आयुष्यातील महत्त्वाचे वळण!
ब्लॉग

आयुष्यातील महत्त्वाचे वळण!

हितगुज

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | अश्विनी काणे-देशपांडे

दहावीचा निकाल लागल्यावर कॉलेजला प्रवेश घेण्याची धावपळ सुरू होते. कॉलेज जीवन आनंददायी आहे. आयुष्याचे हे नवे पर्व असते. जीवनाची आणि कारकिर्दीची दिशा ठरवणारा हा काळ आहे. म्हणून त्याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण आयुष्याच्या वाटेवरचे हे महत्त्वाचे वळण आहे.

दहावीचा निकाल लागला की मुलांना कॉलेजमध्ये जाण्याचा आनंद असतो. आपण आता मोठं झाल्याचा, गाडी-मोबाईल मिळण्याचा एक प्रकारच्या स्वातंत्र्याचा आणि एक नवे पर्व सुरु होण्याचा आनंद असतो. असावा, असणं सहाजिकच आहे, पण दुर्दैवाने हा आनंद शाळेसारखं कॉलेजला हजर राहण्याची गरज नाही, याची मोकळीक मिळण्याचा असतो.

अमूक-अमूक कॉलेजात अ‍ॅडमिशन घेण्याची धडपड असते. का? कारण तिथे उपस्थिती कंपलसरी नाही. तिथलं कॅम्पस चांगलं आहे, तिथे मजा करायला मिळेल.

फक्त क्लास केले तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणून. ही मानसिकता, मेडिकल आणि यासारखे 4-5 प्रोफेशनल कोर्सेस सोडल्यास बाकी सर्वांचीच असते. कॉलेज लाईफबद्दल जो द़ृष्टिकोन असायला पाहिजे त्याच्या बरोबर हा उलटा दृष्टिकोन आहे.

कॉलेज जीवन हे खरोखर एक नवे पर्व आहे. कारण हा काळ आपल्या जीवनाची, कारकिर्दीची दिशा ठरवणारा असा सगळ्यात महत्वाचा काळ असतो. कॉलेज लाईफ हा जीवनातील सगळ्यात छान असा काळ आहे.

सगळ्याच दृष्टीने कारण या काळात मुलांना स्वातंत्र्य पण असते. स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता असते. भरपूर उत्साह असतो. नवीन काही करण्याची इच्छा असते. खूप प्रमाणात सामर्थ्य असते, पण या काळाचा सुयोग्य उपयोग केला जातो, तेव्हा हे सगळं उपयुक्त असते.

कॉलेजमध्ये आले की, मुलं चुकीचं वागायला सुरूवात करतात. त्यामुळे लेक्चर अटेंड न करणे, रोज बाहेर खाणे, मोठ्यांशी उर्मटपणे वागणे, घरी खोटं बोलणे, डायटिंगच्या नावाखाली न खाणे, दिवसभर चॅटिंग करणे, मोबाईल गेम्स खेळणे या सगळ्या गोष्टी इतक्या पटकन आणि सहजपणे करतात की त्यांना आपण काही चुकीचं करीत आहोत, असं वाटत नाही.

त्यामुळे आणि वयामुळे कोणी सांगितलेलं त्यांना आवडत नाही. मी रोज कॉलेजात मुलांना नाश्ता कोणी-कोणी केला आहे आणि डबा कोणी-कोणी आणला आहे हा प्रश्न विचारायचे. तर 90% मुलं पण हे करीत नसल्याचे आढळून यायचे. मग रोज त्याचे महत्व सांगून नाश्ता करायला व डबा आणायला सांगायचे. मुलांमध्ये आठ दिवसांत बदल घडून यायचा. नाश्ता तर करायचेच, पण डबासुद्धा घेऊन यायला लागायचे. अशी परिस्थिती आहे.

या कॉलेजमधील काळाचा नीट उपयोग करायचा ठरवला तर हा आयुष्यातला सुवर्ण काळ ठरेल. मुलांनी या काळाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग केला पाहिजे. आपल्या करिअरबद्दल विचार करणे, योग्य ती निवड करणे हे महत्वाचे आहे. मुलांचा हा काळ ओल्या मातीसारखा असतो. जसा आकार देऊ तसा येतो.

त्यामुळे याच काळात मुलांनी आपले सामर्थ्य मर्यादा ओळखून त्यांचे विश्लेषण करायला पाहिजे. त्यावर जास्त मेहनत घ्यायला पाहिजे. येणार्‍या संधीबद्दल माहिती करून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. त्या दृष्टीने वाटचाल करायला पाहिजे.

हल्लीच्या काळात फक्त अभ्यास नाही, पण सर्वांगीण विकासाला महत्व आहे. मुलांनी त्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी होतात. स्वतःच्या प्रगतीसाठी मुलांनी अशा अ‍ॅक्टिव्हिटी आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे. हल्ली कॉलेजात वेगवेगळ्या विषयावर सेमिनार होतात.

त्यात भाग घेतल्याने वेगवेगळ्या विषयांची सखोल माहिती मिळते. या ठिकाणी उपस्थिती अक्षरशः कंपलसरी असावी लागतो. हे आपल्या चांगल्यासाठी आहे हे मुलांनी समजून घेऊन त्यात भाग घेतला पाहिजे. सेमिनार अटेंड करण्यासोबत त्याच्या तयारीत मदत केली तरी खूप काही शिकायला मिळते.

हे वय आकलनविषयक, भावनाविषयक आणि वर्तन विकारविषयक घटक वाढवण्याचे आहे. या वयातच मुलांनी चिकाटी, शिस्त, वेळेचे नियोजन, सदाचार, सामाजिक शिष्टचार असे सगळे गुणधर्म विकसित करायला पाहिजेत. कारण मानसिक स्वास्थ्य सुस्थितीत ठरवण्यात ते खूप परिणामकारक असतात.

हे सगळं थोडं अवघड आहे. कारण चुकीच्या गोष्टींचा मोह लवकर होतो. शाळेइतकं मोठ्यांचं लक्ष असूच शकत नाही आणि मुलांची ऐकण्याची मानसिकता नसते. परंतु ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ हे तत्व पाळावे लागते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com