Blog : मायमराठीची आबाळ कोण करते?

Blog : मायमराठीची आबाळ कोण करते?

एन. व्ही. निकाळे | राज्यात दरवर्षी १ ते १५ जानेवारी हा काळ सरकारी पातळीवर ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषाविषयक विविध कार्यक्रम आणि उपक्रम यानिमित्त आयोजित केले जातात. यंदाही असा पंधरवडा राज्यात साजरा होत आहे, पण तो दोन आठवडे उशिरा सुरू झाला आहे.

‘करोना’चा तो परिणाम असेल का? राज्याच्या मराठी भाषामंत्र्यांनी मंत्रालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’चे उद्घाटन नुकतेच केले. मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ‘मराठीत बोला, मराठीतून व्यवहार करा आणि मराठीचा आग्रह धरा’ अशी आग्रही त्रिसूत्री त्यांनी निदान त्यावेळी सांगितली.

आम्हा मराठी माणसांना मराठी भाषेची आठवण आणि तिच्याविषयीचा उमाळा दरवर्षी विशिष्ट दिवशीच दाटून येतो. ते दिवस म्हणजे १ मे-महाराष्ट्र दिन, मराठी नववर्षारंभ - गुढीपाडवा, २७ फेब्रुवारी-कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन अर्थात जागतिक मराठी राजभाषा दिन, आणि जानेवारीतील मराठी भाषा संवर्धन पंधरवडा! विशिष्ट दिवशीच मराठी भाषेचा आदर करावा आणि इतर दिवशी तिला विसरून जावे, अशी नकारात्मक भूमिका का तयार झाली? एखाद्या दिवशीच मराठी भाषेविषयी प्रेम व्यक्त केल्याने मराठी भाषा कशी विस्तारणार? तिचे संवर्धन कसे होणार? उठता-बसता, येता-जाता, घरी-दारी, कार्यालयात, प्रवासात, प्रत्येक ठिकाणी, दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सात दिवस, महिन्याचे ३० दिवस आणि वर्षाचे 365 दिवस सदासर्वकाळ मराठी भाषेची आठवण ठेवून तिचा वापर निदान मराठी मुलखात तरी का होत नसावा?

मराठी ही सर्वांना समजणारी साधी-सोपी मायभाषा आहे. मराठी भाषेत अवीट गोडवा आहे. शब्द सोपे आहेत. सोबत कठीण शब्दसुद्धा आहेतच. मराठी ही देशातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. सुमारे दहा कोटी लोक मराठी भाषा बोलतात, असे सांगितले जाते. सातासमुद्रापलीकडे पोहोचलेली मराठी माणसे तेथेही मराठीचा डंका अभिमानाने वाजवतात. मराठी भाषिक मंडळे चालवतात. करमणुकीचे आणि संगीताचे मराठी भाषेतील कार्यक्रम आयोजित करतात. त्याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो.

मराठी भाषेवर आणि तिच्या विकासावर संतांचे फार मोठे उपकार आहेत. संत साहित्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे. 'माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।' अशा सार्थ शब्दांत संत ज्ञानदेवांनी मराठी भाषेची महती सातशे वर्षांपूर्वी सांगितली आहे. अध्यात्म आणि तत्वज्ञानविषयक विचार मराठी भाषेत प्रभावीपणे व्यक्त करता येतात, हा आत्मविश्वास, मराठी भाषेविषयीचे प्रेम आणि अभिमान १३ व्या शतकात व्यक्त केला होता.

केवळ व्यक्तच केला असे नव्हे तर 'ज्ञानेश्वरी'सारखा अप्रतिम ग्रंथ लिहून एक संपन्न साहित्यिक वारसा मराठी माणसांसाठी निर्माण केला; तो अमोल ठेवा आहे. इतिहासकार आणि हजारो मराठी साहित्य सारस्वतांनीसुद्धा आपल्या सिद्धहस्त लेखणीतून मराठी भाषा समृद्ध करण्यात आणि तिचे संवर्धन करण्यात मोठे योगदान दिले आहे. प्रख्यात मराठी कवी सुरेश भट यांनी मराठी अभिमान गीत लिहिले आहे. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी।।'

या गीतातून मराठीविषयीचा अभिमान आणि आपुलकी शब्दा-शब्दांतून ठिबकते.
१९६० मध्ये मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. मराठीचे दैन्य संपून मराठीला आता भरभराटीचे दिवस येतील, अशी स्वप्ने त्यावेळी मराठी भाषिकांनी पाहिली होती. मात्र राज्याच्या साठ वर्षांनंतरसुद्धा मराठी भाषा संवर्धनाचे प्रयत्न करावे लागत आहेत. मराठीला तिचे राजवैभव मिळवून देण्याच्या स्वप्नाचा विसर मराठी माणसालाच पडला आहे. 'डोक्यावर भरजरी मुकुट आणि अंगावर फाटकी वस्त्रे लेऊन मराठी भाषा राजदरबारी उभी आहे' अशा शेलक्या शब्दांत कविवर्य कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या दुरवस्थेचे वर्णन केले होते. मराठीची ही दुरवस्था आजही कायम आहे.

किंबहुना मराठी माणसांकडून होणाऱ्या अवहेलनेमुळेच मराठी भाषेला ही अवकळा आली आहे. साहित्य संमेलनांमधून मराठी भाषेच्या विकासाचा दरवर्षी गजर केला जातो. ठरावही वर्षानुवर्षे केले जातात. मात्र नंतर पुढच्या संमेलनापर्यंत ते दप्तरी झोपलेले असतात. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणार्‍या माणसांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

तथापि हिंदी, इंग्रजीसोबतच इतर प्रांतांतील माणसेही महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याने आता त्या-त्या प्रांतांतील बोली भाषा मर्यादित स्वरुपात का होईना; पण भाषेच्या अभिमानापोटी महाराष्ट्रात बोलल्या जातात. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आदी अनेक प्रांतांतून रोजीरोटी वा व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात आलेल्या व मराठी मातीतच रमलेल्या परप्रांतीयांनी मराठी भाषा बर्‍यापैकी आत्मसात केल्याचे जाणवते. महाराष्ट्रात राहायचे तर मराठी बोलता-लिहिता-वाचता आलेच पाहिजे, असा आग्रह धरला जातो.

केवळ कुणाच्या हट्टाखातर नव्हे तर आपण महाराष्ट्रात मराठी माणसांसोबत राहतो, त्यांच्याशी व्यवहार करतो, मराठी माणसांच्या जीवावर पैसा कमावतो, म्हणून आपल्यालाही मराठी भाषा अवगत झाली, असा दृष्टिकोन परप्रांतीयांनी ठेवलेला आढळतो. मराठी माणसांशी संवाद साधणे सोपे व्हावे म्हणून अनेक अमराठी माणसांनी मराठीला आपलेसे केले आहे. मात्र नेमक्या त्याच उद्देशाने मराठीऐवजी इतर भाषेत बोलण्याचा पायंडा मराठी माणसांनी स्वीकारला आहे. व्यवसाय करणे सोपे जावे हा स्वार्थ त्यामागे असला तरी मराठी शिकण्याची त्यांची चिकाटी दुर्लक्षिता येणार नाही.

मराठी भाषेसाठी मराठी माणसे किती प्रयत्न करतात? मराठी भाषेतच बोलणे, मुलांना शिकवण्यासाठी मराठी शाळांनाच पसंती आणि प्राधान्य देणे एवढे किमान ध्येय ठरवले तरी ते सहज करण्यासारखे आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सरकारने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात काही चुका झाल्याच्या बातम्या नुकत्याच काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या. चुका लक्षात आणल्या गेल्या ही चांगली गोष्ट आहे, पण अशा कितीतरी चुका मराठी बोलणार्‍यांकडून होतच असतात.

त्या सुधारण्याबाबत प्रत्येकात भान कधी येणार?
आपण मराठी भाषिक आहोत, याचा अभिमान बाळगण्याऐवजी कमीपणा समजणारी तथाकथित मराठी माणसे 'मराठीपण' लपवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. मराठी माणसांमध्ये वावरताना किंवा सभा-संमेलनांमध्ये भेटीगाठीवेळी मराठी बोलणे कटाक्षाने टाळतात. मराठी बोलायचे झालेच तर जास्तीत-जास्त इंग्रजी शब्दांचा भरणा असलेली मराठी वाक्ये बोलतात.

आडनावातून मराठीपण डोकावू नये म्हणून पहिल्या अक्षराची इंग्रजी आद्याक्षरे वापरणे त्यांना भूषण वाटते. त्यामुळे माणूस मराठी न वाटता दाक्षिणात्य भासतो. तथापि हिंदी वा इंग्रजी बोलले तरी अस्सल मराठी छटा त्याच्या बोलण्यातून डोकावतच असते. मग मराठी बोलणे आणि मराठी असणे का लपवायचे? मराठीचा विकास रोखण्यात आपण मराठी माणसेच कळत-नकळत अग्रेसर आहोत. काही कामानिमित्त गावाकडील मराठी माणसे शहरात किंवा शहरातील माणसे महानगरात जातात.

तेथे एखाद्या दुकानात, उपाहारगृहात दुकानदार, हॉटेलमालक वा सेवकांशी अथवा रिक्षा-टॅक्सीवाल्याशी मराठीऐवजी तोडक्या-मोडक्या हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करतात. समोरचा माणूस मराठी बोलत असला तरी त्याच्या मराठी बोलण्याकडे त्यांचे लक्ष नसते. लक्षात आले तरी ते अर्धवट हिंदी रेटतच राहतात. आपल्याला अनोळखी असलेली व्यक्ती मराठी भाषिक नाहीच, असा सर्रास समज का करून घेतला जातो? दुकानांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेतच हव्यात, केवळ असा आग्रह धरल्याने मराठी भाषेचा विकास कसा होणार? मराठी वाढण्यासाठी आणि तिला योग्य सन्मान मिळण्यासाठी काही करणे बरेचसे आपल्या हाती आहे.

घरी-दारी, कार्यालयात, प्रवासात, खरेदीनिमित्त दुकाने अथवा मॉलमध्ये गेल्यावर, अगदी दूध अथवा भाजीपाला आणण्यासाठी नाक्यावर गेल्यावर विक्रेत्याशी मराठीतूनच बोलण्याबाबत कटाक्ष ठेवावा. आपण मराठी बोललो तर समोरचाही मराठी बोलेल. त्याला मराठी बोलता येत नसेल तर व्यवसायाची गरज म्हणून तो मराठी बोलण्याचा व शिकण्याचा प्रयत्न करेल. अशा छोट्या-छोट्या प्रयत्नांतूनच मराठीचा प्रसार करता येईल. त्यासाठी मोठमोठे समारंभ अथवा सभा-संमेलने घेण्याची गरज नाही.

आंतरजाल (इंटरनेट), ई-पत्र (ई-मेल), लघुसंदेश (एसएमएस), समाज माध्यमांवरील (सोशल मीडिया) संदेश , चलबोल (मोबाईल) यांवर संदेश लिहिण्यासाठी मराठी भाषेच्या कळफलकाचा (की-बोर्ड) पर्याय उपलब्ध आहे. किती मराठी जन मराठी भाषेचा पर्याय निवडतात? मराठीपेक्षा इंग्रजीतून मराठी संदेश देणार्‍यांचीच संख्या सर्वाधिक आहे. हल्ली छोट्या पडद्यावरच्या बातम्या देणार्‍या वृत्तवाहिन्या मराठी भाषेच्या वापराबद्दल फारशा काळजी घेताना दिसत नाहीत. वृत्तवाहिन्यांनी तर मराठी भाषेचे सौंदर्य वा सौष्ठव निकाली काढण्याचा जणू विडाच उचलला आहे. पूर्वी अचूक शुद्धलेखनासाठी वृत्तपत्रांकडे खात्रीने पाहिले जात असे.

हल्ली मात्र अनेक वृत्तपत्रांतून चुकीची शब्दरचना, चुकीचे शब्दप्रयोग तसेच मथळ्यांमध्ये इंग्रजी शब्दांचा आग्रहाने वापर होताना दिसतो. मराठी शब्दांपेक्षा इंग्रजी शब्द त्यांना भारदस्त का वाटतात? काही इंग्रजी शब्दांचा वापर अटळ असला तरी त्या शब्दांना मराठीत चांगला पर्याय उपलब्ध असतो किंवा शोधून घेता येईल. असे मराठी शब्द का वापरले जाऊ नयेत? मथळ्यांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर नसणारी वृत्तपत्रे हल्ली अभावानेच आढळतात. सरकारी पातळीवर मराठी भाषेचा विकास, विस्तार, प्रसार आणि संवर्धन करण्याच्या भरपूर चर्चा होतात. सरकारी कारभारात मराठी भाषेचा वापर गेल्या काही वर्षांत वाढला आहे, असे म्हटले जाते, पण सरकारी कारभारातील मराठी भाषा आणि व्यवहारातील मराठी भाषा यात जमीन-अस्मानाचा फरक जाणवतो.

सरकारी आदेश, परिपत्रके, प्रसिद्धीपत्रके यांतील मराठी भाषा दुर्बोध असलीच पाहिजे, असा कटाक्ष का ठेवला जातो? सरकारी मराठीचे तेच वैभव का मानले जावे ? 'ज्याअर्थी', 'त्याअर्थी' यासारख्या शब्दांपासून सुरुवात होणारी वाक्ये वाचताना अथवा समजून घेताना भल्या-भाल्यांची त्रेधा उडते.

सामान्य मराठी माणसाला समजेल, अशा मराठी भाषेचा वापर सरकारी कारभारात कधीपासून सुरु होणार? मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल बोलताना त्याची सुरुवात सरकारी मराठी भाषा सुबोध करण्यापासून होईल का? त्यासाठी येत्या जागतिक मराठी भाषादिनासारखा सुमुहूर्त दुसरा कोणता असेल? प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेत बोलण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा, मराठी नाटके आणि मराठी चित्रपट पाहण्याचा आग्रह धरला व तसा मनापासून प्रयत्न केल्यास मराठी भाषेच्या संवर्धनासाठी फार प्रयत्न करण्याची गरज उरणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com