मुलं खरचं शिक्षक असतात...

आपल्याकडे शिक्षक होण्यासाठी पदवी, पदविका पुरेशी मानली जाते. शिक्षकी पेशाचा प्रवास पदव्यांच्या व्दारातून होतो हे खरे आहे. मात्र कोणत्याही पदव्या या बालकांच्या मनातील शिक्षक घडविण्यासाठी पुरेशा असत नाहीत. त्याकरीता शिक्षक म्हणून स्वतःलाच सतत घडवावे लागते... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
मुलं खरचं शिक्षक असतात...

मुलं म्हणजे मोठयांसाठी स्व शिक्षणाची पाठशाळा आहे. मुलं सर्वांना कमी अधिक प्रमाणात काहींना काही शिकवत असते. आपण मुलांकडे कसे पाहातो याला अधिक महत्व आहे. अनेकदा मुलाला काय कळते असे समजून आपण त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच बरोबर त्यांना काही कळत नाही असेच आपले गृहितक असते. मुलं मात्र प्रत्येक क्षणी विचार करते. त्याला प्रश्न पडतात. ते निर्मळ अंतकरणाने आपला प्रवास सुरू ठेवत असते..

घरात काय आणि शाळेत काय.. त्याचे वर्तन प्रामाणिकच असते. पण त्याच्या प्रश्नांत अनेकदा मोठयांना अडचणीत आणण्याचे सामर्थ्य आहे. नैतिकतेचा अहंम उतरविण्याची क्षमता असते. आपल्या प्रतिष्ठेचा मुखवटा फाडण्याची हिंम्मत असते. आपल्या अडचणी वाढू नये म्हणून त्यांचे स्वातंत्र्य नाकारण्याचा विचार पुढे येतो. मात्र जगभरातील अनेक शिक्षक स्वतःला समृध्द करण्यासाठी मुलांना समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आले आहेत. मुलांना पडलेल्या उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरी शिक्षक म्हणून आपण समृध्द होत जातो.. म्हणूनच मुले बरंच काही शिकवत असतात फक्त गरज त्यांना जाणून घेण्याची.. त्यातून आपण शिकत जातो,समृध्द होत जातो.. म्हणूनच मुलेच आपले खरे शिक्षक असतात.

आपल्याकडे शिक्षक होण्यासाठी पदवी, पदविका पुरेशी मानली जाते. शिक्षकी पेशाचा प्रवास पदव्यांच्या व्दारातून होतो हे खरे आहे. मात्र कोणत्याही पदव्या या बालकांच्या मनातील शिक्षक घडविण्यासाठी पुरेशा असत नाहीत. त्याकरीता शिक्षक म्हणून स्वतःलाच सतत घडवावे लागते. ते घडविणे जसे भवतालमध्ये उपलब्ध असलेल्या विविध माध्यमातून घडत असते, तसे विद्यार्थ्यांच्या मदतीने होत असते. शिक्षक जेव्हा पदव्यांच्या माहितीतून अमूक अध्यापन पध्दती ही अमूक विषयासाठी अधिक योग्य म्हणून उपयोगात आणतो. अमूक स्वरूपात निवेदन करतो.

वर्गातील अध्यापनासाठी अमूक पाय-यांनी आपला प्रवास सुरू ठेवतो. हे शिकवित असतांना प्रत्येक मुलं भिन्न आहे. प्रत्येक शाळा भिन्न आहे. वर्गही भिन्न आहे त्यामुळे आपण पुस्तकांच्या नियमात राहून अध्यापन करू लागलो तर शिक्षक म्हणून मुलांच्या मनात स्थान निर्माण करता येणार नाही. जशी सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परीस्थिती बदलते त्या प्रमाणे शिक्षणाची प्रक्रिया बदलत असते. ते जाणून न घेता शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला की विद्यार्थी शिक्षणात रममान होण्याची शक्यता नाही. मुळात आपण मुलांना गृहित न धरता स्वातंत्र्य देत असू तर मुले खुप मोकळेपणाने प्रश्न विचारतात. त्यांचे प्रश्न हेच आपल्याला खूप काही शिकून जातात असतात. त्यांच्या प्रश्नामुळेच आपण विद्यार्थी बनत असतो.विद्यार्थी बनने हेच शिक्षणाचे यश आहे.

आपण शाळेत जे काही करत असतो ते मुलांसाठी करीत असतो. शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. विद्यार्थी उशीरा आलेत तर त्यांना शिक्षा केली जाते. त्यामागे तळमळ असेलही. पण तो प्रवास योग्य की अयोग्य हे कायदा सांगत असला तरी मुले त्यांच्या प्रयत्नातून आपले डोळे उघडवत असतात. एखाद्या दिवशी शिक्षक उशीरा आले तर विद्यार्थी विचारतो, “आम्ही उशीरा आलो तर आम्हाला शिक्षा करतात आता तुम्ही उशीरा आला आहात तर तुम्हाला काय शिक्षा..?” मग आपण त्यांना समर्थन देणारी कारणे सांगतो. त्यांना ती कारणे पटतात कारण त्यांचे शिक्षकांवरती प्रेम असते. प्रेम असेल तर कोणाच्याही चुका पोटात घालण्याची क्षमता प्राप्त होत असते. त्यामुळे शिक्षणांचा मार्ग हा विद्यार्थ्यांच्या प्रेमातून जात असतो. ज्या दिवशी मुले असे प्रश्न विचारतात तेव्हा ते स्वातंत्र्य घेत असतात, पण त्या स्वातंत्र्यातून येणारे प्रश्न आपल्याला आत्मभान देण्यास मदत करीत असतात.

आपण त्यांच्या प्रश्नांकडे सकारात्मकतेने पाहाण्याची गरज आहे. जेव्हा मुले शिक्षक उशीरा आल्यावर त्यांना समजून घेतात त्या प्रमाणे शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना जाणून घेण्याची गरज असतेच. एकदा एका शाळेत वार्षिक तपासणी होती. आदल्या दिवशी त्या संदर्भाने वर्गाची तयारी शिक्षकांने केली होती. तपासणीच्या दिवशी आधल्या दिवशीचेच घटक शिकविले जात होते. साहेब आले..त्यांनी पाठ निरिक्षण सुरू केले. काल जे शिकविले तोच घटक पुन्हा शिकविला. काल जे प्रश्न विचारले, जी उदाहरणे दिली.. तीच आज पुन्हा विचारण्यात आली. मात्र त्या दिवशी शाळेच्या फळ्यावरती शिक्षकांनी लिहिलेला सुविचार होता “नेहमी खरे बोलावे.. सत्याचा मार्ग कठिण असतो पण तो यशाचा असतो..” असे अनेक सुविचांरानी भिंती सजल्या होत्या. मुलं विचार करतात त्या प्रमाणे, त्या दिवशी तपासणी झाली.. पण वर्गातील एक विद्यार्थी अस्वस्थ होता. त्यांने दुस-या दिवशी शिक्षकांना विचारले. तुम्ही काल विविध फळ्यांवरती लिहिलेले सुविचार आणि तुम्ही त्या दिवशी केलेली कृती या विरोधाभासी होत्या. तुम्ही साहेबांना फसविले. मग सत्याचा मार्ग कुठे निवडला..?

त्याचा प्रश्न अगदी बरोबर होता. त्या प्रश्नाने शिक्षकांना आत्मभान आले. आपली वाट चुकीची होती. आपण तसे करायला नको होते. मुलांवरती त्याचा किती परीणाम होतो.. अखेर मुलाची शिक्षकांने माफी मागितली. “आता तु माझा गुरू आहे.. यापुढे मी जे लिहिल तसेच वागेल”. जीवन प्रवासासाठी ते बालक गुरू बनले होते. अनेकदा पुस्तकातील आशय समजावून सांगताना शिक्षक स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते उदाहरणे देतात.. आणि शेवटी सहजतेने विचारतात तुम्हाला शिकविलेले समजले का? शिक्षकांना दुःख व्हायला नको, त्यांना नाराज करायला नको म्हणून विद्यार्थी हो म्हणत असतील. काही अत्यंत विनम्रतेने सांगतात की नाही समजले. जेव्हा मुलं शिकविलेले समजले नाही असे म्हणते तेव्हा शिक्षकांना अधिक विचार करायला शिकवत असते. नेमके कसे शिकवायला हवे? याचा विचार करण्यास भाग पाडत असते. त्यातून शिक्षक अधिक उत्तम शिकविण्यासाठी पाऊलवाट निर्माण करतो.

अनेकदा मुलांना हुशार व्हायचे असेल तर तुम्ही खुप वाचायला हवे असे शिक्षक सांगत असतात.. शिक्षकांची उपदेश करणे ही जणू जबाबदारी असते.. पण एखादा विद्यार्थी जेव्हा विचारतो, तुम्ही किती वाचले? तेव्हा दांडी गुल होते. तेव्हा त्या प्रश्नाला सकारात्मकतेने समजावून घेतले तर शिक्षक पुन्हा नव्याने पुस्तकांशी जोडला जातो. त्या निमित्ताने मुलांना शिकविण्यासाठी शिक्षक म्हणून बरेच काही वाचायला लागते. खरेतर जो शिक्षक वाचतो, विचार करतो आणि वाचलेले जो पचवितो तोच शिक्षक मुलांच्या हदयात स्थान निर्माण करतो. मुलांसाठी वाचावे लागते. तेच जणू आपल्याला मार्ग दाखवित असतात. मुलांसाठी आपण काय करतो हे त्यांना जाणवत असते. आपण किती प्रामाणिक आहोत त्यांच्याशी हे ते ओळखूण असतात.

एकदा एका प्रवासासाठी शिक्षक निघाले होते. बसमध्ये प्रचंड गर्दी होती. सर कसेबसे बसमध्ये चढले, पण बसण्यासाठी जागा मिळाली नाही. सर उभे राहिले. बस सुरू झाली. वाहकांने तिकीट दिले, सरांनी विचारले “पुढे कुठे जागा होण्याची शक्यता आहे का ?” वाहकांने नाही म्हणून सांगितले. तीन चार तासाचा प्रवास उभा राहून करावा लागणार होता. मात्र थोडेसे अंतर बस पुढे गेली आणि एक सुट बुट घातलेला विद्यार्थी बसलेल्या जागेवरून उभा राहिला. सरांकडे आला. त्याने त्यांना बसलेल्या जागेवरती बसण्याची विनंती केली. जागा मिळाली याचे समाधान होते. मग सर म्हणाले “मी तुम्हाला ओळखले नाही”, तेव्हा तो म्हणाला “मी तुमचा विद्यार्थी आहे. तुम्ही आम्हाला कनिष्ठ महाविद्यालयात शिकवत होते. तेव्हा तुम्ही कधीच हातात पुस्तक घेऊऩ शिकविले नाही. अत्यंत प्रसन्नतेने तुम्ही शिकवायचे. तुमची तयारी पाहून अत्यंत प्रभावित व्हायचो. तुम्ही पेपर तपासून देतांना सुक्ष्मतेने सूचना लिहित होते. त्यामुळे आम्ही पुढील वेळी सुधारणा करीत गेलो म्हणून यश मिळत गेले”.

सरांचे कौतूक ऐकून इतर प्रवासी देखील सुखावले,सरांनी त्याला विचारले “तुम्ही आता काय करता?” “मी आता उच्च न्यायालयात वकील आहे. खूप छान प्रॅक्टीस सुरू आहे”. सर त्याला म्हणाले “अहो बसा तुम्ही मी उभा राहातो..” “सर, नाही.. तुम्ही मला आहो जावो घालू नका. तुमच्या सारखा प्रामाणिक शिक्षक आमच्या आय़ुष्यात आला म्हणून आम्ही घडलो. तेव्हा तुम्ही मला अरे कारे म्हणा.. आणि आता तुम्हीच बसा”. शिक्षक काय करतात यावर त्यांचा आदर सन्मान भविष्यात देखील टिकून असतो. पण या प्रवासापर्यंत पोहचण्यासाठी तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी मार्ग दाखविला. वर्गात कोणी वेगळा विचार करणारा असतो. वाचणारा असतो.. प्रज्ञावान असतो त्यांच्यासाठी मी स्वतः तयारी करीत गेलो. त्यातून माझ्यामध्ये अऩेक सुधारणा होत गेल्या. विद्यार्थ्यांना काय नको आणि काय हवे ते विद्यार्थीच सांगत गेले. विद्यार्थीच शिक्षकांना प्रेरित करीत असतात. आपला प्रवास कोणत्या दिशेने करायचा हे शिक्षकांनी ठरविणे आवश्यक असते इतकेच.

विद्यार्थी शिक्षकांवर नितांत प्रेम करीत असतात. त्यांच्या प्रेमात शिक्षक ओलेचिंब होत असतो. पण प्रेम करण्यासाठी शिक्षकांच्या मनातील तळमळ आणि प्रयत्न प्रामाणिकपणे अधोरेखित व्हायला हवे इतकेच. त्या प्रेमात जीवनाचे दुःख विसरण्याची आणि जीवनभर आनंद देण्याची शक्ती आहे. प्रामाणिकपणाने जीवन फुलत जाते. शिक्षक म्हणून आपण आपल्या पेशाकडे किती उंचीने पाहातो त्यावरती त्या पेशाची समृध्दी अवलंबून असते. आपण आपला पेशा कोणताही असू दे.. तो कोणत्या दर्जाचा, श्रेणीचा असला तरी त्याचा विचार विद्यार्थी कधीच करीत नाही. जिल्हाधिकारी पदावर पोहचलेला विद्यार्थी शिक्षक पाहिल्यावर नतमस्तक होतात. शिक्षक वर्ग तीनचा कर्मचारी असतो.. म्हणून त्याच्याकडे श्रेणीच्या नजरेतून कोणी पाहात नाही. विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी केलेले प्रयत्न तो जाणत असतो. त्यामुळे शिक्षक होणे याचा अर्थ अखंड काळ स्वतःला विद्यार्थी ठेवणे असते. सतत अभ्यास करणे असते.सततचा अभ्यास म्हणजे जीवंत पणाचा अऩुभव असतो.ते केवळ शिक्षकांनाच भाग्य मिळते.

शिक्षकाला विद्यार्थी काय काय देतात आणि त्यातून शिक्षक कसा समृध्द होते याबददल गिजूभाई म्हणतात की,

मुलांनी त्यांच्या प्रेमाने मला सन्मानित केले.

मुलांनी मला नवीन आयुष्य दिले.

मुलांनी शिकवताना मी बरेच काही शिकलो.

मुलांसाठी वाचताना मी बरेच काही वाचले.

मुलेच खरतर शिक्षक असतात हे शिक्षक झालो म्हणून उमगले.

ही काही कविता नाही, हा अनुभव आहे.

त्यामुळे हा प्रवास सुरू ठेवला आनंदाला भरते येईल आणि समाज व राष्ट्र उन्नत होण्याचा प्रवास देखील सुरू होईल.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Related Stories

No stories found.