परिपूर्ती..

परिपूर्ती..

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर

भाग 3

बाळाच्या जन्मानंतर ती त्या बाळाची आई म्हणून ओळखली जाऊ लागते. हे गोजिरवाणे बाळ म्हणजे आई व बाबा या दोघांच्याच हृदयाचा ठेवा नाही तर घरातील सर्वांचाच तो गळ्यातील ताईत असतो. त्याला कुठे ठेऊ नि कुठे नको असे घरातील सर्वांनाच होऊन जाते. प्रत्येक जण आपल्या कामात असला तरी एक नजर या चिमुरड्यावर हमखास असते. इतरी काळजी घेऊनही बाळ पडले व चटकन रडू लागले तर आईचे काळीज कळवळते नि चटकन डोळे भरून येतात. ती त्याला क्षणात उचलते व जवळ घेते. आता या छकुल्याला नादी लावायला बाबा घरात असतील तर त्यांचाही पुढाकार महत्त्वाचा असतो. बाबांचे मन आपल्या अपत्यांच्या बाबतीत फारच हळवे असते. त्यांच्या आयुष्याचा तो महत्त्वपूर्ण भाग बनलेला असतो व त्याचे लालनपालन करणे ही जबाबदारी त्यांना समजत असते.

बाबांचे मन आभाळाएवढे असते नि त्या आभाळभर मनात बाळ एक नाजूक फुलपाखरू असते. त्याच्या जीवनात अनेक रंग बाबांना भरायचे असतात. पडल्यामुळे बाळ रडत आहे आणि त्याच्यासाठी बाबा चक्क घोडा बनतात. बाळ रांगते तसे तेही जमिनीवर गुडघे टेकून रांगू लागतात. त्यांच्या पाठीवर बाळाला बसवले जाते नि ते लबाड पिल्लू आपण पडलो होतो, हेही विसरून जाते. आता ते एका आश्वस्त व्यक्तीकडे पूर्ण सुरक्षित आहे हे बाळालाही समजते. आपले रडणे बाळ विसरते नि हळूच गालाच्या खळीत हसू लागते. बाबा आता घोडा घोडा करत सावकाश त्याला घरभर फिरवू लागतात. म्हणजे बाळ हे आता घरातील केंद्रबिंदू झाले व सगळे त्याच्या आनंदासाठी त्याच्या भोवती आहेत. आठवले ना तुम्हाला एक गाणे, जे मलाही आठवले गौरी बापटने गायलेले ‘लकडिकी काठी..’

ही गौरी बापट म्हणजे माझी बालमैत्रीण सुचेता सामंत नि आनंद बापट यांची मुलगी. गौरी राहायलाही आमच्याच सोसायटीत होती. त्यामुळे मी रोजच तिला पाहत होते. इतरही काही बालगीते तिने आपल्या गोड आवाजात गायलीआहेत. लकडिकी काठीने तर सर्वांवर जादूच केली होती इतके ते सर्वांना आवडत होते. लहान मुलांवर चांगले संस्कार केले की ते चांगल्या गोष्टींकडे वळते याचेही उदाहरण देण्यासाठी मी गौरीचा उल्लेख केला. गौरीची आई मला नुकतीच भेटली व अर्थातच गौरीची विचारपूस मी केली

तिचे आजी-आजोबाही तिला प्रेमाने जपत होते, हे मी पाहत होते. संस्कारक्षम घरात वाढलेल्या गौरीने कौतुकाने गायलेली गाणी सर्वांना आवडली पण त्यामागे तिचे घरदार उभे होते. त्या गाण्यांमध्ये आहे गोडवा नि तिच्यातील निरागसता. आता बाळाचे बाबा घोडा घोडा करत बाळाला घरभर फिरवून आणतात व नि ते लबाड बाळही आपले कौतुक सर्वांकडून करून घेत असते. आई व बाबा हे दोघेही बाळासाठी प्रेमाचा आधार असतात. प्रत्येक क्षणी ते आपल्या बाळाबरोबर असतात. बाळाचे इवले हात आभाळाला टेकवण्यासाठी ते मनापासून कष्ट करतात व आपल्या तळहातावरील फोडाप्रमाणे ते त्याला काळजीपूर्वक जपतात क्रमशः

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com