ब्लॉग : शोध सामर्थ्याचा : ‘अनुभूती’तून मिळाले आयुष्यभरासाठी आत्मविश्वासाचे इंधन!

ब्लॉग : शोध सामर्थ्याचा : ‘अनुभूती’तून मिळाले आयुष्यभरासाठी आत्मविश्वासाचे इंधन!

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून वंदे भारतम्-नृत्य उत्सव ही राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विद्यार्थी कलावंतांची निवड झाली. निवड झालेल्या कलावंताना राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या सांस्कृतिक पथसंचलनात स्वप्रतिभेचा आविष्कार सादर करण्याची संधी प्राप्त होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकात्मता आणि कला संपदेचा उत्कृष्ट आविष्कार यांचा सुरेख समन्वय असलेला वंदे भारतम उपक्रम आयोजित केला होता. देशभरातील सर्वोत्तम नृत्य प्रतिभा निवडणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या संघाने जिल्हा, राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करून या संघाची प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या सांस्कृतिक पथसंचलनात निवड झाली आहे. या कलावंतांच्या मुलाखती ज्ञानेश्वर शेंडे यांनी घेतल्या आहेत.

1) निर्मल जगदीश राजपूत -

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या निकषांनुसार-नियमानुसार मला अ‍ॅडमीशन मिळाली. अनुभूती स्कूलमधील वातावरणामुळे आमच्यावर खूप चांगले संस्कार झाले. शाळेसाठी नेमलेल्या पुस्तकातील अभ्यासक्रम आम्ही शिकलोच, पण त्यापेक्षाही आयुष्याला आकार देणारे खूप काही इथे मिळत गेले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वक्तृत्व-वादविवाद स्पर्धा, वाद्यवादन, संगीत-नृत्यात सहभाग, नाटकात सहभाग याही कौशल्यांचा विकास या शाळेत झाला. आम्हाला आयुष्यभरासाठी आत्मविश्वासाचे इंधनच इथे प्राप्त झाले. एखाद्या शिंपल्यात मोती असावा तसे आम्ही या शाळेकडे पाहतो. दिल्लीला परेडमध्ये सहभागी होण्याची संधी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांना मिळणे ही राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा वाढविणारी घटना आहे. आनंदासोबत ही कृतज्ञता व्यक्त करणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. जिल्हास्तरावरून, झोनल आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर एकेक स्टेप पार करत पुढे सरकत असताना आदरणीय अशोकभाऊ जैन तन-मन-धनाने आमच्या सर्वांच्या पाठीशी उभे राहिले. तुम्ही हे करु शकता! हे अशोकभाऊंचे शब्द आमच्यासाठी आशीर्वाद ठरले आहेत. आमचे नृत्य शिक्षक नाना सोनवणे व मार्गदर्शक रुपाली वाघ अक्कांनी आमच्यासाठी खूप परिश्रम घेतले.

2) पवन अर्जुन खोंडे -

आज शरीररुपाने भवरलालजी जैन आपल्यासोबत नाहीत, पण आमच्या सर्वांच्या ह्रदयात ते कायम आहेत. आमच्या सर्वांची निवड झाली हे तर त्यांच्याच आशीर्वादाचं फळ आहे. मला दिल्ली परेडमधील सांस्कृतिक कार्यक्रमात निवड झाल्याचा खूप खूप आनंद अआला. आमचे नृत्य शिक्षक नाना सोनवणे यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका मला या लोकनृत्याच्या सादरीकरणात दिली आहे. धनगराची भूमिका मी करतो आहे. खांद्यावर प्रत्यक्ष बकरी नसतानाही, बकरी खांद्यावर आहे असा अभिनय मला हुबेहूब करुन दाखवावा लागतो. दिल्ली परेडमधील निवड हे टिमवर्क आहे, इथे प्रत्येकालाच मेहनत घ्यावी लागते, त्याचं हे फळ आहे! राजपथावर प्रवेश मिळणं ही खरोखरचं खूप मोठी घटना आहे, आयुष्यभर न विसरता येण्यासारखी! मुंबईला आणि दिल्लीला जाण्यायेण्याची, भोजन-निवासाची सोय केलीच शिवाय मुंबई आणि दिल्लीतील काही महत्त्वाची स्थळं दाखवण्याची व्यवस्थाही अशोकभाऊंनी केली. राजपथाचा विचार जेव्हाही माझ्या मनात येतो, त्यावेळी भवरलालजींनी सांगितल्याप्रमाणे एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. 26 जानेवारीच्या परेडसोबत राजपथावर चालायला मिळणार आहे, त्याचा आनंद खरंतर खूप मोठा आहे, अभिमानास्पद आहे ते, मात्र तिथे कदाचित अशी संधी एकदाच मिळणार आहे. आयुष्याच्या राजपथावर चालताना मात्र कर्तव्य भावनेने यशस्वी व्हायचे असेल तर आणि आयुष्याचे सार्थक करायचे असेल तर भवरलालजींच्या विचारांच्या राजपथावर मला चालावे लागणार आहे आणि तोच माझा ध्यास आहे.

अभिमानास्पद कामगिरी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून लोकनृत्य या क्षेत्रात विशेष काही कर्तबगारी सिद्ध करावी म्हणून धडपडतो आहे. माझ्या या परिश्रमाला आदरणीय भवरलालजी जैन आणि अशोकभाऊंच्या आशीर्वादामुळे घवघवीत यश प्राप्त झाले आहे, याचे संपूर्ण श्रेय मी त्यांनाच देतो. अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळणारे राष्ट्रीय व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध होते आहे. नृत्य मल्हारमध्ये आपल्या अनुभूती स्कूलने मोठे यश संपादन केले होते. राष्ट्रीय स्तरावर आपल्या अनुभूती स्कूलचे विद्यार्थी पोहोचले. याचा अभिमान वाटतो.

- ज्ञानेश्वर चावदस सोनवणे (नाना सोनवणे) कलाशिक्षक, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल

3) उमेश दिलीप झुरके -

आमच्या नृत्य संघाचा परेडकरिता समावेश झाला ही खरोखरचं अभिमानास्पद बाब आहे. अनेक गोष्टी सुरुवातीला खूपच कठीण आणि अशक्य वाटतात. वाटा तयार करणार्‍याला खूप त्रास होतो पण इतरांना मात्र त्या वाटेवरुन सहज जाता येते. 26 जानेवारीला दिल्ली येथील राजपथावर परेड सोबत सादर होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता आमच्या नृत्य संघाची निवड झाली आहे, ते या संघातील आम्हा विद्यार्थ्यांचे गुरु नाना सोनवणे सर यांच्या वेळोवेळी योग्य प्रशिक्षणामुुळे. गेल्या तीन महिन्यांपासून दररोज संध्याकाळी आम्ही नियमीतपणे सराव करतो आहे. अशोकभाऊंच्या प्रोत्साहनामुळे पाठबळ मिळते. आम्ही नियमितपणे सराव करुन प्रजासत्ताकदिनी संपूर्ण टीम मिळून उत्कृष्ट सादरीकरण करु, असा दृढ विश्वास आहे.

4) रोशन देविदास पवार-

बेस जितका स्ट्राँग तितकं पिरॅमीड बेटर असतं! हेच खरं आहे. प्रजासत्ताकदिनाकरिता निवड झालेल्या नृत्य संघात पिरॅमीडच्या लिड रोलला आम्ही आहोत. अनुभूती स्कूलमधील ग्रंथालयाने आणि क्रिडांगणाने खूप काही दिलं. पुस्तकांनी आपलं अनुभव विश्व समृद्ध होतं हे खरं आहे. श्यामची आई हे पुस्तक दादाजींनी प्रत्येकालाच दिलं होतं. संवेदनशीलता हे महत्त्वाचं मूल्य आहे. स्पोर्टसमनशीप ही एक उच्च दर्जाची कॉलीटीच आहे! खिलाडूवृत्ती म्हणजे चांगला माणूस असणे, चांगला मित्र असणे! आमच्या क्रिकेट टीमचा मी कॅप्टन होतो. हरणं आणि जिंकणं यापेक्षा प्रत्यक्ष खेळणं किती महत्त्वाचं आहे हे इथल्या क्रिडांगणावर शिकलो. शारीरिकदृष्ट्यासुद्धा खेळणं महत्त्वाचं आहे, व्यायामाची गोडी शाळेने लावली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com