ड्रोन हल्ला : नव्या युद्धपद्धतीचे आव्हान

आधुनिक काळात युद्धपद्धतीमध्ये बदल होत चालले असून तंत्रज्ञानाचा वापर कमालीचा वाढला आहे. ड्रोनचा शोध हा भलेही सकारात्मक कार्यासाठी लावण्यात आला असेल; पण नव्या काळातील युद्धांमध्ये ड्रोन महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती राज्यांत ड्रोनद्वारे शस्रास्रे, अमली पदार्थ, बनावट नोटा, स्फोटके आदीचा पुरवठा केला जात असल्याचे समोर आले होते. मात्र अलीकडेच जम्मूतील एअरबेसवर ड्रोनद्वारे हल्ला करुन पाकिस्तानने आणि दहशतवाद्यांनी युद्धाचे आयामच बदलून टाकले आहेत. ड्रोन्सद्वारे होणार्‍या हल्ल्यांपासून बचाव करणे हे अत्यंत कठीण आणि महाखर्चिक असल्याने भारताची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा ब्लॉग.
ड्रोन हल्ला : नव्या युद्धपद्धतीचे आव्हान

जम्मू- काश्मीरमधील भारतीय हवाई दलाच्या छावणीवर झालेला हल्ला हा भारताच्या इतिहासामधील पहिला ड्रोन हल्ला आहे. यापूर्वी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून आत्मघातकी हल्ले होत असत, ग्रेनेड हल्ले झाले आहेत, गोळीबाराच्या घटना झाल्या आहेत. मात्र आजवर कधीही ड्रोनद्वारे हल्ला झालेला नव्हता. वास्तविक पाकिस्तानकडून भारताविरुद्ध ड्रोनचा वापर हा गेल्या काही वर्षांपासून केला जात आहे; मात्र तो स्फोट घडवून आणण्यासाठी होत नव्हता. पंजाब आणि राजस्थानात आंतरराष्ट्रीय सीमारेषेनजीक पाकिस्तानचे दहशतवादी, त्यांची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्य यांच्याकडून भारतामध्ये एके-47 सारखी शस्रास्रे पाठवण्यासाठी, टेहाळणी करण्यासाठी, अफू-चरस-गांजा यांसारखे अमली पदार्थ पाठवण्यासाठी केला जातो. याशिवाय भारतात लपलेल्या त्यांच्या हस्तकांपर्यंत काही साहित्य पोहोचवण्यासाठीही ड्रोनचा वापर पाकिस्तानकडून केला जातो. कारण सीमेवर भारताने कुंपण घातल्यामुळे प्रत्यक्ष व्यक्तीला पाठवून या वस्तूंचा पुरवठा करणे पाकिस्तानसाठी कठीण ठरत आहे. काश्मीरनजीकच्या लाईन ऑफ कंट्रोलवरही पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. परंतु तेथे केवळ टेहळणीसाठी ड्रोन्स वापरली जातात. भारतीय सैन्याची तैनाती, डिप्लॉयमेंट कशी आहे याचा धांडोळा या ड्रोन्समार्फत घेतला जातो. त्यानुसार आपल्या दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत घुसवण्यासाठीची योजना आखली जाते. केवळ पाकिस्तानच नव्हे तर इकडे चीनलगतच्या सीमेवरही चीनी सैन्य भारतावर लक्ष ठेवण्यासाठी राजरोसपणाने ड्रोन्सचा वापर करत असते.

ड्रोन म्हणजे नेमके काय, तर एक छोटे विमान जे विनापायलट रिमोटच्या मदतीने उडवता येते. ड्रोन्सना त्यांच्या वजनाच्या दृष्टीने चार भागात विभागता येईल. नॅनो म्हणजे 250 ग्रॅम हून कमी जास्त वजन पेलणारे, मायक्रो म्हणजे 250 ग्रॅम ते 2 किलोपर्यंत सामान वाहून नेऊ शकणारे, तिसरे म्हणजे मिनी म्हणजे 2 किलो ते 25 किलो इतके वजन घेऊन जाणे आणि चौथे स्मॉल ड्रोन म्हणजे 25 किलो ते 150 किलो वजन घेऊन जाणे, आणि मोठे ड्रोन म्हणजे यापेक्षा अधिक वजन घेऊन जाण्याची क्षमता. ड्रोनची रेंज त्याच्या आकारावर, त्यातील तंत्रज्ञानावर अवलंबून असते. ड्रोन अतिशय स्वस्त असतात. ड्रोनचे तंत्रज्ञान आणि त्यांची निर्मिती ही त्या मानाने अतिशय सोपे आहे. ड्रोन्स कमी उंचीवरून उडतात. ते कोणत्याही दिशेने येऊ शकतात. या ड्रोन्सवर स्फोटके घालून त्यांचा इम्प्रोव्हाईज एक्स्प्लोजिव्ह डिव्हाईस म्हणजे आयडी म्हणून वापर केला जातो. जम्मूमध्येही आईडीचा वापर केला गेला असल्याचे समोर आले आहे. या दोन ड्रोन हल्ल्यांत तुलनेने कमी नुकसान झाले. एका ड्रोनवर बसवलेला बाँब न फुटता निकामी करण्यात यश आले.

आता प्रश्‍न असा पडतो की, जगभरात इतरत्र ड्रोनद्वारे हल्ले केले गेले आहेत का? याचे उत्तर हो असे आहे. 14 सप्टेंबर 2019 रोजी 18 ड्रोन आणि 7 क्रूझ क्षेपणास्त्र यांनी सौदी अरेबियाचा अरामकोमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला. त्यामुळे सौदी अरेबियाचे 50 टक्के तेलाचे उत्पादन बंद पडले. हा ड्रोन हल्ला इराणने केल्याचे सांगितले गेले. वास्तविक, इराणची लष्करी ताकद ही सौदी अरेबियाच्या तुलनेत कमजोर समजली जाते. याउलट सौदी अरेबियाचे डिफेन्स बजेट हे 67.6 अब्ज डॉलर एवढे आहे. अत्याधुनिक शस्त्रे आणि अत्यंत महागडे हवाई दल, हवाई संरक्षण व्यवस्था सौदी अरेबियाकडे आहे. जगातील सर्वात अत्याधुनिक हवाई हल्ल्यापासून रक्षण करणारी व्यवस्था त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे असलेली शस्त्रे ही अमेरिकेने दिलेली सर्वांत आधुनिक शस्त्रे आहे. एवढेच नव्हे तर सौदी अरेबियाच्या सैन्याचे प्रमुख म्हणून पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ काम करतात. ते खूप अनुभवी आहेत. एवढी महागडी, अत्याधुनिक शस्त्रेसुद्धा अतिशय स्वस्त दरात तयार होणारे ड्रोन्स थांबवू शकले नाहीत. यावरुन ड्रोन हल्ल्यांचे आव्हान किती मोठे आहे हे लक्षात येते. अमेरिकेने बनवलेल्या पॅट्रिऑट क्षेपणास्त्राची किंमत 2.4 बिलियन डॉलर आहे. एवढ्या महागड्या सिस्टिम असूनही इराणने छोट्या ड्रोनच्या मदतीने केलेले हल्ले त्यांना थांबवता आले नाहीत. आयर्लंडमध्ये अशा प्रकारचे स्फोटक पदार्थ हवेतून ब्रिटिश सैन्याविरूद्ध वापरली गेल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत. एवढेच नव्हे तर अशाच प्रकारच्या आयईडीज इराक आणि अफगाणिस्तानात हवेतून अमेरिकन सैन्याविरूद्ध थोड्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. अमेरिकेकडे असलेली चिलखती वाहाने अशा हल्ल्याविरूद्ध स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम नाहीत.

ड्रोनद्वारे जेव्हा हल्ला होतो तेव्हा त्यापासून बचाव किंवा रक्षण करणे हे खूप कठीण असते. कारण ड्रोनचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते रडारवर दिसत नाही. ते खूप खालूनही जाऊ शकते. तसेच सर्वच ठिकाणी आपली अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम बसवलेली नसते. त्यामुळे एखाद्या विमानाद्वारे किंवा हेलिकॉप्टरद्वारे जर आपल्यावर कुणी हल्ला करू लागले वा करण्यास आले तर रडार आणि तोफांच्या मदतीने त्यापासून बचाव करु शकतो. तसे ड्रोनच्याबाबतीत करणे हे अशक्य आहे. कारण विमानतळांवर एअर डिफेन्स सिस्टिम लावणे हे प्रचंड खर्चिक असल्याने ते व्यवहार्य नाही. दिल्ली किंवा मुंबई यांसारख्या एखाद्या महानगरातील महत्त्वाच्या ठिकाणाचे रक्षण आपण करु शकतो. मात्र देशभरात शेकडो विमानतळे असून त्यांचे रक्षण करणे हे जवळपास अशक्य आहे. कारण ड्रोन नेट लावणे, ड्रोन रडार लावणे यासाठी प्रचंड खर्च करावा लागू शकतो.

या पार्श्‍वभूमीवर युद्धतंत्राच्या या नव्या प्रकाराचे आव्हान कसे पेलायचे हा आज एक मोठा प्रश्‍न बनून समोर आला आहे. मागच्या वर्षी आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन राष्ट्रांत घनघोर युद्ध झाले होते. या युद्धात आर्मेनियाने तोफा, रणगाडे यांसारख्या पारंपरिक शस्रांचा वापर केला; तर आर्मेनियाने ड्रोन्सचा वापर केला. आर्मेनियाची 50-60 ड्रोन्स एकाच वेळी जाऊन निर्धारित लक्ष्यावर हल्ला करुन ती उद्ध्वस्त करत होती. साहजिकच या युद्धात आर्मेनियाचा विजय झाला. जगाच्या इतिहासातील हे पहिले पारंपरिक युद्ध होत जे ड्रोनच्या मदतीने जिंकले गेले.

आज पाकिस्तानकडे मोठ्या प्रमाणावर ड्रोन्स आहेत. याचे मुख्य कारण चीन आहे. पाकिस्तानी सैन्याला चीनकडूनच ड्रोन्सचा पुरवठा झाला असणार हे उघड आहे. भारताने आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. मागील काळात ज्याप्रमाणे भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता, तसाच स्ट्राईक आता करण्याची गरज आहे. कमी खर्चात भारतावर हल्ले करून पाकिस्तान आपल्या देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त कऱण्याचे प्रयत्न करत आहेत. म्हणून ड्रोनविरूद्धची लढाई आता आपल्याला पाकिस्तानच्या आत न्यावी लागेल. त्यामुळे भारताने स्वतःचे रक्षण ड्रोन हल्ल्याविरूद्ध कऱण्याऐवजी भारताकडून होणार्‍या ड्रोन हल्ल्यापासून पाकिस्तानला संरक्षण करण्यास भाग पाडावे, तरच त्यांना याची किंमत कळू शकते.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com