दिवाळी होईल गोड!

दिवाळी होईल गोड!

आपण घरच्या मदतनीसांना ताट भरून फराळाचे देतो. त्यामुळे त्यांच्या घरी फराळाचे खूप सामान जमते असे नाही. पण आपल्याकडे लक्ष आहे, या भूमिकेतून आनंद मिळतो. सरकारचेही तसेच आहे. सरकारने वाजवी किमतीत दिलेल्या चार वस्तू घरात आल्या तर दिवाळीचा आनंद द्विगुणीत होईल, असा दृष्टिकोन बाळगल्यास ही मदत महत्त्वाची ठरून दिवाळी आनंदमय होऊ शकते. मात्र त्याला आणखी काही बाबींची जोड हवी.

राज्य शासनाने दारिद्य्ररेषेखालील जनसामान्यांची दिवाळी आनंददायी व्हावी, यासाठी अवघ्या शंभर रुपयांमध्ये चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. हे चांगलेच आहे. एखादा पुणेकर ‘एवढ्याने काय होणार?’ असे म्हणू शकेल, पण गोष्ट अशी आहे की राज्यकर्त्यांनी आपल्या जनतेसाठी विशिष्ट भूमिका घेऊन सणासुदीला मदत करणे निश्चितच स्वागतार्ह आहे. अर्थात असे वारंवार घडते हेदेखील खरे आहे. चार वस्तू दिल्या म्हणून लगेच दारिद्य्र संपेल अशातला भाग नाही. परंतु ‘प्रत्येकाच्या घरी येणारी दिवाळी आनंद निर्माण करणारी असावी’ अशी भूमिका घेऊन शासन मदत करत असेल तर तो आनंदाचाच भाग मानावा लागेल.

याच पद्धतीने शर्ट-पँटची जोडी, साडी-चोळी, सलवार-कुर्ता अशाही काही वस्तू सरकारी यंत्रणेतून देता येणे आणि सर्वसामान्य माणसाच्या घरात आनंद निर्माण करणे शक्य होत आहे. मध्यमवर्गीयांच्या मनात असा प्रश्न कायम रुंजी घालतो की, शासनाला फक्त गरिबांचीच किव येते, मध्यमवर्गीयांना कोण काय देते? या वर्गाला बोनस मिळतो, सानुग्रह अनुदान मिळते, पण ते प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला मिळत नाही. त्यामुळेच शासनाने अशा प्रकारच्या मदतीसाठी दारिद्य्ररेषेखालील नागरिकांबरोबरच कनिष्ट मध्यमवर्गीयांचाही विचार करायला हवा.

दारिद्य्ररेषेखालच्या मंडळींचा आकडा (मतदारांचा) प्रचंड मोठा आहे. एकदा त्यांना खूश केले की मताचे दान पदरात पडू शकते, असा आजवरचा राजकीय पक्षांचा अनुभव आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीची मांडणी करतात यात चुकीचे काहीच नाही. परंतु मध्यमवर्गाला डावलले जाते आहे की काय, अशी भूमिका त्यांच्या मनात निर्माण झाली तर त्याचा दोष राज्यकर्त्यांकडे जातो, हेदेखील विसरता येणार नाही. यामुळे वर्गविग्रह होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. क्षणाचा फायदा झाला तरी दीर्घ मुदतीचा विचार करता यामुळे नुकसानच होणार हे नक्की.

या ठिकाणी मला एक घरगुती प्रसंग नमूद करावासा वाटतो. नटवर्य नानासाहेब फाटक यांचे चिरंजीव एकदा आमच्या घरी आले होते. काही वेळानंतर त्यांनी सिगारेट पेटवली. मी सिगारेट ओढत नाही म्हणून वा एक प्रकारची आदब म्हणून माझ्याकडे येणारी मंडळी कधी आमच्या घरात सिगारेट ओढत नाहीत. परिणामी, आमच्याकडे अ‍ॅश ट्रे नाही. मग अ‍ॅश टाकण्यासाठी मी नानासाहेब फाटकांच्या चिरंजीवांना एक कानफुटका कप दिला. त्यांनी त्याचा वापर केला, बैठक संपली आणि ते निघून गेले. चार दिवसांनी परत आले तेव्हा येताना त्यांनी मला एक भेटवस्तू आणली होती. पत्नीने विचारले, हे काय आहे? त्यावर ते ‘हा अ‍ॅश ट्रे आहे’ असे म्हणाले. ‘तुमच्याकडे नाही म्हणून मुद्दाम घेऊन आलो आहे,’ असेही ते म्हणाले. त्यावर पत्नी हसत हसत म्हणाली, ‘आमच्याकडे इतर अनेक गोष्टीही नाहीत. फ्रीज, वॉशिंग मशीन, उत्तम सोफा नाही... मग तुम्ही त्या वस्तू आणून देणार का...?’ सांगण्याचा मुद्दा असा की माणूस गरीब असला म्हणून त्याचा स्वाभिमान नसतो असे अजिबात नाही. सरकारने दिलेल्या रवा, साखर, पामतेल आणि डाळ या वस्तूंचे मूल्य गरीब माणसाला वाटणारच, पण म्हणून त्याला सतत या पद्धतीने मदत करणे कितपत योग्य आहे, याचाही विचार स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षात व्हायला हवा. अन्यथा, गरीब-गरीब म्हणत सातत्याने काही तरी मागण्याची वा मिळवण्याची प्रवृत्ती वाढत जाण्याची शक्यता आहे.

वेगळे विचार मांडून दिवाळीचा आनंद कमी करावा या मताचा मी नाही. पण याचबरोबर उद्या शासनाने पेट्रोल, कपडे, शालेय सामान अशा काही बाबी द्यायला सुरुवात केली तर गरीब म्हणवणारे त्यांची गरिबी तशीच ठेवतील आणि काही ना काही प्रमाणात शासनाकडून आणखी काय घेऊ शकतो, याचाच विचार करत राहतील. यापूर्वीही इंदिरा सरकारने, वाजपेयी सरकारने, मोदी सरकारने समाजातले दारिद्य्र नष्ट व्हावे यासाठी प्रयत्न केले आहेत. पण त्यामुळे दारिद्य्र नष्ट झालेले नाही हे निर्विवाद.

आपण आपल्या घरच्या मोलकरणीला ताट भरून फराळाचे देतो. त्यामुळे तिच्या घरी फराळाचे खूप जमते असे नाही. पण मालकाचे आपल्याकडे लक्ष आहे, या भूमिकेतून तिला आनंद मिळतो. सरकारचेही तसेच आहे. सरकारने वाजवी किमतीत दिलेल्या या चार वस्तू घरात आल्या तर दिवाळीचा आनंद द्विगुणीत होईल, हा दृष्टिकोन मनात बाळगून गरजूंना केलेली मदत सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारून दिवाळी आनंदमय करावी, असेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते. या चार जिन्नसांनीही ‘आमची दिवाळी गोड झाली’ असे काही लोक म्हणू शकतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com