Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगदिल्ली वार्तापत्र : पर्यावरणाचे भान राखा...

दिल्ली वार्तापत्र : पर्यावरणाचे भान राखा…

सुरेखा टाकसाळ

उत्तराखंडमधील चमोली दुर्घटनेतील बचावकार्य सुरूच आहे. ही घटना म्हणजे निसर्गाचाच कोप होता. निसर्गाने पुन्हा एकदा जगाला इशारा दिला आहे. जून 2013 मध्ये केदारनाथ मंदिराजवळ झालेली दुर्घटना आठवते ना?

मोलीमधील ग्लेशियर का व कसा फुटला, याचा शोध पर्यावरण तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक आणि संबंधित यंत्रणा घेत आहेत. हवामानातील बदल, पाण्याचा दबाव, अति उंचावरील भागात निरभ्र आकाशामुळे, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे उष्णतेचे प्रमाण वाढणे इत्यादीमुळे ग्लेशियरवरील बर्फ वितळू लागते, किंवा तो फुटतो. एकदा का तो फुटला की त्याचे परिणाम खरे तर दुष्परिणाम त्याच्या खालच्या भागात, दर्‍या व नदीच्या खोर्‍यांमध्ये पुढेपुढे घडून येतात.

- Advertisement -

ग्लेशिअर म्हणजे सामान्य भाषेत हिमनदी. ग्लेशियर वितळू लागला की त्याच्या उतारावरील भागात पूर-विध्वंस होतो. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. समुद्र किनार्‍यांची धूप होते. काही ठिकाणी बेटे, किनार्‍यावरील गावे पाण्याखाली जातात. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली की पाण्याचे व हवेचे तापमान वारंवार वाढते व हरिकेन, टायफून प्रकारची किनारी वादळे निर्माण होतात. ग्लेशिअर (हिमनदी) हा दाट बर्फाचा कायम स्वरुपी हलणारा थर. मात्र त्याचा हलण्याचा वेग सर्वसाधारणपणे कमी असतो. हिमालयासहीत, जगातील सर्व खंडांमधील अति उंचावरील पर्वतांवर ग्लेशिअर्स आहेत.

उत्तरध्रुव (अंटार्टिक) व दक्षिण ध्रुव (अंटार्टिक) भागांमधील कायमस्वरुपी बर्फाच्या स्तरांना ग्लेशिएटेड आईस किंवा पर्माफ्रॉस्ट असे म्हणतात. गेल्या काही वर्षात होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे या भागातील हिमखंड झपाट्याने वितळू लागले आहे. संपूर्ण जगाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.

मागच्या वर्षी, उत्तर ध्रुवाजवळील ग्रीनलॅन्ड या देशात पॅरिस शहराच्या आकारमानापेक्षा मोठा हिमखंड वेगाने वितळला. छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसते. उत्तर ध्रुवाप्रमाणे द. ध्रुवाकडील अंटार्टिक भागात हिमखंड वितळण्याचे प्रमाण 57 टक्के अधिक वेगाने होत आहे. 2017 साली या भागातील 175 कि. मी. लांब व 50 कि. मी. रुंद असा विशाल हिमखंड दक्षिण अमेरिकेच्या दिशेने सरकू लागला. 1400 कि. मी. सरकत, 2020 च्या मार्चमध्ये तो दक्षिण जॉर्जिया बेटापासून 500 कि. मी. अंतरावर आला. तेव्हा त्याचा आकार 150 कि. मी. 48 कि. मी. राहिला आहे. आणखी काही काळ तो वितळत राहणार असून त्याचा परिणाम द. जॉर्जियाच्या पर्यावरणावरच नव्हे तर अर्थ व्यवस्थेवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

असे हिमखंड किंवा ग्लेशिअर्स, मोठ्या प्रमाणावर वितळणे म्हणजे केवळ बर्फाचे पाणी होणे इतकेच नव्हे, त्या भागातील पर्यावरण, जीवसृष्टीलाही ते अपायकारक, हानीकारक ठरते. काही प्रजाती नष्टही होण्याचा धोका असतो. ग्लेशिअरची रिट्रीट किंवा पीछेहाट, ही नैसर्गिक प्रक्रिया असते. (काही ग्लेशिअर्स विस्तारतही असतात.) अर्थात त्या भागातील हवामान बदलाचा (क्लायमेट चेंज) तो एक मोठा सिग्नल, संकेत असतो. ग्लेशिअरच्या संवेदन शीलतेवर परिणाम होण्यात तापमानाची भूमिका प्रभावी ठरते.

हिमालयातील ग्लेशिअर्सबाबत सांगायचे झाले तर जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानुसार, भारताच्या हिमालयीन क्षेत्रात 9575 ग्लेशिअर्स आहेत. यापैकी आपल्याला सर्वाधिक परिचयाची आहेत गंगोत्री व सियाचीन, हिमालय-काराकोरम भागातील सियाचीन 17 हजार 720 फूट (5400 मी.) उंचीवर असून, उत्तर व दक्षिण ध्रुव वगळता, जगातील हे क्रमांक दोनचे सर्वात मोठे ग्लेशिअर आहे. हिमालयातील ग्लेशिअर्स ही गंगा, सिंधू व ब्रह्मपुत्रा नद्यांच्या परिसरात आहेत. हिमालयातील खास करून पश्चिम भागातील 77 टक्के ग्लेशिअर्समागे हटत आहेत, तर 7 टक्के ग्लेशिअर्स विस्तारत आहेत. आपल्याला ग्लेशिअरचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. कारण, खास करून त्यांचा उत्तर भारतातील जनजीवनावर परिणाम होत असतो. हिमालयातील ग्लेशिअर्सचे, बर्फाचे आच्छादन वितळण्याचा परिणाम, तेथून उगम पावणार्‍या नद्यांच्या प्रवाहावर होत असतो. पावसाळ्याचा काळ वगळता, वर सांगितल्याप्रमाणे गंगा, ब्रह्मपुत्रा, नद्यांच्या परिसरात आहेत. हिमालयातील खास करून पश्चिम भागातील 77 टक्के ग्लेशिअर्स मागे हटत आहेत, तर 7 टक्के ग्लेशिअर्स विस्तारत आहेत.

आपल्याला, भारताला ग्लेशिअरचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. कारण, खास करून त्यांचा उत्तर भारतातील जनजीवनावर परिणाम होत असतो. हिमालयातील ग्लेशिअर्सचे, बर्फाचे आच्छादन वितळण्याचा परिणाम, तेथून उगम पावणार्‍या नद्यांच्या प्रवाहावर होत असतो. पावसाळ्याचा काळ वगळता, वर सांगितल्याप्रमाणे गंगा, ब्रह्मपुत्रा व त्यांच्या अनेक उपनद्यांमध्ये या ग्लेशिअर्समधून पाणी येते. या नद्यांवर या भागातील 50 कोटींपेक्षा अधिक लोकांचा जीवन चरितार्थ अवलंबून आहे. शेतीबरोबरच उद्योगधंदे व देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठीही या नद्या महत्त्वाच्या ठरतात.

तापमानातील बदल या विषयावर गेली काही वर्षे जगातील अनेक देशांमध्ये चळवळी सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदा, उहापोह होत असतो. औद्योगिक व विकसित देशांमध्ये कार्बन उत्सर्जन सर्वाधिक होते. याचा वातावरणावर परिणाम होतो. वातावरणातील ओझोन लेअरला छिद्रे पडतात व तापमान वाढते. हे कमी करण्यासाठी वृक्ष/जंगल तोड थांबवून, जंगल वाढवण्यावर अधिक जोर दिला जात आहे व तो अत्यावश्यक आहे.

जागतिक हरित क्षेत्रात कॅनडा, रशिया हे आघाडीवर आहेत. जागतिक हरित क्षेत्राच्या 6.6 टक्के हरित क्षेत्र चीनमध्ये असून, चीन ते आणखी वाढवत आहे. भारतात हेच प्रमाण 2.7 टक्के आहे. 2019 पर्यंत भारतात पंचवीस हजार चौरस कि. मी. वनक्षेत्र वाढले आहे. काही वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये समाजसेवी सुंदरलाल बहुगुणा यांनी वृक्षतोडीला विरोध म्हणून ‘चिपको’ आंदोलन सुरू केले होते. हजारो स्त्रिया या आंदोलनात सामील झाल्या होत्या व झाडांना विळखा घालून त्यांनी वृक्षतोडीला प्रखर विरोध केला होता. चिपको आंदोलनाची प्रासंगिकता आजही जाणवते.

महाराष्ट्रात, प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता, आतापर्यंत काही लाख झाडे लावली आहेत व त्यांची जपणूक होईल, हे ते पहात आहेत. नाशिक जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते कै. विनायकदादा पाटील यांचेही वृक्षारोपणाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. असे वैयक्तिक पातळीवर काम करणारे काही आहेत. मात्र कोणत्याही सरकारने वृक्षारोपण व जंगल संवर्धनासाठी कळकळीने प्रयत्न केलेले दिसले नाहीत. वाढत्या लोकसंख्येला पुरे पडण्यासाठी निसर्ग किती काळ पुरणार?

दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या एका परिषदेत, जेम्स कुक विद्यापीठातील प्रोफेसर बिल लॉरेन्स यांनी हवामानातील बदल व समुद्राच्या पातळीत वाढ यामुळे गंगा नदीतील सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे मॅन्ग्रोव्ह म्हणजे खारफुटीचे जंगल नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली. परिणामी, सुंदरबनमधील जगप्रसिद्ध ‘बंगाल टायगर’ ह्या वाघाची वसतीस्थाने 2070 पर्यंत नामशेष होण्याचीही भीती आहे. सुंदरबन जंगलाची स्थिती खालावली तर तेथील इतर जीवसृष्टी प्राणी उरणार नाही. ज्यावर त्या वाघाचे जीवन अवलंबून आहे.

गेल्या पन्नास वर्षांत पृथ्वीवरील तापमान 1 ते 1.5 डिग्री सेल्सियसने वाढले आहे. आणखी एक डिग्रीने ते वाढले तर मालदीव हा देश समुद्राखाली जाईल. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून मुंबई व अन्य काही किनारी शहरांना जलसमाधी मिळण्याचा धोका संभवतो! हिमालयाप्रमाणे युरोपमध्ये आल्पस पर्वत व उत्तर अमेरिकेत रॉकी पर्वत राजीवरील ग्लेशिअर्स वितळत आहेत. हा फक्त निसर्ग नाश नाही. पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीसाठी हे हिताचे नाही. जीवसृष्टी टिकायची तर निसर्ग टिकायला हवा. त्याचे जतन व जोपासना करायलाच हवे.

- Advertisment -

ताज्या बातम्या