स्पंदन : ‘टीआयएसएस’ अर्थात ‘टीस’ नावाचा ब्रान्ड...

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांची पाक्षीक ‘ स्पंदन ’ ब्लॉगमालिका...
स्पंदन : ‘टीआयएसएस’  अर्थात ‘टीस’ नावाचा ब्रान्ड...

१० मे १९९४. याच दिवशी आमच्या संस्थेचा पदवीप्रदान सोहळा झाला. त्याला १० मे २०२१ रोजी सत्तावीस वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने आम्ही बॅचमेट २७ वर्षांनी झूमद्वारे भेटलो. यातले एक दोन फोनवरून संपर्कात होते पण प्रत्यक्ष भेट नव्हती झाली. झूमद्वारे भेटलेले बहुतांशी सहअध्यायी विदेशांमध्ये स्थायिक झाले आहेत. यातील सर्वांनाच १० मे १९९४ नंतर प्रथमच भेटत-बघत होतो. त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९३६ मध्ये एक संस्था मुंबईत स्थापन झाली. ही केवळ भारतातलीच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातली अशा प्रकारची पहिली संस्था. ‘सर दोराबजी टाटा ग्रज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क’ हे त्या संस्थेचं नाव. सर दोराबजी टाटा ट्रस्टने ही संस्था सुरु केली. पुढे १९४४ मध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्था (Tata Institute of Social Sciences-TISS) असं या संस्थेचं नामकरण झालं. ‘सामाजिक कार्य’ या विषयाचं शिक्षण-प्रशिक्षण देणारी ही आशिया खंडातली आद्य संस्था. टाटांच्या दूरदृष्टीला सलाम करावा तेवढा कमीच. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १९५६ मधील कायद्यानुसार या संस्थेला १९६४ मध्ये स्वायत्त विद्यापीठाचा म्हणजेच अभिमत विद्यापीठाचा दर्जा ( Deemed University ) बहाल करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत या संस्थेची वेगवान घोडदौड सुरु आहे. १९८६ मध्ये या संस्थेचा पहिला विस्तार करण्यात आला.आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा ‘रुरल कॅम्पस’ सुरु करण्यात आला. तर 2011 मध्ये हैदराबाद आणि गोहाटी इथं कॅम्पसेस सुरु करण्यात आलेत. या शिवाय नवी दिल्ली, लेह-लडाख आणि पोर्ट ब्लेअर याठिकाणी देखील अध्ययन केंद्रे TISS ने सुरु केली आहेत.

समाजकार्याच्या क्षेत्रात TISS ने केलेली कामगिरी उत्तुंग म्हणावी अशीच आहे. मेधा पाटकर TISS च्याच विद्यार्थिनी. याशिवायही अनेक माजी विद्यार्थी समाजात योगदान देत आहेत. मला या संस्थेत शिकायला मिळालं याचा अभिमान नि आनंद वाटतो. आम्ही शिकत असताना मुंबईत कोणत्याही ठिकाणी फिल्ड व्हिजीट अथवा फिल्ड वर्कसाठी गेल्यावर we are from TISS सांगितल्यावर फार आदराने व आपुलकीची वागणूक मिळायची. मुंबईत काम करणाऱ्या सामाजिक संस्था (NGO) मध्ये मोठ्या संख्येने TISS चे माजी विद्यार्थी दिसून येतात. TISS शिवाय मुंबईत अजून एका संस्थेचा लौकिक दिसून येतो. निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क देखील TISS खालोखाल ख्यातनाम आहे. ही संस्था NN या संक्षिप्त रूपाने ओळखली जाते. TISS च्या विद्यार्थ्यांची सैद्धांतिक बाजू (theory part) भक्कम असते तर NN चे विद्यार्थी क्षेत्र कार्यात (फिल्ड वर्क मध्ये) पारंगत असतात, अशी धारणा त्यावेळी प्रचलित होती. यात नेमकं काय खरं नि काय खोटं हे नाही मला सांगता यायचं. आता काय परिस्थिती आहे याची कल्पना नाही.

झूम मिटिंगच्या माध्यमातून भेटलेले माझे बहुतांशी बॅचमेट (batchmates) परदेशात स्थायिक झाले आहेत. खरं म्हणजे भारतात शिक्षण घ्यायचं नि त्याचा उपयोग परदेशात करायचा हे काही पटत नाही. इथल्या सामाजिक-आर्थिक- राजकीय- व्यावसायिक संरचनेवर टीका करायची, इथे संधी नाही म्हणून विदेशात जायचं असा हा प्रकार.

विदेशात स्थायिक झालेले बॅचमेट उच्चभ्रू-उच्चवर्गीय-सधन सामाजिक संवर्गातले आहेत. त्यांना इथे कोणत्या भेदभावाला सामोरे जावं लागलं ? सिमान्तिक समूहातील, अल्पसंख्यांक समाजातील, अभावग्रस्त समूहातील, शोषित-पीडित समाज घटकातून येणाऱ्या व्यक्तींना जसा त्रास सोसावा लागतो, शोषण सहन करायला लागते, असा अनुभव या अभिजन वर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना अजिबात येत नाही. तरीही त्यांना आपला देश सोडून जावंसं वाटतं, या मागच्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे.

बडोदा इथले सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, पुण्याची कर्वे समाजिक विज्ञान संस्था आणि TISS असे तीन पर्याय मी पदवी नंतरच्या शिक्षणासाठी निवडले होते. TISS ने निर्धारित केलेल्या तारखेपर्यंत तार (पोस्टाची ही सेवा आता बंद झाली आहे.) न आल्यास फोन करायला सांगितले होते. ती तारीख उजाडली. मला निकालाची प्रतीक्षा होती. निवड झाल्याचे समजले आनंद द्विगुणीत झाला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात TISS मधले क्लासेस सुरु झालेत. एकूण १०० मुलांची तुकडी होती. त्यात ७० टक्के मुली तर ३० मुले असं प्रमाण होतं. एक मुलगी जर्मनी मधून आली होती. उत्तर महाराष्ट्रातून निवड झालेला मी एकमेव विद्यार्थी होतो. मराठी भाषक मुलांमध्ये मुंबई-पुणे इथले विद्यार्थी जास्त होते. कोर्स सुरु होऊन दोन आठवडे झाल्यावर माझ्या पदवी परीक्षेचा निकाल लागला. TISS च्या प्रवेश प्रक्रियेत पदवीला किती गुण आहेत याला महत्व नव्हतं. केवळ पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं हीच अट होती. TISS सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाल्याचा आनंद मोठा होता.

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com