रथ…उत्सव आणि नवे बदल

jalgaon-digital
7 Min Read

भारतीय संस्कृतीत पावित्र्याला प्रमाण मानून सण, उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. विविध धर्म त्यांच्या रितीरिवाजानुसार, मान्यतांनुसार ते साजरे करतात. त्यातून सामाजिक सलोखा वाढीला लागतो. आनंदाची उधळण होते. निखळ समाधानाने मनाचा गाभारा भरून जातो. माणूस माणसाशी माणूसकीच्या धाग्याने जोडला जातो. दुःख असतं, चिंता असतात, संकटं ‘आ’ वासून उभी असतात. त्यातून तो शोधत असतो सुखाचा चिन्मय मार्ग. मग तो उभ्या करतो काही प्रतिमा, प्रतिकं. सोबत जोडीला काही मिथकं! त्याला हे सगळं विवेकनिष्ठ हवं असतं. मग तो त्याची एक आचारसंहिता तयार करतो. त्याला तत्वांची, तथ्यांची जोड दिली जाते. एक निरन्वय जीवनप्रणाली आकार घेते. तिचा ओहोळ वाहत राहतो निरंतर. ती रुजवते काही मूल्यं. निष्ठा जोपासल्या जातात. श्रद्धेच्या पोटातून अंधश्रद्धा जन्म घेते. विवेकाच्या दिव्यावर अविवेकाची काजळी वाढत जाते. निखळ आनंदाला ग्रहण लागतं. सुकुमार भावना पायदळी तुडवल्या जातात. ज्याच्यासाठी म्हणून हा आटापिटा चाललेला असतो ते समाधान लोप पावतं. उन्मादाला भरती येते. विकृतांचे जमाव रस्तोरस्ती खिदळत राहतात. रित बदलते, चाल बदलते. निरामय चालीरितींना हेतूपूर्वक मूठमाती दिली जाते. थोर संस्कृतीला तिलांजली अर्पण केली जाते.

अलीकडे उत्सवांचं स्वरूप बदलत चाललय. आता ते इव्हेंट झालेत. ते साजरे करण्यापाठीमागच्या धारणा बदलत चालल्यात. केवळ उत्सवी स्वरूपांमुळे त्यांचा आत्माच हरवलाय. जनसामान्यांचं त्यात योगदान नसल्यामुळे ते त्यापासून कोसो मैल दूर आहेत. मूठभरांच्या मिरासदारीने उत्सवांची व्यापकता संपुष्टात आणलीय. पूर्वी असं नव्हतं! उत्सव म्हणजे उत्साहाचा माहौल, मौजमजा, आनंदाची लयलूट, मांगल्याचा शिडकावा, पावित्र्याची आराधना, शुभशकुनांची बरसात आणि माणूसकीचं मनोहारी दर्शन. आणि या सगळ्याला प्रेमाची, करूणेची झालर आणि निरागस शांततेची गहिरी किनार. परंतु आता ते शिल्लक नाही. उत्सवांची व्याख्या बदलली. धांगडधिंगा, कर्णकर्कश आवाज, मस्ती, बेगडी दर्शन यामुळे ते आता उत्सव वाटत नाहीत. उघड्या वाघड्या मिरवण्याने आता ते केवळ इव्हेंट झालेत.

माझा जन्म धार्मिक महत्व असणाऱ्या शिर्डीत झाला. त्यामुळे घरीदारी धार्मिक वातावरण. मंदिरात नित्यनेमाने येणंजाणं. धार्मिकतेचा प्रचंड पगडा. सगळ्या आरत्या तोंडपाठ. कीर्तन-प्रवचनांना आवर्जून उपस्थिती. सर्व उत्सवांत मनापासून सहभाग. दर गुरूवारी निघणाऱ्या पालखीचं आणि विशेष सण-समारंभांच्या दिवशी मिरवणुकीने निघणाऱ्या रथाचं विशेष आकर्षण. किती सुंदर दृश्य असायचं. मंदिरातून जल्लोषात निघालेला रथ गावातल्या ठरवून दिलेल्या मार्गावरून हळूहळू पुढे सरकत राहायचा. मंजूळ वाद्यं वाजत असायची. रथाच्या समोर शिंगाड फुंकलं जायचं. पेट्रोमॕक्सचे दिवे घेऊन स्वयंसेवक अंतराअंतराने उभे असायचे.

भालदार-चोपदार नामाचा गजर करायचे. ठरवून दिलेले मानकरी रथ पुढे ओढत न्यायचे. भजनं गाताना चढाओढ लागायची. दारासमोरचं अंगण सडा-सारवण, रांगोळ्यांनी सजायचं. उद-धुपाचा दरवळ वातावरणाला प्रफुल्लीत करायचा. दारासमोर आलेल्या रथाची स्त्रिया मनोभावे पुजा करायच्या. सगळं घर नतमस्तक व्हायचं. आशीर्वादाची चादर पांघरून पुढच्या उत्सवाची घर आतुरतेने वाट बघायचं. रथासमोर लेझिमचा डाव रंगायचा. भक्तीत तल्लीन झालेले लोक नाचत राहायचे. रथाचं मार्गक्रमण चालू असायचं. एकनाथी भारूडांनी रथाची सांगता व्हायची. ठरवून दिलेल्या वेळेनुसार सगळे उपक्रम पार पडायचे. जल्लोष असायचा परंतु उन्माद नसायचा. शेजारतीला हजेरी लावून लोक आपापल्या घरी परतायचे.

आजही रथ येतो. मंगलमय वाद्यांची जागा कर्णकर्कश बँडपथकाने घेतलेली असते. पेट्रोमॕक्सचे दिवे जाऊन झगझगीत ट्यूबलाईट घेऊन चाकर उभे असतात. सिनेगीतांच्या चालीवर भजनं म्हंटली जातात. जल्लोषाला उन्मादाची फोडणी दिलेली असते. रथासमोर शिंगाड फुंकण्याचा आवाज या गदारोळात कुणाच्याच कानावर पडत नाही. सगळाच गोंधळ, धक्काबुक्की, आरडाओरडा. मनोभावे हात जोडून शांतपणे दर्शन होत नाही. लेझिमचे डाव रंगत नाहीत. विचित्र हातवारे करीत लोक नाचत राहतात. बेहोष होतात. उत्साहाच्या टोकावरचं भक्तीचं हे हिडीस रूप उघड्या डोळ्यांनी बघवत नाही.

गुरूपौर्णिमेचा दिवस होता. सोळा जुलै दोन हजार. वार रविवार होता. नित्यनेमाने येणारा रथ त्यादिवशीही येणार होता. माझी आई आणि पत्नी लगबगीने जाऊन वाड्याच्या तोंडाशी उभ्या होत्या. रथ हळूहळू पुढे सरकत होता. मी घराच्या ओट्यावर येऊन उभा राहिलो. माझ्या कानावर दूरवरून येणारे विविध आवाज जोरात आदळत होते. फटाक्यांच्या लडी पेटत होत्या. झगमगाटाने रस्ता दिपून गेला होता. पुढे जाऊन दर्शन घेण्याची इच्छा झाली नाही. जीवघेण्या गोंगाटात रथ चालला होता.

ध्वनींच्या विविध प्रकारांनी पुरता गोंधळ मांडलेला होता. उजेडाचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी आणि उसळलेल्या गर्दीसमोर देवाचं नामस्मरण लाचार होऊन उभं होतं. टाळ मृदंगाचा स्वर हरवला होता. धुंदमधुर विणेचा झंकार कानावर पडत नव्हता. आयाबाया ओवाळत होत्या. घराला बरकत मागत होत्या. प्रश्न पडला; देवाला हे सगळं सहन होत असेल? मग दुरूनच त्याच्यासाठी मनोभावे हात जोडले. डोळे मिटून घेतले. काळोखाच्या विस्तिर्ण पटलावर ‘तो’च उभा होता. डोळे झाकलेले आणि दोन्ही हात कानांवर ठेवलेले. मला सगळा उलगडा झाला. देवाच्याही सहनशक्तीच्या पलीकडे सगळ्या गोष्टी पोहोचल्याने तो असहायपणे उभा होता. शेवटी देव म्हणजे आपलंच विशुद्ध रूप. अंतःकरणातला ओलावा.

प्रेम, माया, ममता, करूणेचा अखंड झरा. समुद्रासारखं अमर्याद मन. दुःखीतांच्या जखमेवरची हळूवार फुंकर. याचकाच्या झोळीत त्याच्या गरजेनुसार ओतलेलं दान. संकटाच्या वेळी मदतीचा दिलेला हात. या सुक्ष्मतम रुपांत तर खरा ईश्वर राहत असतो. जर त्याला या मानवी भावभावना चिकटलेल्या असतील तर मग कसा सहन होईल त्याला हा गदारोळ? क्षणकाल चमकलेल्या या विचारांनी मी खडबडून जागा झालो. धावतच घरात गेलो. कोरे कागद पुढ्यात ओढले आणि सुचलेलं भरभर लिहीत गेलो. एकटाकी लिहून झालेली ‘रथ’ ही एकमेव कविता. पंधरा-वीस मिनिटांनी आई आणि पत्नी माघारी आल्या. तोवर कविता पूर्ण झाली होती.

परभणीवरून निघणाऱ्या ‘अक्षर प्रतिष्ठा’ दिवाळी अंकात दोन हजार एक साली ‘रथ’ कविता प्रसिद्ध झाली. देविदास कुलकर्णी त्याचे संपादक होते. पुढे दोन हजार चौदा साली आलेल्या ‘ताटातुटीचे वर्तमान’ या कवितासंग्रहात तिची वर्णी लागली. मनात कल्पना येऊन लगोलग लिहून झालेली ही एकमेव कविता. प्रिमॕच्युअर डिलिव्हरीसारखी. परंतु आशयाच्या आणि मांडणीच्या बाबत एकदम अजोड. बांधेसूद आणि सशक्त. आजही कधी गावाकडे जातो. रथ यायचा असतो. त्याला ओवाळण्यासाठी घरात लगबग चाललेली असते. मी दुरूनच हात जोडतो. डोळे घट्ट मिटून घेतो. ‘तो’ तसाच असहायपणे उभा असलेला दिसतो. अधिकच दिनवाणा. खाडकन् माझे डोळे उघडतात. रथासमोरच्या गर्दीने क्षणभर डोळे मिटून त्याचं ते अगतिक रूप पाहावं यासाठी त्यानेच ‘रथ’ कविता माझ्या हातून लिहून घेतलेली असते. मी पुन्हा डोळे मिटून घेतो, तर त्याचा कुठेच मागमूस नसतो. ‘रथ’ हळूहळू त्याच्या गतीने पुढे पुढे सरकत राहतो.

रथ

जीवघेण्या गोंगाटात

रथ देवाचा चालला

किती ध्वनींचे प्रकार

कसा गोंधळ मांडला

दिवल्यांची रोषणाई

फटाक्यांचा भडिमार

नामस्मरण देवाचे

गर्दीपुढती लाचार

दूर हरवला कुठे

टाळ मृदंगाचा स्वर

कानी पडेना मधुर

धुंद विणेचा झंकार

रथ दाराच्या पुढती

आयाबाया ओवाळीती

आणि घराला अवघ्या

औक्ष वरद मागती

अशा गर्दीत देवाने

गच्च झाकलेले डोळे

दोन्ही कानावर हात

ठेवताना, मी पाहिले

नित्यनेमाने देवाचा

असा भरतो उत्सव

रथ थांबतो दारात

पुढे गर्दीचा आरव

_शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *