विक असायला हवा. प्रत्येक व्यक्तीत दोन अंश सामावलेले आहे. एक अंश विचाराचा आहे तर दुसरा अंश हा शरीराचा आहे. आपल्या शरीराच्या अंशात विविध इंद्रीयांचा विचार आहे. त्यात हात,पाय,कान,डोळे सारखे इंद्रिये आहेत. जेव्हा इंद्रियांचा विचार केला जातो तेव्हा त्यांचे क्षेत्र आपला परीसरच असणार असतो. इंद्रियाची मर्यादा लक्षात घेतली तर त्याचे स्वरूपे अत्यंत मर्यादित स्वरूपाचे आहे . त्यामुळे इंद्रियाव्दारे आपण जे जे कर्म करणार आहोत ते कर्म इंद्रियांचा विचार करून आपल्या परीसराचे क्षेत्र निवडून करण्याची गरज आहे. इंद्रियासाठी स्थानिक परिसर निवडला जाणार असला तरी विचाराचे क्षेत्र मात्र वैश्विकच असायला हवे. आपण एका ठिकाणी बसून जगाचा विचार जगाचा शकतो.प्रत्येकाचीच विचाराची शक्ती अफाट आहे.त्यामुळे विचार करण्याची क्षमता लक्षात घेता प्रत्येकालाच जगाचाही विचार करता यायला हवा.
या दोन अंशाचा विचार प्रत्येकाला करता आला तर त्यातून स्वतःचा परीसर जितका सुंदर आणि उत्तम करता येईल तितके जगाचे कल्याणही आणि सौंदर्य देखील अधिक वेगाने वृध्दींगत झालेले आपणास अनुभवता येणार आहे. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ केला , तर अवघे गाव स्वच्छ होईल आणि गावं स्वच्छ झाली तर देश स्वच्छ होणे आपोआप घडते.त्यामुळे विनोबा सातत्याने शिक्षणातून सेवेचा आग्रह धरता आहेत आणि त्याचवेळी वैश्विक विचाराची गरज देखील अधोरेखित करतात.आपल्याकडे जे सेवा करतात ,श्रम करतात त्यांना विचार करण्याची संधी नाही,संधी मिळाली तर त्यांच्या विचाराची दखल नाही. जे विचार करतात ते श्रम करत नाही. त्यांच्या लेखी श्रमाचे मोल नाही. शिक्षणामुळे श्रमकरी आणि बौध्दिक असे हे भेद निर्माण झाले आहेत.ते भेद शिक्षण घेणा-या प्रत्येकानेच टाळायला हवेत. शिक्षण हे भेदाभेद निर्माण करण्यासाठी नाही तर ते भेद नष्ट करण्यासाठी आहे. शिक्षणाचे ते मूळ उद्दीष्ट आहे. शिक्षणातून भेद निर्माण करण्याची वृत्ती विकसित केली जात असेल तर ते शिक्षण समाज व राष्ट्राचे भले कसे करणार हा प्रश्न आहे.त्यामुळे शिक्षणातून सेवापरायण वृत्ती निर्माण झाली तर भेदाभेदाचे दर्शन घडण्याची शक्यता नाही.
शिक्षणातून केवळ अक्षऱ साक्षरतेचा विचार नाही , तर जीवनाची उंची वाढविण्याचा मंत्र जपला जाईल इतका व्यापक विचार मनामनातून स्त्रावण्याची नितांत गरज आहे. आज समाजात कायद्याने भेदाभेद संपले आहे असे वाटत असले तरी मनातील भेदाच्या भिंती अजूनही भक्कमपणे घर करून उभ्या आहेत.या भिंती कदाचित टोकदारपणे जाती धर्माचे नसतील मात्र आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक भेदाभेद अधिक घटट बनत चालल्या आहेत. हे भेद जीवन व्यवहाराच्या छाया अधिक गडद करताना दिसत आहेत.ज्या शिक्षणाने सर्व भेद नष्ट करावे म्हणून मन साफ करण्याची गरज आहे ती मनेच शिक्षणानंतर स्वच्छ होत नसतील, तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? समाजात गुणवत्तेची कदर करण्या ऐवजी आजही जाती आणि धर्माचा आधार घेत गुणवत्तेचा विचार केला जातो.
एखादा विद्यार्थी कोणत्या जातीचा आहे त्यावर आपण गुणवत्तेचा विचार करणार असू तर शिक्षणाचा उपयोग नाही.आज समाजात एखाद्या मुलाने विशेष प्राविण्य प्राप्त केले तर त्याचा सन्मान समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन करण्याची गरज आहे.मात्र तसे न घडता तो ज्या समाजातून आला आहे तो समाज सत्कार,सन्मान करणार असेल तर आपण समाज म्हणून जबाबदारी नाकारत आहोत.शिक्षणातून बरेच काही रूजविण्याचे राहून गेल्याचा तो पुरावा म्हणायला हवा.समाजातील व्यक्तीचे मोठेपणही जाती धर्मात गुंतलेले दिसते आहे.माणसांचे मानवी संबंध, त्यांची गुणवत्ता अथवा वाईट गुणांचा विचार करताना देखील जाती, धर्माचाच विचार करणे घडत असेल तर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आपण शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत पोहचविण्याचा जो उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे तो उददेश सफल होताना दिसत नाही. शिक्षण घरादारापर्यंत पोहचले आहे. मात्र त्यातून अपेक्षित मूल्यांची पेरणी करण्यात आपल्याला यश मिळताना दिसत नाही हेही वास्तव आहे.
शिक्षणातून मूल्यांची पेरणी करण्याचा विचार सातत्याने केला आहे. श्रमाला प्रतिष्ठा देण्याचा विचार शिक्षणाच्या गाभाघटकात आहे. मात्र आज श्रमाचा विचार हरवला आहे.शिक्षणातून माणसाला प्रतिष्ठा आली आहे , पण श्रमाला मात्र प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात आपल्याला यश आले नाही.जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्र पुढे गेली आहेत.ती त्या देशातील राष्ट्र प्रमुखाच्या विचाराच्या उंचीने. कोणीतरी राष्ट्र प्रमुख स्वतःची कामे स्वतः करतो..आपण वाचलेली कात्रणे स्वतः काढतो..हवी तेव्हा हवी नस्ती स्वतःची स्वतः काढतो आणि वाचतो.आपली कामे आपण करण्यात त्यांना धन्यता वाटते.महात्मा गांधी हेही स्वतःची कामे स्वतः करण्यात अधिक रस दाखवत असायचे.विनोबा प्रथम जेव्हा भेटण्यास गेले तेव्हा गांधीजी आश्रमात स्वतः भाजीपाला कापत होते.अशी माणसं जेथे आपल्याला दिसतात तो समाज व राष्ट्र पुढे जात असते. त्यामुळे गांधीजीचे जीवन हाच वस्तूपाठ समजून त्याकाळी अनेक सेवक त्यांच्या वाटेने चालत होते. मोठी माणसं ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने समाजातील सामान्य माणसं चालत असतात. त्यामुळे समाजात कर्ते लोक श्रमाची वाट चालतील , तर ती वाट इतरही चालतील. शेवटी शिक्षण तर पुस्तकातील धडयांनी होत नाही तर ते भोवताल मध्ये असलेले माणसांच्या वर्तनातील अनुभवाने होत असते. म्हणून समाज उन्नतीसाठी शिक्षक नाही तर आचार्य हवेत असे विनोबा सातत्याने सांगत होते.आचार्य म्हणजे जीवन आणि शिक्षण विचार यांचे एकसंघ नाते आहे. त्या वाटेचा प्रवासी हा आचार्य असतो. त्या अर्थाने शिक्षणाची पेरणी महत्वाची ठरते.
आपण शिक्षणातून व्यक्तीचे जीवन आणि जगभरात शांतता निर्माण करण्याचा विचार करत आहोत. आपण जसे आपल्या देशाचे नागरिक असतो त्यामुळे आपल्या देशावर आपण प्रेम करत असतो. आपल्या देशाच्या कल्याणासाठी आपण सतत विचार करण्याचा प्रयत्न करत असतो.मात्र वर्तमानात आपण केवळ देशाचे नागरिक नाही तर विश्वाचेही नागरिक असतो. आपण आपल्या देशावर प्रेम करतो त्याप्रमाणे जगावर आणि जगातील मानवी समूहावर प्रेम करता येण्याची गरज आहे. शिक्षणातून माणसांवर प्रेम करता येण्याची गरज असते.केवळ आपण देशातील नागरिकांचा विचार करून जगातील नागरिकांना शत्रू मानने चुकीचे ठरेल. आपली संस्कृती तर वैश्विक प्रेमाची आहे.आपण शिक्षणातून पसायदानाचा विचार करत आहोत. पसायदानाच्या वैश्विकतेच्या भावनेची मने माणसांच्या मनामनात निर्माण होण्याची गरज आहे. ती शिक्षणातूनच निर्माण केली जातात. त्यामुळे आपल्या देशाचा विचार करताना जगातील नागरिकांची काळजी घेणे आणि जगातच आनंद पेरण्याचा विचार करण्याची वृत्ती निर्माण करण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. आज आपल्या हिता बरोबर जगाचे अहित त्यात सामावलेले नाही ना ? तसाही विचार करता याला हवा.
वैश्विक नागरिकत्वाचा विचारही आपल्या शिक्षणात असायला हवा आहे तो आहेही मात्र ती धारणा रूजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज देखील आहे.शिक्षणातून जर वैश्विकतेचा विचार रूजला तर जगात शांतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तसे झाले तर युध्दाची भाषा थांबेल. त्यातून संघर्षाची शक्यता नाही. मात्र आज शांततेपेक्षा संघर्षाचेच चित्र अधिक आहे. जगात एकिकडे शांततेचे चित्र उभे केले जात आहे.विविध संघटना शांततेसाठी प्रयत्न करता आहेत आणि दुसरीकडे शस्त्रांस्त्राची जागतिक स्पर्धा आहे. त्या स्पर्धेतून जग युध्दाच्या खाईत लोटले जात आहे. एकिकडे शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे आपण निर्माण केलेली शस्त्र विकली जावी म्हणून ग्राहक शोधायचे. या स्पर्धेतून युध्दाची वाट निर्माण करणे घडते. दोन राष्ट्रात संघर्ष असल्याशिवाय शस्त्रास्त्र तरी कोण घेणार.त्यामुळे तो संघर्ष पेरण्याचे कामही काही राष्ट्र करत असतात. वर्तमानात विवेकाने विचार करण्याची निंतात गरज आहे आणि ती विचाराची प्रक्रिया शिक्षणातून पेरल्याशिवाय युध्दाचे ढग कमी करता येणार नाही. आपले युध्द स्वहितामुळे निर्माण झाले आहे.त्यामुळे शिक्षणाचा मूळ गाभा विसरून आपला प्रवास सुरू राहिला तर जग शांततेच्या दिशेने प्रवास करेल. त्यासाठी सर्वांनीच शिक्षण सेवापरायण करण्याच्या दिशेचा प्रवास घडविण्यासाठी कटीबध्दता ठेवण्याची गरज आहे. शिक्षण सेवापरायण झाले तर त्यातून मानवी विकासाचा विचार पुढे येईल आणि त्याचवेळी मानवी कल्याणाची दृष्टी देखील प्राप्त होईल. समाजातील सारे प्रश्न शिक्षणाच्या चिंतनाशी आहे.त्यामुळे शिक्षणाचे चिंतन ज्या दिशेने घडेल त्याच दिशेने जगाचा प्रवास घडणार आहे.त्यामुळेच विनोबा शिक्षण सेवापरायण असण्याचा आग्रही भूमिका प्रतिपादन करतात.ती वाट जगाच्या हिताची आहे.
संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)