Friday, April 26, 2024
Homeब्लॉगलोकशाहीच्या नावांन चांगभले

लोकशाहीच्या नावांन चांगभले

पण या निमित्ताने गांवोगावी रंगलेल्या या उत्सवाला आदर्शाचे धडे गिरविण्याचे राहून गेल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी माणंस विकली गेली असल्याची चर्चा समाज माध्यमात रंगली. माणंस विकली जातात तशी व्यवस्था देखील विकली जाऊ लागल्याचा भासही अनेकदा होत राहातो.

कधीकाळी माणंस विकली जायची…पण आता अख्खा गाव विकतांना पाहावे लागू नये म्हणजे झाले.मते विकत घेतली जाऊ शकतात.पण त्या मतांसोबत माणंसही आता विकली जात आहे. त्यामुळे शिक्षणाच्या इयत्ता पुढे जातांना पाठयपुस्तकातून शिकवलेली लोकशाही जगण्यात अधोरेखित होण्याचे राहून तर गेली नाही ना ? अशी शंका येते.

- Advertisement -

शिक्षणातून नागरिकशास्त्र विषय शिकतांना लोकशाहीची तत्वे आणि निवडणूकाचे महत्व,मताचे पावित्र्य शिकविले जात असतांना त्याचे दर्शन जीवन व्यवहारात होत नाही , तर त्या सर्वांचे प्रदर्शन होत राहाते.अस जेव्हा घडत राहाते तेव्हा लोकशाहीच्या नावांन चांगभल असत म्हणावे लागेल.

समाज अधिक उत्तम व जबाबदार नागरिकांचा असायला हवा . या करीता कायदे निर्मितीवर भर देण्यात येतो. आपल्याला उत्तम व्यवस्था हवी आहे त्या करीता आपल्याला समाज अधिक चांगला हवा आहे. समाजाला कोणत्या दिशेने न्यायचे आहे याकरीता सत्तास्थांनाशी निगडित व्यवस्था कायदे निर्माण करीत असते. कायद्याचे पालन होण्यासाठी पुन्हा अमंलबजावणीची व्यवस्था उभी राहाते.कायदे मोडले तर नियंत्रण आणणारी पुन्हा एक व्यवस्था असतेच.

अर्थात समाज अधिक उत्तम राहावा हिच त्यामागील धारणा असते.पण शेवटी कायदे व नियंत्रण आणणारी व्यवस्था ज्या समाजासाठी निर्माण केली जाते तो समाजच जर अधिक शहाणा निर्माण केला तर कायदे आणि नियमांच्या निर्मितीची गरज पडणार नाही. समाजात जेव्हा शहाणपणाची पेरणी होत नाही तेव्हा प्रत्येकवेळी कायद्याची गरज वाटत जाते. उत्तम समाज निर्माण करण्याचे माध्यम तर केवळ शिक्षण आहे. या शिक्षणांच्या व्यवस्थेतून जर जबाबादार व शहाणपण असलेला नागरिक निर्माण केला, तर अनेक प्रश्न निकाली निघू शकतील.

शिक्षणातून माणूस निर्माण करण्याचे आव्हान पेलण्याची निंतात गरज आहे.महात्मा गांधी,कृष्णमूर्ती यांनी माणूस निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. शिक्षणातून माणूस निर्माण व्हायला हवा असे विवेकांनद सातत्याने म्हणत होते.जगभरातील शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा शिक्षणांच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या असल्या तरी प्रत्येक व्याख्येच्या मूळ गाभ्याशी माणूसच आहे हे लक्षात घ्यायला हवे.

काही विचारवंतानी सरळ सरळ माणूस घडवायला हवा असे नमूद करीत शिक्षणाची दिशा स्पष्ट केली.परंतू दुर्दैवाने शिक्षणाचा विचार केंद्रस्थानी ठेवताना साक्षरतेचा विचार जितका केला गेला तितका विचार माणूसपणाचा आणि विवेकाचा झाला नाही.त्यामुळे गेले सत्तर वर्षात आपण साक्षरतेचा आलेख ऐंशी पंच्याशी टक्यावरती नेला खरा, पण माणूस निर्मितीचा आणि माणंसातील माणूसकीचा आलेखाला मात्र घसरती ओहटी लागली आहे. त्यामुळे शिक्षणाचा विचार केंद्रस्थांनी करून आपण जोपर्यंत शिक्षणात गुंतवणूक करीत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेरच्या मलमपटटया कराव्या लागतील हे निश्चित.

शिक्षण हे मुलगामी परिवर्तनांचे केंद्र आहे.त्या केंद्रातून जे काही पेरले जाते ते उगवते असे म्हटले जाते.त्यामुळे आपण लोकशाही जीवन प्रणाली स्विकारल्यानंतर ती जीवन व्यवहारात दिसायला हवी.लोकशाहीत निवडणूका अपरिहार्य असतात.बहुमताच्या हाती राजसत्ता देण्याचा तो एकमेव राजमार्ग आहे.त्यामुळे लोकशाहीत निवडणूका होतांना केले जाणारे मतदान हा विवेकाने बजावयाचा अधिकार असतो.

आपण ज्यांना निवडून देणार आहोत ती लोकप्रतिनिधी म्हणजे विकासाचे दूत असतात.त्यामुळे आपल्याला पुढील पाच वर्षासाठी विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी लोकप्रतिनिधी अधिकाधिक उत्तम असावे लागतात.ते जितके प्रामाणिक आणि उत्तम असतील तितका विकासाचा आलेख उंचावलेला पाहावयास मिळेल.

पण दुर्दैवाने आपल्याकडे गेले काही वर्ष व्यवस्थेतील प्रामाणिकपणाचा आलेख घसरतांना पाहावयास मिळत आहे.आपल्याला मतदानाच्या निमित्ताने मतदाराना लाच देताना जे काही पाहावयास लागते आहे ते कशाचे धोतक मानायचे..? कोठे साडया वाट..कोठे पार्टया दे..कोठे पैसे वाट,कोठे धमक्या दे असे जे काही दिसते आहे…ते लोकशाहीत आपण जबाबदार आणि शहाणपणाची पेरणी करण्यात अपयशी ठरलो आहोत का ? याचा विचार करण्याची गरज आहे.राज्यकर्ते बदमाश आहेत असे म्हणून मतदार जबाबदारी झटकू शकत नाही.

प्लेटो नावांचा विचारवंत म्हणत असे “ जसा समाज तसे राज्यकर्ते…आणि जसे राज्यकर्ते तसा समाज..कारण समाजाचे प्रतिबिंब म्हणजे राज्यकर्ते असतात आणि राज्यकर्ते म्हणजे समाजाचे प्रतिबिंब असते ” त्यामुळे आपण कोणा एकाकडे बोट दाखवून जबाबदारीतून पळ काढता येईल, पण ती पळवाट म्हणजे लोकशाहीच्या मृत्यूच्या दिशेचा प्रवास ठरेल.

त्यामुळे आपण जो पर्य़ंत शिक्षणातून विवेक पेरत नाही तोपर्यत मानसिक सुधारणा आणि शहाणपण कसे येणार.. ? लोकशाही प्रक्रियेत जेव्हा भ्रष्टाचार येतो तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण व्यवस्थेला अनुभवायला लागतो. एखादा लोकप्रतिनिधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटत असेल आणि पैसे मिळवत मतदार मतदान करणार असतील, तर निवडून येणारा उमेदवार विकासाची कामे प्रामाणिकपणे करतील अशी आशा बाळगणे हा मूर्खपणा ठरेल.

जो पैसा वाटेल तो वाटलेला पैसा मिळविण्याचा प्रयत्न करेल.पुन्हा निवडणूकांना सामोरे जायचे असेल तर पुन्हा वाटण्यासाठी त्याला पैसा मिळवायला लागेल.अशा परीस्थितीत पैसा मिळवायचे म्हणजे कामात खोट करावी लागेल.त्यामुळे मतदार जोपर्यंत प्रामाणिकतेने मतदान करत नाही आणि कोणी काही घेऊन आले तर ते नाकारत नाही तोपर्यंत व्यवस्थेतील भ्रष्टाचार कमी होण्याची शक्यता नाही.मतदानाचा मिळालेला अधिकार इतक्या सहजतेने मिळालेला नाही.त्यासाठी झालेला संघर्ष जाणला की त्याचे मोल कळते.

त्यामुळे मतदान हा पवित्र अधिकार आहे त्याचा पुरेपूर उत्तम उपयोग करायला हवा.अनेकदा अनेक शिकलेली माणंस देखील या प्रक्रियेकडे नकारत्मकतेने पाहू लागल्यांने तेही मतदान न करणे पसंत करतांना दिसतात..त्या प्रक्रियेपासून दूर राहाणे त्यांना हिताचे वाटू लागले आहे.हे सारेच सोबतीने येणारे आहे.भ्रष्टाचाराच्या नावाने बोटे मोडून ही माणंस दूर जातात..आपला काय त्याच्याशी संबंध असे म्हणून जबाबदारी नाकारत असले तरी देखील ही जबाबदारी आपण नाकारू शकत नाही.

आपल्या पर्यंत जे काही येते ते म्हणजे भ्रष्टाचाराच्या चक्राचे चाक आहे.ते सतत फिरत राहाते. त्यामुळे मतदारानी नाकारणे म्हणजे भ्रष्ट लोकप्रतिनिधींना दूर करणे आहे.व्यवस्थेतील भ्रष्ट प्रतिनिधी दूर झाले, तर लोकशाहीच्या माध्यमातून विकासाचा पाया सामान्यांसाठी घातला जाऊ शकेल. लोकशाही भक्कम करणे म्हणजे लोकांमध्ये विवेक पेरणे आहे. तो पेरण्याचे एकमेव मार्ग शिक्षण आहे हे लक्षात घ्यायला हवे.

शिक्षणातून विवेक पेरला गेला तर शहाणपण येईल. त्याच बरोबर चिकित्सक दृष्टीकोन निर्माण केला गेला , तर आपण काय करतो याची जाणीव होण्यास मदत होईल.समाज कोणत्या दिशेने घेऊन जायचा आहे तो विचार शिक्षणातून पेरला जातो.त्यामुळे शिक्षणाबाबत समाज व राज्यकर्त्यांनी अधिक जागृत राहाण्याची गरज असते. जगभरात जे देश प्रगत आहेत त्या देशात शिक्षणावरील गुंतवणूक करण्यात येते याचा अर्थ केवळ आर्थिक गुंतवणूक असा नव्हे तर त्या सोबत विचाराची पेरणी आणि विवेक बांधणीला देखील महत्व आहे.

ती पेरणी करणारी व्यवस्थेत काम करणा-या प्रत्येकाने समाजातील प्रत्येक घटनेची जबाबदारी स्विकारून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडता कामा नये.समाजाप्रति प्रेम,कळवळा बाळगायला हवा..मला काय त्याचे असे म्हणून आपण जबाबदारी टाळली तर समाजाची नैतिकता आणि शहाणपणाची उंची कशी वाढणार ? शिक्षक हाच राष्ट्राचा व समाजाचा निर्माता आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्या मोठेपणात जबाबदारी देखील असते हे गृहीतक आहे.

जो पेरतो त्यास अधिक सन्मान समाजात मिळतो पण केवळ पेरणी करून चालत नाही. त्यासाठी संपूर्ण जबाबदारी स्विकारावी लागते.त्यासाठी खस्ता खाव्या लागतील..स्वतःला गाढून घ्यावे लागते.त्यादिशेने प्रवास सुरू ठेवला तर बरेच चित्र बदलेलेल पाहावयास मिळेल.अन्यथा निवडणूका होत राहातील..मतदान घडत राहिल.लोकप्रतिनिधी निवडून येतील आणि भ्रष्टाचाराचा आलेखही उंचावत राहील आणि विकासाची प्रतिक्षा देखील करावी लागेल..त्यामुळे शिक्षणातून विवेकाची पेरणी महत्वाची ठरते.अन्यथा लोकशाहिच्या नावांन चांगभल असंच म्हणाव लागेल.

– संदीप वाकचौरे

लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या