चला, स्वानंद शोधूया

चला, स्वानंद शोधूया

काळाने कूस पालटली आहे. नव्या वर्षाच्या नव्या कोर्‍या करकरीत पानावर आपण हवी ती नक्षी रेखू शकतो, हवे ते चित्र चितारू शकतो. मागील चुकांची पुनरावृत्ती टाळून नवतेला हर्षोल्हासात सामोरे जाणे आपल्या हाती आहे. भविष्याच्या गर्भात नेहमीच सुखस्वप्नांच्या वेली असतात. आकाशात उंच उंच जाणारा झुला टांगलेला असतो. गरज असते ती फक्त त्याचा शोध घेऊन तिथपर्यंत पोहोचण्यास प्रयत्न करण्याची.

अन्य अनेक गोष्टींबरोबरच हिशेब हा कदाचित माणसाचा स्थायी भाव असावा, त्यामुळेच तो प्रत्येकाचे मोजमाप करतो. किती होते आणि किती संपले, आता किती उरले आणि उरलेल्याचा विनियोग नेमका कसा करायचा आहे, याचे ठोकताळे त्याच्या डोक्यात तयार असतात. नववर्ष लागतानाही तो सुरूच होता. 2022 संपले हे वाक्य साधे असले तरी हा अनुभव वेगळा होता. करोनाच्या मगरमिठीतून सुटल्यानंतरचा हा काळ नव्याने घडी बसवण्याचा, जगण्याला नव्याने सामोरे जाण्याचा, नवी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी नव्याने कार्यरत होण्याचा होता. चोहीकडून असे मळभ दाटून आले असतानाही आपण खंबीरपणे, अतिशय चिवटपणे प्रकाशाची वाट प्रशस्त करत राहतो तेव्हा नवे वर्षही अत्यंत आश्वासकतेने आपल्याला सामोरे येते. मानवाचा कैक वर्षांचा खडतर कालखंडातून पुढे चालत राहण्याचा इतिहास पाहिला तर आपण ही चेतना, धैर्य राखून असल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला हवी.

वर्षांच्या येरझार्‍या अविरत सुरू आहेत, यापुढेही तशाच सुरू राहणार आहेत. त्यातील अगदी मोजका काळ आपल्याला खेळण्यासाठी मिळाला आहे. एखादा टी-20 चा सामना असावा; त्याप्रमाणे ठराविक काळात खूप काही करून दाखवण्याचे ध्येय आज प्रत्येकापुढे आहे. पुढच्या क्षणी काय होईल याचा कोणताही भरवसा नाही. सगळेच अशाश्वत, अनाकलनीय, अंधुक आणि अगम्य आहे. पण ही बाबच रंगत आणि तजेला टिकवून आहे. दृष्टीआडची ही सृष्टी रम्य असल्याच्या किंबहुना, रम्य करण्याच्या मनीषेमुळेच आज जीवनप्रवास अधिक आश्वासक होतो. नवनिर्मितीची ओढ माणसाला अधिक सक्रिय आणि कलासक्त बनवते. हे सत्य लक्षात घेता गतकाळाने दिलेल्या दाहक जखमा बाजूला टाकत आपण सगळेच नव्या वर्षामध्ये खूप काही चांगले मिळवू या आणि याच आशावादानिशी परिस्थितीला सामोरे जाऊया.

सध्याचा काळ स्थित्यंतराचा आहे. तसे पाहता स्थित्यंतर हा निसर्गनियमच. निसर्गात स्थित्यंतरे घडतात, समूहात स्थित्यंतरे घडतात, समाजात घडतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी मनातही स्थित्यंतरे घडत असतात. या वाटचालीत वेळोवेळी विविध भावनांचे प्रगटीकरण होत असते. म्हणूनच सकारात्मक विचार करणे आणि प्रगटीकरणातूनही सकारात्मकता जाणवू देणे ही सध्याच्या काळातील महत्त्वाची गरज ठरत आहे.

विविध क्षेत्रात वाढत चाललेली स्पर्धा, धावपळीचे जीवन, वाढते ताण-तणाव, नियमित व्यायाम, सकस आहाराचा अभाव यामुळे आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. आरोग्यदायी जीवनाचा मंत्र सार्‍यांनीच आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात अनेक नवीन संकल्पना, अनेक नवे उपक्रम राबवले जात आहेत. नदी शुद्धीकरण, पर्यावरण रक्षण इथपासून महिला आणि मुलींना सन्मानाने जगता यावे या हेतूने राबवले जाणारे अनेक उपक्रम यामध्ये अंतर्भूत करता येतील. योजना चांगल्या आहेत, गरज आहे सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याची. नव्या वर्षातला पहिला संकल्प हाच का असू नये? अगदी आपल्या घरापासून सुरुवात करूया. घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला तर आपोआपच आपण ‘स्वच्छ भारत अभियाना’त खारीचा वाटा उचलणार आहोत. घरातील कचरा आजूबाजूला न टाकता कचराकुंडीतच टाकायचा, निर्माल्य नदीपात्रात न टाकता निर्माल्यकुंडात टाकायचे, आजूबाजूच्या उजाड परिसरात बीजारोपण करायचे आणि झाडे जपायची यांसारखे अनेक उपक्रम वैयक्तिक पातळीवर राबवता येण्याजोगे आहेत. आपण शेजार्‍यांनाही या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊ शकतो.

याच धर्तीवर मुक्या जीवांची जपणूक, निराधारांना सहाय्य, अपंगांना मदत आदी कृत्यांद्वारे सकारात्मकतेकडे वाटचाल सहज शक्य आहे. यादृष्टीने सध्या निरनिराळे उपक्रम राबवले जात आहेत. ‘माणुसकीची भिंत’ हा त्यातीलच एक उपक्रम. आपल्या घरातील वापरात नसणार्‍या सुस्थितीतील वस्तू अन्य कोणाच्या उपयोगी पडतील या हेतूने दान करणे हा उपक्रम वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये राबवला जात आहेे. याअंतर्गत वापरण्याजोगे कपडे, पादत्राणे, चादरी, बेडशीट, खेळणी असे कोणतेही सामान भिंतीलगत आणून ठेवता येते. गरजवंत त्यातील आवश्यक ते सामान घेऊन आपली गरज भागवू शकतात. याच धर्तीवर अन्नधान्याचे वाटपही केले जाते. घरातील उरलेले अन्न, समारंभप्रसंगी उरलेले अन्न भुकेल्यांच्या मुखात जावे यासाठी याच कामाला वाहिलेल्या संस्थांची मदत घेता येईल. काही स्वयंसेवी संस्था अशा पद्धतीची फूड बँक चालवतात. या फूड बँकेत अन्न नेऊन देता येते. त्यानंतर हे अन्न भुकेल्यांपर्यंत पोहोचवले जाते. याच धर्तीवर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याच्या उपक्रमाचादेखील उल्लेख करायला हवा. असे एक ना अनेक उपक्रम समाजाला सकारात्मक दिशेेकडे नेणारे आहेत. प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यात सहभाग घेतला तर खूप काही वेगळे घडू शकते.

नवीन वर्षात पदार्पण केल्यानंतर वेध लागतात ते संक्रातीचे... संक्रातीचा हा काळदेखील स्थित्यंतराचा मानला जातो. संक्रातीपासून दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते. थंडी नाहीशी होते आणि उन्हाचे साम्राज्य पसरू लागते. हे उत्साही उत्सवपर्व आकाशात पतंगांची नक्षी रेखून, घरी तीळ आणि गुळाचे गोडधोड पदार्थ बनवून, वाणवसा लुटून आणि दानधर्म करून साजरे होते. आता घरोघरी याची लगबग सुरू होईल. संक्रांतीला चंद्रकळा घ्यायची की आणखी कोणती साडी, जावयाला किंवा सुनेला हलव्याचे कोणते दागिने करायचे, संक्रांतीचे हळदी-कुंकू कधी आणि कसे करायचे, घरातील लहानग्यांचे बोरनहाण कधी करायचे याचे आडाखे महिलांच्या मनात सुरू असतील. खरेदीचा उत्साहही दुणावू लागला असेल. दरवर्षीप्रमाणे हे सगळे उपचार पार पडतीलच. मात्र यावेळी थोडा व्यापक विचार करता येईल. दान जरूर करावे पण ते सत्पात्रीही असावे. आपल्याकडे सणासुदीला देवदर्शनाला जाणे आणि दानपेटीत यथाशक्ती रक्कम अर्पण करणे हा पुण्यप्राप्तीचा मार्ग समजला जातो. मात्र एखाद्या सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी मदतीच्या हेतूने दार वाजवतात तेव्हा त्यांच्या तोंडावर दार बंद करण्याचे कामही आपणच करतो. असे किती काळ चालणार? माणसाच्या मनातील देव कधी ओळखणार, कधी त्याच्या मदतीला सिद्ध होणार? हे सगळे दुसर्‍या कोणी करावे ही अपेक्षा बाळगणे सोडायला हवे. आपणच कृतिशील होण्याचा संकल्प सोडायला हवा.

नव्या वर्षात हे सगळे करायचेय तरी स्वत:साठी जगायचेय. स्वत:ला वेळ द्यायचा आहे. स्वत:साठी आनंद शोधायचा आहे. कारण आपले जग या बिंदूपासूनच सुरू होते आणि या बिंदूपाशीच संपते. म्हणूनच दुसर्‍याला आनंदी ठेवण्याची पराकाष्ठा करताना स्वत:च्या आनंदाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. आज असे अनेक अभागी जीव स्वानंद हरवून बसले आहेत. कालांतराने नैराश्येचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसते आणि बघता बघता खोेल गर्तेत गाडून टाकते. आपल्याला असे अभागी जिणे नको आहे. चला तर मग, नव्या वर्षात हाही एक संकल्प करूया. स्वानंद शोधूया आणि आनंदाचे हे तरंग सर्वदूर पोहोचवूया!

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com