Blog : समाजसेवा करताना मर्यादांचे भान हवे
ब्लॉग

Blog : समाजसेवा करताना मर्यादांचे भान हवे

Sarvmat Digital

किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच एका संघटनेने आवाज उठवला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला आहे. महाराजांनी माफी मागितली तरी या संघटनेच्या नेत्यांची ‘तृप्ती’ व्हायला तयार नाही. कीर्तन ही समाजसेवा आहे. तशी स्त्री-पुरुष समानतेसाठी, भेदाभेद नष्ट करण्यासाठी लढणार्‍या संघटना या देखील समाजसेवाच करतात. मात्र तरीही त्यांच्यात टोकाचा संघर्ष करण्याची उर्मी का निर्माण झाली हा महत्वाचा प्रश्न आहे. आपआपल्या समाजसेवेच्या मर्यादांचे भान न राहिल्यानेच असा प्रसंग उद्भवला आहे.

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली. ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाईंनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करतानाच कायदा हातात घेवून काळे फासण्यासारखे कृत्य करण्याची धमकीही दिली. इंदोरीकर महाराज नगर जिल्ह्यातलेच. तृप्ती देसाई शनीशिंगणापूर येथे महिलांना चौथर्‍यावरुन दर्शनाच्या आंदोलनामुळे जिल्ह्याला परिचित झाल्या. न्यायालयानेही तसा निकाल दिलेला असल्यामुळे महिलांना चौथर्‍यावरुन दर्शन सुरु करावे लागले. कावळ्याने बसण्याची अन् फांदी तुटण्याची एकच वेळ व्हावी तसे त्यांचे झाले. मात्र आपण मोठा इतिहास घडवल्याचे त्यांना वाटत आहे. यावेळी मात्र तशी परिस्थिती नाही.

इंदोरीकरांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असली तरी गुन्हाच दाखल केला पाहिजे असा आततायी आग्रह धरला जात आहे. इंदोरीकरांच्या खास शैलीतील विनोदी कीर्तनामुळे त्यांचा चाहता वर्ग महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला होत असलेला विरोध तीव्र स्वरुपाचा आहे. विज्ञान जे सिद्ध होऊ शकते त्यालाच सत्य मानते. त्यामुळे अध्यात्मात शंभर टक्के विज्ञानाची अपेक्षा करता येणार नाही. देव, धर्म हे श्रद्धेचे विषय आहेत.

वक्तव्याचे समर्थन करणारे एका ग्रंथाचा दाखला देतात. त्यांच्या कीर्तन शैलीवर अगदी कीर्तनकार मंडळींमध्ये देखील मतभेद असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. मात्र या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींनी अधिकारवाणीने त्यांना काही समज दिल्याचे ऐकिवात नाही. कीर्तन हे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. अनेक कीर्तनकारांनी समाजाला दिशा दिली. गाडगेबाबांसारख्या महापुरुषांनी स्वच्छतेचा संदेश दिला. काहींनी भेदाभेद नष्ट करण्यासाठी आयुष्यभर कीर्तन सेवेचे माध्यम वापरले.

कीर्तन शैली कशी असावी, कोणत्या गोष्टींचा आधार घ्यावा यावर या संप्रदायाने निश्चिती करायला हवी. पुराण कथांतील, धार्मिक ग्रंथातील उदाहरणे देवून यापुढे कीर्तने करायची की विज्ञाननिष्ठतेचा नवा मार्ग चोखाळायचा यावर ठाम निर्णय होणे गरजेचे आहे. तसे झाले तर भविष्यात असे प्रश्न प्रसंग उद्भवणार नाहीत.

कीर्तनातून माणूस सुधारतोच असे नाही तसे तमाशाने तो बिघडतोच असेही नाही. त्याची वृत्ती, प्रवृत्ती कशी आहे तो कोणत्या प्रकारे त्याकडे पाहतो, त्यावर विश्वास ठेवतो व ग्रहण करतो यावरच ते अवलंबून असते. जे विचार पटतात. जे अंगिकारणे सोपे वाटते तेच विचार माणूस स्विकारतो. तमाशाला जाणारा तरुण इंदोरीकरांमुळे कीर्तनाकडे वळला असा दावा केला जात आहे.

तमाशातली करमणूक कीर्तनातूनच होऊ लागल्याने हा वर्ग इंदोरीकरांच्या कीर्तनाला येतो असेही काही लोक म्हणतात. त्यांच्या कीर्तनातून विनोदी पद्धतीने चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यांची शैली योग्य की अयोग्य याबद्दल समर्थकांमध्येही मतभेद आहेत. आजच्या काही किर्तनकारांबद्दल समाजाचे मत खरोखरच चांगले राहिलेले नाही. कीर्तनातून विशिष्ट राजकीय व्यक्तींचे सहेतूक कौतुकही केले जाऊ लागले आहे. संप्रदायातील ज्येष्ठांनी त्यामुळे याबाबतही नियमावली करण्याबाबत विचार करायला हवा.

देशात कायदा आहे. प्रशासन व्यवस्था आहे. त्यांना त्यांचे काम करु द्यायला हवे. एखादे कुठे काही घडले की काढा मोर्चे, करा आंदोलने, ठेवा बंद. यामुळे नुकसान शेवटी जनतेचेच होते.

इंदोरीकरांनी माफी मागितल्यानंतर हे प्रकरण आता थांबवायला हवे. एखादा विषय किती लांबवावा यालाही मर्यादा असावी. आपल्याला हवे तसेच झाले पाहिजे तसे झाले नाही तर काहींची ‘तृप्ती’ होत नाही. यामध्ये प्रसिद्धीचा हव्यासच अधिक दिसतो.

अंधश्रद्धा, वाईट रुढी-परंपरा यांचा जनतेने त्याग करुन पुरोगामी मार्ग स्विकारल्याचे आतापर्यंत अनेकदा दिसून आले आहे. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह काही संघटनांचा प्रभाव कमी झाला आहे. विशेषतः तरुण वर्ग त्यापासून दुरावत चालले आहेत. कारण पुर्वीसारखे प्रभावी प्रबोधन त्यांच्याकडूनही केले जात नाही. अशा घटनांचा वापर केल्याने आपल्या संघटनांना ‘टॉनिक’ प्राप्त होईल अशा भ्रमात राहू नये. कारण त्यामुळे उरला सुरला विश्वासही गमावला जाईल.

इंदोरीकर कीर्तनातून कसे वाईट, चुकीचे, अशास्त्रीय बोलतात, महिलांचा कसा अवमान करतात याबाबत तृप्ती देसाई सारख्यांच्या संघटनांनी प्रबोधनाचे काम हाती घेवून समाजप्रबोधनाचे त्यांचे काम केले पाहिजे. समाजाला पटवण्यात त्यांना यश आले तर इंदोरीकरांसारख्यांनी काहीही बोलले तरी जनता ते स्विकारणार नाही.

मात्र देसाई यांना जनतेत जावून हे प्रबोधन करावे लागेल. केवळ कायदा हातात घेण्याची धमकी देवून झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी लक्ष वेधून घेवून काहीच साध्य होणार नाही. उलट समाजसेविका म्हणून असलेला थोडाफार लौकीकही धुळीस मिळेल. जनसेवेचा वसा घेतला आहे त्याच्या चौकटीत राहून समाजसेवा केली तर समाज त्यांच्या विचारांना नक्कीच किंमत देईल.

वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे लक्ष वेधून घेवून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना रोखायला हवे. मोर्चे, बंद अशा आंदोलनांनी खरेच काही साधणार का? याचाही विचार होणे आवश्यक आहे. कथा, कीर्तन प्रवचने हे समाजसेवेचे माध्यम आहे तसे स्त्री-पुरुष समानता, भेदाभेद यासाठी जागृती घडवणे, प्रबोधन करणे ही देखील समाजसेवाच आहे.

मात्र प्रत्येकाने आपल्या समाजसेवेच्या माध्यमाची चौकट समजून घेवून त्यातून कार्य केले तर असे वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. जनतेनेही अशा घटनेतून संधी साधून तीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना थारा देवू नये.

-अशोक पटारे
9404251840

Deshdoot
www.deshdoot.com