आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

आपण मोठी माणसं बालकांच्या विकासाची जबाबदारी पूर्णतः स्वतःच्या मस्तकी घेतो. त्यांच्या विकासाची जबाबदारी आपल्यावर आहे म्हणजे सर्वच गोष्टी आपण करणे अपेक्षित नाही. बालकांच्या विकासाची पाऊलवाटा त्याला चालू देण्याची गरज आहे. त्याला त्याची वाट निर्माण करता आली पाहीजे. त्या वाटेने चालतांना ती किती उत्तम आणि अडचणीची आहे हे लक्षात घेऊन, अयोग्य वाट असेल तर ती विवेकाने तो बदलत राहिल... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
आत्मनिर्भयतेच्या दिशेने..
Photo Courtesy - Nilesh Jadhav

बालकाचा विकासाची जबाबदारी ही घर आणि शाळेवरती असते. बालकांचा समग्र विकासासाठी या दोन्ही संस्थानी प्रयत्न करायचे असतात अशी आपली अपेक्षा आहे.घरात आई, बाबा, आजी,आजोबांसह इतर नातेही असतात आणि शाळेत मात्र शिक्षक असतात.बालकांचा समग्र विकास म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक विकासाची प्रक्रिया असते.

आपण मोठी माणसं बालकांच्या विकासाची जबाबदारी पूर्णतः स्वतःच्या मस्तकी घेतो. त्यांच्या विकासाची जबाबदारी आपल्यावर आहे म्हणजे सर्वच गोष्टी आपण करणे अपेक्षित नाही. बालकांच्या विकासाची पाऊलवाटा त्याला चालू देण्याची गरज आहे. त्याला त्याची वाट निर्माण करता आली पाहीजे. त्या वाटेने चालतांना ती किती उत्तम आणि अडचणीची आहे हे लक्षात घेऊन, अयोग्य वाट असेल तर ती विवेकाने तो बदलत राहिल. त्यातून काय चांगले काय वाईट हे त्याच्या लक्षात येईल. त्यामुळे त्याला स्वतःला चालू दे. आपण स्वतःच्या मस्तकी जबाबदारी न घेता केवळ वातावरण निर्माण करण्याची आणि संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आपल्या मदतीने तो अपंग न होता.. त्याला आत्मनिर्भय होऊ देण्याची गरज आहे.

Photo Courtesy - Nilesh Jadhav
आपण मुलांना गृहित का धरतो?

शाळा म्हणजे नेमके काय असते.. शाळा म्हणजे केवळ शिकविणारी संस्था नाहीच.. तर बालकाला शिकण्यासाठी संधी आणि वातावरण निर्माण करून देणारी व्यवस्था आहे. शाळेने शिकविण्यासाठी आणि संस्कार रूजविण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न न करता केवळ दृष्टीकोन आणि वाटा दर्शित केल्या तरी बालक योग्य वाटेने चालू लागतात. मुलांना विचार करता येतो. ते आपल्याभोवती जे काही घडते आहे त्या सर्व गोष्टीं पाहात असतात. त्यानुसार विचार करीत असतात. त्या विचाराने कोणत्या वाटेने जायचे हे ते ठरवितात. त्यांना काहीच कळत नाही असे आपण म्हणतो तेव्हा खरंतर आपल्याला काही कळत नाही असेच म्हणावे लागेल. बालमानस शास्त्राच्या भूमिकेने मुलांना जाणून घ्यायला हवे. त्यांचा वयोगट आणि त्यांचा परीसर, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक यासारख्या गोष्टींचा त्याचा विकास घडू पाहातांना किती विचार करतो हे महत्वाचे आहे. आपल्याकडे एखादे लहान मुलं असते. त्याच्या बाबतीत आपण अधिक काळजी घेत असतो. अगदी त्याचा शारीरिक विकासाची प्रक्रिया सुरू झालेली असते.

ती त्या वयात गतीने होते. स्नायू परीपक्वतेचेचा प्रवास सुरू झालेला असतो. त्यासाठी बालकाला अधिक मदत हवी असते. बालकाला विकास, वाढीला मदत न करता स्वतःच सर्व शिरावर घेतो, मग त्याला स्वतःच्या हाताने खाण्याची भूक असते. परीवक्वतेच्या अभावी त्याच्या हातून अनेकदा खाली सांडते. अगांवर सांडते.. तोंड भरते अशा गोष्टी घडत असतात. आपण त्याचे अंग, कपडे, जागा खराब होईल म्हणून त्याला स्वतः खाऊ देण्याऐवजी स्वतः भरवितात.. स्वतः भरविल्याचा आनंद आपल्याला मिळत असतला तरी तसे करणे त्याच्या विकासाला मारक ठरते. बालक जेव्हा स्वतः काही करू पाहाते तेव्हा त्या करण्यात चूका अपेक्षित असतात. जितक्या चूका अधिक असतात तितके शिक्के उत्तम होत असते. प्रत्येक चूक दुरूस्त करणे म्हणजे एक नवी गोष्ट शिकणे असते. जितक्या चूका अधिक केल्या जातील तितक्या गोष्टी अधिक शिकतील आणि शिकणेही परिणामकारक होते.

Photo Courtesy - Nilesh Jadhav
...तर पृथ्वीवरती अवतरेल स्वर्ग

मात्र केवळ शिकण्याचा अटटहास करतांना रचनावादी दृष्टीकोनातून न शिकता अनुकरणाच्या पाऊलवाटांनी चालत ठेवण्याचा प्रयत्न केल्यांना आपण बालकांच्या विकासाला तारक ठरण्याऐवजी मारक ठरत असतो. आईन्स्टाईन यांना एकदा विचारले होते, की तुम्ही एकच प्रयोगवेळा अनेकदा करत राहातात, तुम्हाला कंटाळा, थकवा येत नाही का? तेव्हा त्यांनी प्रश्नाला उत्तर देतांना म्हणाले.. “मी एखाद्या सिंध्दातांपर्यंत पोहाचायचे असेल तर पुन्हा पुन्हा तोच प्रयोग करीत राहातो. प्रत्येक प्रयोगाच्यावेळी एक चूक घडत राहाते. पुढच्यावेळी ती चूक दुरूस्त करायची आणि मग पुन्हा तो प्रयोग पुन्हा करत राहातो. असे हजारदा प्रयोग केले तर माझ्या हजार चुका दुरूस्त करीत मी नव्या सिंध्दातापर्यत पोहचत असतो. त्यामुळे तो प्रवास म्हणजे वेळ वाया जाणे नसते तर प्रत्येकवेळी नवे काही शिकणे असते”. आपण मोठी माणंस मुलांचे चुका करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतो आणि तेथूनच मुलांचा शिक्षणांचा प्रवास थांबला जातो. अगदी लहान वय आणि घरापासून मुलांमध्ये हा दृष्टीकोन विकसित करण्याची गरज आहे. त्याला स्वतःला खाण्यासाठी लागणारी सक्षमता शारीरिक स्नायूमध्ये आली असेल तर त्याला स्वतःला खाऊ द्यायला हवे.

पालक म्हणून आणि पाल्यांची काळजी म्हणून स्वतःच्या हाताने भरण्याचा प्रयत्न करू नका. त्याला स्वतःला स्वतःच्या हातांने जे करावे वाटते ते त्याला करू द्या. त्याच्यावरती कोणत्याच कामासाठी सक्ती करू नका. कोणत्याही कामाची सक्ती म्हणजे ते करण्यातील आनंदाला पारखे होणे आहे. बालकांने अघोंळ करतांना देखील आपली सक्ती असते. अमक्या वेळी त्यांने अंघोळ करावी. त्यांने साबन लावावा, डोक्यावरून पाणी घ्यावे.. वगैरे सक्ती आपली असते. यात आपण स्वतःचा विचार अधिक करीत असतो. अगदी लहान वयात मुलांने चालत राहावे, त्यांने चालणे शिकावे म्हणून मोठी माणंस प्रयत्न करतात. त्याला चालण्याची सक्ती करीत असतात. त्यावेळी त्याच्या स्नायूची गरज आणि काळ यांचे काही नाते असते. त्याचा विचार होता का? हाही प्रश्न असतो. खरेतर शरीरातील जे अवयव विकसित होत असतात तेव्हा त्यांची देखील काही गरज असते. त्या गरजांसाठी मुले आपोआप चालू लागतात.

Photo Courtesy - Nilesh Jadhav
सांगा काय करायचे..?

शरीराच्या वाढीसाठी कृतींची भूक असते आणि त्या कृती बालक करीत राहातात. सक्तीने आपले समाधान होते इतकेच.. पण ती बालकांच्या शरीराची गरज आहे का? याचा विचार करायला हवा. आपण वयाचा आणि क्षमतांचा विचार न करता त्याचेवर काही लादत जातो आणि बालक थकत जाते. मुलांला त्या गोष्टी कधी, कशा करायच्या याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. मोठी माणंस जसा प्रवास घडवितात तसा प्रवास ते सुरू ठेवतात. त्यामुळे त्यांना स्वतःच्या हाताने आणि आनंदाने कृती करू दयायला हवी. त्यांच्यावरती कोणतीच सक्ती करू नका. घरात आणि शाळेत सक्ती लादली गेली की मुले ती कृती केवळ मोठयांच्या समाधानासाठी करत असतात. त्यात त्यांची शिकण्याची दृष्टी हरवते. त्या सक्तीत त्यांचे समाधानही राहात नाही. त्यामुळे ही आनंद विरहित पाऊलवाटा शिकण्यात जशा ज्ञानाच्या दिशेने जात नाही त्याप्रमाणे जीवनातही आनंद मिळवून देत नाही.

अनेकदा लहान वयात बालकांच्या शारीरिक वाढ गतीने होते असते. तेव्हा त्या वाढीसाठी मैदानाशी नाते जोडायला हवे. बालकाच्या प्रत्येक टप्प्यावरती वाढ होतांना वेगवेगळ्या गरजा असतात. त्यानुसार मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती विकसित होत असते. त्या वयोगटाला जी गरज असते त्याप्रमाणे बालक कृती करतात. त्यांच्यामध्ये योग्यवेळी जाणीवाही विकसित होतात, म्हणजे एका विशिष्ट वयोगटात मुलांचे सामाजिकीकरण होण्याचा कालखंड असतो. त्या वयात मुले अधिक मैदानाशी नाते जोडतात. त्यांना खेळू द्या. बालक जेव्हा खेळत असते तेव्हा ती त्याची गरज असते, ती भूक शमली तर वाढ आणि विकास योग्य गतीने होत असतो. मात्र त्याच्या खेळावरती देखील मोठयांचे नियंत्रण असते. खरेतर बालक जेव्हा खेळते तेव्हा आपण हस्तक्षेप न करता त्याला खेळू देण्याची गरज असते. आपणाला अनेकदा भिती असते की मुले खूप काळ खेळत राहील. पण मुलांना आपण जेव्हा स्वातंत्र्य देत असतो तेव्हा ते अधिक जबाबदारीने वागायला शिकतात. मुलांना प्रत्येक वेळी तुम्ही समजून सांगण्याच्या फंदात पडू नका तर त्यांना केवळ विचार कसा करायचा याबाबतची दृष्टी दिली तर बालक योग्यवेळी योग्य निर्णय घेतात. मात्र प्रत्येकवेळी त्यांना समजावून सांगण्याचा आणि उपदेश करण्याचा मोह मात्र आपण गमावू इच्छित नाही. त्यामुळे आपण मात्र बालकाच्या विकासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करतो हे लक्षात घ्यायला हवे.त्यांना खेळायचे असेल तेव्हा खेळूदे..त्यांना नेमके काय करायचे आहे हे कळाले, की ते अधिक अपेक्षांची पूर्ती करतांना दिसू लागतील.

Photo Courtesy - Nilesh Jadhav
बहरू दे ना मजला आता...

अनेकदा मुलांना आपण चला आता गाणे म्हणूया.. कधी कधी पाहुणे आले तर त्यांच्या समोर त्यांना गाणे म्हणायला भाग पाडतो. त्या गाण्यासाठी आदेश करतांना आपण अप्रत्यक्ष त्यांचेवरती सक्ती करत असतो. त्यावेळी त्या बालकाचा मुड नेमका कसा आहे? त्याला ते पाहुणे आवडतात का..? त्याला त्या वेळी जर आपल्या सहकारी मित्रांबरोबर खेळायला, चित्र काढायला जायचे असेल तर तो गात नाही.. आपली मात्र सक्ती असते, रागावणे असते. आणि डोळे वटारून त्याला घाबरवणे असते.. पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण मुलांचा मुड लक्षात घेऊन आणि स्वातंत्र्याची भावना जोपासण्याची गरज आहे. मुलांना प्रत्येक गोष्ट करू देण्यासाठी शाळा आणि घरांने प्रयत्न करायला हवे. घर आणि शाळा म्हणजे स्वातंत्र्याचे दुसरे नाव असायला हवे.. शेवटी आपला भारत आत्मनिर्भय बनवायचा असेल तर त्याची वाट बालक आत्मनिर्भयतेने पुढे जाणारी आहे. आपणा सर्वांना बालक आत्मनिर्भय हवे, त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नाच्या वाटा सक्तीच्या आणि बळजबरीने निर्माण केल्यांने आपल्याला सृजनशील बालकांचे आस्तित्व भवतालमध्ये दिसत नाही. बालकांच्या मुळ वृत्ती आणि प्रवृत्तीना दाबल्यांने त्यांच्या वाटा चुकत जातात आणि आपण त्याबददल चिंता करीत राहातो.त्यामुळे त्यांना नैसर्गिक दिशेने प्रवास घडूदे..त्यांच्यात जे काही आत आहे त्या वाटा चालू देण्याची गरज आहे.

जगप्रसिध्द बाल शिक्षण तज्ज्ञ गिजूभाई बधेका म्हणतात, की

बालक स्वतः खाईल,

त्याला भरवू नका.

बालक अंघोळ करेल ,

त्याला जबरदस्ती करु नका.

बालक चालेल,

त्याला ढकलू नका.

बालक गाणे म्हणेल,

त्याला गायला सांगू नका.

बालक खेळत असेल,

तर त्यात हस्तक्षेप करु नका.

आत्मनिर्भय होणेही मुलांची गरज आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com