स्पंदन : जिंदगी इम्तिहान लेती है...

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांची खास ‘देशदूत’च्या वाचकांसाठी पाक्षीक ‘ स्पंदन ’ ब्लॉगमालिका...
स्पंदन : जिंदगी इम्तिहान लेती है...
बॉलीवूडbollywood

डॉ. प्रवीण घोडेस्वार

अमिताभ बच्चनची प्रमुख भूमीका असलेला ‘नसीब’ नावाचा चित्रपट १९८१ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा मी शाळकरी विद्यार्थी होतो. त्या काळात आजच्या सारखी मल्टीप्लेक्स सिनेमागृह नव्हती. होती ती एकपडदा चित्रपटगृहे. शिवाय तालुक्याच्या ठिकाणी नुकतेच प्रदर्शित झालेले सिनेमे अभावानेच लागायचे. सिनेमा मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शित होऊन काही कलावधी लोटल्यावर लहान शहरांत-गावांमध्ये यायचे. म्हणजे तेथून तो सिनेमा गेल्यावरच इकडे यायचा. त्यामुळे अशा सिनेमांची उत्सुकता असायची. माझ्या तालुक्याच्या गावीदेखील हा सिनेमा तसा उशिराच दाखल झाला. तेव्हा अमिताभ सुपरस्टार होण्याच्या मार्गावर होता. म्हणून लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढत होती. या चित्रपटात अमिताभ सोबत ऋषी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, कादरखान, शक्ती कपूर हे पुरुष कलाकार तर हेमा मालिनी, रीना रॉय, किम ह्या स्त्री कलावंत होत्या. या सिनेमाचं दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनी केलं होतं. निर्मातेही तेच होते. कथा प्रयाग राज, के.के. शुक्ला आणि कादर खान यांनी लिहिली होती. गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार होते लक्ष्मीकांत –प्यारेलाल.

गाण्यास अमिताभने आवाज दिला

मेरे नसीब मे तू है के नही..., जॉन जॉनी जनार्दन..., जिंदगी इम्तिहान लेती है...,चल-चल मेरे भाई...ही यातली त्याकाळात बऱ्यापैकी लोकप्रिय झाली होती. चल मेरे भाई या गाण्यात मो.रफी सोबत दस्तुरखुद्द अमिताभने आवाज दिला होता. सिनेमात हे गाणं अमिताभ-ऋषी यांच्यावर चित्रित केलं होतं. हे दोघे सिनेमात भाऊ भाऊ होते. मी सिनेमा पहिला पण त्याचं कथानक माझ्या फार दिवस लक्षात राहिलं नाही. पण यातलं एक गाणं मात्र माझ्या आजही लक्षात आहे. हे गाणं पडद्यावरच्या कलाकारांपेक्षा याचं पार्श्वगायन करणाऱ्या कालावंतासाठी मला जास्त आवडतं नि विशेष वाटतं. यासाठी संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आपण हे गाणं ऐकलं आहे का ? नसल्यास नक्की ऐका. या गाण्यात संगीतकाराने जे आवाज वापरले आहेत तेच माझ्यामते या गाण्याचा ‘यूएसपी’ आहे. हिंदी चित्रपट गाणी आवडीने ऐकणाऱ्या सर्वसामान्य रसिकांना हे आवाज तसे अनोळखी वाटणार नाहीत. पण या गाण्याच्या गायकांचे आवाज परिचित वाटत असतील तरी ते तसे नाहीत. म्हणजे आवाज ओळखीचे पण गायक अनोळखी! आहे ना गंमत ? पण थोडी माहिती असणारे शौकीन मात्र हे गायक ओळखू शकतात.

या गाण्यातला स्त्री स्वर ऐकून तो लता मंगेशकर यांचा आहे, असं वाटू शकतं. तर पुरुष आवाज ऐकून मो. रफी आणि मुकेश यांचा भास होईल. होय, भासच. कारण हे गायक रफी आणि मुकेश नाहीयेत. शिवाय लताचा देखील आवाज यात नाहीये. तर लता, रफी आणि मुकेश यांच्या आवाजाशी बरेचसे साधर्म्य असलेल्या गायकांनी हे गाणं गायलं आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतली थोर गायिका सुमन कल्याणपूर यांचा स्वर या गाण्याला लाभला आहे. तर मो. रफीचा प्रभाव असलेला आणि त्याच्या शैलीत गाणारा गायक अन्वर हा यातला एक पुरुषी स्वर. तर दुसरा पुरुष गायक म्हणजे डॉ. कमलेश अवस्थी. हे मुकेश च्या शैलीत गाणारे.

यामुळे सुमनताईंना संधी

तीन दिग्गज आणि महान गायकांच्या आवाजाची आठवण करून देणारे हे गाणं संगीतबद्ध करून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना श्रोत्यांना अनोखा असा श्रवण आनंद दिला आहे. सुमन कल्याणपूर यांच्याबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांनी अनेक हिंदी- मराठी गाणी गाऊन रसिकांना तृप्त केलं आहे. त्यांच्या आणि लता च्या आवाजात विलक्षण साम्य आहे. त्यांची गाणी पहिल्यांदा ऐकणाऱ्या श्रोत्याला ती लताचीच वाटतात. हिंदी –मराठी चित्रपटसृष्टीतल्या तत्कालीन जवळपास सर्वच आघाडीच्या संगीतकारांकडे सुमनताईनी गाणी गायली आहेत. असं म्हणतात त्याकाळात लताचे संगीतकारांसोबत अधून-मधून खटके उडायचे. मतभेद निर्माण व्हायचे. अशावेळी मग संगीतकार लताचा पर्याय म्हणून सुमनताई कडून गाणी गाऊन घ्यायचे. यात नौशाद, शंकर-जयकिशन, सचिनदेव बर्मन यांची नावं घेता येतील. अर्थात त्यांना केवळ लता उपलब्ध नाहीये म्हणूनच गाणी मिळाली असं नाही तर त्यांच्या स्वतःच्या गुणवत्तेवर नि कर्तृत्वावर देखील अनेक गाणी गायली आहेत, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पण लतासारखा आवाज याचा त्यांना फायद्यापेक्षा तोटाच झाला असं वाटतं. अन्यथा त्यांची कारकीर्द लवकर संपली नसती.

‘जिंदगी इम्तिहान लेती है

या गाण्यातला गायक अन्वर याने देखील चित्रपटसृष्टीत दमदार आगमन केलं होतं. त्याच्या ‘जनता हवलदार’ मधल्या ‘’हमसे क्या भूल हुई जो ये सजा हमको मिली...’’ त्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पण पुढे त्याला फार गाणी मिळाली नाहीत. रफी हा अष्टपैलू प्रतिभावंत गायक होता. त्याच्या एका शैलीची नक्कल करून फार ठसा उमटवता येत नाही हे अन्वरच्या कारर्कीर्दीवरून दिसून आलं. सनी देवल च्या ‘सोहनी महिवाल’ मधली अन्वरने गायलेली एक-दोन गाणी गाजली होती. तसेच ‘अर्पण’ या चित्रपटातलं ‘’मोहब्बत अब तिजरात बन गई है...” हे गीत लोकप्रिय झालं होतं.आता कमलेश अवस्थी बद्दल. हा मुकेशच्या शैलीत गाणारा गायक. त्याचं ‘प्यासा सावन’ तेरा साथ है तो...हे गाणं लोकप्रीय आहे. याशिवाय त्याची गाणी आठवत नाही. ‘नसीब’ सिनेमातल्या ‘जिंदगी इम्तिहान लेती है...’ या गाण्याचा चित्रपटातला संदर्भ वेगळा आहे. पण सध्या संपूर्ण देशात नि त्यातल्या त्यात आपल्या राज्यांत करोनाची जी आपत्ती आलीये ती बघून नक्कीच म्हणावं लागतंय की खरोखरच ‘जिंदगी इम्तिहान लेती है...’ हे संकट लवकरच दूर होईल अशी आशा करू या..

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com