Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगBlog : आयुष्यातील महत्वाच्या वळणांवर समुपदेशन हेच प्रभावी अस्त्र...

Blog : आयुष्यातील महत्वाच्या वळणांवर समुपदेशन हेच प्रभावी अस्त्र…

आजमितीला समाजात सर्वच प्रकारच्या समस्या जसे की मानसिक ताण तणाव, क्लेश, एकटेपणाची भावना, आरोग्याच्या समस्या, आत्महत्या, घटस्फोट, विवाह बाह्य संबंध, सहनशक्ती चा होत चाललेला ऱ्हास, संपत चाललेला संयम, त्यातून संपुष्टात येत चाललेली कुटुंब व्यवस्था, वैवाहिक नातेसंबंध आणि पालकांच्या भांडणांमुळे भरडली तसेच भरकटली जाणारी युवा पिढी पाहायला मिळते….

आपण सर्वजण जरी दररोजचे दैनंदिन आयुष्य जगत असलो आपली नित्य कर्तव्य, जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असलो तरी कुठेतरी आपले अंतर्मन अस्वस्थ, दुःखी आणि असमाधानी असतेच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती न कोणती उणीव, सल आपल्याला सतत जाणवत असते.

- Advertisement -

शालेय विध्यार्थी असोत, महाविद्यालयीन युवक युवती असोत, विवाहित स्त्री पुरुष असोत, नवविवाहित दाम्पत्य असोत किंवा जेष्ठ नागरिक असोत कोणत्याही वयोगटातील कोणीही स्वतः च्या आयुष्यात पूर्णपणे सुखी समाधानी नसतेच. जे आहे त्याही पेक्षा जे जवळ नाहीये, जे मिळालं नाही, जे मिळवता आलं नाही, यामुळे आपण झुरत असतो.

समाजातील इतर लोकांच्या आयुष्याशी कळत नकळत आपण आपली स्वतः ची तुलना करत असतोच. आपण कितीही उत्तम परिस्थिती मध्ये असलो तरी स्वतः ला असुरक्षित, अपूर्ण, अपयशी समजत असतो. त्यातून आपल्याला आपल्या आयुष्यात नैराश्य, एकटेपणा, कमतरता, पोकळी जाणवत असते. कुठेतरी काहीतरी कमतरता सातत्याने भेडसावत असते. कोणी नौकरी व्यवसायात असमाधानी असते तर कोणी वैवाहिक आयुष्यात !विध्यार्थी आपण करीत असलेल्या करियर मधील स्पर्धेमुळे अभ्यासामध्ये तणाव घेत असतात तर युवक युवती भविष्यातील मिळणारी नौकरी, व्यवसाय, जीवनसाथी कसा मिळेल, लग्न कधी जमेल याबाबत चे विचार यामुळे व्यथित असतात.

तारुण्यातील अवखळ वयात झालेले प्रेम, त्यामध्ये, त्यामुळे निर्माण झालेले गुंतागुंतीचे प्रसंग, लग्न जुळणं, वेळेत न जमणं अथवा आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी न होणं यासारख्या नानाविध समस्यांनी तसेच त्यातील चढ उतार यामुळे आयुष्याच्या अनेक टप्प्यावर माणूस डिस्टर्ब होतो. कधी कोणाकडून झालेला विश्वासघात, कोणी आपला घेतलेला गैरफायदा, कोणी केलेली आर्थिक भावनिक मानसिक फसवणूक मानवी मनाला कमकुवत करते.

लग्न करण्याआधी, ठरविण्याआधी ते योग्य व्यक्तीशी होणे, त्या स्थळाबद्दल सर्व खरी माहिती आपल्याला माहिती असणे हा देखील आज खूप सवेंदनशील विषय झालेला आहे. समुपदेशन ला अशी अनेक प्रकरण येतात ज्यामध्ये संबंधित मुलगा अथवा मुलीने तिच्या घरच्यांनी आमच्यापासून खूप गोष्टी लपवल्या. सांगितलं भलताच आणि निघाले भलतेच, आमची फसवणूक झाली. अश्या प्रकरणात समुपदेशन चाच एक भाग म्हणून लग्न जमविण्यापूर्वी अथवा लग्न झाल्यानंतर सुद्धा संबंधित स्थळाची सखोल पुराव्यानिशी माहिती आणि त्याचा अहवाल काढून दिला जातो. जेणेकरून पुढील निर्णय घेणे सोईस्कर होते आणि फसवणूक टाळली जाऊ शकते.

भूतकाळात आपण घेतलेले चुकीचे चुकलेले निर्णय आठवून आपण पस्तावात असतो आणि या सगळ्याचा राग आपल्या कुटुंबातील सदस्यांवर, मित्र मंडळी नातेवाईक याना जबाबदार धरून त्यांचेवर काढत असतो.

आपल्या जीवनातील आपल्या बालपणापासून घडलेल्या घटना, घडामोडी याचे आपल्यावर चांगले वाईट परिणाम होत आलेले असतात. त्यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाची जडण घडण झालेली असते. आपल्याला आलेले अनुभव, आपल्या भोवतालची परिस्थिती यानुसार आपण निर्णय घेत आलेलो असतो. जे आपल्याला योग्य वाटते ते समोरच्याला अयोग्य वाटणे, जे आपल्याला करायचे आहे त्याला इतरांनी नकार देण हा कॉमन फॅक्टर तर सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. या सर्व मानसिक गुंतागुंतीच्या प्रक्रियेत समुपदेशन आपल्याला कायदेशीर, भावनिक, मानसिक दृष्टीने स्थिर होऊन, योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करते.

आपल्यावर प्रभाव टाकणारे, आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका निभावणारे आपले आई वडील इतर स्वकीय, गुरुजन, मित्र मैत्रिणी, आप्त नातेवाईक यांचे वेळोवेळी दिलेले चांगले वाईट सल्ले, टाकलेला दबाव अथवा प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात दिलेली मोकळीक, त्यांनी सांगितलेले अनुभव यानुसार आपण आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन ठरवत असतो. अनेकदा सर्व काही आपल्या हातात असून सुद्धा आपण चुकतो, तर कधी इतरांनी भरीला घातल्यामुळे आपण भरकटतो.

कारण काहीही असो आयुष्यात खूप काही करायचा जगायचं राहूनच गेलं असं प्रत्येकाला वाटत असत. त्यातून आताची बदलत चाललेली जीवन शैली, विभक्त कुटुंब रचना, गाव सोडून शहरात स्थलांतरित झालेली पिढी, एकलकोंडे आयुष्य जगण्याची सवय, एकमेकांमधील संवाद आणि संभाषणाचा आभाव, सातत्याने वाढणारी स्पर्धा यामुळे सगळेच स्वतःला उत्कृष्ट, उत्तम, यशस्वी सिद्ध करण्याच्या पाठीमागे धावणे तसे जगाला भासवणे यातून आपली स्वतः चीच फसवणूक करीत असतात.

सत्य स्वीकारून जगणे अनेकांना शक्य होत नाही. विवाहबाह्य संबंध ठेवणाऱया महिला स्वतःच्या मनाला, स्वतःला सातत्याने फसवत असतात आणि अनैतिक, बेकायदेशीर संबंधांमधून स्वतःचे आयुष्य बरबाद करीत असतात. कायदेशीर विवाह, कायदेशीर नवरा आणि तत्कालीक साथ देणारा प्रियकर यातील फरक लक्षात घेऊन त्यानुसार कोणाचाही संसार उध्वस्त न करता स्वतःचे आयुष्य सुद्धा मार्गी लावणे अनेक महिलांना जमत नाही. समुपदेशन अश्या महिलांना सत्य परिस्थिती चा स्वीकार करुन स्वतःचे आयुष्य स्थिर करण्याकरिता मदत करते.

स्वतः च्या मनाशी सुद्धा प्रामाणिक न राहता आपण स्वतःला फसवतो आणि त्यातूनच आपली मनःशांती ढासळत चाललेली आहे. मनाचा समतोल बिघडला, मानसिक स्वास्थ हरपले की ते पटकन लक्षात येत नाही पण कालांतराने अप्रत्यक्ष रित्या आपण विचारांच्या खोल गर्तेत जातं राहतो.

त्यातूनच मानसिक आजार, आत्महत्या, विकृती, वादविवाद, भांडण, धुसफूस, चिडचिड, संशयी वृत्ती, सातत्याने दुसऱ्याला दोष देणे, दुसऱ्याच्या चुका काढणे, कोणत्याही परिस्थिती ला स्वतःला जबाबदार न धरता आजूबाजूच्या लोकांना त्यासाठी दोष देणे असा स्वभाव तयार होऊ लागतो. आक्रमक स्वभाव, इतरांची सतत निंदा नालस्ती करणे, हिंसाचार, गुन्हेगारी, आपल्या अपयशाला इतरांना जबाबदार धरणे, असे दुर्गुण वाढीस लागतात आणि आपलेच कौटुंबिक, वैवाहिक, व्यावसायिक आयुष्य बिघडायला सुरुवात होते.

कोणत्याही कारणास्तव जेव्हा आपले नातेसंबंध, आपले करियर, आपली आर्थिक परिस्थिती अथवा आपली सामाजिक प्रतिष्ठा, शारीरिक आरोग्य धोक्यात येऊ लागते, आपल्या मनाप्रमाणे न घडता वेगळेच घडू लागते, आपले अंदाज चुकीचे ठरतात किंवा आपले नियोजन यशस्वी होत नाही तेव्हा आपण खोलात जाऊन विचार करु लागतो. अश्यावेळी अनेकदा लक्षात येते की आपल्याला असे आयुष्य किंवा अशी परिस्थिती अपेक्षित नव्हती. आपल्यासमोर अचानक येणाऱ्या समस्या, त्रास देखील आपल्या आत्मविश्वासाची परीक्षाच घेतो आहे.

अनेकदा उध्दभवलेल्या समस्या चे मूळ आपणच घेतलेल्या चुकीच्या निर्णयात असते किंवा इतरांमुळे चुकीच्या लोकांनी आपल्या आयुष्यात केलेल्या हस्तक्षेप मुळे आपल्याला हकनाक त्रास सहन करावा लागलेला असतो. कारणीभूत कोणीही असो अशी परिस्थिती सावरण्यासाठी, त्यातून बाहेर पाडण्यासाठी एकमेकांना आधार देणे, धीर देणे, संयम ठेवणे, समजावून घेणे अपेक्षित असते. परंतु खूपदा तसे होताना दिसत नाही. प्रथम समस्या स्वीकारणे, ती समजावून घेणे आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यावर मार्ग काढणे हा एकमेव पर्याय आहे. पण बहुतेक लोक समस्येपासून पळताना दिसतात. अनेक लोक चुकीच्या परिस्थिती साठी दुसऱ्यावर आरोप करण्यात स्वतःला धन्य मानतात.

आपल्या कुटुंबातील लोक, कार्यालयातील सहकारी, आपले मित्र मैत्रिणी सर्वांची हि जबाबदारी असते की कोणावरही अशी वेळ एकतर येऊ देऊ नाही अथवा दुर्देवाने आलीच तर त्याला योग्य मार्ग दाखवावेत , त्याला योग्य दिशा द्यावी. पण आजकाल समाजातच काय पण कुटुंबात देखील इतक्या मोठया मनाचे आणि प्रामाणिक पणे आपली काळजी करणारे आपल्यावर प्रेम करणारे लोक पाहायला मिळत नाहीत.

जो तो स्वतःच्याच धुंदीत जगताना दिसतो. प्रत्येकाला स्वतःचच पडलंय कोणाला कोणाशी घेणं देणंच नाही अश्या अविर्भावात एकूणच सगळे असतात. एखाद्याची बिघडलेली मानसिकता त्याला किती त्रासदायक होऊ शकते याचा विचार न करता त्यालाच दोष देऊन, त्याच्यावर वाटेल तसें आरोप लावून नामानिराळे होणारे नातेवाईक आपल्याच समाजात आहेत. एखाद्याचे मानसिक खच्चीकरण करून त्याला अधिक बदनाम कस करता येईल याकडे आजकाल जास्त लक्ष दिले जाते असे वाटते.

अश्या व्यक्तीचा गैरफायदा घेणारे महाभाग देखील अस्तित्वात आहेत. अनेक ठिकाणी नातेवाईक, मित्र मंडळीच समस्या वाढविण्यासाठी अप्रत्यक्ष रित्या कारणीभूत असतात. नेमक कोणाला आपलं समजावं, कोण नक्की आपला चांगला विचार करतो, कोणाला आपली मनापासून कळकळ, कोण आपल्या जिवाभावाचा आहे हाच संभ्रम प्रत्येकाच्या मनात असतो.

त्यामुळे आपला त्रास, आपली मानहानी, आपली फसवणूक, आपली बिघडलेली चुकलेली आयुष्याची गणित कोण सोडवू शकत कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मन मोकळे करावे हेच अनेकांना समजू शकत नाही आणि त्यातूनच माणूस आतून तुटत जातो, संपत जातो.

अश्या कसोटीच्या वेळी जिथे आपली विचारशक्ती संपते तिथे समुपदेशन आपल्याला मोठा आधार देऊ शकते. आपण जे आपल्याला ओळखणाऱ्या, जवळच्या माणसांजवळ मोकळेपणाने बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, अनेकदा आपल्या लोकांसमोर आपल्याला स्वतः च्या चुका मान्य करणे अयोग्य वाटते. अश्या वेळी कोणत्याही कितीही गोष्टीवर समुपदेशकाशी विस्तृत, निवांत चर्चा केली जाऊ शकते.

आपली सर्व माहिती, सर्व समस्या गोपनीय ठेऊनच पूर्ण विश्वासाने आपल्याला आपल्या समस्यांवर उत्तम आणि योग्य समाधान मिळण्यासाठी मदत होते.

वर्षानुवर्षे आपल्या मनात साठलेल्या साचलेल्या आपल्या मनावर भावनांवर आघात केलेल्या अनेक घटना घडामोडी ज्या आपण कोणाजवळ बोललेलो नसतो पण आपल्या वर्तमानातील समस्यांचे मूळ मात्र यातच दडलेले असते. समुपदेशन च्या साहाय्याने आपल्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर उपाययोजना करणे सोपे होते.

अनेकांच्या आयुष्यात कोणत्याही स्वरूपाची समस्या आली की त्याला वरवर मार्गदर्शन करून तात्पुरती मलमपट्टी करून भागत नाही तर त्या समस्येचा, त्यामागील पार्शवभूमीचा खोलवर अभ्यास करून त्यावर तोडगा काढणे अपेक्षित असते. व्यक्ती कितीही अनुभव संपन्न असली, सुशिक्षित असली, सुसंस्कृत असली वयाच्या कोणत्याही टप्प्यात असली तरी कुठे न कुठे त्याला कोणाशी तरी स्वतःच्या आयुष्यातील समस्या, त्रास, घालमेल, कुचंबणा बोलून मन मोकळ करावंसं वाटतच.

आपल्या आयुष्याकडे आपण ज्या नजरेने पाहतो त्यापेक्षा समुपदेशन वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू शकतो त्यामुळे जो निर्णय आपण घेऊ शकत नाही, जी व्यथा आपण सोडवू शकत नाही त्याठिकाणी समुपदेशन नक्कीच मदत करते. समुपदेशन घेतांना कोणालाही कमी पणा अथवा अपमान अथवा भीती बाळगण्याची अजिबात आवश्यकता नसते. आपण समुपदेशन घेतोय म्हणजे आपल्याला गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार झाला आहे, आपल्याला आपल्या आयुष्यातील समस्या स्वतः सोडवता आल्या नाहीत म्हणजे आपण आता पूर्ण संपलो आहोत किंवा कोणतीही परकी त्रयस्थ व्यक्ती आपल्याला कसा आणि काय सल्ला देणार, आपण हारलो आहोत अशी विचारसरणी ठेवणे चुकीचे आहे. प्रत्येकाला येणाऱ्या समस्या, अडचणी, आव्हानात्मक परिस्थिती वेगवेगळ्या स्वरूपाची असते. कोणत्याही समस्येला जसे अनेक बाबी, अनेक प्रसंग कारणीभूत असतात तसेच प्रत्येक समस्येवर पर्याय देखील अनेक उपलब्ध असतात.

आपल्याला नेमका कोणता पर्याय कश्याप्रकारे अंमलात आणणे आवश्यक आहे यावर समुपदेशन मदत करते. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून, आहे त्या परिस्थिती चा स्वीकार करून आपल्या जवळच्या सगळ्याच माणसांना विश्वासात घेऊन भविष्याची वाटचाल करण्यासाठी समुपदेशन मदत करते.

समुपदेशन आयुष्यातील कोणत्याही वळणावर, कोणत्याही समस्येवर घेतले जाऊ शकते. शक्यतो समस्या छोटी असताना किंवा कोणत्याही गोष्टीचा, व्यक्तीचा त्रास होतोय हे जाणवायला लागल्यावर ताबडतोब सतर्क होणे आवश्यक आहे. परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जाण्याआधी तिला सावरणे खूप गरजेचे असते. वेळीच आपल्या समस्येचे समाधान शोधून त्यावर योग्य ती कार्यवाही केली तर भविष्यात आपल्याला होणारा त्रास, उध्दभवणारी जटिल परिस्थिती, अजून विस्कळीत होणारी आयुष्याची घडी अश्या अप्रिय घटनांना वेळीच लगाम घालता येतो. आपल्या आयुष्याशी आपण इतरांना खेळू देण्यापेक्षा, आपण स्वतः तर्क वितर्क लावून स्वतः चा वेळ वाया घालवण्यापेक्षा समुपदेशन घेऊन आपण बरेच चिंतामुक्त होऊ शकतो यात शंकाच नाही.

– मीनाक्षी जगदाळे.

- Advertisment -

ताज्या बातम्या