‘स्वयं’पूर्ण वक्तृत्व...

अनेक मुलांना कला गुण उपजतच असतात, तर काहींच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी काही घटना कारणीभूत असतात. अशाच 5 ते 15 वयोगटातील नगरमधील बाल कलाकारांचा, गुणवंतांची ओळख करून देत आहेत सागर खिस्ती...
‘स्वयं’पूर्ण वक्तृत्व...

काही मुलांच्या अंगी उपजतच गुण असतात असं म्हटलं जातं. निरीक्षण, आकलनशक्ती जास्त असणारी मुलंही अभ्यासाबरोबरच अनेक कलांत पारंगत होतात. त्यांच्यातील उत्सुकता नवेनवे छंद जोपासण्यास कारणीभूत ठरतात. स्वयं सागर शिंदे. वय वर्षे 7. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या इंग्लिश मेडियम स्कूलचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी. त्याला लहानपासूनच वक्तृत्व, अभिनय, आणि खेळाची खूप आवड. त्याचं वक्तृत्वही खूप छान आहे. यासाठी त्याला वडिलांचे खूप सहकार्य लाभते.त्याचे वडील स्वतः 7 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतात. ते स्वयमकडून भाषणाची तयारी करून घेतात. त्याला विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ए.पी.जे. अब्दुल कलाम, लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलायला खूप आवडते. छत्रपती शिवाजी महाराजांना तो आपला आदर्श मानतो.

अडीच वर्षांचा असताना तो सर्वप्रथम स्टेजवर भाषण करण्यासाठी उभा राहिला. सुरुवातीला 15 सेकंद, नंतर 5 मिनिटं, 10 मिनिट आणि आता तो तब्बल 30 मिनिटं तो सलग एका विषयावर बोलू शकतो. इतकेच काय पण तब्बल 15000 ते 20000 इंग्रजीचे स्पेल्लिंग स्वतः तयार करतो. ते तोंडपाठ आहेत. इतकंच काय पण इतर शाळाही त्याला त्यांच्या शाळेतील मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून भाषण करण्यासाठी बोलावतात. यासाठी त्याच्या शाळेतील मुख्याध्यापिका नमरीता ओहरी यांचा त्याला खूप पाठिंबा मिळतो. शाळेच्या शिक्षकांचेही त्याला खूप सहकार्य लाभते.

शिवजयंती उत्सव, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, तसेच इतर दिवशी तो या महापुरुष यांच्यावर आत्मविश्वासाने आणि उत्साहात भाषण करतो. त्याच्या साभिनय वक्तृत्वकलेमुळा त्याला नाट्यआराधनानिर्मित अनंत जोशी दिग्दर्शित ‘आणखी एक द्रोणाचार्य’ या दोन अंकी नाटकात छोटया अश्वत्थामाची भूमिका मिळाली. ती त्याने लिलया पार पाडली. मागील वर्षी नगर केंद्रात झालेल्या ‘वानरायण’ या नाटकासाठी अंतिम फेरीत स्वयमला रौप्य पदक मिळाले. त्याबद्दल त्याचं खूप कौतुक झालं. स्वयं सध्या स्पॅनिश आणि चायनीज भाषा ही शिकत आहे. मागील वर्षी स्वयमला आदर्श बालवक्ता हा पुरस्कार मिळाला. मोठेपणी त्याला पहिल्याच प्रयत्नांत आयएएस अधिकारी होण्याची इच्छा आहे. त्याच्या पालकांना तो एक आदर्श मुलगा होऊन, कितीही मोठा झाला तरी त्याने गर्व करू नये, असे वाटते. स्वयमला भाव भविष्यासाठी खूप शुभेच्छा!

  • - सागर खिस्ती, 9822741307

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com