Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगब्लॉग : शोध सामर्थ्यांचा : रिक्षा चालकाचा मुलगा पोहोचला राजपथावर!

ब्लॉग : शोध सामर्थ्यांचा : रिक्षा चालकाचा मुलगा पोहोचला राजपथावर!

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून वंदे भारतम्-नृत्य उत्सव ही राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विद्यार्थी कलावंतांची निवड झाली. निवड झालेल्या कलावंताना राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या सांस्कृतिक पथसंचलनात स्वप्रतिभेचा आविष्कार सादर करण्याची संधी प्राप्त होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकात्मता आणि कला संपदेचा उत्कृष्ट आविष्कार यांचा सुरेख समन्वय असलेला वंदे भारतम उपक्रम आयोजित केला होता. देशभरातील सर्वोत्तम नृत्य प्रतिभा निवडणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या संघाने जिल्हा, राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करून या संघाची प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या सांस्कृतिक पथसंचलनात निवड झाली आहे. या कलावंतांच्या मुलाखती क्रमशः देत आहोत.

1) रितीक बाळू पाटील-

- Advertisement -

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून निवड झालेल्या माझ्या सर्व मित्रांवर सर्वाधिक प्रभाव भवरलालजी जैन म्हणजेच दादाजींचा आहे. आमच्या सर्वांचेच रोल मॉडेल ते आहेत. अंधाराकडून उजेडाकडे जाण्यासाठी पुस्तकं मार्ग दाखवतात. गुणवत्तेला संधी मिळाली तर मोठा इतिहास घडू शकतो. आमच्यासारख्या सर्वसाधारण परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्यांना भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने शाळेच्या माध्यमातून वेळोवेळी मोठी संधी उपलब्ध करुन दिली. भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी संपन्न होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात आमच्या नृत्य संघाला मिळणारी संधी ही सुद्धा गुणवत्तेला प्रोत्साहन देणारी अनमोल अशी संधी आहे. वास्तविक पाहता वाद्यवादन वगैरे प्रकाराशी माझा संबंध नव्हता, मात्र या सांस्कृतिक कार्यक्रमात मी धनगर लोकनृत्यात बेसला आहे. शिवाय घुंगरु बीटसही देतो आहे. आज मी जो काही आहे, ज्या क्षमतेसह उभा आहे, ते या शाळेमुळे शक्य झालं आहे. मला एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आहे आणि देशाचा संस्कारक्षम अधिकारी या दृष्टीने नावलौकीक मिळवायचा आहे.

2) विरेंद्र शांताराम ताडे –

पंतप्रधानांच्या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित असलेल्या या सुंदर संकल्पनेविषयी सर्वांनाच आदर भावना आहेत. भारताच्या विविध राज्यातील, अनेक भाषेतील लोकनृत्य सामुहिक एकतेचा सुंदर आविष्कार राजपथावर घडवणार आहेत. भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून पाठवलेल्या नृत्यसंघाची निवड झाली, आणि त्यात मीसुद्धा आहे याचा मला खूप आनंद आहे. जिल्हा स्तरावरुन, झोनल स्तरावर आमची निवड झाली. त्यानंतर नॅशनल लेव्हलवर साडेआठशेच्यावर नृत्य संघ आपापल्या भागातील लोकनृत्य कसे सादर करतात हे जवळून पाहायला मिळाले. लोकनृत्य ही परंपरा कमीकमी होत चालली आहे का, अशी चिंता खरोखरच अनेकांना वाटते. लोकनृत्याला या निमित्ताने इतक्या मोठ्या प्रमाणावर संधी मिळते आहे याचाही आनंद आहे. सर्वच लोकनृत्य अतिशय शिस्तबद्ध वातावरणात मात्र आनंद-उत्साह-जल्लोषात संपन्न होणार आहेत. आमच्या सारख्या विद्यार्थी कलावंतांसाठी हा सोहळा अविस्मरणीय असणार आहे.

अगदी माझ्याविषयी सांगायचं तर या निमित्ताने आदरणीय अशोकभाऊंच्या सहकार्यामुळे मी मुंबई-दिल्ली पाहू शकलो. नृत्य क्षेत्राची मला आवड आहे. या क्षेत्रात करिअर करण्याची मनापासून जिद्द आहे. ती आणि मी पुस्तकातील ती म्हणजे दादाजींच्या सौभाग्यवती कांताबाई भवरलालजी जैन आणि मी म्हणजे स्वतः दादाजी, भवरलालजी जैन. या पुस्तकातील काही भागाचे नाट्य रुपांतरण करण्यात आले. मी अतिशय भाग्यवान आहे मला दादाजींची भूमिका करण्याची संधी मिळाली. या छोटेखानी नाटकातील मला सर्वात आवडलेला भाग म्हणजे, दादाजींनी व्यक्त केलेला महिलांविषयीचा आदर. एकमेकांना सामंजस्याने समजावून घेतल्याशिवाय घरात शांतता राहत नाही हेच खरे आहे.

3) सनी अर्जुन शेटे –

अगदी मनापासून सांगतो, स्वप्नातसुद्धा असा विचार कधीही आला नव्हता, इतकी ही सत्य घटना आहे! आजपर्यंत टिव्हीवर परेड सोबत सांस्कृतिक झांकीयां पाहिल्या होत्या मात्र, या वर्षी आपण आणि आपला नृत्य संघ त्यात असणार आहे ही खरोखरचं आनंदाची आणि आर्श्चयाची घटना वाटते आहे. गुणवत्ता गरिबांच्याही घरातल्या मुलांमध्ये असते, ती गुणवत्ता पारखी आणि दातृत्ववान व्यक्तीलाच जाणवते. भवरलालजींसारखं आम्हाला व्हायचे आहे. निसर्गाच्या सहवासात राहायला मला आवडेल. आर्थिकदृष्टीने संपन्न व्हायचे आहे मात्र इतरांनाही शक्य असेल तितकी मदतही करायची आहे. मला अ‍ॅप डेव्हलपर्स व्हायचं आहे.

4) रोहन भिला चव्हाण –

मला स्वतःच्या कष्टाने उभे राहयचे होते. स्वतःला तपासून पाहायचे होते. कोरोनाच्या काळात मला अगदी जवळून दुनियादारी काय असते हे समजले. अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचा मी विद्यार्थी आहे. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वक्तृत्व, संगीत, गीत गायन, वाद्यवादन, नाट्यकला अशा अनेक छंदातून आम्ही प्रशिक्षित झालो. माझ्या कला नैपुण्याची सरांनी पारख केली, मला प्रोत्साहन देऊन घडवलं, म्हणूनच मीही प्रजासत्ताकदिनानिमित्त निवड झालेल्या नृत्य संघात सहभागी आहे. अशोकभाऊंच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही सर्व विद्यार्थी एवढ्या धाडसाने सर्वकाही उपक्रमात सहभागी होत आहोत. माझे वडील रिक्षा चालवतात. दिल्लीला राजपथावर जाण्याचे स्वप्न आम्ही कधीही पाहिले नव्हते.

दरवर्षी टिव्हीवर स्वातंत्र्यदिनाचा व प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम पाहत असतो. माझे वडिल एकदा सहज म्हणाले होते, दिल्लीला राजपथावर चालताना तुला पहायचे आहे! मी म्हणालो होतो, तसे झाल्यास मी खरोखरच भाग्यवान राहिलं! सर्वाधिक मोठा आनंद हाच आहे की, माझ्या वडिलांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी दिल्लीच्या राजपथावर संपन्न होणार्‍या सांस्कृतिक झांकीयांमध्ये आम्ही आमची कला सादर करणार आहोत. आमच्या नृत्य संघाने वेळोवेळी सूचनांनुसार काही महत्त्वाचे बदल केले म्हणूनच आता आमचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या