Friday, April 26, 2024
Homeब्लॉगस्पंदन : रिमझिम गीरे सावन...

स्पंदन : रिमझिम गीरे सावन…

पावसाळा सुरु झाला की हिंदी-मराठी चित्रपटातली पाऊस गाणी, पावसावरली मराठी भावगीतं हमखास आठवायला लागतात. यावर्षी तसा पाऊस उशिरानेच दाखल झाला. काही भागात भरपूर तर काही ठिकाणी अत्यंत थोडा. नाशिक आणि परिसरात अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये. त्याच्या प्रतीक्षेत केवळ शेतकरीच नाही तर सारेच चातकासारखी वाट पाहताहेत. पाऊस सर्व सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी किती आवश्यक आहे, हे नव्याने सांगण्याची गरज वाटत नाही. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात काही दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याने शहरवासीयांना पाणी कपातीला सामोरे जायला लागण्याचा इशारा संबंधित यंत्रणेने दिला आहे. पण अशी वेळ येणार नाही, अशी आशा करू या. नाशिकच नव्हे तर नंदुरबार-धुळे परिसरात देखील पावसाने दडी मारल्याच्या बातम्या आहेत. म्हणजे उत्तर महाराष्ट्रावर वरुण राजा रुसलेला दिसतो. वरण राजाचा रुसवा लवकरात लवकर दूर होओ ही सदिच्छा व्यक्त करू या.

तर विषय आहे पाऊस गाण्यांचा. प्रख्यात कवी मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून साकार झालेलं ‘श्रावणात घन नीळा बरसला’ हे श्रीनिवास खळ्यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं आठवल्याशिवाय श्रावणाची रंगत लक्षात येत नाही. तर ‘रिमझिम गीरे सावन..सुलग सुलग जाए मन…’ हे ‘मंझील’ चित्रपटातलं अमिताभ-मौसमी चटर्जी यांच्यावर चित्रित झालेलं गाणं पावसाळा सुरु झाल्याची जणू काय वर्दीच देतं. कवी योगेश यांनी लिहिलेलं आणि राहुलदेव बर्मन यांनी स्वरसाज चढवलेलं चिरतरुण गीत. येणाऱ्या अगणित पावसाळ्यांत हे गाणं एकवलं जाईल..एकलं जाईल यात तिळमात्र शंका नाही. किशोरकुमार यांनी गायलेलं हे भावमधुर गीत आजही तेवढेच ताजेतवाने नि नवंचं वाटतं. फार कमी लोकांना माहिती असेल की हेच गाणं लताने देखील म्हटलं आहे. या गाण्याचा मुखडा सारखा असला तरी यातले मधले शब्द मात्र वेगळे आहेत. यातून चित्रपटाच्या नायिकेच्या मनाची भावना व्यक्त झाली आहे. या गाण्यातून तत्कालीन मुंबईचं घडवलेलं दर्शन फारच विलोभनीय असं आहे. १९७९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. म्हणजे ४२ वर्षे जुन्या असलेल्या या गाण्याची खुमारी आजही टिकून आहे. हे किशोरकुमारच्या आवाजातलं गाणं तुफान लोकप्रिय आहे मात्र लताच्या आवाजातली आवृत्ती मात्र इतकी गाजली नाही, हे विशेष !

- Advertisement -

फार लोकप्रिय नसलेलं पण पावसाळ्यात हमखास एकावंस वाटणारं एक युगल गीत म्हणजे ‘अब के सावन मे जी डरे..रिमझिम तन पे पानी गिरे…’ हे गाणं आधीच्या गाण्यापेक्षाही जास्त जुने. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जैसे को तैसा’ या जितेंद्र-रीना रॉय अभिनित चित्रपटातलं. ‘लता-किशोर-राहुलदेव बर्मन-आनंद बक्षी’ या सर्जकांची एक बहारदार निर्मिती. पडद्यावर साकारलेला धुंद पावसाळी वातावरणाचा थोडासा उन्मादक आविष्कार म्हणजे हे ठेकेदार गाणं! याच गाण्यावर बेतलेलं एक गाणं १९९८ मध्ये आलेल्या आमीर खान-राणी मुखर्जी यांच्या ‘गुलाम’ या चित्रपटात संगीतकार जतीन- ललित यांनी दिलं आहे. “आंखोसे तूने ये क्या कह दिया..दिल ये दीवाना धडकने लगा..’’ रूढार्थाने हे गाणे पावसाचे वर्णन करणारे नाही. पण याचं चित्रीकरण पावसांत झालेलं असून जुन्या गाण्याच्या तुलनेत ते जास्त उन्मादक नि आव्हानात्मक आहे. गीतकार समीर यांनी लिहिलेल्या या गाण्याला अलका याज्ञीक व कुमार सानू यांचा आवाज लाभला आहे. सख्खे भाऊ असलेल्या जतीन-ललित या संगीतकार जोडीची अख्खी कारकीर्दच आर.डी. बर्मनच्या चालींवर घडलेली आहे. हे पण एक महत्वाचं नि उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. मात्र शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, नदीम-श्रवण या गाजलेल्या जोड्यांप्रमाणे त्यांची जोडी अतूट राहिली नाही. ते कालांतराने वेगळे झाले. कल्याणजी-आनंदजी या भावांचा आदर्श त्यांना ठेवता आला नाही, हे दुर्दैव. संगीतकार नदीम-श्रवण जोडीतल्या नदीमने लंडनला पलायन केल्यावर यांना चित्रपट मिळणे जवळपास बंद झाले होते. याचा फायदा जतीन-ललित यांना झाला. काही काळ ते शिखरावरचे संगीतकार झाले होते. पण दोघा भावांत मतभेद झाल्याने त्यांची जोडी विभक्त झाली. परिणामी चित्रपट मिळणे देखील थांबले. हिंदी चित्रपट गाण्यांच्या रसिकांना मात्र त्यांच्या गाण्यांपासून वंचित राहावे लागले. आर. डी. च्याच चाली ते वापरत असले तरी त्यांच्या गाण्यांत मेलडी असायची, हे मात्र नक्की!

कविवर्य मंगेश पाडगावकर हयात असेपर्यंत ‘लिज्जत पापड’ साठी एक पावसाळी कविता लिहित. ती सर्व वर्तमानपत्रातून लिज्जतच्या जाहिरातीसमवेत प्रसिद्ध व्हायची. त्या काळात गंमतीने असं म्हटलं जायचं की पाडगावकर जो पर्यंत लिज्जत साठी पावसाची कविता लिहित नाही तोवर पावसाळा सुरु होत नाही ! गेली अनेक वर्षे हा प्रघात सुरु होता. खरं म्हणजे पाडगावकरांनी ‘लिज्जत पापड’ करिता लिहिलेल्या कवितांचा संग्रह काढायला हवा. कदाचित निघाला पण असेल पण मला त्याची कल्पना नाही. आमच्या लहानपणी पावसावरची बालगीते देखील आवर्जून ऐकली जायची. अर्थात रेडीओवर. सांग-सांग भोलानाथ पाउस पडेल काय , आई मला पावसात जाऊ दे, पाऊस आला वारा आला, ये रे ये रे पावसा रुसलास का ? यासारखी गाणी आजही आठवली की मन बालपणीच्या आठवणींमध्ये रममाण होत हरवून जातं.

मराठी रसिकांना पावसळ्यात हमखास आठवणारं गाणं म्हणजे ‘बाई या पावसानं…’ पु. ल. देशपांडे यांचं नि सबकुछ (गीतकार-संगीतकार-गायक) ‘पुल’ असलेलं. कविश्रेष्ठ ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो..झाडांची हलती पाने’ ही कविता विसरून कशी चालेल? मराठीतल्या दोन श्रेष्ठ गायकांनी ही कविता स्वतंत्रपणे गायली आहे. अरुण दाते आणि पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी. संगीतकार यशवंत देव यांनी कवितेच्या आशयाला सर्वार्थाने न्याय देणारी चाल बांधली आहे. दस्तुरखुद्द कविराज ग्रेस यांनी पद्मजाच्या आवाजातल्या या गाण्याला मुक्त कंठाने दाद दिली होती! पावसाळी वातावरणाचा अनोखा फील देणारं अजून एक गाणं- ‘’चिंब पावसानं रान झालं आबादानी…’’ ही रचना कवी ना. धों. महानोर यांची. तर संगीत हृदयनाथ मंगेशकरांचे. लता-सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत ‘सर्जा’ या चित्रपटातले. या चित्रपटाचा विषय ऐतिहासिक, शिवकालीन. पण गाणी मात्र प्रेम आणि निसर्गाचं वर्णन करणारी. म्हणून त्या काळात चित्रपटाच्या गीतकार ( कवी ना. धों.) व संगीतकार (हृदयनाथ) यांच्यावर समीक्षकांनी टीका देखील केली होती !

सांग ना रे पावसाला…, एका पावसात दोघांनी भिजायचे…, आला आला वारा संगे पावसाच्या धारा…, झुंजूर मुंजुर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलचिंब झालं रं… यासारखी मराठी आणि आज रपट जाए तो…, रिमझिम रिमझिम भिगी भिगी ऋत मे…, रिमझिम के तराने लेके आयी बरसात…,अहा रिमझिम के प्यारे प्यारे गीत लिये…, बादल यू गरजता है…यासारखी अनेक हिंदी गाणी आपला पावसाळ्यातला आनंद द्विगुणीत करतात…

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या