‘पॉझिटिव्ह’ आणि ‘निगेटिव्ह’

‘पॉझिटिव्ह’ आणि ‘निगेटिव्ह’

एखादी नवी घटना घडली किंवा एखादी बाबी नव्याने आली तर काही शब्दांचे वजन वाढते तर काही शब्दांचे घटते. ‘करोना’ नावाच्या अतिभयानक व्हायरस अर्थात विषाणूने असेच दोन शब्द प्रचलित केले ते म्हणजे ‘पॉझिटिव्ह’ आणि ‘निगेटिव्ह’ हे होय. ‘पॉझिटिव्ह’ याला मराठीत ‘सकारात्मक’ असे तर ‘निगेटिव्ह’ला ‘नकारात्मक’ असे संबोधन आहे. माणसाने नेहमी सकारात्मक असावे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असे म्हटले जाते. सकारात्मक व्यक्ती पुढे जाते अर्थात प्रगती करते, तर नकारात्मक विचारांची व्यक्ती मागे पडते. आणि हे सत्य आहे. पण या सत्याच्या मागे एक पुसटसे ‘असत्य’ दडले आहे आणि ते वास्तव असल्याचे ‘करोना’नो दाखवून दिले आहे.

‘करोना’ चाचणी अहवाल ‘पाझिटिव्ह’ अर्थात ‘सकारात्मक’ आला तर संबंधित रुग्णाच्या डोळ्यासमोर रेड्यावर बसून येत असलेला ‘यमराज’ दिसू लागतो आणि अहवाल ‘निगेटिव्ह’ अर्थात ‘नकारात्मक’ आला तर इहलोकीचे आपले वास्तव्य अजून वाढले आहे, असे संबंधित रुग्णाला वाटू लागते. ‘एड्स’ किंवा अन्य रोगांमध्ये सुद्धा ‘पॉझिटिव्ह’ आणि ‘निगेटिव्ह’ हे शब्द वापरले गेले; परंतु ‘करोना’ काळाइतके वजन या दोन्ही शब्दांना अन्य रोगांत प्राप्त झाले नाही. जीवनशैली जर ‘निगेटिव्ह’ ठेवून माणूस वागू लागला तर करोना त्याच्याशी मैत्री करतो आणि संबंधित व्यक्ती ‘करोना पॉझिटिव्ह’ बनते.

जीवनशैली ‘पॉझिटिव्ह’ असेल तर करोना त्या व्यक्तीशी फटकून वागतो आणि त्या व्यक्तीला ‘करोना निगेटिव्ह’चा अनुभव येतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह किंवा सकारात्मक किवा नकारात्मक हे दोन शब्द करोनाच्या बाबतीत कसे विरोधाभासी किंवा अपेक्षाभंगी आहेत हे दिसून येते. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा, सरकार जनतेला अनेक सूचना देत आहे. त्या सूचनांचे पालन करणे हा ‘पॉझिटिव्ह’ विचार.

काहीही काम नसताना रस्त्यावर फिरणे, गर्दी करून राहणे, तोंडाला मास्क न लावणे, कुठेही थुंकणे, प्राणायाम, योग, व्यायाम न करणे, गरम पाणी न पिणे, फ्रीजमधील पदार्थ व पाण्याचे सेवन करणे, या सार्‍या गोष्टी या नकारात्मक किंवा ‘निगेटिव्ह’ आहेत. याची परिणिती ‘करोना’चा अहवाला ‘पॉझिटिव्ह’ येण्यामध्ये होऊ शकतो. ‘मला काय नाय होणार’ ही जी ‘निगेटिव्ह’ मानसिकता आहे, ती मानसिकता करोनाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आणू शकते. तेव्हा विचार पॉझिटिव्ह असले आणि त्या विचारबरहुकूम वागले तर करोनाचा अहवाल ‘निगेटिव्ह’ येऊ शकतो.

अन्य सार्‍या गोष्टींमध्ये ‘पॉझिटिव्ह’ म्हणजे चांगल्याचे प्रतीक आणि ‘निगेटिव्ह’ म्हणजे वाईटाचे प्रतीक; परंतु ‘करोना’मध्ये ‘पॉझिटिव्ह’ असणे हे वाईट आणि ‘निगेटिव्ह’ असणे चांगले. करोना आणि अन्य गोष्टींमध्ये हाच फरक आहे. करोनाच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात माणसे घरी बसली, गाड्या उडवत जाणे बंद झाले, बाहेर हॉटेलचे खाणे बंद झाले, घरचे खाणे, घरचे पाणी पिणे सुरू झाले. त्यामुळे हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण, अन्न प्रदूषण कमी झाले, अपघात कमी झाले, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, सकस आहार मिळायला लागले. या सार्‍या ‘पॉझिटिव्ह’ घटना घडत गेल्या. त्यामुळे ‘करोना’ सोडून अन्य आजार किंवा रोग यांना प्रतिबंध बसला व त्याद्वारे होणार्‍या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. हे ‘पॉझिटिव्ह’पण लाभदायकच ठरले ना! हे पॉझिटिव्ह परिणाम आणि करोनाच्या अहवालातील ‘पॉझिटिव्ह’ परिणाम यात हाच फरक आहे.

दोन्ही पॉझिटिव्ह पण एक चांगले तर दुसरे वाईट. शब्द एकच! पण त्याचे परिणाम मात्र वेगवेगळे दररोजच्या जीवनात आचरण पॉझिटिव्ह ठेवल्यास फळ पॉझिटिव्ह मिळते आणि आचरण निगेटिव्ह ठेवल्यास फळही निगेटिव्ह मिळते. करोनाच्या बाबतीत मात्र आचरण निगेटिव्ह ठेवल्यास म्हणजे आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन न करता गैरगुमान वागल्यास करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकतो आणि आचरण पॉझिटिव्ह ठेवल्यास म्हणजे सद्गुणी वागल्यास करोनाचा अहवाल निगेटिव्ह येऊ शकतो.

याचा अर्थच असा की, करोनाच्या अहवालातील पॉझिटिव्ह असणे ‘नकारात्मक’ स्थिती दर्शविते तर निगेटिव्ह असणे ही ‘सकारात्मक’ स्थिती दर्शविते. शब्द तेच पण ते बसविण्याचे कोंदण बदलले तर अर्थ कसा बदलतो हे करोनाने दाखवून दिले. करोना अहवाल निगेटिव्ह हवा असेल तर तुमचे विचार आणि तुमचे आचार हे पॉझिटिव्ह असायला हवेत आणि तुमच्या मृत्यूपर्यंतच्या जीवनचा अहवाल जर पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक हवा असेल तर तुमचे आचार आणि तुमचे विचार हे पॉझिटिव्हच असले पाहिजेत हाच इशारा करोना देतोय.

थोडक्यात दोन्ही गोष्टीत करोनाची ‘पॉझिटिव्ह’ला पसंती आहे. माणसाच्या व्युत्पत्तीपासूनच ‘पॉझिटिव्ह’ आणि ‘निगेटिव्ह’चे द्वंद्व चालू आहे. करोनाने इशारा दिल्यानंतरही वागायचे कसे ‘पॉझिटिव्ह’ की ‘निगेटिव्ह’ हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ‘मी’ पॉझिटिव्ह नको असेल तर तुम्ही सकारात्मक किंवा ‘पॉझिटिव्ह’ जीवन जगा असाच संदेश ‘करोना’ने दिला आहे.

- प्र. के. कुलकर्णी

7448177995

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com