ब्लॉग : हेलिकॉप्टर लँड झालंय.. : डॉ. अरुण स्वादी
हेलिकॉप्टर लँड झालंय.. : डॉ. अरुण स्वादी
ब्लॉग

ब्लॉग : हेलिकॉप्टर लँड झालंय.. : डॉ. अरुण स्वादी

Dr Arun Swadi

Dr Arun Swadi

सगळ्या चांगल्या गोष्टींना शेवट असतोच असतो. त्यामुळे भारताचा महान क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीच्याही आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट होणे क्रमप्राप्त होते.

काल संध्याकाळी साडेसात वाजता माहीने निवृत्तीची घोषणा केली आणि सुनील गावस्कर, कपिल देव, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या इतकेच मोठे आणि महत्वाचे योगदान असणारा भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार धोनीने आंतर राष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय केले.

प्रत्येक सामन्याची पटकथा लिहिणाऱ्या माहीला आपल्या निवृत्तीची स्क्रिप्ट हवी तशी लिहायला मिळाली नसेलही पण भारतासाठी त्याने सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला.

टी-20 विश्वचषक, मर्यादित षटकांचा विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान असा ग्रँड स्लॅम करणारा तो पहिला कर्णधार. भारतातच नव्हे, जगातही अशी कामगिरी कोणीही केलेली नाही.

पुढे कोणी करेल असेही वाटत नाही. या एका गोष्टीसाठी धोनीला अलौकिक कर्णधार म्हणायला हरकत नाही.

मैदानावर अफलातून अदाकारी करणारा धोनी नुसता ग्रेट कॅप्टन नव्हता. तो क्रिकेटचा राजदूत होता. मैदानावर क्रिकेट कसं खेळलं जावं याचा उत्तम नमुना तो आपल्या बोलण्या चालण्यातून पेश करायचा.

मैदानावर त्यानं कधीही आक्रस्ताळेपणा केलेला मला तरी आठवत नाही. बर्फाच्या लाद्या डोक्यावर ठेऊन तो खेळतोय असं वाटायचं.

या थंड वृत्तीमुळेच तो योग्य निर्णय घेत असावा. टी-20 विश्व चषक अंतिम सामन्यात शेवटच्या ओव्हर साठी अनुभवी भज्जी ऐवजी जोगिंदर शर्माला आणायची त्याची चाल जेव्हढी अफलातून, तेव्हढेच, युवी ऐवजी स्वतःला बढती द्यायची 2011च्या अंतिम सामन्यातील डावपेच आउट ऑफ हॅट.

या दोन्ही निर्णयामुळे आपण वर्ल्ड कपला गवसणी घातली. नागीण डान्स करणाऱ्या बांगला देशला त्याने एक सामन्यात शेवटच्या चेंडूवर ग्लोव्हज काढून रन आउट करून असाच धोबी पछाड दिला.

मैदानावर पंचांशी त्यांनी भांडण केलंय असं कधीच दिसलं नाही. याला अपवाद आय पी एल मधला एक सामना.! धोनी तंबूतून सगळे नियम झुगारून पंचांशी वाद घालायला आल्याचे न भूतो न भविष्यती दृश्य तेंव्हा पाहायला मिळाले. एरवी महेंद्रसिंग धोनी खेळाडू आणि कप्तान म्हणून आदर्श ठरावा.

कसोटी फलंदाज म्हणून धोनीची कामगिरी उत्तम होती. तो काही तंत्रशुद्ध फलंदाज नव्हता पण त्याने लाल चेंडूची चांगली ठुकाई केली. व्हाईट बॉल मात्र त्याचा गुलाम होता. वन-डे सामने कसे संपवायचे याचं त्याचं गणित होतं.

ते क्वचित चुकलं. सुरुवातीला थोडं सबुरीने खेळायचं मग, ठोकशाही अमलात आणायची आणि सामना जिंकायचा हा डाव त्यानं चांगला आत्मसात केला होता. या सामन्याची पटकथा त्यानेच लिहिली की काय असं वाटायचं.

मात्र इंग्लंड मधल्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात त्याचं गणित रन आउट मुळे थोडक्यात चुकलं आणि त्याबरोबर भारताचं आव्हान ही संपलं. बेस्ट व्हाईट बॉल फिनिशरची ही शोकांतिका ठरावी हे दुर्दैव...

धोनी जन्माला आला तो क्रिकेट बॉल ठोकण्यासाठी! उंच उंच षटकार मारण्यात तो पहिल्यापासून माहीर होता. पुढे पुढे तो फिनिशर बनला आणि सावध सुरुवात करायला लागला. हे संघासाठी होतं. आणि दहापैकी नऊ वेळा तो सामने जिंकून द्यायचा. त्याने शोधलेला फटका होता हेलिकॉप्टर शॉट.

मलिंगाच्या यॉर्कर फटकारण्यासाठी, मारण्यासाठी त्याने तो शोधला असावा. या फटक्यांची रॉयल्टी त्याच्याकडेच राहावी.

त्याने अनेक षटकार मारले पण कायमची, संस्मरणीय झालेली सिक्स होती वानखेडेवरील लंकेवरील अंतिम सामन्यातील "ती" मिडविकेट वरील सिक्स.. ती भारतीय क्रिकेट इतिहासातील गोल्डन सिक्स ठरावी.

यष्टीरक्षक म्हणून धोनीने अप्रतिम कामगिरी केली आहे. यष्टीचीत करण्यात त्याचा कोणीही हात धरू शकणार नाही. ब्रॅडमनच्या काळातले विकेटकीपर काय करायचे माहीत नाही. पण जबसे हमने होश संभाला, माही सारखं स्टम्पिंग आपण तरी पाहिलं नाही.

मुंबई लोकलच्या खिसेकापूपेक्षा हे काम तो बेमालूमपणे करायचा. ते लाईटनिंग स्टम्पिंग असायचं. त्याचं झेल घेण्याचं कसबही कौतुकास्पद होतं.

तो फारसे सूर मारायचा नाही, जिम्नॅस्टिक्स नसायचं पण त्याचं यष्टीरक्षण सुरक्षित असायचं.चाळीशीच्या उंबरठ्यावर पोचल्यावरही तो तरुणाईला लाजवेल अशी किपिंग करतो.

महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीचा निर्णय घेण्यामागे या वर्षीचा रद्द झालेला टी 20 विश्वचषक हे कारण असू शकतं. पुढच्या वर्षीपर्यंत या स्पर्धेसाठी थांबणं त्याला योग्य वाटलं नसावं.कदाचित वाढत्या वयाचं दडपणही असावं.

नाही म्हटलं तरी फलंदाजीसाठी लागणारे त्याचे रिफ्लेक्स किंचित मंदावले होते. प्रत्येक खेळाडूची नस जाणणारा धोनी स्वतःच्या खेळाचं मूल्यांकन करत असेलच.

खरं तर इंग्लंड हुन आल्यावर त्याने निवृत्ती जाहीर करायला हवी होती! पण त्यावेळी ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कप त्याला खुणावत असावा.यापुढे तो आयपीएल खेळणार आहे. मला वाटतं किमान तीन वर्षे तरी तो ही स्पर्धा खेळेल. ती गाजवेल आणि धोनी का निवृत्त झाला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडेल.

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबरोबरच भारतीय क्रिकेटमधल्या एका यशस्वी युगाची सांगता झाली आहे. त्याच्या सहकारी खेळाडूंनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यांच्यासाठी तर तो दीपस्तंभ होता.

पण नव्या पिढीसाठी त्याची ओळख दैवत म्हणूनच राहणार आहे. भारताचा हा सच्चा, इमानदार, सुसंस्कृत सज्जन खेळाडू पुन्हा ती जर्सी घालून खेळणार नाही याचं दुःख तर आहेच पण एका गोष्टीचा फार मोठा आनंदही आहे. आम्ही भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार पाहिला, जगातला सर्वश्रेष्ठ व्हाईट बॉल फिनिशर आणि कॅप्टन पाहिला..

दोन विश्वकरंडक जिंकणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे हेलिकॉप्टर आता लँड झालंय.. त्याला जमिनीवरच्या प्रवासासाठी, दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा..

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com