माय डिअर कोरोना ....

Happy birthday !!!!

जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा वाढदिवस असतो ,

साजरा पण होतो ,

शुभेच्छांचा वर्षाव होतो ...

मग तुझाच का नको ?

तसे तूझे काही परिचित बांधव

चीन मध्ये डिसेंबर १९ लाच जन्माला आले

अन् त्यांनी सर्व जगातच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली,...

हे माहिती असूनही आमच्याकडे कसला येतोय कोरोना ?

अश्या अविर्भावात आम्ही राहिलो अन्

तू मात्र मोठ्या थाटात विमानाने पोहचलास

थेट भारतात .....

तोपर्यंत क्वारंटाईन वगैर हे शब्द आमच्या डिक्शनरीतही नव्हते ,

परदेशातून प्रवासी एअरपोर्टवर ऊतरला की लगेच घरी , जाताजाता टॅक्सीचालक , कुली , हाॅटेल कर्मचारी यांनाही बाधीत करून फिरत राहिला ,

अन् २९ मार्च २०२० चा तो दिवस ....

रात्री ९ वाजता मला नासिकहून फोन आला

डाॅक्टर तुमच्या लासलगावात जिल्ह्यातील पहिला पेशंट सापडला ....

सिव्हिलला अॅडमिट आहे ...

रिपोर्ट पाॅझिटिव्ह आलेत ...

काळजी घ्या ....

अन् सुरू झाली चर्चा ,,,,

तो कोणाकडे गेला होता ?

बेकरीवाला होता ....

खूप ठिकाणी फिरला

मग काय ...

प्रशासनाची जोरदार धावपळ ...

बॅरीकेटस ... रस्ताबंदी ....

परिसरातील लोकांनी गावात कुणी येऊ नये म्हणून रस्तेच खोदून टाकण्यास सुरवात केली ..

जिल्हाधिकार्यांची भेट ..

पोलिसांवर मोठी जबाबदारी ...

कुटुंबातील सर्वांनाच काॅरंटाईन करण्याचे आदेश ...

भारत बंद असूनही आपला दवाखाना सुरू ठेवणार्या फॅमिली डाॅक्टर व पॅथाॅलाॅजीस्ट यांच्या संपर्कात तो आल्याने त्यांच्याबद्दलही जोरदार चर्चा ....

तोपर्यत परिसरात ही बातमी पोहचली...

मग सुरू झाल्या अफवा..

यांना ऊचलले !!

( हा शब्द ऊच्चारणार्याला सलाम )

लगेच काळजीपूर्वक फोन ,

डाॅक्टर मी तुमच्याकडे कधी आलो होतो ?

तो तुमच्याकडे कधी आला होता का ?

मला त्रास होऊ शकतो का ?

या विवंचनेत मात्र तुम्ही कसे आहात ?

हे मात्र विचारण्याची साधी तसदीही घेत नसत ..

नंतर दुसर्या दिवशी आमच्या डाॅक्टर्संना मिळालेली वर्तणूक नक्कीच दुर्देंवी होती ,

क्लेशकारक होती .

शेवटी आमचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना अक्षरक्ष: प्रशासन व मंत्रीमहोदयांपर्यंत धाव घ्यावी लागली ..

त्यानंतरही जे डाॅक्टर रूग्णसेवा करत असतांना पाॅझिटिव्ह झाले त्यांच्याबाबत तर अतिशय वाईट प्रचार करण्यात आला ...

तरीही लासलगावातील एकही डाॅक्टर रूग्णसेवेपासून हटला नाही हे मात्र अभिमानास्पद !,,

पण

यापेक्षाही वाईट परिस्थिती झाली ती सामान्य नागरिकाची ,लाॅकडाऊन मुळे ...

गजबजलेले रस्ते शांत झाले ,

आशियातील सर्वात मोठे मार्केट पुकारण्याचे

थांबले ,

रेल्वे , बसेस , खाजगी गाड्यांची चाके थांबली ,

शाळा , काॅलेजेस ओस पडली .

व्यापार , दुकांनाना कुलूप लागले ....

अन् सुरू झाला दुखदायक प्रवास मजुरांचा ..

घराकडे परतण्याची धडपड , प्रवासाची

साधणे नाहीत .अक्षरश: पायी चालत मैलोमैल प्रवास करत कदाचित फाळणीनंतर प्रथमच ही वाईट वेळ भारतीयांवर आली ..

पोटाला काही नव्हतेच पण जीव वाचावा म्हणून असंख्य मजूर शहराकडून गावाकडे असा उलट प्रवास करू लागली ..

त्यातच काही मजूरांचा रेल्वे ट्रॅकवर झोपल्याने अपघाती मृत्यू चटका लावून गेला ...

अशातच काही गावांनी केलेली गावबंदी त्यांच अजून खच्चीकरण करून गेली ...

रोजंदारीवर जगणारा स्थानिक मजूर , नोकरदार कोलमडला.

आजपर्यंत स्वकष्टावर जगत कुणापुढेही हात न पसरणारा स्वाभिमानी , लढवय्या

पण कुटुंबाला काय खाऊ घालायचे या काळजीने पछाडला ...

पण इथही दिसली माणुसकी ...

अनेक संस्था , मित्रमंडळी , सामाजिक कार्यंकर्त्याच्या रूपाने देव अवतरला ..

तुझ्याच नावाने कोरोना मदत निधी ऊभारून अन्नछत्र सुरू झाली , मदतकेंद्र ऊघडली

अन् अनेक मानवीय स्वभावाचे ऊदात्त संस्कृतीचे दर्शन झाले ..

यावेळी मात्र महाराष्ट्राला लाभले एक संवेदनशील मुख्यमंत्री मा . ऊद्ववजी ठाकरे ,

दूरदर्शनवर थेट भेटत जणू काही आपल्या घरातीलच एखादी व्यक्ति आपली काळजी घेतेय , संवाद साधतेय ..

असा भास प्रत्येकाला झाला ...

एकतर शतकातील पहिलीच नवीन महामारी ,

जागतिक आरोग्य संघटनेचे रोज बदलणारे ठोकताळे ,

यामुळे थोडी गोंधळमय परिस्थिती निर्माण झाली ...

तरीही

डाॅक्टर , पॅरामेडिको व कर्मचारी घेतलेल्या अफाट मेहनतीने तुझ्यावर बरीच पकड घेता आली ...

बाबा कोरोना

तू मात्र छान वावरत होतास ,

एका शहराकडून दूसरीकडे,

सुरवातीला मेट्रो सिटित तू मनसोक्त रमलास , अगदी मुंबई पुण्यात सर्वच हाॅस्पिटल , जंबो कोविड सेंटर तू फूल्ल करत होतास मग

तूला वेध लागले ,

ग्रामिण भागातले ..खेड्याकडचे ...

तिकडे तू शिरकाव केलास . अलगदपणे ...

कोरोना थोतांड आहे ,

काही नाही हो !

झोल आहे !

अस म्हणणार्यांच्या घरातच किंवा आजूबाजूला मृत्युतांडव अनुभवले तेव्हा कुठे लोकांना जाग आली ,

तोपर्यंत तू बाळसे धरून सशक्त झाला होतास ..

मास्क ,स्वच्छ हात व फिजिकल डिस्टंस एवढी साधी त्रिसूत्री असतांना मात्र आपल्याच नादात राहिल्याने , न पाळल्याने अनेक जण बाधीत झालेत व रूग्णालयात भरती झालेत ..

अनेकांची आर्थिक गणिते तू कोलमडीस आणलीत ,

काही गोष्टी मात्र तू चांगल्या शिकवल्यास ..

कुटुंबात रहाणं , साध जगण , निसर्गाच्या जवळ घेऊन गेलास ,

पण कोरोना ,

माणसाला मात्र सामाजिक अंतर ठेवायला सांगितलं हे मात्र वाईट केलं

सहज एखाद्याची गळाभेट दूरच पण एकमेकाच्या सुखदुखातही जवळ जाणं , टाळायला लागण,

मदत करायला घाबरायला लावलंस ..

एव्हाना तू सात - आठ महिण्यांचा झालास , रांगायला लागलास ...थोडा शांतही झालास

आम्हालाही वाटल २०२१ आता मजेत जाणार ,

लोकांनी बंधन झिटकारली ..

मास्क बाजूला टाकले ,

व्यवहाराची लगबग सुरू झाली

लग्न सुरू झाले , पंगती झडू लागल्या

, बाजार खुलला ...

कालाय तस्मै नम: अस म्हणतं

अगदी महिन्यात तुझा विसरही पडला ...

अन्

मी पुन्हा येईन ...

अस सांगत परत आलास

अगदी नव्या जोम्याने आलास ,

मात्र पहिल्यापेणाही जोरात ,,

आज परिस्थिती पुन्हा चिघळतेय ,

सोशल मेडियामुळे अफवा पसरतात

लस घेऊ नका , साईड ईफेक्ट असतात ,

पेशंट सांगूनही टेस्ट करत नाहीत , अन् केलीच तर रिपोर्टस पाॅझिटिव्ह येऊनही घरी थांबत नाहीत ,

यामुळे तू अजून फोफावतोस .

हर्ड इम्युनिटीच्या नावाखाली अनेक जण बरे पण होतायेत पण काही वयोवृंद्ध यात बळी पडतायेत ,,

प्रशासन तरी काय करणार ??

तेही जिवाच्या आकांताने नियंत्रण करतायेत ,

डाॅक्टरांना मात्र थकून चालणार नाही ..

अवितरत काम करावच लागणार आहे ...

आज तुझा वाढदिवस आलाय ...

खर तर तुझ

श्राद्ध घालायच स्वप्न पहायच ?

कि अजून वर्षोनुवर्ष किती वाढदिवस साजरे करायचे ?

हे मात्र सामान्य नागरिकांच्याच हातात आहे ....

शेवटी एवढच म्हणावस वाटत ....

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥

डाॅ विलास कांगणे

लासलगाव ( नाशिक )

9822514091