Friday, April 26, 2024
Homeब्लॉगBlog : झेलू किती-किती पावसाळे...!

Blog : झेलू किती-किती पावसाळे…!

पुणे | पुष्पा सदाकाळ

घन सावळा माधव,
याच्यासाठी धरित्रीनं झुरावं
गर्भारता काळी आई,
हिरव्या रंगी मग खुलावं…

वैशाख वणव्याने होरपळून निघालेली काळी आई! तिला हे प्रिय पावसा, तुझ्या येण्याची केवढी अपूर्वाई…! साऱ्या चराचर सृष्टीचा तू हवा हवासा आहेस. तूच तर चैतन्याचा गाभा! तुझ्या आगमनाने साऱ्या सृष्टीचं रूप पालटून जावं आणि प्रेमवीरांनी तुझ्यात मनसोक्त भिजावं, तेही अंतर्बाह्य…! तुझ्या त्या अलवार स्पर्शात चिंब-चिंब भिजता नखशिखांत मोहरावं…

- Advertisement -

इंद्रधनुच्या सप्तरंगी कमानीत आनंदाचा फुलवत मोरपिसारा, दिलखुलास हसावं. लहान-लहान पिटुकली ही, उघड्या अंगी अंगणी आनंदाचा साठा लुटत बागडताना पाहून मन कसं तृप्त व्हावं! हे पावसा, तूच तर जीवन आहेस. तू जगण्याचं सार आहेस. तू प्रीतीचा सागर तर विपुल धनधान्य लक्ष्मीचा आगर तूच…! तू पिला-पाखरांचा गाई-गुरे, साऱ्या जीवसृष्टीचा अन्नदाता आहेस. हिरव्या रानाची शान आहेस. कोकिळकंठी मधुर गान तूच रे. तुझ्यामुळे मातीचा रोम-रोम पुलकित होऊन मृद्गंध सारा आसमंत मोहून टाकतो.

आणि मग अंकुर फुटू लागताच धरित्रीचे ते साजिरे-गोजिरे रूपडे किती मोहक आणि त्यावरचा तो दवबिंदूंचा लखलखणारा अमोल रत्नहार! तूच तर मधुमास श्रावणाचा प्राणनाथ तर यौवनातल्या फुलवारीतला तू प्रणय क्रीडेता…! डोंगरमाथ्यावरून, नदीनाल्यातून, सुसाट वेगे पळतो तर कधी नवतरुणीच्या कृष्णकुंतलातून अलवार ओघळतो.

झाडेवेलींमधून प्राजक्तासम टप्टप् पडतो. तुझी मेघगर्जना, तडमताशा, धुडुमधाड वाजत कोसळतो. सौदामिनीच्या नृत्यात लखलखून नूर आगळा तू दावितो. तुझी लागता चाहुल मयूरही फुलवून पिसारा नाचू लागतो. हे प्रिय पावसा, तू शृंगाराची मीलनरात्र तर तुझ्या चिंबचिंब भिजण्यानं पुलकित सारी गात्र…!

तू छेडल्या सतारीचा सूर, तुझा वेगळ्याच ढंगाचा नूर… हे पावसा, तूच आमची समृद्ध जीवनबाग आहेस. तू तर माहेरवाशिणींचा हर्ष आणि म्हणूनच स्वागतही तुझे करतात त्या सहर्ष…! कधी गाणी, फुगड्या, झिम्मा खेळता नटती, शालू-पैठणीत शोभती…

पुरणपोळी स्वाद मिष्टान्न चाखती, केवळ पावसा तुझ्याच येण्याने बरे… तूच आनंदाचा झुला! तुझ्या रस्त्याच्या पाण्यातून, कधी डबक्यातून सोडत नावा हसवतो तूच त्या सानुल्या…! हर्ष वाऱ्याच्या झुल्यात. स्वप्ने साकारती कितीतरी मनात…!

तुझी आनंदाची घेता टाळी, तुजवर भाळते राधा काळी…! अशी शृंगारी हिरव्या रंगी सुवासीन धरा नटते. पानांच्या सळसळीतून हलकेच गूज सांगून जाते. सारं वातावरण निर्मळ, सुंदर आणि नवचैतन्यानं न्हाऊन जातं.

मग हा बळीराजा गातो आनंदे भल्लरी,
तुका म्हणे सोयरे आम्हा वृक्ष वल्लरी…

या पहिल्या पावसाने माझ्या मनी घुमतो पारवा, चातकापरी वाट पाहतो हा ऋतु चक्राचा खेळ नवा.
हा पहिला पाऊस साऱ्या सृष्टीला मनाला आनंद तर देतोच,पण उष्म्याने होरपळून निघालेल्या काळ्या आईला सुखावून जातो. तृप्त करतो.
पहिल्या पावसाचे सोहळे
स्वप्नांना लागती डोहाळे,
हिरव्या रंगाचं पाहण्या सपान
झेलू किती-किती पावसाळे…!

- Advertisment -

ताज्या बातम्या