Sunday, May 5, 2024
Homeब्लॉग...तर पृथ्वीवरती अवतरेल स्वर्ग

…तर पृथ्वीवरती अवतरेल स्वर्ग

आहे ते जग कदाचित सुंदर असेलही पण आहे त्यापेक्षा अधिक जग सुंदर व्हायला हवे. जग किती सुंदर असायला हवे, तर त्याचे रूपांतर स्वर्गात व्हायला हवे. अशी सामान्य माणंसाची भाबडी अपेक्षा अनेकदा व्यक्त होते. त्या स्वर्गाची वाट कोणी दाखवत नाही. स्वर्ग म्हणजे नेमके काय आहे? हे भारतीय पौराणिक वाडःमयात आलेली कल्पना आहे.

तेथे सर्वप्रकारचे सुख नांदत असते. तेथे मनातील इच्छांची परीपूर्ती करणारे कल्पतरू असतात. अमृताच्या नद्या असतात. माणंसाच्या इच्छेची तृप्ती करणारे सर्वकाही तिथे मिळते. तेथे हिंसेला जागा नाही. आनंदाला भरते आलेले असते. केवळ सुख आणि आनंद या पलिकडे दुसरे काहीच नाही. सुखाच्या सर्व कल्पनांची परिपूर्ती तेथे होत असते अशी साधारण कल्पना आहे. आता हे कोणी पाहिले नाही. कोणी पाहून आलेले आहे आणि त्याचे अनुभव कथन आहे असे पण नाही.. त्या कल्पनांनी मात्र आपल्या समाजमनावर सातत्याने गारूड केले आहे. त्या कल्पनांच्या जोरावरती समाजाला योग्य दिशेचा प्रवास करण्यासाठी प्रेरणा मिळते असे मानले जाते.

- Advertisement -

पाप, पुण्य या संकल्पना मानवाने योग्य पाऊलवाटेने जाण्यासाठीच्या सूचक कल्पना आहे. मात्र परलोकी असलेला स्वर्गानुभव आपल्याला घराघरात आणि पृथ्वीवरती निर्माण करता येणार नाही का..? त्याचे उत्तर अनेकांनी आपापल्या तत्त्वज्ञानाच्या जोरावरती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पृथ्वीला स्वर्ग करायचा असेल तर पृथ्वीवर मानव नव्हे तर मनुष्य असायला हवेत. मनुष्यत्वात अनेक उत्तम गुणांचा परिपोष असतो. त्या दिशेने जाण्यासाठी आपण प्रयत्न करावेत इतकी साधी अपेक्षा आहे. शिक्षणाने मानवाचे मनुष्यात रूपांतर करायचे असते. माणूस निर्माण झाला की समाजातील संघर्ष आपोआप कमी होतो. मानवाला विषयाची भूक असते आणि माणंसाला माणूसपणाची. त्यामुळे शिक्षण जीवनाचा अर्थ उलगडून दाखवत असते. तो जितका छान उलगडून दाखविला जाईल तितके जगणे समृध्द आणि आऩंदाचे होणार असते. त्यामुळे पृथ्वीला स्वर्ग करायचा असेल तर आपल्याला शिक्षणात प्रामाणिकपणाची वाट चालावी लागणार आहे.

सांगा काय करायचे..?

मूळात स्वर्ग ही मानवी मनाला मोहिनी घालणारी सर्वांग सुंदर कल्पना आहे. समजा स्वर्ग आहे असे मानले तर तेथील आनंद आपण पृथ्वीवरती देखील निर्माण करू शकू. माणंसानी माणसांचा व्देष, मत्सर, राग, अंहकार, लोभ, मद यांचा लोप केला की आपण माणूसपणाचा प्रवास सुरू झाला असे मानावे. शिक्षणातून त्याच मूल्यांची पेरणी केली जाते. जगात निर्माण झालेले कोणतेही धर्म माणसाला प्रेमाच्या पलिकडची वाट दाखवत नाहीत. आज ज्या ज्या धर्मात हिंसेचा प्रादूर्भाव झालेला दिसतो आहे तो काही त्या धर्मांच्या आरंभी त्यांच्या तत्वज्ञानात मांडलेला नाही. धर्माचा मूळ गाभा सत्य, अहिंसा, प्रेम, अस्तेय, अपरिग्रह यासारख्या तत्वांचा आहे. असत्याची धारणा आणि अहिंसेचा समर्थन कोणी केलेले नाही. मग तरीसुध्दा काही धर्ममार्तंड धर्माच्या नावे जे काही करतात ते म्हणजे त्यांनी विचाराची त्यांना हवी तशी तोडमोड करीत केलेली मांडणी असते. त्याचा परिणाम धर्माधर्मात संघर्ष उभा ठाकला जातो. तो संघर्ष माणंसाच्या जीवावर उठतांना पाहिला की धर्माबददलच शंका यायला सुरूवात होते.

प्रत्येक धर्माचा आधार प्रेम हाच आहे. त्यामुळे त्या दिशेने जाण्याचा विचार करण्यासाठी विचाराची पेरणी करण्याची गरज आहे. इतिहासातील लढाया, युध्दाचा अभ्यास केल्यानंतर हाती काय लागले? सत्ता मिळेल.. संपंत्ती मिळेल. पण मानवी जीवनाचा परिपोष होण्यास आणि विकासाला मात्र पोषक नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. जिथे प्रेमाचा लोप होतो तेथे स्पर्धा सुरू होते. स्पर्धा सुरू झाली की संघर्ष ठरलेला आहे. त्यामुळे शिक्षणातून स्पर्धेचा विचार दूर करण्याची भूमिका सातत्याने मांडली जात आहे. समाजात सध्या जे काही दिसते आहे ते शिक्षणाने पेरलेले आहे हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षण त्यापासून स्वतःला दूर करू शकणार नाही आणि अपयशही नाकारता येणार नाही.

बहरू दे ना मजला आता…

सध्या शिक्षणाची उददीष्टांचा विचार जेव्हा केला जातो, तेव्हा त्यात निश्चित आदर्शवादाची तत्वे समाविष्ट आहेत. आदर्शांच्या अपेक्षा सातत्याने केलेल्या असल्या तरी त्या पेरणीची उगवण समाजाता होतांना दिसत नाही. मूल्यांचा गाभा शिक्षणात दडलेला आहे. मूल्य ही काही शिकवून आणि भिंतीवर सुविचारांच्या ओळी लिहून येण्याची शक्यता अजिबात नसते. मूल्यांचा परिपोष हा समोर असलेल्या आणि मिळणा-या अनुभवांच्या जोरावरती येत असतो. ते अऩुभव कसे मिळतात त्यावरती जीवनाचा प्रवास अवलंबून असतो. व्देषाची पेरणी करून प्रेम निर्माण करता येत नाही. मुलांना जेव्हा आपल्या अवतीभोवती हिंसा, व्देष,मत्सर साठवलेला दिसून येत असेल आणि प्रत्येक वर्तनात त्याच स्वरूपाचा अऩुभव येत असेल तर प्रेमाचा वर्षाव होण्याची शक्यता नाही. आपल्याकडे जे असेल तेच आपण देऊ शकतो. जे नाही ते देता येणार नाही. त्यामुळे समाजात प्रेम दिसत नाही हा काही बालकांचा दोष नाही. त्यांच्या समोर प्रेमाच्या अनुभवाचे आस्तित्व नाहीत. शाळेत आणि घरी देखील प्रेमाचे दर्शन नसेल तर त्या वाटेने चालणे कसे होणार? त्यामुळे जे हवे आहे त्याची पेरणी करण्याची गरज आहे.

मुळात व्यक्तीच्या आत हिंसा भरलेली असेल तर ती शब्दांतून, वर्तनातून, विचारातून व्यक्त होत असते. मनात प्रेम साठून भरलेले असेल तर प्रेमाचे दर्शऩ होईल. शिक्षण कितीही प्रेममय विश्व निर्माण करण्याची परीभाषा व्यक्त करीत असले, तरी शिक्षण प्रक्रियेतून प्रेम ओत प्रोत वाहायला हवे. वर्गात लोकशाही घटकाची तासिका घेतांना हातात काठी घेऊन अनुभव दिला जाणार असेल तर लोकशाहीची मूल्य कशी रूजणार? त्यामुळे आपल्याला पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायचा असेल तर आपण त्यादृष्टीने पेरणी करण्याची गरज आहे. प्रेम व्यक्त करायला फक्त शब्द नाही तर भावनाही असाव्या लागतात. असे प्रेममय वातावरण म्हणजे स्वर्ग.

शिक्षण म्हणजे काय रे भाऊ ?

शिक्षण प्रक्रिया आदर्शाची वाट चालणार असेल तर चित्र बदलेल. शिक्षण हेच परिवर्तनाचे एकमेव साधन आहे. त्यामुळे आपणच शिक्षणातून जाणीव पूर्वक पेरणी करण्याची तयारी करायला हवी. मात्र पेरलेले उगवायला वेळ द्यावा लागेल. काळाशिवाय परिणाम दिसत नाही. शिक्षणात जे पेरले ते लगेच उगण्याची शक्यता नाही. आज एका पिढीत आपण पेरलेले उगवले तर ती पिढी उद्या मोठी होईल तेव्हा ती पिढी घर आणि भोवताली पेरणी करतांना दिसेल. आजच्या पिढीला मोठे होणे, त्या दिशेने प्रवास घडविणे यासाठी समाजाला उगवण्याची प्रतिक्षा करावी लागेल. त्यामुळे गिजूभाई बधेका म्हणतात त्या प्रमाणे शाळेतील चित्र बदलेल तर स्वर्ग सुखाचा अनुभव घेता य़ेईल… ते म्हणतात आपली जी मुले आहेत त्यांना योग्य मान देण्याची गरज आहे. मुले घरी, शाळेत,आणि समाजातही वावरत असतात. त्यांना केवळ शाळेत सन्मान देऊन चालणार नाही तर त्यांना घरी, समाजात, शाळेसह सर्वत्र समान अनुभूती मिळायला हवी. मुलांना जाणून घेणे. त्यांचेवरती प्रेम करणे. त्यांना त्यांचे अधिकार मिळून देणे. त्यांच्या हक्काचे जतन करणे हे समाज व्यवस्थेतील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

आपण बालकांना नेहमीच गृहित धरीत आलो आहोत. त्यामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक विकासाची प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात. त्यांना गृहित धरल्यांने बालक आंनद व स्वातंत्र्याला पारखे होतील. त्यातून त्यांच्या मनात निराशा निर्माण होते. त्यातून भितीचे काहूरही निर्माण होते. मुळात स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे आनंदाला पारखे होणे आहे. आनंद नाही म्हणजे नरकाची अनुभूती असते. त्यामुळे गिजूभाई म्हणतात की आपण जर मुलांना योग्य सन्मान दिला तर त्या माध्यमातून आपणाला पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करता य़ेईल. मुलांना स्वातंत्र्य आणि सन्मान दिल्यांने त्यांना आंनद मिळेल. आंनदाचे भाव त्यांच्या चेह-यावर उमटतील. त्यांना आनंदाच्या भावनेतून जाणून घेतले तर त्यांच्या आऱोग्यावर त्याचा परिणाम दिसेल. अधिक आरोग्यसंपन्न असलेले बालके ही राष्ट्राची संपत्ती असते. त्या निरोगी आयुष्यातून मनाला मिळणारी सदृढता समृध्दतेचा प्रवास घडविते. त्यामुळे आरोग्य संपन्न मनाच्या बालकांचे घरात, शाळेत फुलणारे हास्य पाहून मोठयांच्या मनाची प्रसन्नता वाढत जाते. त्यामुळे अशा बालकांचे आस्तित्व आणि सहवास म्हणजे स्वर्गानुभूती असते.

आमच्या शिक्षणाचे काय..?

जीवनभर आपल्या चेह-यावरचे हास्य हेच आपल्या जीवनप्रवासाचे फलित असते. माणंसाचा आंनद व्यक्त करण्याचे हास्य एकमेव प्रभावी माध्यम आहे. त्याच बरोबर मुलांना शिक्षणातील कौशल्यांमध्ये आपण सक्षम करीत राहूच. त्याच बरोबर जगण्याला सामोरे जाण्याची सक्षमता निर्माण करण्याचे आव्हान आहे. त्यांना जीवनासाठी लागणारे सर्व कौशल्य प्राप्त करून देणे, समस्या निराकरणासाठी शक्ती देणे महत्वाचे आहे. त्याला त्याच्या जीवन प्रवासात स्वावलंबनाने जगता आले पाहिजे. ज्ञानाची साधना करण्याची पाऊलवाट आणि अखंड जीवनभर विद्यार्थी असण्यासाठी साधक बनविण्याची तयारी शाळांनी करून घेणे गरजेचे आहे. शाळा त्या माध्यातून शहाणपण पेरतील. तर शहाण्या माणसांचा समाज उभा राहिल. शहाण्यांचा समूह म्हणजे स्वर्गाचा प्रवास नाही का? जेव्हा मुले आपल्या सोबत असतात… हातात हात घेऊन चालू लागतात. तेव्हा त्यांना त्या स्पर्शात विश्वास जाणवत असतो.

स्पर्श ही भाषा असते विश्वासाची. त्या स्पर्शात विश्वास, श्रध्दा आणि प्रेमाचा भाव असतो. त्यांना जेव्हा अशा विश्वासाचा स्पर्श होतो तेव्हा त्यांच्या मनात चिंता, भितीचा भाव दिसत नाही. अशी निरागस मने असलेली बालके सृर्जनशीलतेची वाट चालू लागतात तेव्हा त्यांच्या मनात सौंदर्यंदृष्टीची पेरणी होत राहाते. अशी सौंदर्यदृष्टी असलेली बालके समाजाला उन्नत करण्याच्या दृष्टीने गती प्राप्त करून देत असतात. त्यांच्या मनाला भितीचा स्पर्श नसल्यांने आणि मोठयांनी विश्वास दिल्यांने त्यांना समाजात मुक्त अभिव्यक्ती करता येते. त्यांच्या जीवनप्रवासात चिंता संपुष्टात येते. मुले जेव्हा अशा मुक्त वातावरणात वावरू लागतात तेव्हा ते मुक्ततेने संवाद करीत प्रवास सुरू ठेवतात. त्यांना कदाचित शब्दांशी नाते सांगता येत नसेल पण त्यांच्या गुणगुण्यातील भाव प्रामाणिक आणि शुध्दतेचे असतात. त्यांचा स्वरही अधिक आनंद देणारी असतात. त्यामुळे बालकांना आपण त्यांच्या विकासाला हवे ते देऊ या म्हणजे त्यांच्या विकासातून समाजाला अधिक काही मिळू शकेल. त्यातून समृध्द समाजाचा प्रवास सुरू होईल.

आपण जर मुलांला योग्य मान दिला,

तर पृथ्वीवर स्वर्ग उभारला जाईल.

मुलांच्या हास्यामध्ये आहे स्वर्ग

मुलांच्या आरोग्यामध्ये आहे स्वर्ग

मुलांच्या या सक्षमतेमध्येआहे स्वर्ग

स्वर्ग आहे मुलांच निरागस आणि चिंतारहित मनात.

स्वर्ग आहे मुलांच्या या गणुगुण्यात आणि स्वरात

श्रमाविना स्मार्ट शिक्षण..

गिजूभाई शिक्षणातून स्वर्गाची निर्मिती करू पाहातात. त्यासाठीची पाऊलवाट नेमकी कोठे आहे याचे दिशादर्शनही ते घडवितात. त्यांनी ज्या वाटेने जाण्यासाठी वाट निर्माण केली आहे त्यातच समाजाचे भले आहे. त्या वाटेने आपण महानत्वाकडे प्रवास करू शकू. त्यामुळे चालत राहाण्याची गरज आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या