करोना - एवढं हतबल होण्याची पहिलीच वेळ!

- डॉ. राहुल भामरे
करोना - एवढं हतबल होण्याची पहिलीच वेळ!

गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात एक बेड मिळावा यासाठी अक्षरश: असंख्य फोन येत आहेत. सुरूवातीचे काही दिवस बेड मिळवून देण्यात मी यशस्वी झालो खरा. पण आता कोणीही दाद देत नाही. कारण खरोखर बेड शिल्लक नाहीत. आणि असतील तर तिथे वेंटिलेटर ची सोय नाही.

प्राणवायू आणि बेड यांच्या अभावी होणारे मृ्त्यू ‘याचि देही याचि डोळा’ पाहावे लागत आहेत. मानवजात इतकी हतबल झाल्याचे पाहण्याची माझ्या आयुष्यातील ही पहिली घटना आहे.

गेले एक वर्ष आम्ही कोव्हिड रुग्णालयात सेवा देत आहोत ...पण या पंधरा-वीस दिवसात नाशिक शहर आणि एकूणच महाराष्ट्र राज्यांत होणारा हाहाःकार थरकाप उडवणारा आहे.

अशावेळी आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे हे पाहणे अधिक विचार करायला लावणारे आहे.

केंद्र , राज्य , नगरपालिका , नगर परिषदा , पंचायत समित्या आणि त्या कोणी इतर संस्था असतील. यांनी आतापर्यंत समाजाच्या सामूहिक आरोग्याची काय काळजी घेतली याची लिटमस टेस्ट म्हणजे ही कोव्हिड महामारी आहे.

आणि या परीक्षेत यांनी आपल्या प्रगतीपुस्तकावर काठावर पास होण्याइतके देखील गुण मिळवले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

अशा वेळी परिस्थिती हाताबाहेर जाते असे दिसले रे दिसले की मग टाळेबंदीसारखी दुसरी सोय नाही.

खरे तर ही टाळेबंदी आपल्या आरोग्यव्यवस्थेची आधीच झालेली वाताहत थांबवण्यासाठी केलेला एक केविलवाणा प्रयत्न यापलीकडे काही नाही.

बरे....

जिथे अद्याप कोरोना फारसा फैलावला नाहीये ( किंवा फैलावला असला तरी कागदावर मात्र दाखवला जात नाहीये ) अशा ठिकाणी काय सुरू आहे हे पाहणे विशेष महत्त्वाचे आहे.

आपल्या राजकीय शक्तीप्रदर्शनाचा सोस कधीकधी मोठमोठ्या नेत्यांची देखील विवेकबुद्धी हरण करतो. मग ते अजस्त्र सभा भरवतात आणि फेसबुकवर त्याचे लाईव्ह प्रदर्शन करतात.

पण या सभांत येणारा सर्वसामान्य माणूस कोव्हिड प्रभावित झाला तर त्याचे आणि पर्यायाने त्याच्या कुटुंबाचे काय होऊ शकते हा विचार या आधुनिक समाजधुरीणांच्या संवेदनशील मनाला शिवत नसेल का ? कदाचित शिवतही असेल. त्यांनास ठाऊक.

दिवसाला कोव्हिड रूग्णांची संख्या रोज नवेनवे उच्चांक गाठत असताना तिकडे कुंभमेळ्यात मात्र गंगेत एक डुबकी घेण्यासाठी लाखो लोक एकत्र येत आहेत.

आपली ही एक डुबकी प्रसंगी आपल्या कुटुंबाला घेऊन बुडू शकते याचा सारासार विचार या भोळ्या भाबड्यांना तर नाहीच पण त्यांच्या मायबाप सरकारला देखील तो नाही हे कुणाचे दुर्दैव म्हणायचे...? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ...हेच खरे.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात... “उद्धरेदात्मनात्मानम् “ - तुझा उद्धार तुलाच करायचा आहे.

God Helps Those Who Help Themselves.

आजच्या परिस्थितीत तर हे अधिकच सुसंगत आहे. या ज्ञानात डुबकी घेतली तर पुण्यप्राप्तीसाठी इतरत्र कुठेही डुबकी घ्यायला जाण्याची गरज सध्या तरी दिसत नाही. तेव्हा सावध रहा. आणि सुरक्षित रहा.

- डॉ. राहुल भामरे

(लेखक भूलरोग तज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य आहेत.)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com