जीवन हेच शिक्षण

कोणताही अनुभव हा आपल्या जीवनापासून तोडला जावू शकत नाही. जीवनाला जो जोडला जात नाही तो अनुभव नाही. त्यामुळे अनुभवातून होणा-या शिक्षणाला जीवन शिक्षण म्हटले जाते. कोणीतरी शिकवते म्हणून आपण शिकतो ही धारणाच चुकीची असल्याचे विनोबा सांगतात. खरे शिक्षण हे प्रत्येकजन केवळ स्वतःच प्राप्त करू शकतो. कोणी कोणाला शिकू शकत नाही. त्यामुळे शिक्षण म्हणजे जीवनात जे जे म्हणून अनुभव घेत जातो ते अनुभव म्हणजे शिक्षण असते.. आणि त्यातूनच... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
File Photo
File Photo

पुस्तके वाचून संपवले.. परीक्षा दिल्या.. मार्क मिळाले.. हाती पदवी मिळाली म्हणजे शिक्षण झाले असे मानले जाते. आपल्या हाती असलेला कागद हा शिक्षणाचा पुरावा नाही. कोणतेही शिक्षण हे बाहेरून लादले जात नाही आणि जे लादले जाते ते शिक्षण नाही. जे वर्गात बसून शिकवले जाते आणि शिकले जाते तेही शिक्षण नाही. जे स्वतःहून प्राप्त केले जाते ते खरे शिक्षण. स्वतःहून जे प्राप्त होते ते शिक्षण आहे. त्यात स्वानुभव असतो. स्वतःचे शिकणे हे अनुभवाने युक्त असते.

कोणताही अनुभव हा आपल्या जीवनापासून तोडला जावू शकत नाही. जीवनाला जो जोडला जात नाही तो अनुभव नाही. त्यामुळे अनुभवातून होणा-या शिक्षणाला जीवन शिक्षण म्हटले जाते. कोणीतरी शिकवते म्हणून आपण शिकतो ही धारणाच चुकीची असल्याचे विनोबा सांगतात. खरे शिक्षण हे प्रत्येकजन केवळ स्वतःच प्राप्त करू शकतो. कोणी कोणाला शिकू शकत नाही. त्यामुळे शिक्षण म्हणजे जीवनात जे जे म्हणून अनुभव घेत जातो ते अनुभव म्हणजे शिक्षण असते.. आणि त्यातूनच खरं शिक्षण होत असते. जे विद्यार्थी पुस्तके शिकतात आणि त्यातून जी माहिती मिळवतात ती माहिती मिळविणारे विद्यार्थी जीवनाचे आव्हान पेलण्यास समर्थ ठरत नाही. शिक्षण जेव्हा आव्हाने पेलत नाही तेव्हा ते शिक्षण सत्वयुक्त असत नाही. पुस्तकातील शिक्षण सत्वयुक्त बनवण्याची शक्ती पुस्तकातील माहितीत सामावलेले नाही. याचा अर्थ पुस्तकी शिक्षण कुचकामी आहे का ? तर त्याचे उत्तर नाही असे नाही तर, पुस्तकातील शिक्षणाचा आशय आपण जीवनाशी जोडून शिकण्याची संधी दिली गेली तर शिक्षण जीवनाभिमुख बनण्याची शक्यता असते.त्यामुळे शिक्षण आणि जीवन यांचे नाते पक्के होण्यास मदत होईल. शिक्षण आणि जीवन असे दोन स्वतंत्र भाग तयार झाले की शिक्षणाला अर्थ उरत नाही आणि जीवनाला अर्थपूर्णता लाभत नाही.जोवर शिक्षण अर्थपूर्ण होत नाही तोवर शिक्षणाचे मोल उंचवणार नाही.शिक्षण आणि जीवन यांचे एकमेकाशी असणारे नाते हरवल्यानेच आपल्या समाज व्यवस्थेत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यामुळे शिक्षण घेऊन जीवन अर्थहीन बनत आहे.जीवन अर्थहीन आहे म्हणून शिक्षणाला मोल नाही.शिक्षणाचा परिणाम आपल्या प्रतिमा आणि प्रतिभेवर दिसायला हवा.

जीवनात आपण जे कर्म करत राहतो त्यातच अधिक चांगले शिक्षण दडलेले आहे. कर्म करण्यामुळे मिळणा-या अनुभवातून शिक्षण होत असते.अनुभव हाच शिक्षणाचा राजमार्ग आहे.कर्मात सेवाभाव असतो.जेथे सेवाभाव असतो तिथेच ज्ञानाचा प्रवास शक्य आहे. ज्ञान मिळविण्याच्या हेतूने आपण कोणतेही कर्म केले आणि त्यात सेवाभावाचा अभाव असेल तर ज्ञान मिळण्याची शक्यता नाही. विनोबा म्हणतात की, विश्वमित्र हे राजा दशरथांकडे राम आणि लक्ष्मण यांची मागणी करत होते.त्यावेळी त्यांनी ज्ञान प्राप्तीसाठी पाठवा असे नाही म्हटले.तर त्यांनी म्हटले की, यज्ञाचे रक्षण करायचे आहे त्यासाठी मुलांना पाठवा. मुलेही गुरूंसोबत गेले त्यात केवळ सेवेचा भाव होता. त्यामागे कोणताही भाव हा सकामतेचा नव्हता,त्यामागे कोणताही हेतू नव्हता. त्यांच्या जाण्यामागे सेवा केली तर ज्ञान मिळेल असाही हेतू भाव नव्हता. केवळ गुरूंची सेवा हा एकमेव भाव त्यांच्या वृत्तीत होता.आपल्या गुरूंची सेवा हाच ज्ञानाचा मार्ग असल्याचे आपल्या इतिहासात दर्शन घडते आहे. याचा अर्थ गुरूंच्या सेवेमुळे ज्ञान प्राप्त होते असेही नाही . अन्यथा गुरूची सेवा केली तरच ज्ञान प्राप्त होते म्हणून लोक सेवा करतील.त्या दिशेच्या प्रवासात सकामता आहे.

जेथे सकामता असते अशा दिशेचा प्रवास आपण टाळायला हवा.विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्यात असलेल्या बंधाने शिक्षण होत असते हे लक्षात घ्यायला हवे. गुरू आणि शिष्य हे एकमेकाकडून शिकत असतात.अनेकदा आपण म्हणतो की,गुरूंकडून मुलं शिकत असतात...मात्र तसे होत नाही.अनेकदा शिक्षकही मुलांकडून अनेक गोष्टी शिकत असतात. मुलांना काही कळत नाही,त्यांना विचार करता येत नाही.त्यांना आपले हित कशात आहे हे जाणता येत नाही..पण हे काही खरे नाही. मुलांना आपले हित समजत असते.त्यांना माणसं ओळखू येतात. जेव्हा एकमेकाच्या मनातील भाव हे एकमेका कडून शिकण्याच्या मनोवृत्तीचे असतात तेव्हा शिकणे अधिक चांगले होण्यास मदत होत असते. आपण मुलांना स्वातंत्र्य दिले की, ते अधिक जबाबदारीने वागतात.त्यांच्यावर सोपावलेल्या जबाबदारीमुळे ते अधिक उत्तम वर्तन ठेवतात. त्यांच्या त्या वर्तनामागे निश्चित अशी भूमिका असते.त्यांच्या स्वतंत्र विचारामुळे आपण मोठी माणसंच अधिक शिकत असतो.त्यामुळे मुलांकडून देखील शिक्षकांने शिकण्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. मोठया माणसांमुळे मुले शिकतात हा समाजातील मोठा गैरसमज आहे.

मुले भोवतालमधील लोकांच्या प्रत्यक्ष जगण्यातील अनुभवातून अधिक शिकत असतात.त्यामुळे त्यांना आपण जगण्यासाठीच्या किती संधी देतो त्यावर मुलांचे शिकणे अवलंबून असते. मुलांचे शिकणे हे शिक्षकांच्या जगण्याकडे पाहून होत असते म्हणून विनोबा म्हणतात की, देशाचे कल्याण करायचे असेल ,समाजाचे भले साध्य करायचे असेल तर आपल्याला शिक्षकांची नाही तर आचार्यांची गरज आहे.आचार्य म्हणजे पदवी नाही..आचार्य म्हणजे कोरडया ज्ञानाचा साठा नाही..आचार्य म्हणजे अफाट पुस्तके वाचणारी व्यक्ती नाही..आचार्य म्हणजे जगण्याचा वस्तूपाठ आहे.विद्यार्थ्यांना पुस्तकातून जे शिकवायचे आहे त्याचा वस्तूपाठ शिक्षकांच्या जीवन अनुभवातून प्रतिबिंबीत होण्याची गरज आहे. विनोबांच्या मते शिक्षक जे बोलतो त्याप्रमाणे आचरण करतो.जीवन तत्वज्ञानाची मांडणी ही स्वतःच्या वर्तनातून दाखवतो तो आचार्य. विद्यार्थी पुस्तकातून जे शिकत नाही ते आचार्यांच्या जीवन व्यवहारातून शिकत असतो.त्यामुळे समाजाला अधिकाधिक गरज आचार्यांची अधिक गरज आहे.

समाजाच्या हितासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकमेकाकडून शिकण्याची तयारी दाखविण्याची गरज असते.शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी जसा शिकतो त्याप्रमाणे शिक्षकही शिकत असतो.एका अर्थाने शिकण्याचा प्रक्रियेत दोन्ही शिक्षक असतात. शिक्षण ही काही द्यायची गोष्ट नाही.जे दिले जाते.ज्याचा हिशोब ठेवला जातो.ते काही खरे शिक्षण नाही. आपण अनुभवत,पाहत पाहत, विचार करत जे शिकतो तेच खरे शिक्षण. आपण अन्न सेवन केल्यानंतर प्राप्त केलेल्या उर्जेचे दर्शन हे आपल्या शरीरातून होत असते. ती उर्जा ही काही कागदावर दिसत नाही.त्याप्रमाणे जीवनात आपण जे अनुभव घेतो..त्यातून जे शिकतो ते शिकणे हा जीवन अनुभव आहे.त्या अनुभवामुळे शिक्षण होत असते.

जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा ते शिकणे हे पचायला हवे असते. शिक्षणाचे जे पचणे झाले आहे ते शिकणे हे रक्तात मिसळायला हवे.अनुभवातील शिकणे आणि जीवन प्रवास हे एकसंघ होण्याची गरज आहे.जे पचले तेच खरे शिक्षण.आपण किती खाले ते महत्वाचे नसते तर जे खाले आहे ते किती पचले आणि पचलेले किती रक्तात रूपांतरीत झाले ते अधिक महत्वाचे आहे. त्याप्रमाणे आपण किती शिकलो, किती पदव्या धारण केल्या हे महत्वाचे नाही तर ,आपण त्या पदव्या धारण करण्यासाठी जे जे प्रयत्न केले त्यातून जे ज्ञान मिळवले..आणि त्यातील जे पचले आणि मस्तकातून रूजले ते खरे शिक्षण. त्यामुळे शिक्षणाच्या पदव्या प्राप्त करण्यापेक्षा ते शिक्षण पचण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शाळा,महाविद्यालयातील शिक्षण घेतल्यानंतर आपण जेव्हा महाविद्यालय सोडतो आणि त्यातून विसरल्यानंतर जे आपल्या जवळ उरते ते खरे शिक्षण.विनोबा म्हणतात की,शिक्षण थांबल्यावर सोबत जे उरते ते शिक्षण. त्यामुळे शिक्षणाचा विचार अधिक गंभीरपणे करण्याची गरज आहे.

विनोबा म्हणतात की, आपण कोणाला शिकू शकत नाही.शिकण्याच्या प्रक्रियेत आपण कोणाला तरी शिकवतो याचा अर्थ कोणीतरी अज्ञानी आहे. अज्ञान दूर करण्यासाठी मी शिकवण्याचा प्रयत्न करतो ही भावना मनात निर्माण होणे म्हणजे शिक्षकांचा अहंकार आहे.शिकवणे आणि शिकवणे या दोन्ही गोष्टी भिन्न आहे.जेव्हा दोन गोष्टी भिन्न असतात तेव्हा त्यांची उद्दीष्टे देखील भिन्न असतात.ही उददीष्टे बदलली की,आपण सारे एकाच मार्गावर चालू शकणार नाही.त्या अर्थाने आपण अध्ययन हा दोघांचा स्वभाव बनवायला हवा.विद्यार्थी अध्ययन करतो आहे आणि त्याला अध्ययन करण्यासाठी आपण केवळ मदत करत असतो. हा भाव निर्माण होणे म्हणजे शिकवणे आहे. हा भाव मनात निर्माण होतो तेव्हा त्यात शिकविण्याचा भाव नसतो..आज दुर्दैवाने शिक्षणात शिकवण्याच्या प्रक्रियेची मानसिकता अधिक आहे. मुळात माणसांचा स्वभाव आपल्याला कोणी तरी शिकवतो आहे हे स्विकारणे घडण्याची शक्यता अजिबात नाही.कोणी तरी शिकवते म्हणून कोणी शिकते असे घडत नाही.याचाही विचार करण्याची गरज आहे.शिकणे म्हणजे सोबतचा प्रवास आहे.तो समांतर स्वरूपात सुरू असतो.तो प्रवास उत्तम घडला तरच शिक्षणातून परिवर्तन होण्याची शक्यता अधिक आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com