Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगBlog : भेटी लागी जीवा

Blog : भेटी लागी जीवा

प्रा. माधवी महेश पोफळे (Prof. Madhavi Mahesh Pophale)

देहू-आळंदीहून पंढरपूरकडे ( Dehu Aalandi To Pandhrpur Wari ) जाणार्‍या पायी वारीचे कुतूहल मला अगदी लहानपणापासूनच होते. माझी आजी अगदी रोज न चुकता गावातल्या पांडुरंगाच्या देवळात जायची आणि सतत तिच्या मुखात पांडुरंगाचे नाव असायचे. काहीही झाले की तिची सारी सुखदुःख ती पांडुरंगावरच सोडायची, तेव्हा नेहमी मी तिला म्हणत, तुझा पांडुरंग असा कधीही येईल का तुझे संकट, तुझ्या समस्या सोडवायला? तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास मला नकळत खूप काही सांगून जायचा. तेव्हापासूनचे पांडुरंगाविषयी कुतूहल आजही आहेच. विठ्ठलाला उठवण्यापासून तर शेजारतीपर्यंत मंदिरात येरजारा घालत, तेव्हा मी माझ्या आजीला गंमतीने नेहमी म्हणायचे एवढ्या चकरा मारशील तर घरचा पांडुरंग रुसेल ना! तेव्हा ती मला म्हणायची, तू भेट एकदा माझ्या पांडुरंगाला तेव्हा कळेल त्याची भक्ती.. तेव्हा मला खरेच वाटले की भेट घ्यावी पांडुरंगाची. तेव्हापासून आस लागली ती पांडुरंगाच्या भेटीची.‘भेटी लागी जीवा लागलीसे आस…’

- Advertisement -

देवा पांडुरंगा, माझ्या जीवास तुझ्या भेटीची फार इच्छा आहे. मला तुझ्या भेटीसाठी बोलव. पौर्णिमेचा चंद्र हे जसे चकोर पक्ष्याचे जीवन आहे तसेच माझ्या मनाला तुझी भेट हेच जीवन आहे. तेव्हा मला कळले पांडुरंगाच्या भेटीची आस भक्तांना का असते? आषाढ महिन्याची चाहूल लागताच पंढरपूरकडे पायी जाणार्‍या वारकर्‍यांसोबत मी जाते त्यांच्यात कसला भेद नाही, क्रोध, अभिमान सगळे विसरून एकमेकांना माऊली माऊली म्हणत नमस्कार करत असतात. त्यांच्या नामघोषाने पाषाणालाही पाझर फुटतो, आकाशातून पुष्पवृष्टी होते, टाळ-मृदुंगाच्या तालावर नाचते विठ्ठलमय होतात.

खेळ मांडीयेला वाळवंटी, घाई नाचती वैष्णव भाई रे…

मीदेखील त्यांच्या तल्लीन होते आणि चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येऊन आनंदाने पांडुरंगाचे नामस्मरण करते. वारीदरम्यान रिंगण केले, तुळशी डोक्यावर घेऊन त्या रिंगणात धावत ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष केला, रिंगणदेखील श्रद्धेय मानले जाते, वारी, कीर्तन, प्रवचन झाले, अनेक कीर्तनकार, प्रवचनकार या वारीत होते. तुकोबा, ज्ञानोबा जयघोषाने गरजू लागले अवघे पंढरपूर.

अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर….

विठ्ठलाच्या नावाने जयघोष होतो आणि चंद्रभागेच्या तीरावर उभे राहून विटेवर उभी असलेली पांडुरंगाची सावळी मूर्ती दिसू लागते.

‘चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पाहा विटेवरी, पांडुरंग हरी तो पाहा विटेवरी….’

तो विटेवर उभा असलेला पांडुरंग त्याच्या भेटीला वारकरी पोहोचतात आणि विठ्ठलाला अळवणी घालतात.

विठू माऊली तू… माऊली जगाची…

या वारीत येणारी सगळीच मंडळी वेगवेगळ्या ठिकाणची होती. नोकरदार, शेतकरी, कामगार सर्वच वर्गातील. त्यातला शेतकरीवर्ग शेतीची मशागत झाली, पाऊस पडला तर पेरणीचे काम उरकवून वारीत सहभागी झाले. वारीत येण्याच्या आधी त्याला त्याच्या शेतातही पांडुरंगाचे दर्शन झाले आणि माझा शेतकरी राजा म्हणतो,

कांदा-मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण-मिरची-कोथिंबीर अवघा झाला माझा हरी।

असे म्हणत पांडुरंगाला सर्वत्र पाहत असतात. मीही रांगेत उभी असते आणि पांडुरंगाच्या भेटीसाठी वाट पाहते, आता मला पांडुरंगाचे दर्शन होणार हाच आनंद होता. पांडुरंगाजवळ जाऊन त्याला आधी मन भरून पाहू म्हटले पण हिंमतच झाली नाही त्याच्या डोळ्यात डोळे टाकून पाहण्याची. त्याच्या पायावर डोकं ठेवते, वर्षानुवर्षे भक्तांसाठी उभा असणारा पांडुरंग तुझे पाय नाही दुखत का रे उभे राहून राहून? दमला असशील ना ? थोडीही विश्रांती नाही तुला. बरे तू तर तू त्या रखुमाईला पण दमवतोस.. तुझे भक्त आले की तिला पुरणा-वरणाचा घाट घालायला लावतोस, कर की थोडा तू ही आराम आणि रखुमाईलाही सांग थोडा आराम करायला. पांडुरंग माझ्या बोलण्यावर गालातच हसतो, म्हटले काय झाले हसायला? तर म्हणतो कसा, मी भक्तांचा थकवा काढण्यासाठी उभा आहे. कधीचेच माझ्या भेटीसाठी पायी पायी येत आहेत. त्यांचा थकवा माझ्या भेटीने जातो गं, त्यांना भेटल्यावर माझाही थकवा नाहीसा होतो. गेल्या दोन वर्षांत माझ्या भक्तांची भेटच नव्हती बघ आणि आज माझी भेट होणार. तुझी भक्ती वेदांनाही नाही कळली.. असा कसा रे तू?

‘कानडा राजा, कानडा राजा पंढरीचा… कानडा राजा पंढरीचा..’

असे म्हणत मी रखुमाईकडे गेले. पाहते तर काय ती पण उभीच.. एकटीच.. मी तिच्या पायांवर डोकं ठेवून तिला म्हटले,

‘तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालेना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना।’

ती हसली आणि तिने मला तिच्या पायांवरून उठवले.. उठ बाळ उठ असे म्हणताच मी जागी झाले. मला साक्षात पांडुरंग आणि रखुमाईने दर्शन दिले आणि माझी पावले थेट पंढरीकडे जाऊ लागली…

‘पाऊले चालती पंढरीची वाट…..’

- Advertisment -

ताज्या बातम्या