हवामानानुसार बदलावी पीकपद्धती!

हवामानानुसार  बदलावी पीकपद्धती!

नाशिक जिल्ह्यात हवामानातील विविधतेसोबतच विविध प्रकारच्या जमिनी आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र येऊन पिकांच्या उत्पादनासोबत बाजारपेठ शोधली व मोठ्या शहरांत शेती उत्पादनांचा पुरवठा केला तर त्यांना अधिक फायदा होऊ शकतो.

भौगोलिकदृष्ट्या हवामान व जमिनीच्या बाबतीत नाशिक अतिशय समृद्ध जिल्हा आहे. त्यामुळे विविध हवामानावर आधारित शेतीपद्धती जिल्ह्यात विकसित झाली आहे. भारतातील सर्वात मोठी फळे-भाजीपाला उत्पादित करणारी व विक्री करणारी बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्र राज्याचा विचार करता नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राची ‘फळ आणि भाजीपाल्याची बास्केट’ या नावानेही ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचा पूर्व भाग हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनी असलेला व उष्ण हवामान, कोरडे हवामान असलेला भूभाग आहे. कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, चांदवड, येवला, नांदगाव या तालुक्यांचा यात समावेश होतो.

जिल्ह्याच्या मध्यभागी निफाड, नाशिक, दिंडोरी तालुक्यांचा समावेश होतो. या तालुक्यांतील जमिनी भारी ते मध्यम प्रतीच्या व बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ऊस, द्राक्ष, टोमॅटो, कांदा व इतर प्रमुख व्यापारक्षम भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्टा डोंगराळ पश्चिम घाट सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आहे. हा अतिपावसाचा प्रदेश असल्याने व लाल हलक्या जमिनी आहेत. या भागात पावसाच्या पाण्यावर येणारी हंगामी भात, नागली, वरई, खुरासणी यांसारखी पिके घेतली जातात. जवळ-जवळ सर्व प्रकारच्या पिकांची लागवड व उत्पादन या जिल्ह्यांमध्ये भौगोलिकदृष्ट्या घेता येणे शक्य आहे.

पूर्व भागातील जमिनी या हलक्या मुरमाड व मोठ्या प्रमाणात निचरा होणार्‍या आहेत. या भागातील पाण्याची व्यवस्था अतिशय कमी असल्यामुळे प्रामुख्याने हंगामी व कोरडवाहू शेती या ठिकाणी केली जाते. या भागात ज्या ठिकाणी काही प्रमाणात विहीर, बोरवेल किंवा नदी अथवा छोट्या धरणातील पाण्याचे उपसा जलसिंचन ओलिताच्या सोयी आहेत त्या ठिकाणी व्यापारक्षम पिके जसे डाळिंब, कांदा, शेवगा, सीताफळ, लिंबू व पूर्वहंगामी द्राक्ष ही पिके घेतात. जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यातील हवामान कोरडे असल्यामुळे या ठिकाणी प्रामुख्याने कोरडवाहू फळपिके डाळिंब, शेवगा या पिकांची लागवड करून दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकते. पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी मुख्यत्वे करून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन घेतात.

डाळिंब, शेवगासोबत कांदा हे या भागातील प्रमुख पीक आहे . प्रामुख्याने उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पावसाळी हंगामात मका, सोयाबीन हे पीक घेतले जाते. त्यानंतर उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते. खरे तर कोरडे हवामान व हलकी जमीन, मर्यादित पाणी हे या भागातील वरदान आहे. काही शेतकरी प्रयोगशील व शास्रोक्त पद्धतीने या परिस्थितीचा फायदा घेऊन दर्जेदार व अधिक उत्पादन काढताना दिसून येतात. पूर्वहंगामी द्राक्षाचे उत्पादन घेऊन या भागातील शेतकरी द्राक्षाच्या प्रमुख हंगामापूर्वीच द्राक्षे बाजारात आणतात. त्यापासून चांगला आर्थिक लाभ मिळवतात.

नाशिक जिल्ह्याचा पूर्व भागाचा पट्टा हा गुजरात राज्याला लागून असल्याने या भागात उत्पादित होणार्‍या मालाला चांगल्या प्रकारे बाजारपेठ उपलब्ध होते. नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी व नाशिक तालुक्यातील बागायती क्षेत्रात द्राक्षाचे दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन घेतले जाते. यामध्ये पिंपळगाव बसवंत, वणी, दिंडोरी, निफाड, ओझर, विंचूर व सिन्नर तालुक्यात भाग दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रयोगशील व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार उत्पादन घेत असतात.

नाशिक जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे काही प्रमाणात शेतकरी नियंत्रित वातावरणातील शेतीकडे वळू लागले आहेत. त्यात प्रामुख्याने शेडनेट हाऊसमध्ये भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. पॉलिहाऊसमध्ये फुलांचे व विदेशी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. परंतु पॉलिहाऊसमधील शेतीसाठी सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी सातत्यपूर्ण या पीक पद्धतीचा अवलंब करून उत्पादन घेताना दिसतात.

पश्चिम सह्याद्रीच्या रांगेतील पट्ट्यातील अतिपावसाच्या इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांत अतिपाऊस पडणार्‍या प्रदेशात साधारणत: आदिवासी शेतकरी भात, नागली, वरई यांसारख्या पिकांचे उत्पादन घेतात. या तालुक्यांत पावसाळ्यात अतिपाऊस पडूनसुद्धा उन्हाळ्यात किंवा रब्बी हंगामात पाण्याचे दुर्भिक्ष्य भासते किंवा शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. ज्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात धरणातील लिफ्ट इरिगेशन किंवा उपलब्ध सिंचन पद्धतीचा वापर करून या भागातील शेतकरी हंगामी भाजीपाला पिके प्रामुख्याने वेलवर्गीय भाज्यांत कारली, दोडकी या पिकांची लागवड करतात.

या पिकांचे या भागातील जमिनी निचरा होणार्‍या व वरकस असल्यामुळे सेंद्रीय खतांचा वापर करून चांगले उत्पादन मिळू शकते. या पिकांसाठी या भागात असलेले उष्ण-दमट हवामान पाण्याची उपलब्धता तसेच या पिकांना मुंबईची जवळचीं बाजारपेठ उपलब्ध असल्याने या पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. मल्चिंग मांडव पद्धतीने लागवड करून दर्जेदार व अधिक उत्पादन घेऊन कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न घेत आहेत. पश्चिम पट्ट्यातील उताराच्या जमिनीत व लाल जांभा दगडाच्या निचरा होणार्‍या जमिनींमध्ये आंबा, काजूसारख्या फळ पिकांची लागवड यशस्वी होत आहे.

छोट्या छोट्या वाडीच्या स्वरुपात किंवा बांधावर आंबा, काजू पिकांची लागवड करून वर्षात एकदा हमखास उत्पन्न घेत आहेत. या भागात उत्पादित होणारा आंबा सेंद्रीय पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या हानिकारक रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर न करता व घरगुती पिकून मोठ्या प्रमाणात ग्राहकांना उपलब्ध होत आहे. व्यापारी आंबा, जांभूळ, करवंद खरेदीसाठी येतात. या शेतकर्‍यांना आधुनिक लागवड त्या पिकाचे व्यवस्थापन काढणी, प्रक्रिया तंत्रज्ञान, कीड-रोग व्यवस्थापन या बाबींचे प्रशिक्षण दिल्यास दर्जेदार व अधिक उत्पादन घेणे शक्य आहे.

बिगर हंगामात कमी पाण्यात वर्षातून एकदा हमखास देणार्‍या फळबागेची लागवड या भागात यशस्वी होऊ शकते. मोगर्‍यासारख्या फुलांची लागवड करून चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ या छोट्या अदिवासी शेतकर्‍यांना मिळू शकतो. केंद्र व राज्यस्तरावर या हवामान पद्धतीत उत्पादित होणार्‍या विविध फळझाडांच्या, भाजीपाल्याच्या लागवडीसाठी प्रोत्साहनपर योजना राबवल्या जातात. याचा शेतकर्‍यांनी फायदा घेऊन अधिक उत्पादकता, बाजारपेठ व काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया यासाठी फायदा होऊ शकतो. हॉर्टिकल्चर ट्रेनसारख्या वाहतूक व्यवस्थेमुळे नाशिक जिल्ह्यातील विविध हवामान प्रदेशांमध्ये उत्पादित होणार्‍या फळभाज्या यांना देशभरात त्वरित पुरवठा शक्य असल्याने योग्य मोबदला मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com