आपण काय पेरतो आहोत..?

jalgaon-digital
9 Min Read

आपल्या समाज व्यवस्थेत भ्रष्टाचार पाळामुळात रूजलेला आहे. केवळ पैसे खाण्यास आपण भ्रष्टाचार मानत आहोत. त्यापलिकडे भ्रष्टाचाराचा विचार केला जात नाही. मात्र कामातील अप्रमाणिकपणा, पूर्ण क्षमतेने काम न करणे. कामासाठी इतरांना सहकार्य न करणे. कामाची अडवणूक करून पैशाची अपेक्षा ठरणे हा पण भ्रष्टाचारच आहे. कामासाठी मोबदला मागणे हा देखील भ्रष्टाचार आहे. एका कामाच्या मोबदल्यात दुसरे काम करून देण्याचा प्रयत्न देखील त्याच स्वरूपातील आहे. खरेतर भ्रष्ट आचरण करू नये म्हणून अभ्यासक्रमाव्दारे विविध अंगाने प्रयत्न करू नये. शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात भ्रष्ट आचरणासंदर्भात काहीच शिकविले जात नाही, तरी ते माणंसात आपोआप कसे रूजते? हा प्रश्न आहे.

पण आपण घरातून केलेली पेरणीच मुलांच्या मनावर अधिराज्य करीत असते. आपण मुलांनी एखादे काम करावे म्हणून त्याला लालूच दाखवत असतो. त्यांने ते काम केले तर त्याला पैसे, खाऊ देण्याचे आश्वासन देत असतो. त्या अमिषाने मुलं काम करते. ते काम भविष्यासाठीची काही पेरणी असते का? तर त्याचे उत्तर होय असे आहे. मुलांवरती कामाचा संस्कार रूजावा या करीता आपण अशाप्रकारे लालूच दाखवून काम करून घेतो. अनेकदा त्याला शिक्षा करून ते काम करण्यासाठी सक्ती केली जाते. खरेतर या दोन्ही प्रकारे मुलांकडून काम करून घेणे गैरच आहे. त्यामुळे आपण संस्काराची नाही तर त्यांच्यावरती बेजबाबदारपणाची पेरणी करीत असतो.

घर हीच शाळा…

आपण लहान वयात मुलांच्या मनात काय पेरतो याचा अधिक सुक्ष्मतेने विचार करण्याची गरज असते. अनेकदा आपण मुले मोठेपणी बिघडू नयेत म्हणून अऩेक नियमाच्या चौकटीत त्यांना बांधून टाकत असतो. हे बांधने म्हणजे स्वातंत्र्य हिरावून घेणे असते. अशा गुलामीची मानसिकता किंवा बंधने लादली तर मुले फार तर तात्पुरते पालकांच्या आणि शिक्षकांच्या समोर चांगले वर्तन करतात. मात्र त्यांच्यावरती विचाराचा दिसणारा परीणाम जीवनभराचा दिसणार नाही. घरात आईला मदत कर, किराणा दुकानातून वस्तू आणून दे. आजीला, बाबांना मंदिरात घेऊन जा मग तुला चॉकलेट देईल. तुला बिस्किट दिले जाईल. असे आपण सांगून मुलांच्या मनावर लाचेचे संस्कार तर करीत नाही ना..? कोणतेही काम करायचे असेल तर आपल्याला काही तरी लाभ व्हायला हवा ही धारणाच नुकसान करीत आहे.

मग मुलं प्रत्येकवेळी काही काम कोणीही सांगितले की ते अटी टाकायला लागते. त्या अटीत मला हे दिले तर ते मी करेल असे सांगून मुलं आपल्याकडून प्रत्येक वेळी काहींना काही अपेक्षित करीत असते. आरंभी ही गोष्ट आपले मुलं लहान आहे म्हणून आपण समजू शकतो.. पण या विचारातून आपण भविष्यासाठी लाचेचे संस्काराची पेरणी करीत आहोत हे ही लक्षात घ्यायला हवे. कोणतेही काम करायचे असेल तर आपल्याला काही मिळालया हवे हा विचार पक्का होत जातो. समाजात आणि शिक्षणात कोणत्याच प्रकारे लाचेचा विचार शिकविला जात नाही. तरी माणसं मोठी झाल्यावर, पदावर बसल्यावर लाच कशी घेतात? हा खरा प्रश्न आहे. याचे कारण आपल्या घरातील एका अपेक्षेत दडलेले नाही ना? असा प्रश्न पडतो.

तुम्ही फक्त इतकेच करा..!

अनेकदा लहान वयात आपण जे काही करतो ते जीवनभर टिकणारे असते. एखाद्या लहान झाडाला आपण छोटीशी खूण केली तर झाड जसे मोठे होते जाते तशी खूण देखील मोठी होत जाते. मोठेपणी जी खूण अधोरेखित होते ती काही मोठेपणाची नसते. ती लहान वयात सोबत आलेली असते ही विसरता येत नाही. मात्र मोठेपणी ती खूण अधिक गर्द आणि घटट झालेली असते. त्यामुळे ती डोळ्यात भरते इतकेच. आंतरराष्ट्रीय किर्तीचा गुन्हेगार चार्ल्स शोभराज यांने शालेय वयात केलेल्या थोड्याशा चोरीकडे दुर्लक्ष केल्यांने त्याला भविष्यात गुऩ्हेगारीच्या दिशेने प्रवास करावा लागला आहे. लहान वयाच्या वेळी केलेल्या एका चुकेचा तो परीणाम असतो.

गिजूभाई बधेका म्हणतात की अशा स्वरूपाची आमिष दाखवून आपण मुलांवरती संस्कार करू शकणार नाही आणि त्यांना सदाचाराच्या दिशेने घेऊन जाता येणार नाही. मग मुलांवरती संस्कार करायचे असेल तर त्याला भीती दाखविणे हा पर्याय आहे का, त्याचेही उत्तर नाही असेच आहे. आपण भीतीने मुलांना काही काळ आपल्यासारखे वागण्यास प्रवृत्त करू शकतो पण त्याच्या सदविचाराची पेरणी करून मानसिक परिवर्तन नाही करू शकणार. भीती हे जर सदाचाराच्या दिशेने जाण्याचे पाऊल असते तर जगात कोणीच कधीच वाईट काम केले नसते. आज जगात पोलीस आहे, न्यायालये आहेत तरी पण लोक वाईट वागतात याचे कारण भीती माणसांवरती फार काळ अधिराज्य करू शकणार नाही. त्यामुळे भीती पेक्षा गरज आहे विवेक पेरण्याची. देशात शिक्षण हक्क कायदा आस्तित्वात आल्यानंतर कलम 17 प्रमाणे विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक शिक्षा करण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यावेळी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता गुणवत्ता ढासळणार, शिस्तीचा प्रश्न गंभीर होणार असे बरेच काही बोलले जात होते.

आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

आता कायदा होऊन जवळपास दहा वर्षाचा कालखंड संपुष्टात आला आहे. मात्र शिक्षा बंद केल्यांने काही विपरीत परीणाम झाल्याचे फारसे चर्चीले गेले नाही. तसे असते तर गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्याला तुरूगांत ठेवले जाते, त्याला तिथे शिक्षाही होते म्हणून बाहेर आल्यावर वर्तना बदल होतो असे फार अभावाने दिसणारे चित्र आहे. अनेक गुन्हेगार पुन्हा त्याच दिशेचा प्रवास सुरू ठेवतात. भीती मुलांच्या जीवनावर फारसा सकारात्मक बदल घडू शकणार नाही. भितीने फार झाले तर बदल होतात. कोणताही बदल हा तात्पुरते असतात आणि विवेकाच्या पातळीवर पेरणी केली तर होणारे बदल हे परिवर्तनीय असतात. परीवर्तन होणे हे शिक्षणाचे उददीष्टे आहेत. त्यामुळे शिक्षणातून बदलाची अपेक्षा नाही हे लक्षात घ्यायला हवे. शाळेत, महाविद्यालयात विद्यार्थी चागंले वागतो हे जर अंतरिक प्रेरणेतून घडले असेल तर तो शिक्षणाचा परीणाम आहे. मात्र केवळ शिक्षणाच्या हाती मार्क आहेत ते मिळावेत आणि शाळेच्या हाती दाखला आहे त्यावर वर्तनाचा परीणाम म्हणून लाल शेरा दिला जाऊ शकतो या भितीने वर्तन बध्द असेल तर त्यातून चांगला परीणाम साधल जाण्याची शक्यता नाही.

शाळेत अभ्यास केला नाही तर नापास होशील असे सांगून भीती दाखविली जाते पण परीणाम काय दिसतो..? या भीतीने मुलांच्या मनात अभ्यासाची वृत्ती विकसित होते का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. त्यामुळे शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणी दाखविली जाणारी अमिषे आणि भीती मुलांच्यामध्ये फारसा सकारात्मक बदल नाही घडवून आणू शकणार. अऩेकदा मुलांना सातत्याने भिती दाखविली तर मुले कोडगी होण्याची शक्यता अधिक असते. भितीने मुलांच्या मनात जीवनभरासाठीचे धाडस, आत्मविश्वास हरविला जाऊ शकते. त्यामुळे आपण भविष्यात एखादे काम स्वतःच्या जबाबदारीवर करावे असेही वाटनासे होते. त्यामुळे आपल्याला भविष्यासाठी स्वतःवर जबाबदारी घेऊन सृजनशीलतेची पाऊलवाट चालण्याचे प्रमाण आपोआप कमी झाल्यांने आपण उद्योजक, वैज्ञानिक निर्माण करण्यात मागे पडतो. फारतर आपण नेहमीच्या वाटेने चालणा-या वाटा तुटविणारी माणसं निर्माण करू शकू. त्या वाटा चालणारी माणसं निर्माण होतील पण त्यातून जबाबदार नागरीकत्वाची पेरणी होऊ शकणार नाही.

आपण मुलांना गृहित का धरतो?

अनेकदा भिती दाखवत आपण चालू लागलो तर त्यांना भीतीची हळूहळू सवय बनून जाते. त्यातून ते कोडगी बनण्याचा धोका अधिक आहे. त्यांना प्रत्येक कामाच्या वेळी दाखविलेल्या अमिषाने ते स्वार्थी बनण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक कामाचा आपल्याला काहींना काही लाभ मिळायला हवा ही धारणाच मुलांच्या जीवनातील सत्याच्या प्रकाशाचे अविवेकाच्या अंधारात रूपांतरीत करते. मुलांच्या अंतकरणात सदाचाराची पेरणी करायची असेल तर भीतीमुक्त वातावरणात त्यांना विचार करायला शिकवायला हवे. आपण या वयात कितीतरी सहजतेने ज्या गोष्टी करीत जातो त्याचा परीणाम भविष्यात दिसू लागतो. त्याकरीता लहान वयात आपण श्रमाचे संस्काराची पेरणी केली तर भविष्य निश्चित उज्वल असू शकते. शाळा, घर आणि समाज यातून प्रत्यक्ष जे पेरले जाते त्याची उगवन अधिक वेगाने होत असते. पुस्तकाच्या आशयाने फार काही हाती लागत नाही. पुस्तकातील पाठ शिकल्यांने मार्क मिळतील मात्र जीवनाची उभारणी आणि राष्ट्र उभारणीसाठी सर्वांनीच जबाबदारी स्विकारायला हवी..शेवटी बाजारू व्यवस्थेने होणा-या पेरणीतून आपण मार्क्स मिळविणारी पीढी घडू शकू पण त्यातून आपण माणूस उभा करू शकणार नाही.कारण माणूस घडविण्यासाठी स्वातंत्र्याची गरज आहे..ते जपायला हवे इतकेच..

…तर पृथ्वीवरती अवतरेल स्वर्ग

पालकांना आणि शिक्षकांना जाणवू दे की भीती आणि आमिषांनी आपण सदाचार शिकवू शकत नाही. भीतीने मुले कोडगी होतात. आमिषांनी मुले स्वार्थी होतात. भीती आणि आमिषांनी निलाजरी आणि दयनीय होतात मुले.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *