गुणवत्ता गिळंकृत करणारी व्यवस्था !

सरकारी शाळांना खाजगी क्षेत्रातील शाळा महाविद्यालय पर्याय ठरू लागल्या आहेत. उद्या या शाळा, महाविद्यालयांनी गुणवत्तेकरीता प्रयत्न आणि प्रयोगशीलता जोपासली नाही, तर त्या व्यवस्थेला शिकवणी नावांची व्यवस्था गिळंकृत तर करणार नाही ना?......संदीप वाकचौरे यांच्या ‘शिक्षण भावताल’ या ब्लॉग मालिकेतील नवा भाग...
गुणवत्ता गिळंकृत करणारी व्यवस्था !

मागील आठवडयात बारावीचा निकाल लागला. हातात पेढे घेऊन स्वाती घरी आली होती. तीच्या हाती असलेल्या पेढ्यानेे आणि चेहर्‍यावरील हास्याने उत्तम मार्क मिळाल्याचे दिसत होते.त्या आऩंदात तीने पेढे हातावर दिले आणि मी तिचे अभिनंदन केले.खरेतर तीला उत्तम मार्क मिळाले होते. पण तरी बोलण्याच्या ओघात ती म्हणाली, मला शिकवणी नसती तर मला यापेक्षा अधिक चांगले मार्क मिळाले असते, पण आई बाबांचा चिंता आणि आग्रह यामुळे माझ्या मार्काचा टक्का घसरला आहे. या तिच्या म्हणण्याने तर धक्का बसला. जेव्हा मुलांना उत्तम मार्क मिळतात तेव्हा मुले शिकवणी वर्गाला श्रेय देतात. मग जाहीरातीच्या पानापानावर त्या मुलांचे छायाचित्र झळकते. पण तिच्या उत्तराने मात्र निश्चितच विचार करायला भाग पाडले होते.

शिक्षणात सध्या शाळा महाविद्यालयापेक्षा शिकवणीच महत्वाची झाली आहे. कधीकाळी दहावी-बारावीच्या वर्गापुरते आणि महानगरापुरते मर्यादित असणारे शिकवणीचे पेव आता गावागावात आणि पहिलीच्या वर्गापासून सुरू झाले आहे. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी शिकवणीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी धावाधाव होतांना दिसत आहे. या धावाधावीत पालकांना मार्क हवे आहेत. त्यासाठी सर्वकाही करण्याची त्यांची तयारी आहे.

आता शहरात तर शाळा महाविद्यालयांना पर्याय म्हणून शिकवणी वर्ग सुरू झाले आहेत. काही ठिकाणी केवळ नाव महाविद्यालयात आणि शिकणे शिकवणी वर्गात असे काही घडत आहे. नाव गावच्या शाळेत आणि शिकणे महानगरात असेही घडते आहे. यासाठी लाखो रूपये पालक मोजत आहे. शिक्षणांचे बाजारीकरण झाल्यावरती यापेक्षा वेगळ्या अपेक्षा करता येत नाही.

शिकणारी मुले या शिकवणीच्या फे-यात अडकल्यावरती त्यांचा रोबो होतो.साधारण सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचे शिकणे सुरू होते, त्यात सकाळी सकाळी प्रात्यक्षिक सुरू झाल्यानंतर ते दहा वाजता संपले, त्या नंतर महाविद्यालय सुरू होणार, पाच वाजता सुटणार मग सहा वाजता शिकवणी सुरू झाली असे म्हटले , तर दिवसाला चार शिकवणी म्हटले तरी किमान चार तास आणि एका ठिकाणी नसलेल्या शिकवणीला पोहचण्यासाठी किमान एक तास गृहीत धरायचे म्हणजे पाच तास त्या शिकवणी करता जाणार.

सकाळी सहा ते रात्री दहा असा कालावधी केवळ शिकवणी आणि शाळा महाविद्यालयात उपस्थिती लावणे सक्तीचे ठरते. घरच्यांचा आग्रह असतो म्हणून टाळता येत नाही. सकाळ पासून तर रात्री दहा अकरा पर्यंत ही धावपळ सुरू राहिली, तर शिकविलेल्या घटकांचा सराव,त्या घटकांचे चिंतन,मनन कधी करायचे. शाळा-महाविद्यालय आणि शिकवणीच्या वर्गात उपस्थितीनेकेवळ श्रवण भक्ती होते. त्या करीता तो घटक वाचने, त्यावरील टिपण काढणे, त्या संदर्भाने निर्माण झालेल्या मनातील प्रश्नांच्या अऩुषंगाने उत्तराचा शोध घेणे. त्या संदर्भातील घटकांचा, सिंध्दांताची जीवनात कोठे उपयोग होतो हे जाणून घेणे.

संबंधित घटकासाठीचे पुरक वाचन करणे. त्या विषयी चर्चा करणे यासाठी वेळ नावाची गोष्ट उरत नाही.त्या पलीकडे जीवनांत आऩंदाचे क्षण असावे लागतात. बौध्दीक श्रम जेव्हा घ्यावे लागतात तेव्हा आऩंदासाठी छंद देखील महत्वाचे असतात. चित्र काढणे,गाणे ऐकणे, गायन करणे, अवांतर वाचन करणे, चित्रपट, नाटक आदि कार्यक्रम पाहाणे,कविता करणे, वर्तमान पत्र, नियतकालिक वाचने, खेळणे या सारख्या गोष्टी केल्या तरच बौध्दिकतेसाठी मानसिक तयारी होणार असते. पण सध्या अभ्यास एके अभ्यास या सूत्रामुळे दहावी, बारावीच्या वर्गात प्रवेश घेतला, की या गोष्टींना रामराम करावा लागतो. मग शिकण्यासाठी लागणारे प्रसन्न मन कसे तयार होणार? सातत्यांने बौध्दिक काम करत गेल्यावर येणारा थकवा घालविण्याची कोणतीच व्यवस्था पालकांच्या गुणवत्तापूर्ण नियोजनात असत नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रक्रियेत गुंतलेला असतो पण शिकणे होत नाही हे लक्षात घ्यायला हवे.

वर्तमानात शिक्षणाच्या प्रक्रियेत शाळा, महाविद्यालयांच्या वर्गात बसून खरच शिक्षण होत नसेल तर त्या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. कधीकाळी आपल्या वर्गातील, आपल्या विषयाचा विद्यार्थी शिकवणीला जातो याची शिक्षकांना खंत वाटत होती. हा आपल्या अध्यापन प्रक्रियेचा पराभव वाटत होता. आपण शिकविलेले समजत नाही हा खरच पराभव आहेच. त्यामुळे शिक्षक म्हणून आपले किती विद्यार्थी शिकवणीला जात आहेत त्याचा विचार करायला हवा.

ज्या दिवशी आपला एकही विद्यार्थी शिकवणीला जात नाही असे होईल त्या दिवशी आपले अध्यापन परीणामकारक होते आहे असे समजावे. पण आज असे अपवादाने घडेल.पण याचा विचार केला नाही तर भविष्यात होम स्कूलिंगचा पर्याय जसा आहे , त्या प्रमाणे केवळ शिकवणीला जाऊन शिक्षण घेणारी एक पिढी निर्माण झाली तर नवल वाटायला नको. कदाचित सध्याच्या धोरणानुसार कार्यरत असणा-यांच्या नोकरीला धक्का लागणार नाही, पण भविष्यातील तरूणाईसाठीचा मार्ग आपण बंद करीत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षण अधिक समृध्दपणे देण्यासाठी आणि शिक्षणाची प्रक्रिया गंभीरपणे जाणून घ्यावी लागणार आहे.

त्यामुळे विचार करण्याची गरज आहे. शिकवणीमुळे विद्यार्थ्यांच्या संपादनात किती फरक पडतो याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. वर्गातील अध्यापन प्रभावी असेल, तर विद्यार्थी तेथील अध्ययन अध्यापनाचे जोरावरती अधिकाधिक संपादन प्राप्त करू शकतील.मात्र तेथे परिणामकारकता व विद्यार्थी केंद्रीत प्रक्रिया होणार नसेल तर विद्यार्थी नव्या वाटा शोधू लागतात. त्यातून नव्या व्यवस्थेचा जन्म होतो हे लक्षात घ्यायला हवे.

खरेतर शिक्षणांच्या प्रक्रियेत शिकवणी ही अलिकडे नव्याने उभी राहू पाहाणारी व्यवस्था आहे. तीच्या माध्यमातून हळूहळू शैक्षणिक व्यवस्थेला पर्याय उभा राहू शकेल. त्यातही मोठ्या प्रमाणावरती आर्थिक उलाढाल होते आहे. त्यातून मिळणारा पैसा हा जीवघेणा ठरत असल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत.

त्यामुळे पुन्हा नवे क्षेत्र फुलत असतांना मुळच्या क्षेत्राला मात्र लागलेल्या वाळविणे ते कायमचे संपुष्टात येऊ नये म्हणजे झाले. खाजगी क्षेत्रातील शाळा महाविद्यालय सुरू आहेत.सरकारी शाळांना खाजगी क्षेत्रातील शाळा महाविद्यालय पर्याय ठरू लागल्या आहेत. उद्या या शाळा, महाविद्यालयांनी गुणवत्तेकरीता प्रयत्न आणि प्रयोगशीलता जोपासली नाही, तर त्या व्यवस्थेला शिकवणी नावांची व्यवस्था गिळंकृत तर करणार नाही ना? अशी शंका येते. आजच याचा विचार करायला हवा.

- संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक तथा शिक्षक आहेत.)

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com